नि. १९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३०४/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ३०/६/२०१०
तक्रार दाखल तारीख : १/७/२०१०
निकाल तारीख : १७/८/२०११
-------------------------------------------
श्री तेजूभाई इसरदास लालवाणी
व.व. ५९, व्यवसाय – व्यापार,
रा.गजा भवन, स्फुर्ती इस्टेट,
पत्रकारनगर जवळ, सांगली, जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,
शाखा गोविंदराव मराठे इंडस्ट्रीयल इस्टेट,
मिरज, जि.सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.दिपक शिंदे
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री अनंत बेडेकर
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांचा एम.आय.डी.सी. मिरज येथे जे.के.आईस या नावाने बर्फ उत्पादनाचा मोठा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत कनेक्शन घेतले आहे. सदरचे कनेक्शनची दरमहाची विद्युत देयकाची रक्कम मोठया प्रमाणात असते व सदर देयकाची रक्कम अर्जदार हे दरमहा वेळेत चेकद्वारे भरीत असतात. अर्जदार हे वेळेत रक्कम भरीत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी ही अर्जदार यांना बिलाच्या रकमेच्या १ टक्के सूट देत असते. अर्जदार यांनी जाबदार बॅंकेमध्ये स्वत:चे नावे बचत खाते (सेव्हिंग्ज) उघडलेले आहे. तसेच अर्जदार यांनी जाबदार बॅंकेमध्ये जे.के.आईस या नावाने चालू खाते (करंट) उघडले आहे. सदर दोन खात्यावरुन कोणताही व्यवहार करण्याचे अधिकार खातेदार म्हणून अर्जदार यांनाच आहेत. जाबदार बॅंकही दोन्ही खात्यांवरील व्यवहार हे नियमाप्रमाणे योग्य तो चार्ज आकारुन करीत असते. अर्जदार यांना दि.१७/४/१० ते १९/५/१० या कालावधीमध्ये वापरलेल्या विजेच्या बिलाची एकूण रक्कम रु.१०,१९,६००/- इतकी आहे. सदरची रक्कम अर्जदार यांनी दि.७/७/१० अखेर भरल्यास त्यांना रु.१०,२९०/- सूट मिळणार होती. अर्जदार यांनी जाबदार बॅंकेकडे दि.५/६/२०१० रोजी त्यांचे स्वत:चे नावचे असलेला बचत खात्यावर व व्यवसायाचे नावचे चालू खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे हे पाहून आलेल्या विद्युत बिलाची रक्कम चेकने अदा करण्याच्या दृष्टीने त्यांचे बचत खात्यावरील चेक नं.३७५८२ हा रक्कम रु.८,५०,०००/- इतक्या रकमेचा चेक त्यांचे जे.के.आईस या फर्मचे नावे असलेल्या खातेवर जमा करण्यासाठी दिला. बचत खात्यावरील चेक दिला त्यावेळेस बचत खात्यावर रु.१७,९३,१५०/- इतकी शिल्लक होती. त्यामुळे त्यांचे जे.के.आईस या खात्यावर चेकची रक्कम जमा होण्यास कोणताही अडथळा नव्हता. अर्जदार यांनी विद्युत देयकाची रक्कम लक्षात घेता त्यामधून १ टक्के रक्कम कमी करुन रु.१०,०९,३१०/- या रकमेचा चेक विद्युत कंपनीकडे दिला. तथापि दि. ९/६/१० रोजी विद्युत वितरण कंपनीने चेक अनादरीत झाल्याचे अर्जदारास कळविले. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने रु.१०,१९,६००/- + वटणावळ खर्च रु. ५००/- अशी एकूण रक्कम रु.१०,२०,१००/- तात्काळ भरणेबाबत कळविले व पुढील सर्व विद्युत देयके ही डीमांड ड्राफटद्वारे अथवा रोख भरण्याबाबत समज दिली व मुदतीत भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडीत करुन तसा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. तक्रारदार यांचे खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असताना जाबदार बॅंकेनेवेळेत त्यांचे बचत खात्यावरील रक्कम व्यवसायावरील चालू खात्यावर वर्ग न केल्यामुळे चेक अनादरीत झाला. त्याबाबत जाबदार यांचे मॅनेजरकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व अर्जदारचे तक्रारीची दाद घेतली नाही. त्यानंतर अर्जदार यांनी जाबदार बॅंकेला दि.९/६/१० रोजी पत्र दिले. सदर पत्रास जाबदार यांनी दि.१७/६/१० रोजीचे पत्राने त्रोटक उत्तर दिले व योग्य ते उत्तर दिले जाईल असे पत्र दिले. त्यानंतर जाबदार यांनी कोणताही संपर्क अथवा खुलासा केला नाही. जाबदार यांचे या कृत्यामुळे अर्जदार यांची व्यवसायातील प्रतिष्ठा व पत संपुष्टात आली व त्यांचे व्यवसायातील नावलौकीकाला धक्का बसला. त्यामुळे अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करुन चेक बाऊन्स चार्जेस, १ टक्के डिस्काऊंट रक्कम रु.१०,२९०/-, विद्युत वितरण कंपनीने वसूल केलेली वटणावळ रक्कम रु.५००/-, पत्र खर्च रु.१००/-, शारिरिक मानसिक त्रासापोटी रु.२ लाख, तक्रारअर्जाचा खर्च रु.५,०००/- देणेबाबत आदेश करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सेव्हिंग्ज व करंट खात्यावरील व्यवहाराच्या नोंदी ठेवणे, त्यावरील व्यवहार, इंटर्नल ट्रान्स्फर, लोकल चेक क्लिअरन्स इ. सेवा या पूर्णपणे नि:शुल्क आहेत, त्यासाठी कोणताही मोबदला घेतला वा आकारला जात नाही असे नमूद केले आहे. तसेच सदर जाबदारच ठेवी व सेव्हींग्ज खातेवरील रकमांवर खातेदाराला व्याज देतात. अर्जदारचे चेकची रक्कम करंट अकाऊंटवर वेळीच जमा होणे आवश्यक होते. परंतु जाबदार शाखेमध्ये असणा-या आवश्यक व जरुर स्टाफपैकी पुरेसा स्टाफ उपलब्ध नसल्याने अर्जदारचा चेक संबंधीत कॉम्प्युटर टर्मिनल ऑपरेटरकडून वेळेत जमा करण्याचे राहून गेले. करंट खात्यावरील चेक वटण्यासाठी आला असता खात्यावर शिल्लक रक्कम न दिसल्याने चेक न वटता परत गेला. कायद्याप्रमाणे व बॅंकेच्या नियमाप्रमाणे ज्या खात्यावरील चेक परत दिला आहे, त्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक आहे याची खात्री करुन घेवून नंतरच चेक देण्याचे बंधन खातेदारावर आहे. अर्जदार यांनी दि.९/६/२०१० रोजी सदरची बाब जाबदारांचे निदर्शनास आणली त्यावेळी जाबदार यांचे मॅनेजर यांनी दिलगिरी व्यक्त केली व त्वरीत रोख रक्कम भरण्याची दाखविली. अर्जदार यांचे दि.९/६/२००९ चे पत्र जाबदार यांना मिळालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना उत्तर पाठविले व ते पत्र पुढील आदेशासाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविले परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई होण्यापूर्वीच तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे झालेले आर्थिक नुकसान मान्य आहे व एक जबाबदार बॅंक या नात्याने अर्जदार यांचा चेक बाऊन्सची रक्कम रु.६१०/-, न मिळालेला डिस्काऊंट रु.१०,२९०/- व चेक बाऊन्स चार्जेस रु.५००/- अशी एकूण रु.११,४००/- जाबदार हे अर्जदार यांना नैतिक जबाबदारी स्वीकारुन देण्यास तयार आहेत. अर्जदार यांनी केलेल्या बाकीच्या मागण्या अवास्तव असून सदरच्या मागण्या जाबदार यांना मान्य व कबूल नाहीत असे जाबदर यांनी आपले म्हणणेमध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१२ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१४ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.१६ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार अथवा जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी हजर राहिले नाहीत व तक्रारदार यांनी दिलेला लेखी युक्तिवाद याप्रमाणेच तोंडी युक्तिवाद आहे असे नमूद केलेने प्रस्तुत प्रकरण क्वेरीसाठी ठेवण्यात आले. सदर क्वेरीबाबत तक्रारदार यांचे विधिज्ञ यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदारचे विधिज्ञांनी नि.१८ चे यादीने दोन निवाडे दाखल केले.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, तक्रारदार यांचा दाखल लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता खालील मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे का ? आहे.
२. तक्रारदार यांस जाबदार यांनी सदोष सेवा
दिली आहे का ? आहे.
३. तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र
आहेत का ? अंशत:
४. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१ –
जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांना त्यांचे चेकचे ट्रान्स्फरसाठी जाबदार यांनी नि:शुल्क सेवा दिली आहे, त्यासाठी कोणताही मोबदला घेतला नाही असे नमूद केले आहे. जाबदार यांचे म्हणण्याचे अनुषंगाने तक्रारदार ग्राहक होतो का ? हा मुद्दा मंचासमोर उपस्थित होतो. तक्रारदार यांचे सदर बॅंकेमध्ये दोन वेगवेगळया प्रकारची खाती आहेत. एक खाते हे तक्रारदारचे स्वत:चे नावचे आहे व दुसरे खाते हे तक्रारदारच्या फर्मच्या नावचे आहे. तक्रारदारच्या स्वत:च्या खात्यावर जाबदार हे व्याज देत असतात असे जाबदार यांनी नमूद केले आहे. जरी चेकच्या क्लिअरन्ससाठी जाबदार यांनी नि:शुल्क सेवा दिली असली तरी तक्रारदार यांनी खात्यावर गुंतविलेल्या रकमेचा उपयोग हे जाबदार हे अन्य लोकांना कर्जवाटपासाठी करुन त्यातून नफा कमवीत असतात व त्यातील काही भाग हा तक्रारदारांना व्याजाच्या स्वरुपात देत असतात. त्यामुळे सदरची रक्कम बचत खात्यावर गुंतवणे ही बाब नि:शुल्क होत नाही. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
७. मुद्दा क्र.२ व ३ एकत्रित
जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे का ही बाब विचारात घेताना जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्येच जाबदार यांच्या कर्मचा-याच्या चुकीमुळे तक्रारदार यांचा चेक न वटता परत गेला असे मान्य केले आहे. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत अर्जाचे कामी रु.२,१६,५००/- ची मागणी केली आहे. सदरचे मागणीचे अनुषंगाने विचार करता जाबदार यांनी तक्रारदार यांनी मागणी केलेल्या रकमेपैकी चेक बाऊन्सची रक्कम रु.६१०/- तसेच वेळेत बिल भरता आले असते, तर एक टक्के रकमेची सूट मिळाली असती. ती सूट न मिळालेली रक्कम रु.१०,२९०/-, चेकबाऊन्सची वीज कंपनीने वसूल केलेली रक्कम रु.५००/- असे एकूण रु.११,४००/- मान्य केले आहेत. तथापि, इतर रकमांची मागणी अमान्य केली आहे. तक्रारदार यांनी मानसिक, शारिरिक व व्यावसायिक त्रासाबद्दल व मानहानीच्या नुकसानीबाबत रक्कम रु.२,००,०००/- पाठविलेल्या पत्राच्या खर्चाची रक्कम रु.१००/- व तक्रारअर्जाची रक्कम रु.५,०००/- अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी दि.१२/६/२०१० रोजीच्या पत्राच्या खर्चाची रक्कम रु.१००/- ची मागणी केली आहे. परंतु सदर रु.१००/- खर्चाबाबत कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे सदरची मागणी अमान्य करणेत येत आहे. शारिरिक मानसिक त्रास व व्यावसायिक नुकसान, मानहानी याबाबत एकूण रक्कम रु.२,००,०००/- ची मागणी केली आहे. व्यावसायिक नुकसान व मानहानी याबाबत विचार करता व्यावसायिक त्रासाबाबतची नुकसान भरपाई ही अवास्तव दिसून येते व व्यावसायिक त्रासाबाबत नुकसान भरपाई मागता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. सन्मा.राष्ट्रीया आयोग यांनी 2008 (3)CPR 196 NC. Purvanchal Cables Vs. The Assam State Electricity Boardया निवाडयाचे कामी पुढील निष्कर्ष नोंदविला आहे.
Under the Consumer Protection Act, there is no provision providing for compensation for loss of business.
सदरचे निवाडयाचे अवलोकन करता तक्रारदार यांची सदरची विनंती अमान्य करण्यात येते. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिल्यामुळे त्यांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले व प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल करावा लागला. ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी रक्कम रु.११,४००/- व सदर रकमेवर तक्रारअर्ज
दाखल तारखेपासून म्हणजे दि.१/७/२०१० पासून द.सा.द.शे.९ टक्के व्याज
अदा करावे असा जाबदार यांना आदेश करण्यात येत आहे.
३. तक्रारदार यांना शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारअर्जाचा खर्च
म्हणून रक्कम रु.३,०००/- अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.३०/९/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: १७/८/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११