::: आ दे श प त्र :::
मा. सदस्या श्रीमती भारती केतकर, यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा वरील ठिकाणी कायमचा रहिवासी असून विरुध्दपक्ष क्रमांक 1 ही उत्पादक कंपनी असून ते मोबाईल हॅन्डसेट मॉडेल ए-9 चे उत्पादन करते. विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 4 हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे अधिकृत विक्रेते आहेत.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडून दिनांक 12-11-2012 रोजी पावती क्रमांक 710 प्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट मॉडेल ए-9 रुपये 8,100/- ला खरेदी केला असून त्याचा IMEI No. 1:911211900753097 असा आहे. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 4 चा नियमित सेवेचा उपभोक्ता व ग्राहक आहे. सदरचा मोबाईल संच सुरुवातीपासूनच व्यवस्थित कार्यरत नव्हता. वरील दोष मोबाईलमध्ये वॉरंटी कालावधी आढळलेला आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 4 कडे तक्रार नोंदविली व मोबाईल हॅन्डसेट मधील त्रुटी/दोषाबाबत सांगितले असता विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने सदर मोबाईल मधील त्रुटी/दोष दुरुस्त झाले, असे सांगून सदर मोबाईल परत दिला. परंतु, त्यानंतर सुध्दा सदर मोबाईलमध्ये दोष वारंवार येत होते.
तक्रारकर्त्याने पुन्हा सदरचा मोबाईल संच विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे दुरुस्तीसाठी दिनांक 11-10-2013 ला दिला. त्यावेळेस विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने सदर मोबाईल मधील दोष येथे दुरुस्त होत नाही व सदरचा मोबाईल उत्पादक कंपनीकडे दोष दुरुस्तीकरिता पाठविणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे सदरचा मोबाईल विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे दुरुस्तीकरिता विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने पाठविला. त्यावेळेस सदरचा मोबाईल 1 महिना त्यांचेकडे होता. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे विचारणा केली असता दिनांक 18/10/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने मुळ मोबाईल हॅन्डसेट परत न देता, मॉडेल ए-9 स्टार दिला. सदर मोबाईल हा कमी किंमतीचा असून सुविधा व तांत्रिकदृष्टया मॉडेल ए-9 पेक्षा कमी दर्जाचा होता. अशाप्रकारे निम्न दर्जाचा मोबाईल हॅन्डसेट देवून विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे.
सदोष मुळ हॅन्डसेटच्या ऐवजी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने दिलेला मोबाईल सुध्दा दोषयुक्त आहे. तो सुध्दा वारंवार आपोआप बंद होतो व व्यवस्थित कार्य करीत नाही. त्यावेळेसचे सर्व्हिस सेंटर विरुध्दपक्ष क्रमांक 4 कडे दिनांक 28-05-2014 रोजी तक्रार नोंदविली व सदर मोबाईल हॅन्डसेट मधील दोषाबाबत सांगितले असता विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने सदरचा मोबाईल सर्व साधनासोबत त्यांचेकडे दुरुस्तीकरिता ठेवून घेतला. परंतु, सदरचा मोबाईल हॅन्डसेट तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 4 ला मागून सुध्दा परत दिला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असून तक्रारकर्त्याचा मोबाईल हॅन्डसेट अन्यायाने वापरला.
त्यानंतर वारंवार विरुध्दपक्ष क्रमांक 4 ला मोबाईलची मागणी केली असता विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने इतर साधने व बॅटरीशिवाय सदरचा मोबाईल हॅन्डसेट तक्रारकर्त्याला परत दिला. तो सुरु करण्याकरिता तक्रारकर्त्याला स्वखर्चाने बॅटरी विकत घ्यावी लागली. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला ईजा पोहचविली व त्याला नाहक त्रास दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक, आर्थिक, शैक्षणिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब, तक्रारकर्त्याची प्रार्थना की, न्यायाचे दृष्टीने तक्रार मंजूर होवून 1) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 4 हे अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहेत हे घोषित करावे. 2) तक्रारकर्त्याला मोबाईल हॅन्डसेट मॉडेल ए-9 ची किंमत रुपये 8,100/- व 24/- रुपये दर वर्ष दर शेकडा व्याज दराप्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 4 ला वैयक्तिक व सामाईकरित्या जबाबदार धरुन विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्याला मिळावे. 3) तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाच्या कृत्यामुळे शैक्षणिक, शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास व हानी पोटी रु. 1,50,000/- व तक्रार खर्च म्हणून रु. 10,000/- असे एकूण रु. 1,60,000/- मिळावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 09 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 4 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 4 यांनी संयुक्त लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे आहे की, अशाप्रकारचे निम्न दर्जाचे मोबाईल देवून विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 4 चे असे म्हणणे आहे की, मॉडेल ए-9 स्टार हा मॉडेल ए-9 चे Upgraded Version आहे. कंपनीच्या दिलेल्या वॉरंटीप्रमाणे तक्रारकर्त्यास नवीन मोबाईल दिलेला आहे व तो त्याने स्विकारलेला आहे. तसेच मॉडेल ए-9 हयाची निर्मिती बंद झाल्यामुळे व त्याचेच Upgraded Version मॉडेल ए-9 स्टार देण्यात आलेले आहे व त्याबद्दल तक्रारकर्त्याने घेण्याचे वेळेस किंवा नंतरही कोणतीही तक्रार विरुध्दपक्षाकडे केलेली नाही. सहा-सात महिन्यानंतर मोबाईल वापरुन खोटी सबब पुढे केलेली आहे.
तक्रारकर्त्याने जी दिनांक 28-05-2014 रोजीची तक्रार नोंदविली ती मोबाईलचा वॉरंटी संपल्यानंतरची तक्रार आहे. परंतु, चांगली सेवा विरुध्दपक्ष कंपनी देते म्हणून तक्रारकर्त्याचा मोबाईल हा वॉरंटीच्या नंतर आणलेला असतांना सुध्दा विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने रिंगर चा दोष असल्याने तो दुरुस्त करुन दिला.
तक्रारकर्ता जाणीवपूर्वक खोटया स्वरुपाची मांडणी हया तक्रारीमध्ये करीत आहे. विरुध्दपक्षाचे येथे असे म्हणणे आहे की, जेव्हा कोणतेही मोबाईल विरुध्दपक्ष क्रमांक 4 कडे येते तेव्हा त्या मोबाईल सोबत इतर कोणत्या वस्तू आहेत, जसे बॅटरी व बॅक कव्हर, चार्जर इत्यादी असल्यास त्याच्याबद्दल जॉब कार्ड मध्ये नोंद घेतलेली असते. सदरहू मोबाईल जो तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे आणला होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बॅटरी किंवा इतर साधने नव्हती म्हणूनच त्याचे जॉबकार्डवर तसे टिकमार्क सुध्दा केलेले नाही. मोबाईल दुरुस्त झाल्यानंतर तक्रारकर्ता जेव्हा येतो तेव्हा त्याला मोबाईल परत करण्यात येते. तक्रारकर्ता हा मोबाईल ठेवून गेल्यानंतर परत जेव्हा न्यायला आला तेव्हा त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 4 चे बॅटरीवर पूर्ण चेक करुन ओ.के. स्थितीत घेवून स्वत:ची सही केलेली आहे, हयावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा सपशेल खोटे बोलत आहे.
तक्रारकर्ता यांनी दिनांक 04-09-2014 रोजी दिलेली नोटीस ही सबसेल खोटी असून ती नोटीस मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने फोनद्वारे तक्रारकर्त्याला कळविले की, मुळत: तुम्ही खोटी नोटीस दिलेली आहे व त्यांच्या जॉब कार्डबद्दलची सुध्दा तक्रारकर्त्याला जाणीव करुन दिली होती. त्याबद्दल तक्रारकर्त्याने त्याची चूक कबूल केली व पुढे काही कार्यवाही करणार नाही असे सांगितले म्हणून विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने कोणताही नोटीसला जवाब दिला नाही. तकारकर्त्याची मागणी ही सर्वस्वी गैरकायदेशीर व बिनबुडाची आहे. विरुध्दपक्षाने दिलेली सेवा ही उत्तम दर्जाची होती व त्यामध्ये कोणताही दोष नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने वॉरंटी कालावधीनंतर सुध्दा मोफत सेवा देवूनही तक्रारकर्त्याने ही तक्रार गैरकायदेशीररित्या व अनुचित लाभ उचलण्याचे वाईट उद्देशाने दाखल केलेली आहे, करिता तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना नोटीस बजावल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्रमांक 2 गैरहजर असल्याने सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या विरुध्द एकतर्फी चालविण्याचे आदेश या न्यायमंचाने दिनांक 07-03-2015 रोजी पारित केले.
विरुध्दपक्ष क्रमांक 3 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी त्यांचे लेखी जवाबाचे कथन दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व अधिकच्या कथनात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या अर्जाचे व सोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्टपणे दिसून येते की, तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्दपक्ष क्रमांक 3 ला त्रास देण्यासाठी बेकायदेशीररित्या केली आहे. तक्रारकर्त्याने अर्जात जोडलेल्या दस्तऐवज व वास्तविक परिस्थितीत बरीच तफावत आढळत आहे. तक्रारकर्त्याने मोबाईल नेमका किती काळ वापरल्यानंतर त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या याचे योग्य त-हेने स्पष्टीकरण दिलेले नाही.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मोबाईलमध्ये तथाकथित अडचणी निर्माण झाल्यानंतर तो दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे घेवून गेला याबाबत विरुध्दपक्ष क्रमांक 3 ला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. सदर तक्रारीत नमूद केलेल्या परिच्छेद क्रमांक 3 नुसार व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्यातील संवाद व व्यवहाराबाबत विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांस कुठल्याही प्रकारची माहिती नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 3 हे मोबाईल कंपनीचे किरकोळ विक्रेते आहेत. तक्रारकर्त्यास मोबाईल विकत घेत असतांना मोबाईल विषयी विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडून संपूर्ण माहिती देण्यात आली तसेच तक्रारकर्त्यास मिळणा-या सेवा व सुविधांबद्दल सांगण्यात आले. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 3 ने तक्रारकर्त्याविरुध्द अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही तसेच तक्रारकर्त्याचे कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही. याउलट अनुचित व्यवहार करुन तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत मोबाईल किंमतीपेक्षा जास्त पटीने रु. 1,50,000/- इतकी मागणी करुन विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांस त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांस आर्थिक व मानसिक त्रास झाल्यामुळे सदरची खोटी तक्रार खारीज करुन सदर त्रासापोटी विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांस रु. 20,000/- देण्याचा आदेश पारित करावा, ही विनंती.
का र णे व नि ष्क र्ष
सदर प्रकरणात उभयपक्षांनी दाखल केलेल्या सर्व दस्तांचे अवलोकन करुन व उभयपक्षांचा युक्तीवाद ऐकून काढलेल्या मुद्दयांचा अंतिम आदेशाच्या वेळी विचार करण्यात आला.
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याबद्दल कुठलाही वाद नसल्याने तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द् होत असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे ग्राहय धरण्यात येत आहे.
2) तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे संपूर्ण वाचन मंचाने केले तसेच उभयपक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याची तक्रार दाखल दस्तांशी संपूर्णपणे विसंगत आढळते.
3) तक्रारकर्त्याने तक्रारीत व युक्तीवादाच्या वेळी असे म्हटले की, सदरचा मोबाईल त्याच्या शैक्षणिक उपयोगासाठी घेतला होता. सदरचा मोबाईल दोषपूर्ण असल्याने तक्रारकर्त्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पण तक्रारकर्त्याने संपूर्ण प्रकरणात तो सदर मोबाईलचा त्याच्या शिक्षणासाठी कसा वापर करत होता व मोबाईल दोषपूर्ण असल्याने त्याचे कसे शैक्षणिक नुकसान झाले हे पुराव्यासह कोठेच सिध्द् न केल्याने तक्रारकर्त्याचा सदरचा आक्षेप ग्राहय धरता येणार नाही.
