ग्राहक तक्रार अर्ज क्र. 111/2011
दाखल दिनांक. 23/02/2011
अंतीम आदेश दि.24/02/2014
कालावधी 03 वर्ष, 01 दिवस
नि. 09
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
पुंडलीक दौलत पाटील, तक्रारदार
मु.पो. उंबरखेड, ता.चाळीसगांव, (स्वतः)
जि. जळगांव.
विरुध्द
1. केअर मॅनेजर, सामनेवाला
मॅक्स मोबीलींक, प्रा.लि. (1 विरुध्द एकतर्फा,)
106 चावला कर्मशिअल सेंटर,
माईंड स्पेस, न्यु लिंक रोड, चिंचोली बंदर,
मालाड, मुंबई. 400 0064
2. दिलीप गंगाधर येवले, (स्वतः)
घाट रोड, चाळीसगांव,
जि.जळगांव, 424 101,
(निकालपत्र सदस्य, चंद्रकांत एम.येशीराव यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांनी दि. 12/04/2010 रोजी, रु. 1689/- इतक्या किंमतीस सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेला एम एक्स एक्स 122 हा मोबाईल सामनेवाला क्र. 2 यांच्या कडून बिल क्र. 2033 अन्वये, विकत घेतला. तो वारंवार खराब झाला. सुरुवातीस जळगांव व नंतर धुळे येथे दुरुस्तीसाठी पाठवुनही तो नादुरुस्तच होता. सामनेवाला क्र. 2 याने आता माझी एजन्सी नाही असे म्हणत सेवा देण्यास नकार दिला. त्यानंतर सामनेवाला क्र. 1 यांच्या कडे दिलेल्या तक्रारी वरुन जैन टेक्नीकल बिजे मार्कट, जळगांव येथे दुरुस्तीसाठी नेला असता, तो दुरुस्त होणार नाही असे सांगण्यात आले. अशा रितीने सामनेवाल्यांनी खराब मोबाईल विकून सेवेत कमतरता केलेली आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोबाईलची किंमत रु.1689/- व्याजासह मिळावी. शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 15,000/- व अर्ज खर्चापोटी रु.3,000/- मिळावेत अशा तक्रारदारांच्या मागण्या आहेत.
03. तक्रारदाराने तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ मोबाईल खरेदीचे बिल, जैन टेक्नीकल जळगांव यांचे कडे मोबाईल दुरुस्तीसाठी नेल्या बाबतची पावती, सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे मोबाईल बदलून मिळण्याबाबत केलेला विनंती अर्ज, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
04. मंचाची नोटीस मिळवूनही सामनेवाला क्र. 1 हजर न झाल्यामुळे आमच्या पुर्वाधिकारी मंचाने दि. 04/07/2011 रोजी प्रस्तुत तक्रार अर्ज त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात यावा, असे आदेश नि. 7 वर पारीत केलेले आहेत.
05. सामनेवाला क्र. 2 यांनी जबाब नि. 6 दाखल करुन विरोध केला. त्यांच्या मते तक्रारदारांनी तक्रार केल्यावर वेळोवेळी त्यांनी सामनेवाला क्र. 1 या कंपनीशी संपर्क साधून तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्तीसाठी पाठविलेला आहे. सामनेवाला क्र. 1 यांच्या मोबाईल मध्ये विक्री पेक्षा दुरुस्ती जास्त असल्यामुळे त्यांनी सामनेवाला क्र. 1 ची एजन्सी बंद केलेली आहे. तक्रारदारांना एजन्सी असे पावेतो वेळोवेळी सुविधा पुरविलेली असल्याने, त्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
06. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? -- होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
कमतरता केली काय ? -- सामनेवाला क्र. 1 च्या
बाबतीत होय.
3. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
07. तक्रारदारांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र नि. 2 यात शपथेवर असे सांगितलेले आहे की, त्यांनी दि. 12/04/2010 रोजी, रु. 1689/- इतक्या किंमतीस सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेला एम एक्स एक्स 122 हा मोबाईल सामनेवाला क्र. 2 यांच्या कडून बिल क्र. 2033 अन्वये, विकत घेतला. त्यांचे हे विधान सामनेवाल्यांनी नाकारलेले नाही. उलटपक्षी सामनेवाला क्र. 2 यांनी ते मान्य केलेले आहे. तक्रारदारांनी नि. 3 सोबत दाखल केलेले मोबाईल खरेदीचे बिल वरील बाबीस पुष्ठी देते. त्यामुळे तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत, ही बाब स्पष्ट होते. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
08. आपण सामनेवाल्यांकडून घेतलेला मोबाईल वारंवार खराब झाला. सुरुवातीस जळगांव व नंतर धुळे येथे दुरुस्तीसाठी पाठवुनही तो नादुरुस्तच होता. सामनेवाला क्र. 2 याने आता माझी एजन्सी नाही असे म्हणत सेवा देण्यास नकार दिला. त्यानंतर सामनेवाला क्र. 1 यांच्या कडे दिलेल्या तक्रारी वरुन जैन टेक्नीकल, बिजे मार्कट, जळगांव येथे दुरुस्तीसाठी नेला असता तो दुरुस्त होणार नाही, असे सांगण्यात आले. या बाबी तक्रारदारांनी शपथेवर प्रतिज्ञापत्र नि. 2 यात सांगितलेले आहेत. सामनेवाला क्र. 1 यांनी हजर होवून आव्हानीत केलेला नाही. तर सामनेवाला क्र. 2 यांनी मोबाईल खराब होत होता, ही बाब त्यांचा जबाब नि. 6 मध्ये मान्य केलेले आहे. सामनेवाला क्र. 1 यांच्या कंपनीच्या मोबाईलच्या विक्री मध्ये कपा पेक्षा दुरुस्तीच जास्त होती. या कारणास्तव आपण सामनेवाला क्र. 1 यांची एजन्सी सोडून दिली, असे विधान सामनेवाला क्र. 2 याने त्यांच्या जबाबात केले आहे. वरील बाबी हे स्पष्ट दर्शवितात की, तक्रारदाराने घेतलेला मोबाईल खराबच होता. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारांना खराब मोबाईल विक्री करुन सेवा देतांना कमतरता केलेली आहे. सामनेवाला क्र. 2 हे केवळ विक्री प्रतिनीधी असल्यामुळे त्यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दाक्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र. 1 यांच्या बाबतीत होकारार्थी तर सामनेवाला क्र. 2 यांच्या बाबतीत नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः
09. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार सामनेवाल्यांच्या ग्राहक आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी त्यास चांगला मोबाईल दिला नाही. तो वारंवार नादुरुस्त झाला. अखेर तो दुरुस्ती पलीकडे गेला. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 यांनी खराब मोबाईल विकून तक्रारदारांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. सामनेवाला क्र. 2 हा केवळ विक्री प्रतिनीधी असल्यामुळे व त्याने तक्रारदाराची तक्रार वारंवार सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे कळविलेली असल्याने सेवेत कमतरता केली असे म्हणता येणार नाही. परिणामी तक्रारदार मोबाईलची किंमत रु.1689/-, दि. 12/04/2010 पासून द.सा.द.शे 6 टक्के व्याजने सामनेवाला क्र.1 यांच्या कडून परत मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे मोबाईल वारंवार दुरुस्तीसाठी न्यावे लागल्याने झालेला प्रवास खर्च व मानसिक त्रास यापोटी रु.3,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 1,000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.3 च्या निष्कर्ष पोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास
मोबाईलची किंमत रक्कम रु. 1689/-, दि. 12/04/2010 पासून द.सा.द.शे 6
टक्के व्याजाने अदा करावी.
2. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास
मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 1,000/-
अदा करावेत.
3. सामनेवाला क्र. 2 यांच्या विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
4. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक - 24/02/2014
(चंद्रकांत एम.येशीराव) (मिलिंद सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष