ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई उपनगर जिल्हा यांचेसमोर
प्रशासकिय इमारत, तिसरा मजला, चेतना कॉलेजजवळ, बांद्रा-पूर्व,
मुंबई -400 51.
तक्रार क्रं.ग्रातनिमं/मुंउजि 572-2009
तक्रार दाखल दिनांक–15/09/2009
आदेश दिनांकः-17/12/2015
भारतीय सौर 26, अग्रहणाय 1937 शके
अमीना इनायत शेख
पत्ता- रुम नं.9 आणि10,
अंबादास चाळ नं.382,
हॉल विलेज, कुर्ला (प),मुंबई-70 ...... तक्रारदार
विरुध्द
1.मुख्य व्यवस्थापक,
सेंट्रल बँक ऑफ इंडीया,
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ब्रांच,
बांद्रा (पु) ब्रँन्च, मुंबई-51
2.कार्यकारी संचालक,
सेंट्रल ऑफीस, सेंट्रल बँक ऑफ इंडीया,
चंदरमुखी बिल्डींग,नरिमन पॉईंट,
मुंबई-400 021 ...... सामनेवाले
मंचः- मा. श्री. एम.वाय.मानकर, अध्यक्ष,
मा. शां. रा. सानप, सदस्य,
तक्रारदार - स्वतः
सामनेवाले -
आदेश - मा. श्री. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
निकालपत्र
(दिनांक 17/12/2015 रोजी घोषित)
1. तक्रारदार यांनी त्यांच्या बँकेमधील खात्यामधून बनावट धनादेशाद्वारे काढण्यात आलेल्या रक्कमेबाबत ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार त्यांच्या बनावट सही द्वारे रु.3,18,000/- ची रक्कम काढण्यात आली. उपयोगात आणलेला धनादेश हा जुना होता तरी सुध्दा बँकेने काही चौकशी न करता तो स्विकारला व सेवा देण्यात कसूर केली म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले यांनी सामनेवाले क्र.2 यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याने त्यांना वगळण्यात यावे व सामनेवाले क्र.1 यांनी या प्रकरणात सेवा देण्यामध्ये काही कसूर केलेला नाही असे कथन केले.
2. तक्रारदारानुसार त्यांनी सामनेवाले क्र.1 या बँकेत जुना खाते क्र.10433 व नवीन खाते क्र.1001763431 असे होते. तक्रारदारानी माहे ऑगस्ट, 2008 मध्ये त्यांचे घर विकल्यामुळे रु.60,00,000/- त्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केले. त्यांनी या खात्यावर धनादेशाद्वारे काढलेली रक्कम ही मोठी असल्यामुळे सामनेवाले क्र.1 यानी धनादेश
स्विकारण्यापूर्वी तक्रारदारांकडून त्याबाबत ब-याचदा खातर जमा केल्यानंतरच धनादेश स्विकारण्यात आले. तक्रारदार हा दि.12/02/2009 ला सामनेवाले क्र.1 यांच्याकडे गेला असतांना संगणक योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे त्यांचे खाते अदययावत करुन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी दि.18/02/2009 ला त्यांच्या खात्यामधून रु.10,000/- काढलेत व त्यांच्या खात्यामध्ये नोंदी करण्यात आल्या. बँक अधिका-यांकडून त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक असलेल्या रक्कमेबाबत चौकशी केली व त्यांच्या खात्यामधून श्री एम.सुरेशकुमार यांच्या लाभामध्ये रु.3,18,000/- चा धनादेश स्विकारण्यात आला व तो साऊथ इंडीयन बँक चेन्नईकडून प्राप्त झाला होता असे समजले. तक्रारदारांना अश्या व्यक्तीबद्दल काही माहीती नव्हती व तीने सामनेवाले यांना सांगितले की, ही नोंद चुकीची आहे. तक्रारदारांना तो धनादेश दाखविला असता, त्याची सही ही बनावट असल्याचे लक्षात आले व तीने तसे सामनेवाले क्र.1 यांच्या अधिका-यांना सांगितले. सामनेवाले यांचे अधिकारी यांनी त्या धनादेशावरील तक्रारदाराची सहीची पडताळणी न करता किंवा हेतू पुरस्सर तो धनादेश स्विकारला. या नोंदीबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारांना माहिती दिली नाही. तक्रारदारानी याबाबत दि.19/09/2009 ला बी.के.सी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना व्यवस्थित माहिती दिली नाही, व तीला योग्यप्रकार सहाय्य केले नाही. तक्रारदारांनी वकीलांमार्फत सामनेवाले क्र.1 कडे दि.28/03/2009 ला आपली तक्रार नोंदविली.
