नि. ११
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २७/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २८/०१/२०११
तक्रार दाखल तारीख : ०२/०२/२०११
निकाल तारीख : ०३/०२/२०१२
----------------------------------------------------------------
१. श्री उदय गणपती मगदुम
व.व.३०, धंदा – नोकरी
रा.कवठेपिरान, ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. मॅनेजिंग डायरेक्टर,
कार्बन मोबाईल,
ए.युटीएल-जैन व्हेनचर
युनायटेड टेलींकस (बेंगलोर) लि.
नं.३९/१३, आप्पारेड्डीपाल्या मेन रोड
ऑफिस ७ वी मेन हॉल, २ स्टेज, इंदिरानगर,
बेंगलोर
२. श्री पार्श्व कमल मोबाईल
७४/१, वखारभाग, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एन.एन.वाळवेकर
जाबदार क्र.१व २ : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे.
तक्रारदारांनी जाबदार क्र.१ कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल जाबदार क्र.२ यांचेकडून खरेदी केला. परंतु पहिल्याच दिवशीपासून सदरहू मोबाईलमध्ये तक्रारी जाणवू लागल्या. दुरुस्तीनंतरदेखील या तक्रारी दूर झाल्या नाहीत. याची जाणीव जाबदारांना असून देखील त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे -
१. तक्रारदारांनी जाबदार क्र.१ कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल कार्बन के-३ मॉडेल क्र. आयएमईआय नं.९१००८०४००४४२४९८, बी.एन.ओ.एस.एन.३० डी १०१४१८४ सी.एन.ओ.-एस एन.३०डी १००८८६८ हा दि.२५/९/२०१० रोजी रक्कम रु.४०००/- ला जाबदार क्र.२ यांचेकडून विकत घेतला होता. जाबदार क्र.२ हे जाबदार क्र.१ या कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. सदरचा मोबाईल खरेदी केल्यानंतर पहिल्याच दिवशी तो बंद पडू लागला. त्याच्या सोबत देण्यात आलेला हेडफोन हा देखील खराब निघाला. याबाबत तक्रारदारांनी जाबदार क्र.२ यांचेकडे तक्रार केल्यानंतर, जाबदार क्र.२ यांनी तक्रारदारांना हेडफोन बदलून दिला. परंतु मोबाईल अचानकपणे, आपोआप बंद पडू लागला व तसाच तो अचानक आपोआप सुरु देखील होऊ लागला अशा प्रकारची तक्रार मोबाईलमध्ये जाणवू लागली. त्याकरिता तक्रारदारांनी सदरहू मोबाईल हा ३ ते ४ वेळा जाबदार क्र.१ यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला. दुरुस्तीनंतर देखील या मोबाईलमधील तक्रार दूर झाली नाही. या नादुरुस्तीमुळे तक्रारदारांना त्यांचा मोबाईल वापरणे अशक्य होऊ लागले. नादुरुस्त मोबाईलमुळे तक्रारदारांना त्यांच्या व्यवसायाच्या व घरगुती स्तरावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. याबाबत तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे वेळोवेळी तक्रार करुन देखील जाबदार क्र.२ यांनी त्याची दाद घेतली नाही तसेच तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे त्यांना मोबाईल देखील बदलून दिला नाही अशी तक्रारदारांची जाबदारांविरुध्द तक्रार आहे. जाबदारांच्या या अशा वागण्यामुळे तक्रारदारांचे जे शारिरिक मानसिक व आर्थिक नुकसान झाले, त्याकरिता तक्रारदारांना सदरहू तक्रारअर्ज दाखल करावा लागला आहे असे तक्रारदारांनी तक्रारअर्जात कथन केले आहे. तक्रारअर्जात तक्रारदारांनी मोबाईलची संपूर्ण किंमत तसेच त्यांना जो शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला त्याकरिता म्हणून व तक्रारअर्जाच्या खर्चापोटी म्हणून अशी एकूण रक्कम रु.३९,०००/- ची व्याजासह मागणी केली आहे. तक्रारअर्जाच्या पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.४ अन्वये एकूण ५ कागद दाखल केले आहेत.
२. मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदार क्र.१ व २ यांचेवर होवून देखील ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आले.
३. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारअर्जासोबत जी कागदपत्रे दाखल केली आहेत, त्यातील नि.४/१ अन्वये दाखल केलेल्या बिलावरुन तक्रारदार तक्रारअर्जात कथन करतात त्याप्रमाणे त्यांनी जाबदार क्र.१ कंपनीने उत्पादित केलेला कार्बन के ३ या मॉडेलचा मोबाईल जाबदार क्र.२ यांचेकडून र.रु.४,०००/- खरेदी केला होता हे दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी नि.४/२ अन्वये सर्व्हिस जॉब शीट्स दाखल केलेले आहेत. या जॉब शीटवरती Fault Code 1 या सदरापुढे Hangs / Freezes up (H6) असे नमूद केल्याचे दिसून येते. त्यानंतर Repair code 1 या सदरापुढे Software upgrade (R6) असे नमूद केल्याचे दिसून येते. यावरुन वादातील मोबाईलमध्ये तक्रारदार कथन करतात त्याप्रमाणे बिघाड होता व सॉफटवेअरमधील हा बिघाड काढून देण्यात आला हे दिसून येते. तसेच वादातील मोबाईल हा अचानकपणे बंद पडत होता या तक्रारदारांच्या कथनामध्ये मंचास तथ्य जाणवून येते. नि.४/३ अन्वये तक्रारदारांनी दोनही जाबदारांना मोबाईल अद्यापी नादुरुस्त असून तक्रारदारांना मोबाईल बदलून मिळावा याकरिता रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्याचे दिसून येते. ही नोटीस दोनही जाबदारांना प्राप्त झाल्याचे प्रस्तुत प्रकरणी दाखल पोचपावत्यांवरुन समजून येते. नि.४/२ अन्वये दाखल करण्यात आलेले सर्व्हिस जॉब शीट दि.१२/११/२०१० रोजीचे असून जाबदारांना पाठविण्यात आलेली नोटीस ही दि.११/१२/२०१० रोजीची आहे. यावरुन दि.१२/११/२०१० रोजी मोबाईल दुरुस्त करुन तक्रारदारांना देण्यात आल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बिघाड झाला होता आणि म्हणून तक्रारदारांना जाबदारांना नोटीस पाठवावी लागली हे सिध्द होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
इथे एक बाब विचारात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदारांचे वर होऊन देखील ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत, त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीचे खंडनही केलेले नाही. तक्रारदारांना तक्रारअर्जासोबत कागदपत्रे दाखल करुन त्यांची तक्रार शाबीत केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तक्रारदारांची तक्रार ही खोटी आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी पूर्णपणे जाबदारांवर येते परंतु जाबदारांना संधी असून देखील त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. यावरुन तक्रारदारांना विक्री करण्यात आलेला जाबदार क्र.१ कंपनीचा मोबाईल हा प्रथमपासूनच नादुरुस्त होता, त्यामध्ये दुरुस्ती करुन देखील त्यातील दोष जाबदार यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दूर करता आला नाही हे स्पष्ट होते. जाबदार क्र.२ हे जाबदार क्र.१ कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. वास्तविक त्यांचा वस्तूच्या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत कोणताही सहभाग येत नाही ही बाब निश्चित. परंतु जेव्हा विक्री केलेल्या वस्तूबाबत तक्रारी निर्माण होतात व त्या दुरुस्त करुनही जेव्हा त्या दूर होत नाहीत तेव्हा त्या बाबीची माहिती उत्पादन करणा-या कंपनीला देवून ग्राहकाला सर्वतोपरी सहाय्य करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी अधिकृत विक्रेत्याची असते. अशा प्रसंगी अधिकृत विक्रेता हा ग्राहक व उत्पादन करणारी कंपनी यांच्यामधील महत्वाचा दुवा असतो परंतु प्रस्तुत प्रकरणी एकूणच घटनाचक्राचे अवलोकन करता दुरुस्तीनंतरही मोबाईल वारंवार नादुरुस्त होवून देखील त्याबाबतची माहिती जाबदार क्र.