निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष यांनी पारीत केले
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) कलम 12 नुसार सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे असे की, सामनेवाला क्र.1 ही सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था असून शेतीसाठी, व्यवसायासाठी कर्ज देणे, ठेवी स्विकारणे असा बँकींग स्वरुपाचा त्यांचा व्यवसाय आहे. सामनेवाला क्र.2 हे संस्थेचे सभासद आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी कर्ज घेतेवेळी तक्रारदार यांना जामीनदार म्हणून गोवून घेतले होते. त्यानुसार तक्रारदार यांच्या गट नं.84 वर कर्ज तारणाचा बोजा रेव्हेन्यु रेकॉर्डवर ठेवण्यात आलेला होता. तक्रारदार यांना सदर शेतजमीन विक्री करावयाची असल्याने त्यासाठी सामनेवाला क्र.1 यांचा बोजा नसल्याबाबतचा ना-हरकत दाखला/निल सर्टिफिकेटची आवश्यकता असल्याने त्यासाठी त्यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जाच्या तारणापोटी तक्रारदाराकडून ठेवपावती क्र.196 अनुसार रु.1,50,000/- 1 वर्षाच्या मुदत ठेवीत ठेवून तक्रारदार यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज येणे नाही, असा नील दाखला दि.18/5/2009 रोजी दिलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे सदर ठेवपावतीचे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आलेले आहे. दि.10/4/2013 रोजी मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर मुदत ठेवीच्या रकमेची मागणी केली असता सामनेवाल्यांनी रक्कम दिली नाही. त्यामुळे मुदत ठेवीची रक्कम रु.1,67,956/- दि.10/10/2012 पासून व्याजासह मिळावी. शारीरीक व मानसीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-, नोटीस खर्च रु.1001/-, अर्ज खर्च रु.20,000/- मिळावेत, अशा मागण्या तक्रारदारांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
4. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.5 लगत मुदत पावतीची झेरॉक्स, रिनीव्हल केल्याची सामनेवाला क्र.1 ची पावती, तलाठीला दिलेला दाखला, तक्रारदार यांचा लेखी अर्ज, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, लेखी अर्ज, त्याच्या पोहोच पावत्या, 7/12 उतारा इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. सामनेवाला क्र.1 यांनी जबाब नि.13 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदार यांची शेतजमीन गट नं.84 ही त्यांच्याकडे सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जापोटी तारण होती. कर्जप्रकरणावर व कर्ज रोख्यावर तक्रारदार यांनी जामीनदार क्र.2 म्हणून सहया केलेल्या आहेत. तक्रारदार यांनी गट क्र.84 विक्री केल्याने त्याच्या खरेदीखतासाठी बोजा नसल्याचे सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. परंतु जोपर्यंत कर्जदार कर्ज रक्कम भरत नाही तोपर्यंत जामीनदाराच्या नावावर असलेला बोजा कमी करता येत नाही. परंतु तक्रारदारास जमीन विक्री करणे गरजेचे असल्याने तक्रारदाराने सदर कर्जाच्या जामीनापोटी रक्कम रु.1,50,000/- मुदत ठेवीत ठेवले व तसे प्रतिज्ञापत्र लिहून त्यावर सही केलेली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी ठेव ठेवण्यास कुठल्याही प्रकारे तक्रारदारावर जबरदस्ती केलेली नाही. तक्रारदाराने स्वतःच्या मनाने वेळोवेळी ठेवपावतीचे नुतनीकरण केलेले आहे. दि.19/4/2013 रोजी मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर बँकेने तक्रारदाराशी संपर्क साधला तेंव्हा तक्रारदाराने सदर ठेवपावतची संपुर्ण रक्कमेची मागणी केली. परंतु तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जास जामीन असल्याने कर्ज नील झाल्यानंतरच ठेवपावतीची रक्कम व्याजासह देण्यात येईल, असे सांगून नकार दिला.
6. सामनेवाला क्र.1 यांचे असेही म्हणणे आहे की, आज रोजी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे रक्कम रु.55,000/- कर्जापोटी बाकी आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जास जामीन असल्यामुळे त्यांची वैयक्तीक जबाबदारी म्हणून तक्रारदार यांच्या जमा रकमेतून सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जाची परतफेड होईपावेतो रु.26,000/- मुदत ठेवीत जमा ठेवून उर्वरीत रक्कम व त्यावर होणारे व्याज देण्यास सामनेवाला क्र.1 हे तयार होते व आहेत. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी कर्जफेड केल्यानंतर मुदत ठेवपावतीचे व्याजासह परत देण्यास बांधील आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी केलेली आहे.
7. सामनेवाला क्र.2 मंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत. म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा तक्रार अर्ज चालविण्यात आला.
8. तक्रारदार यांचे वकील अॅड.बोराडे यांचा लेखी युक्तीवाद नि.23, सामनेवाला क्र.1 यांचे वकील अॅड.पिंगळे यांचा लेखी युक्तीवाद नि.24 त्यांच्या तोंडी युक्तीवादांसह विचारात घेण्यात आलेत.
9. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- सामनेवाला यांनी तक्रारदारांना मुदत
ठेवीमधील रक्कम परत न करुन
सेवा देण्यात कमतरता केली काय? अंशतः होय.
- आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
10. तक्रारदार यांचे वकील अॅड.बोराडे यांनी त्यांच्या युक्तीवादात त्यांनी सामनेवाला यांच्याकडे ठेवपावती क्र.196 अनुसार रु.1,50,000/- 1 वर्षाच्या मुदत ठेवीत ठेवलेले आहेत. मुदत ठेवीचे वेळोवेळी नुतनीकरण केलेले आहे. मुदत संपल्यानंतर ठेवपावतीच्या रकमेची अनेकवेळा मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कम दिली नाही. सदर ठेवपावतीची देय रक्कम मिळावी, अशी विनंती केलेली आहे. याबाबत सामनेवाला यांचे वकील अॅड.पिंगळे यांनी त्यांच्या युक्तीवादात, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जाच्या जामीनापोटी रक्कम रु.1,50,000/- मुदत ठेवीत ठेवले व तसे प्रतिज्ञापत्र लिहून त्यावर सही केलेली आहे. आज रोजी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे रक्कम रु.55,000/- कर्जापोटी बाकी आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जास जामीन असल्यामुळे त्यांची वैयक्तीक जबाबदारी म्हणून तक्रारदार यांच्या जमा रकमेतून सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जाची परतफेड होईपावेतो रु.26,000/- मुदत ठेवीत जमा ठेवून उर्वरीत रक्कम व त्यावर होणारे व्याज देण्यास सामनेवाला क्र.1 हे तयार होते व आहेत. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी कर्जफेड केल्यानंतर मुदत ठेवपावतीचे व्याजासह परत देण्यास बांधील आहेत. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, असे नमूद केलेले आहे.
11. वरील युक्तीवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी नि.5/1 लगत दाखल केलेल्या मुदत ठेवपावती व नि.5/2 वरील जमा पावतीवर श्री.सिताराम आप्पा धोंडगे यांच्या कर्जापोटी तारण असे नमूद आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना दिलेल्या नि.15/5 वरील अर्जात, मुदत ठेव पावतीची मुदत वाढवून मिळावी व श्री.धांडगे यांचे कर्ज नील झाल्यानंतर माझी ठेवपावती परत नेईन, असे तक्रारदार यांनी स्वतः नमूद केलेले आहे. यावरुन तक्रारदार यांची ठेवपावती क्र.196 ही सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जापोटी तारण म्हणून ठेवलेली आहे, हे स्पष्ट होते. मात्र असे असले तरी सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा जबाब नि.13 मध्येच तक्रारदारांच्या ठेवपावतीच्या मुदतीअंती देय रकमेतून सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जाची परतफेड होईपावेतो रु.26,000/- मुदत ठेवीत जमा ठेवून उर्वरीत रक्कम व त्यावरील व्याज देण्यास तयार होतो व आहेत, असे मान्य केलेले आहे. त्यानुसार ठेवपावतीची मुदत संपल्यानंतर म्हणजे दि.10/4/2013 रोजीच तक्रारदार यांना त्यांच्या ठेवपावतीच्या मुदतीअंती देय रकमेतून रु.26,000/- सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जापोटी तारण म्हणून मुदत ठेवीत ठेवून उर्वरीत रक्कम अदा करणे आवश्यक होते. परंतु आजपर्यंत कोणतीही रक्कम सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना दिलेली नाही. सामनेवाला क्र.1 यांची सदरची कृती ही सेवेत कसूर करणारी आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही अंशतः होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
12. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जापोटी तक्रारदार यांच्या ठेवीची मुदतीअंती देय होणा-या रकमेतून काही रक्कम तारण म्हणून ठेवून उर्वरीत रक्कम तक्रारदार यांना देणे आवश्यक होते. सामनेवाला क्र.1 यांनी तसे न करुन तक्रारदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. तक्रारदार यांनी मुदत ठेवीची रक्कम रु.1,67,956/- दि.10/10/2012 पासून व्याजासह मिळावी, अशी विनंती केलेली आहे. परंतु सदर ठेवपावती ही सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जापोटी तारण ठेवलेली असल्याने ठेवपावतीची संपुर्ण रक्कम तक्रारदार यांना देता येणार नाही. मात्र सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा जबाब व युक्तीवादात नमूद केल्याप्रमाणे ठेवपावतीच्या मुदती अंती म्हणजे दि.10/4/2013 रोजी देय होणा-या रकमेतून रु.26,000/- सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जाचे जामीनदार म्हणून त्यांच्या कर्जास तारण म्हणून मुदत ठेवीत ठेवून उर्वरीत रक्कम दि.10/4/2013 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांचे कर्जदार आहेत व त्यांचा तक्रारदार यांना सेवा देण्याच्या बाबतीत काहीही संबंध येत नसल्याने त्यांच्याविरुध्दची तक्रार रद्द करणे योग्य होईल, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना ठेवपावती क्र.196 मधील मुदती अंती म्हणजे दि.10/4/2013 रोजी देय होणा-या रकमेतून रु.26,000/- सामनेवाला क्र.2 यांच्या कर्जापोटी तारण म्हणून पुन्हा मुदत ठेवीत ठेवून उर्वरीत रक्कम दि.10/4/2013 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह अदा करावी.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.5000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- अदा करावेत.
3. सामनेवाला क्र.2 विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
4. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक.
दिनांकः05/03/2015