3. तक्रारदार दि.06/04/2009 ला आपले पती, मुले व नातेवाईकांसह चेन्नई येथील संबंधीत बँकेमध्ये गेले. तेथील शाखा व्यवस्थापकाने चौकशी करुन श्री.एम.सुरेशकुमार यांचेशी फोनवर संपर्क केला व रक्कमे बाबत चौकशी केली असता, श्री.एम.सुरेशकुमार यानी तो फोन मध्येच बंद केला.
4. बी.के.सी.पोलीस स्टेशनमध्ये दि.16/04/2009 ला गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीसांनी चौकशी केली असता, श्री.एम.सुरेशकुमार यांनी बनावट कागदपत्रे सादर करुन चेन्नई येथील बँकेत खाते उघडल्याचे लक्षात आले. तक्रारदार यांना सा.वाले क्र.1 कडून 20 धनादेश असलेली पुस्तीका सन 2007 मध्ये प्राप्त झाली होती व धनादेशाचा क्र.622021 ते 622040 असा होता. त्या पुस्तीकेमधील तीन धनादेश शिल्लक असतांना त्यांनी नवीन धनादेश पुस्तीकेकरिता रिक्वीजीशन स्लीप दिली. तक्रारदार हे जुनी पुस्तिका ज्यामधे तीन धनादेश शिल्लक होते, सामनेवाले क्र.1 यांच्या बँकेच्या अधिका-यांच्या टेबलावर विसरलेत. पुस्तिकेमधील धनादेश क्र.622038 याचा उपयोग करुन रक्कम काढण्यात आली होती. तक्रारदारानी विसरलेल्या धनादेश पुस्तिकेबद्दल बँकेत सामनेवाले क्र.1 यांच्या अधिका-यांकडे वारंवार चौकशी केली असता, त्यानी त्याबाबत नाकारले. तक्रारदारानी त्यांच्या वकीलांमार्फत दि.28/03/2009 ला नोटीस पाठऊन झालेले नुकसानाबाबत भरपाई मागितली तसेच ही तक्रार दाखल करुन तक्रारदारानी रु.3,18,000/- या रक्कमेवर 18 टक्के व्याजासह व मानसिक व शारिरीक त्रासापोटी तक्रारीच्या खर्चासाठी रक्कम मागितली आहे.
5. सामनेवाले यांनी आपली लेखी कैफीयत दाखल करुन सामनेवाले क्र.2 हे कार्यकारी संचालक असलेल्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही व अनावश्यकपणे त्यांना पक्ष म्हणून संम्मेलीत करण्यात आले. तक्रारीमध्ये नमुद केलेली बाब विचारात घेता, हे प्रकरण बनावटीचे व अफरा-तफरीचे असल्यामुळे ते समरी पध्दतीने निकाली काढता येऊ शकत नाही. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे ते तीन चेक विसरलेले होते. त्याबाबत त्यांनी सामनेवाले क्र.1 कडे कोणतीही तक्रार केलेली नाही. सामनेवाले क्र.1 यांना धनादेश क्र.6222038 हा बनावट असल्याबाबत काही माहिती व कारण नव्हते. तक्रारदारानी त्या धनादेशावरील त्यांची सही बाबत वेळोवेळी बयान बदलले आहे. झालेल्या प्रकरणाबाबत तक्रारदार व श्री.एम.सुरेशकुमार हे दोघे जबाबदार आहेत. संबंधीत धनादेशावर तक्रारदार यांची सही ही बँकेत असलेल्या नमुना सहीशी साम्य दर्शविते. तक्रारदारांनी सुध्दा धनादेशावरील सही त्यांची असल्यामुळे त्यांनी त्याबाबत सामनेवाले यांच्याशी केलेल्या पत्र व्यवहारामध्ये त्याबाबत उल्लेख केला नाही. श्री.एम.सुरेशकुमार हे सापडून न आल्यामुळे तकारदारांनी बँकेला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. तक्रारदार यांनी कोणत्याही बँक अधिका-याचे नाव व पद नमुद केलेले नाही. सामनेवाले यांनी पुर्ण खबरदारी घेतली होती व सेवा देण्यात कसूर केला नाही, त्यामुळे ही तक्रार खारिज करण्यात यावी.
