(पारीत व्दारा श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक-08 ऑक्टोंबर, 2021)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 सौ.छबीला भरणे, सावकार आणि विरुध्दपक्ष क्रं-2 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, लाखांदूर यांचे विरुध्द विरुध्दपक्ष क्रं 1 हिचे कडे गहाण ठेवलेले सोने परत मिळावे तसेच आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्याची शेती मौजा राजनी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे असून सदर शेतीचा गट क्रं 453 असा आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 सौ.छबीला दुधराम भरणे ही लक्ष्मी ज्वेलर्स मौजा डोकेसरांडी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे सोने चांदी खरेदी-विक्रीचाव्यवसाय करीत असून महाराष्ट्र शासना कडून तिने सावकारीचा परवाना मिळविलेला आहे. त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कडून दिनांक-10.11.2014 रोजी शेतीकामा करीता रुपये-25,00/- कर्ज घेतले आणि त्या बदल्यात विरुध्दपक्ष क्रं 1 कडे 7 नग मणी, 2 नग डोरमणी व 1 नग डोरला असे सोन्याचे दागीने गहाण ठेवले होते, त्या बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 हिने पावती क्रं 1606 तक्रारकर्त्याला दिली होती. सन-2014-2015 या वर्षात शेतात फारसे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागीने सोडविले नाही. दरम्यानचे काळात महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्दोग शासन निर्णय क्रं-एसएलए-1015/प्रक्रं-25/7-स दिनांक-10.04.2015 अनुसार परवानाधारक सावकारां कडून घेतलेल्या शेतक-यांच्या थकीत कर्जास माफी दिल्याचे जाहिर करण्यात आले. तो शेतकरी असल्यामुळे शासनाचे कर्ज माफी योजनेचा फायदा मिळण्यास पात्र होता, त्यामुळे त्याने कर्ज माफी मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 सावकार आणि विरुध्दपक्ष क्रं -2 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना लेखी हमी पत्र दिले. परंतु त्याला सदर योजने प्रमाणे कर्ज माफी मिळाली नाही वा त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागीने परत मिळाले नाही. त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे विचारपूस केली परंतु उडवा उडवीची उत्तरे देण्यात आलीत.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-01.09.2018 रोजी त्याला विरुध्दपक्ष क्रं 1 सावकार हिचेवर पोलीस स्टेशन लाखांदूर, जिल्हा भंडारा यांनी भा.दं.वि. चे कलीम 420, 406 अन्वये गुन्हा नोंद झाल्याची बाब समजली. विरुध्दपक्ष क्रं 1 सावकार हिने फसवणूक करण्याच्या उद्देश्याने तक्रारकर्त्याला सोने गहाण ठेवल्याची बनावट पावती देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि त्यामुळे त्याला आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून त्याने वकीलांचे मार्फतीने दिनांक-10.10.2018 रोजी दोन्ही विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठवून विरुध्दपक्ष क्रं 1 सावकार हिने गहाण ठेवलेले सोन परत करण्याची तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 वर कार्यवाही करण्याची मागणी केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळला नाही. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं 1 कडे गहाण ठेवलेले साने म्हणजेच 07 नग मणी, 02 नग डोरमणी व 01 नग डोरला तसेच रुपये-50,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 हिने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-50,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. सदर प्रकरणात जिल्हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1) सौ.छबीला दुधराम भरणे हिला रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील झाल्या बाबत रजि.पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस तामील होऊनही विरुध्दपक्ष क्रं 1 ही जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयात उपस्थित झाली नाही वा तिने आपले कोणतेही लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 सौ.छबीला दुधराम भरणे हिचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-05.09.2019 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था लाखांदुर, जिल्हाभंडारा यांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्दोग विभाग, मुंबई यांचे शासन निर्णय क्रं-एसएलए-1015/प्रक्रं-25/7-स दिनांक-10.04.2015 अनुसार मराठवाडा व विदर्भातील ज्या शेतक-यांनी परवानाधारक सावकारा कडून कर्ज घेतलेले आहे व सदरचे कर्ज दिनांक-30.11.2014 रोजी प्रलंबित आहे अशा शेतक-यांचे कर्ज माफ करण्याची योजना जाहिर केली होती. सदर योजने मध्ये परवानाधारक सावकारांनी त्यांचे कडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांची नावे प्रलंबित कर्ज व व्याजाच्या रकमेच्या तपशिलासह विहित नमुन्यातील प्रस्ताव तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे दाखल करावयाचे होते. सदर योजने प्रमाणे 7/12 धारक शेतकरी हा कर्ज माफी मिळण्यासाठी पात्र होता तसेच सदर शेतक-याने परवानाधारक सावकारा कडून घेतलेल्या कर्जाची नोंद ही सावकाराचे अभिलेखात म्हणजे कर्ज खतावणी, रोकड वही मध्ये होणे आवश्यक होते. विरुध्दपक्ष क्रं-1) सौ.