१ कंपनीला जाबदार क्र.२ यांनी कळविल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जरी जाबदार क्र.२ यांचा प्रत्यक्षात मोबाईलच्या उत्पादनाशी संबंध येत नसला तरी देखील जाबदार क्र.२ यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस आक्षेप न घेतल्याने विक्री पश्चात सेवा देण्यात त्यांनी टाळाटाळ केल्याचे दिसून येते व यावरुन जाबदार क्र.१ यांनी सदोष मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध करुन व जाबदार क्र.२ यांनी विक्री पश्चात योग्य ती सेवा न देवून तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याचे सिध्द होते असा मंचाचा प्रतिकूल निष्कर्ष (Adverse inference) निघतो. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जाबदार क्र.२ हे जरी अधिकृत विक्रेते असले तरी देखील त्यांना प्रस्तुत प्रकरणी जबाबदार धरणे मंचास क्रमप्राप्त ठरते. आणि म्हणून जाबदार क्र.१ व २ या दोघांनाही तक्रारदारांच्या नुकसानीसाठी वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरण्यात येते. त्यातूनही जाबदार क्र.२ यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होवून त्यांनी तक्रारदारांना योग्य ती विक्रीपश्चात सेवा दिल्याचे शाबीत केले असते तर गोष्ट वेगळी होती.
अशा परिस्थितीमध्ये वर नमूद विवेचन व निष्कर्षाचा विचार करता वादातील मोबाईलची संपूर्ण रक्कम म्हणजेच र.रुपये ४,०००/- जाबदारांनी तक्रारदारांना अदा करावी असा आदेश करणे अत्यंत योग्य व न्याय्य ठरेल असे मंचास वाटते.
आजच्या युगामध्ये मोबाईल हा चैनीची वस्तू नसून अत्यंत गरजेची वस्तू ठरलेला आहे. त्यामुळे नादुरुस्त मोबाईलमुळे तक्रादारांची सर्व स्तरांवर जी काही अडचण झाली असेल याची मंचास कल्पना येते. व त्याची दखल घेवून मंजूर रकमेवर प्रत्यक्षात संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के व्याज मंजूर करणेत येत आहे. तक्रारदारांनी वादातील मोबाईलची खरेदी केल्या दिवसापासूनच तक्रार होती असे तक्रारअर्जात नमूद केलेले आहे. जाबदारांनी तक्रारदारांच्या या तक्रारीचे खंडन केलेले नाही याचा विचार करुन सदरहू व्याज हे मोबाईलचे खरेदी तारखेपासून म्हणजेच दि.२५/९/२०१० पासून मंजूर करण्यात येत आहे तर तक्रारअर्जाच्या खर्चापोटी म्हणून र.रु.२,०००/- तक्रारदारांना मंजूर करण्यात येत आहेत.
प्रस्तुत प्रकरणी मंजूर रकमेवर व्याज देण्यात आल्या कारणाने तक्रारदारांना झालेल्या शारिरिक मानसिक व आर्थिक त्रासापोटी म्हणून स्वतंत्र रक्कम मंजूर करण्यात आलेली नाही.
वर नमूद विवेचन व निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतात.
सबब, मंचाचा आदेश की,
आ दे श
१. जाबदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना रक्कम रु.४,०००/- (रुपये चार हजार फक्त) दि.२५/९/२०१० पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.९ टक्के व्याजदराने अदा करावी.
२. जाबदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना रक्कम रु.२,०००/- (रुपये दोन हजार फक्त) तक्रारअर्जाच्या खर्चापोटी म्हणून अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार क्र.१ व २ यांनी दि.१८/३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दि.३/२/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.