6. तक्रारदार व सामनेवाले यांच्या प्लीडींग्स वाचली. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला परंतु सामनेवाले हे गैहरजर होते. तक्रारदारांनी इतर कागदपत्रांच्या व्यतिरीक्त हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल दाखल केला आहे. 7. उपरोक्त बाबींवरुन खालील बाब मान्य आहेत असे म्हणता येईल.
तक्रारदार यांचे सामनेवाले क्र.1 कडे बँक खाते होते. तक्रारदार हे धनादेशाचा वापर करीत होते. तक्रारदार यांच्या खात्यामधून रु.3,18,000/- धनादेश क्र.622038 द्वारा माहे फेब्रुवारी, 2009 मध्ये काढण्यात आले. ती रक्कम श्री.एम.सुरेशकुमार यांच्या साऊथ इंडीयन बँक चेन्नई येथील शाखेत जमा झाली. तक्रारदार यांनी या घटनेबाबत प्रथम खबरी नोंदविली व त्यावरुन पोलीसांनी फसवणूकीचा, व बनावटकरण्याचा गुन्हा बी.के.सी. पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला. श्री.एम.सुरेशकुमार हे सापडून आले नाही. बँकेतील अधिकारी/कर्मचारी यांना अटक झालेली नाही.
8. ही तक्रार निकाली काढण्याकरिता खालील बाब महत्वाची ठरते.
अ) सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या खात्यावर काढण्यात आलेला धनादेश क्र.622038 रु.3,18,000/- चा स्विकारतांना निष्काळजीपणा किंवा सेवेमध्ये कसूर केला आहे का?
अ.1) मा.राष्ट्रीय आयोगाकडून वेळोवेळी दिलेले न्यायनिवाडया द्वारा हा सेटल लॉ झालेला आहे की, ग्राहकमंचात फसवणूकीच्या/बनावटीच्या तक्रारी चालवू नये. कारण अशा तक्रारीमध्ये भरपुर पुरावे व कागदपत्रे असतात. शिवाय, साक्षीदारांची तपासणी आवश्यक ठरते, जी समरी पध्दतीमध्ये शक्य नसते.
अ.2) ग्राहक मंचाच्या अधिकारात सेवेमध्ये त्रुटी आहे का ? हे पाहणे आवश्य येते. बँकेने वाजवी खबरदारी घेणे आवश्यक असते त्यामध्ये कसूर केल्यास बँकेला जबाबदार धरता येते. आमच्यामते धनादेशावरील सहयांची पडताळणी करतांना साध्या डोळयांनी सहयांमधील साम्य किंवा अंतर स्पष्ट होणे आवश्यक आहे. एखादया तज्ञांप्रमाणे पडताळणी करणे रोजच्या व्यवहारात अपेक्षीत नाही.
अ.3) तक्रारदारांनी बँकेमध्ये खाते उघडतांना भरलेल्या फॉर्मची प्रत दाखल केली आहे. त्यावर तक्रारदारांची नमुना सही आहे. तसेच तक्रारदारांनी कथीत बनावट सही असलेल्या धनादेश क्र.622038 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यामुळे दोन्ही सहयांची पडताळणी करणे मंचास आवश्यक व सुलभ आहे. हस्ताक्षर तज्ञांनी आपल्या अहवालामध्ये कोणते अक्षर किती स्ट्रोकमध्ये लिहीण्यात आले त्याबाबत नमुद केले आहे. परंतु आमच्या मते ते साध्या डोळयांनी पाहणे शक्य नाही. हस्ताक्षर तज्ञाच्या अहवालात तक्रारदार यांच्या मान्य व कथीत बनावट सहीमध्ये अक्षर “ न” बाबत नमुद केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांच्या सामान्य सही मध्ये “ न” अक्षरात बल्ब दिसून येतो. बनावट सहीमध्ये तो बल्ब दिसून येत नाही. या बाबत मंचाने निरीक्षण करुन त्याबाबत आपले मत व्यक्त करणे आवश्यक आहे. हस्ताक्षर तज्ञांचे “ न” बाबतचे निरीक्षण बरोबर आहे. आता महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की, तक्रारदारांच्या सर्व सहयामध्ये त्यांच्या सहीतील “ न” अक्षरात बल्ब दिसून येतो का?