छबीला दुधराम भरणे हिने सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांचे कडून सावकाराचा परवाना मिळविलेला होता. तक्रारकर्त्याने परवानाधारक सावकार सौ.छबीला भरणे हिचे कडून पावती क्रं-1606, पावती दिनांक-10.11.2014 अनुसार सोन्याचे दागीने गहाण ठेऊन रुपये-2500/- कर्ज घेतले होते परंतु तक्रारकर्त्याने घेतलेल्या कर्जाची नोंद विरुध्दपक्ष क्रं 1 हिने तिचे कर्ज खतावणी, रोकडवही या नोंदवही मध्ये घेतल्याचे दिसून आले नाही. शासन परिपत्रका नुसार सावकाराने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये तक्रारकर्त्याचे समाविष्ट नसल्यामुळे त्याचा कर्जमाफीचा प्रस्ताव तहसिलदार, लाखांदूर यांचे अध्यक्षतेखालील छाननी समिती मध्ये ठेवता आला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 सावकार हिचे कडील रेकॉर्डची तपासणी केली असता त्यामध्ये तक्रारकर्त्याने घेतलेल्या कर्जाच्या नोंदी कर्ज खतावणी, रोकडवही यामध्ये आढळून आल्यानाहीत. त्यामुळे तक्रारकर्त्यास शासनाच्या योजने प्रमाणे कर्ज माफी योजनेचा लाभ देता आला नाही असे विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी नमुद केले.
05. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री पराग बी.ठेंगरे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 तर्फे कोणीही मौखीक युक्तीवादाचे वेळी उपस्थित नव्हते.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे लेखी उत्तर, शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद तसेच दाखल दस्तऐवज याचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन केले असता खाली मुद्दे न्याय निवारणार्थ जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता हा विरुदपक्ष क्रं 1 हिचा ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | त.क.ने वि.प.क्रं 1 परवानाधारक सावकार हिचे कडे सोन्याचे दागीने गहाण ठेऊन उचलेल्या कर्जाच्या नोंदी रोकडवही/खतावणी मध्ये न ठेवल्याने त्याला शासनाचे थकीत कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने वि.प.क्रं 1 हिने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
03 | त.क.ला शासनाची थकीत कर्ज माफी योजना मिळाली नाही यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था हे जबाबदार असल्याची बाब सिध्द होते काय? | -नाही- |
04 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 ते 4
07. विरुध्दपक्ष क्रं 1 सौ.छबीला दुधराम भरणे ही परवानाधारक सावकार असल्याची बाब विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक, सहाकरी संस्था लाखांदूर यांनी आपल्या उत्तरातून मान्य केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 ही लक्ष्मी ज्वेलर्स, डोकेसरांडी या ठिकाणी सोने चांदी गहाणाचा व्यापार करते ही बाब
तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेल्या पावती क्रं-1606, पावती दिनांक-10.11.2014 वरुन सिध्द होते. सदर पावती अनुसार तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 हिचे कडून रुपये-2500/- कर्ज घेतल्याचे आणि त्या बदल्यात 07 नग मणी, 02 डोरमणी आणि 01 डोरला गहाण ठेवल्याचे सदर पावती मध्ये नमुद असून सदर पावतीवर त.क. आणि वि.प.क्रं 1 यांच्या सहया देखील आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 चा “ग्राहक”होत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे दरम्यानचे काळात महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्दोग शासन निर्णय क्रं-एसएलए-1015/प्रक्रं-25/7-स दिनांक-10.04.2015 अनुसार परवानाधारक सावकारां कडून घेतलेल्या शेतक-यांच्या थकीत कर्जास माफी दिल्याचे जाहिर करण्यात आले. तो शेतकरी असल्यामुळे त्याने कर्ज माफी मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 सावकार आणि विरुध्दपक्ष क्रं -2 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना लेखी हमी पत्र दिले. परंतु त्याला सदर योजने प्रमाणे कर्ज माफी मिळाली नाही वा त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 कडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागीने परत मिळाले नाही. या संदर्भात त्याने शासन निर्णयाची प्रत पुराव्या दाखल सादर केली. त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे कर्ज माफी योजनेचा लाभ मिळण्या बाबत भेटी दिल्यात परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखात कर्ज माफीचा लाभ मिळण्यासाठी वि.प.क्रं 1 व क्रं 2 यांचेकडे सर्व आवश्यक कागदपत्र व हमीपत्र वेळेच्या आत दिल्याचे नमुद केले.
09. विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था लाखांदूर यांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रात असे नमुद केले की, संबधित शेतक-याने कर्ज घेतल्याच्या नोंदी या परवानाधारक सावकाराने त्याचे कडील रोकडवही, कर्ज खतावणी, भांडवल रजिस्टर तसेच गहाण ठेवल्याचे पावती बुक मध्ये असणे आवश्यक आहे. परवानाधारक सावकारांनी त्यांचे कडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांचे प्रलंबित कर्ज रक्कम, व्याज इ. तपशिलासह कर्ज माफी प्रस्ताव सहकार विभागाकडे दाखल करणे आवश्यक आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था लाखांदूर यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 सावकार हिचे कडील रेकॉर्डची तपासणी केली असता त्यामध्ये तक्रारकर्ता श्री देवचंद अन्नाजी कावळे याने गहाण ठेवलेल्या सोन्याच्या नोंदी आढळून आल्या नाहीत तसेच त्यांना देण्यात
आलेली दुय्यम प्रत सावकाराच्या रेकॉर्डला दिसून आली नाही. महाराष्ट्र शासनाचे निर्णया नुसार दिनांक-30.11.2014 रोजी प्रलंबित कर्ज आहे अशा शेतक-यांना कर्ज माफीचा लाभ देण्या बाबतची योजना होती. सदर कर्ज माफी संबधाने तालुका स्तरावर तहसिलदार लाखांदूर यांचे अध्यक्षते खाली समीती स्थापन करण्यात आली होती व त्या समीती मध्ये लेखापरिक्षक, सहकारी संस्था, लाखांदूर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लाखांदूर हे सदस्य होते. शासन निर्णया नुसार सावकारांच्या रेकॉर्डची तपासणी करण्या करीता एस.एस.मते, लेखा परिक्षक, श्रेणी-2 सहकारी संस्था, साकोली यांची नियुक्ती केली असता त्यांनी दिनांक-19.10.2015 रोजी दिलेल्या अहवाला मध्येतक्रारकर्ता श्री देवचंद अन्नाजी कावळे याने दिनांक-10.11.2014 रोजी उचल केलेल्या कर्जाची नोंद विरुध्दपक्ष क्रं 1 हिचे रेकॉर्डला नसल्या बाबत कळविले आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याचा कर्ज माफीचा प्रस्ताव छाननी समिती समोर आलेला नसल्याने त्याला कर्ज माफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 सौ.छबीला दुधराम भरणे हिचे विरुध्द झालेल्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लाखांदूर यांनी रेकॉर्डची पाहणी केली असता सदर गहाण पावत्या रेकॉर्डला आढळून न आल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन, लाखांदूर येथे केलेल्या तक्रारी वरुन संबधित खातेदारांना बनावटा पावत्या दिल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 सौ.छबीला भरणे हिचे विरुध्द एफ.आय.आर. नोंदविण्यात आलेला आहे. अशाप्रकारे त्यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीची दखल घेऊन विरुध्दपक्ष क्रं 1 विरुध्द पोलीस मध्ये कार्यवाही केलेली असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती शपथपत्रा मध्ये केली.
10. विरुध्दपक्ष क्रं 1 हिला जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळाल्या बाबत पोस्टाची पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस मिळूनही ती जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाली नाही वा तिने लेखी निवेदन सादर केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये तिचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. तक्रारकर्त्याची तक्रार सत्यापनावर असून त्याने पुराव्या दाखल शपथपत्र सुध्दा दाखल केलेले आहे त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार आणि त्याने दाखल केलेले दस्तऐवज यावरुन सदर तक्रार जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे गुणवत्तेवर (On Merit) निकाली काढण्यात येते.
11. जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे अभिलेखावरील विरुध्दपक्ष क्रं 1 हिचे विरुध्द पोलीस स्टेशन लाखांदूर यांचेकडे दिनांक-24.08.2015 रोजी केलेल्या एफ.आय.आर. प्रतीचे अवलोकन केले असता विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक यांचे कथनास पुष्टी मिळते. सदर एफ.आय.आर. मध्ये विरुध्दपक्ष क्रं 2 हिने ईनमटॅक्स वाचविण्यासाठी गहाण प्रकरणात बनावट पावत्या दिल्या बाबतची तक्रार नमुद आहे.
12. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 हिचे कडून सोन्याचे दागीने गहाण ठेऊन कर्ज उचल केल्याची बाब वि.प.क्रं 1 हिने फर्मचे नावे दिलेल्या पावती वरुन सिध्दहोते. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लाखांदूर यांचे लेखी उत्तर व शपथे वरील पुराव्या वरुन ही बाब सिध्द होते की, विरुदपक्ष क्रं 1 हिने सोने दागीने गहाण ठेऊन कर्ज उचल केलेल्या शेतक-यांना बनावट पावत्या देऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि त्यासंबधात तिचे विरुध्द पोलीस स्टेशन, लाखांदूर येथे एफ.आय.आर. नोंदविल्याची बाब एफ.आय.आर.चे प्रती वरुन सिध्द झालेली आहे.
13. महाराष्ट्र शासनाचे निर्णया नुसार दिनांक-30.11.2014 रोजी प्रलंबित कर्ज असलेल्या शेतक-यांना कर्ज माफीचा लाभ देण्याची योजना होती आणि तक्रारकर्ता श्री देवचंद अन्नाजी कावळे याने दिनांक-10.11.2014 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 हिचे कडून सोन्याचे दागीने गहाण ठेऊन रुपये-2500/- रकमेचे कर्ज उचललेले असल्याने त्याला निश्चीतच सदर शासन निर्णया प्रमाणे कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला असता परंतु वर नमुद केल्या प्रमाणेतक्रारकर्त्याच्या कर्ज उचल गहाण नोंदी विरुध्दपक्ष क्रं-1 हिने रोकडवही / खतावणी / गहाण पुस्तीके मध्ये न केल्यामुळे आणि तक्रारकर्त्यास बनावट पावती दिल्याने सदर कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नाही या सर्व प्रकारासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 ही एकमेव जबाबदार आहे आणि अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 हिने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.
14. वर नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 हिने कर्ज व्यवहाराच्या योग्य नोंदी न ठेवल्या मुळे तक्रारकर्त्याला कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. तक्रारकर्त्या सोबत अन्य शेतक-यांच्या तक्रारी गेल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी लेखा परिक्षकां मार्फत चौकशी करुन त्यांनी दिलेल्या अहवाला नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 हिचे विरुध्द पोलीस मध्ये एफ.आय.आर. नोंदविल्याची बाब एफ.आय.आर.च्या प्रतीवरुन सिध्द होते त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याचे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 3 चे उत्तर “नकारार्थी” नोंदवित आहोत.
15. वर नमुद केल्या प्रमाणे मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर “होकारार्थी” आल्याने मुद्दा क्रं 4 प्रमाणे तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 हिचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. विरुध्दपक्ष क्रं-1 हिने तक्रारकर्त्याचे कर्ज प्रकरणात अभिलेखा मध्ये योग्य नोंदी न ठेवल्याने त्याला शासन योजने प्रमाणे कर्ज माफी मिळाली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याला त्याने विरुघ्दपक्ष क्रं 1 लक्ष्मी ज्वेलर्स, डोकेसरांडी यांचे कडे पावती क्रं-1606, पावती दिनांक-10.11.2014 अनुसार 07 नग मणी, 02 डोरमणी, 01 नग डोरला असे गहाण ठेवलेले सोन्याचे दागीने विरुध्दपक्ष क्रं 1 हिने परत करावेत असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 1 हिने तक्रारकर्त्याला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं 1 हिने तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लाखांदूर, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्या मुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं 1 लक्ष्मी ज्वेलर्स, डोकेसरांडी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा फर्म आणि सदर फर्म तर्फे- चालक/मालक सौ. छबीला दुधराम भरणे यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 लक्ष्मी ज्वेलर्स, डोकेसरांडी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा फर्म आणि सदर फर्म तर्फे- चालक/मालक सौ. छबीला दुधराम भरणे यांना आदेशित करण्यात येते की,त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या. लक्ष्मी ज्वेलर्सचे पावती क्रं-1606 पावती दिनांक-10.11.2014 अन्वये तक्रारकर्त्याने कर्ज रक्कम रुपये-2500/- चे बदल्यात पावती नुसार गहाण ठेवलेले 07 नग मणी, 02 नग डोरमणी व 01 नग डोरला असे सोन्याचे दागीने तक्रारकर्त्या कडून कोणतीही कर्ज रक्कमेची वसुली न करता तक्रारकर्त्याला परत करावेत आणि पावती अनुसार गहाण ठेवलेले सोन्याचे दागीने त्याला परत मिळाल्या बाबत लेखी पोच म्हणून तक्रारकर्त्याची सही घ्यावी. किंवा
- जर विरुध्दपक्ष क्रं 1 व्दारा निर्गमित पावती क्रं-1606 पावती दिनांक-10.11.2014 अनुसार असे सोन्याचे दागीने तक्रारकर्त्यास परत करण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 काही कारणास्तव असमर्थ ठरल्यास विरुध्दपक्ष क्रं 1 फर्म व सदर फर्मचे चालक/मालक सौ.छबीला दुधराम भरणे हीने सदर सोन्याचे दागीन्याचे मोबदल्यात सोन्याचे दागीन्यांची किम्मत तक्रारकर्त्यास परत करावी. अशी सोन्याचे दागीन्यांची किम्मत परत करताना विरुध्दपक्ष फर्मचे गहाण पावती प्रमाणे तक्रारकर्त्याचे गहाण असलेल्या सोन्याचे दागीन्यांची ज्या दिवशी ती किम्मत तक्रारकर्त्यास परत करेल त्या दिवशी सोन्याचे असलेल्या मान्यता प्राप्त बाजारभावा नुसार येणारी किम्मत विरुध्दपक्ष क्रं 1 फर्म व सदर फर्मचे चालक/मालक सौ.छबीला भरणे हिने तक्रारकर्त्यास परत करावी व अशी योग्य व हिशोबा नुसार येणारी रक्कम परत मिळाल्या बाबत तक्रारकर्त्याची लेखी सही घ्यावी.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 लक्ष्मी ज्वेलर्स, डोकेसरांडी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा फर्म आणि सदर फर्म तर्फे- चालक/मालक छबीला दुधराम भरणे यांनी तक्रारकर्त्याला दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 लक्ष्मी ज्वेलर्स, डोकेसरांडी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा फर्म आणि सदर फर्म तर्फे- चालक/मालक सौ.छबीला दुधराम भरणे यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 फर्म आणि सदर फर्मचे चालक/मालक सौ.छबीला दुधराम भरणे हिने न केल्यास तक्रारकर्त्यास देणे असलेली शारिरीक व मानसिक त्रास आणि तक्रारखर्च असे मिळून येणारी एकूण रक्कम रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पोवतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत करण्याची जबाबदारी वि.प.क्रं 1 फर्म आणि सदर फर्मचे चालक/मालक सौ.छबीला दुधराम भरणे हिची राहिल.
- विरुध्दपक्ष क्रं 2) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लाखांदूर, जिल्हा भंडारा यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.