अ.4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी सोबत बी.के.सी.पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या प्राथमीक खबरी अहवालाची प्रत दाखल केली आहे ती पृष्ठ क्र.29,30 व 31 वर आहे. व त्याला निशाणी-जे देण्यात आलेले आहे. यामध्ये पृष्ठ क्र.30 वर बयानाखाली तक्रारदारांची सही आहे व दुसरी सही पृष्ठ क्र.31 वर छापील नमुन्यामध्ये आहे. हया दोन्ही सहया एकाच दिवशी केलेल्या आहेत. पृष्ठ क्र.31 वर असलेल्या सहीमध्ये “ न” मध्ये बल्ब दिसून येतो. ही बाब पृष्ठ क्र.30 वर तक्रारदारांच्या सहीबाबत म्हणता येणार नाही. तक्रारदार यांच्या सहीतील अक्षर “ न” मध्ये बल्ब स्पष्ट दिसत नाही. तसेच पृष्ठ क्र.21 वर तक्रारदारानी दाखल केलेल्या दि.28/03/2009 च्या पत्रामध्ये, जे त्यांनी सामनेवाले क्र.1 ला लिहीलेले आहे, त्यावरील तक्रारदार यांच्या सहीमधील “ न” अक्षरामध्ये त्यामुळे बल्ब आहे असे खात्रीशीर म्हणता येणार नाही. त्यामुळे आमच्या मते निव्वळ साध्या डोळयांनी पाहता, तक्रारदारांच्या सर्व सहयांमध्ये “ न” अक्षरामध्ये बल्ब असतोच असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी कथीत बनावट धनादेश स्विकारतांना सहयांची पडताळणी करतांना निष्काळजीपणा केला असे म्हणता येणार नाही.
अ.5) तक्रारदार यांचे तीन धनादेश गहाळ झाल्याबाबतचे कथनसुध्दा एकसारखे नाही. तक्रारदारांनी तक्रारी मध्ये असे नमुद केले आहे की दुस-या धनादेश पुस्तीकेकरिता रिक्वीजीशन स्लीप देतांना ते बँकेच्या अधिका-यांच्या समोरील टेबलावर जुनी पुस्तिका विसरले होते. त्यांनी दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवालामध्ये त्यांनी असे नमुद केले की, ते धनादेश कुठे गहाळ झालेत याबाबत त्यांना आठवत नाही.
अ.6) तक्रारदाराकडे कथीत बनावट धनादेशाची पुस्तिका ही काही पहीली प्राप्त धनादेश पुस्तिका नव्हती व तो काही पहील्यांदा दुस-या धनादेश पुस्तिकेकरिता रिक्वीजीशन स्लीप देत नव्हते. त्यापुर्वी सुध्दा त्यांनी धनादेश पुस्तिका ज्यामध्ये धनादेशांचा क्रमांक 522707 व पुढे असे अनुक्रमांक होते, त्या पुस्तिकेचा उपयोग केला होता. आमच्यामते ती पुस्तिका संपल्यानंतर तक्रारदारानी कथीत बनावट धनादेश असलेली पुस्तिका प्राप्त केली. त्यामुळे आमच्यामते तक्रारदारांना धनादेशाची नवीन पुस्तिका प्राप्त करतांना काय प्रक्रिया असते ती माहीती होती.
अ.7) तक्रारदार जर एवढी मोठी रक्कम पहील्यांदा त्यांच्या खात्यामधून काढत असल्यास बँकेकडून थोडी अधिक खबरदारीची अपेक्षा होती. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदारानी त्यांच्या खात्यामधून मोठया रक्कमा काढल्या होत्या. त्यांनी रु.9,50,000/10,00,000/- रक्कम काढलेली दिसून येते. सबब हा कथीत बनावट धनादेश प्राप्त झाल्यानंतर बँकेकडून विशेष खबरदारी अपेक्षीत नाही.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
10. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापुर्वी निकालात काढता येऊ शकली नाही.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्रमांक 572/2009 खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात/ देण्यात याव्यात.
4. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये त्यांची मुळ पासबुक दाखल केले आहे. तक्रारदारांकडून त्या पासबुकची सत्यप्रती प्राप्त करुन मुळ पासबुक त्यांना परत करावे.
5. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदाराना परत करावे.