4) दाखल दस्तांच्या अवलोकनावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या कंपनीचा मोबाईल मॉडेल ए-9 रु. 8,100/- ला दिनांक 12-11-2012 रोजी खरेदी केला. सदर पावती दस्त क्रमांक A, पृष्ठ क्रमांक 12 वर दाखल आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याच्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम तक्रार दिनांक 11-10-2013 रोजी उदभवलेली दिसून येते. त्या दिवशीचे जॉब कार्ड दस्त क्रमांक B, पृष्ठ क्रमांक 13 वर दिसून येते, यावरुन मोबाईल घेतल्यानंतर जवळ जवळ 11 महिन्यांनी तक्रार उदभवलेली दिसून येते. सदर जॉबकार्ड मधील Complaint या रकान्यासमोर Head phone, Hang असे नमूद केलेले दिसून येते. सदर मोबाईल वॉरंटीच्या कालावधीत बिघडल्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने दिनांक 18-10-2013 रोजी तक्रारकर्त्याला ए-9 स्टार हा नवीन मोबाईल दिला. ( पृष्ठ क्रमांक 15 ) तक्रारकर्त्याच्या मते सदरचा नवीन मोबाईल हा तक्रारकर्त्याच्या मुळच्या मोबाईलपेक्षा कमी किंमतीचा व कमी सुविधा असलेला तसेच तांत्रिकदृष्टया निम्न दर्जाचा होता. तक्रारकर्त्याचे हे म्हणणे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यानेच दाखल केलेल्या दस्तांचा आधार घेऊन खोडून काढले. यासाठी विरुध्दपक्षाने युक्तीवादाच्या वेळी तक्रारकर्त्याने दाखल केलेले ( दस्त क्रमांक D, पृष्ठ क्रमांक 15 ) वरील डिलेव्हरी चालान वरील नमूद मजकूर मंचाच्या निदर्शनास आणून दिला. त्यात अनुक्रमांक 2 वर तक्रारकर्त्याला दिनांक 18-10-2013 रोजी ए-9 च्या ऐवजी ए-9 स्टार बदलून दिल्याचे नमूद केलेले दिसून येते. त्याची किंमत रु. 8,938/- इतकी दिसून येते. तक्रारकर्त्याच्या आधीच्या मोबाईलची किंमत रु. 8,100/- इतकी होती. ( दस्त क्रमांक A, पृष्ठ क्रमांक 12 ) त्या बदल्यात त्याला 11 महिने मोबाईल वापरल्यानंतरही रु. 8,938/- चा नवीन मोबाईल मिळाला. विरुध्दपक्षाच्या मते सदर मॉडेल तक्रारकर्त्याच्या ए-9 या मॉडेलपेक्षा सुधारित तंत्राचे होते. त्याचप्रमाणे नवीन ए-9 स्टार मोबाईल निम्न सुविधांचा होता असे तक्रारकर्त्याने कोठेही पुराव्यासह सिध्द् केलेले नसल्याने तक्रारकर्त्याचा नवीन मोबाईल निम्न दर्जाचा व कमी किंमतीचा असल्याचा आक्षेप ग्राहय धरता येणार नाही.
5) तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर नवीन मोबाईल दिनांक 18-10-2013 रोजी मिळाल्यावर त्यात ही तक्रारकर्त्याला वारंवार तक्रारी येत होत्या. सदरचा मोबाईल विरुध्दपक्ष क्रमांक 4 कडे दिनांक 28-05-2014 रोजी दुरुस्तीकरिता दिला. परंतु, नंतर सदरचा मोबाईल तक्रारकर्त्याने मागून ही तक्रारकर्त्याला परत केला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून तक्रारकर्त्याचा मोबाईल हॅंडसेट अन्यायाने वापरला. सदर मोबाईलमध्ये उत्पादक दोष असून तो दुरुस्त होण्याजोगा नाही. वारंवार मागणी केल्यावर विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने इतर साधने व बॅटरीशिवाय सदरचा मोबाईल हॅन्डसेट तक्रारकर्त्याला परत केला. तो सुरु करण्याकरिता तक्रारकर्त्याला स्वखर्चाने बॅटरी विकत घ्यावी लागली.
6) तक्रारकर्त्याचे सदरचे म्हणणे खोडून काढण्याकरिता विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने दिनांक 14-07-2015 रोजी अर्ज करुन Mobile Repair Delivery Sheet दाखल केली. ( पृष्ठ क्रमांक 45 ) सदर Delivery Sheet वरुन तक्रारकर्त्याला सदर मोबाईल दिनांक 16-07-2014 रोजी OK Condition मध्ये मिळालेला दिसून येतो व त्यावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी ही दिसून येते.
या सर्व घटनाक्रमांवरुन तक्रारकर्त्याने मुळ मोबाईल दिनांक 12-11-2012 रोजी रु. 8,100/- मध्ये विकत घेतला. सदर मोबाईल 11 महिने वापरल्यावर तक्रारकर्त्याच्या सदर मोबाईलमध्ये बिघाड झाल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने दिनांक 18-10-2013 रोजी ए-9 स्टार हा नवीन मॉडेलचा रु. 9,838/- किंमतीचा नवीन मोबाईल तकारकर्त्याला दिला. तक्रारकर्त्याने सदर ए-9 स्टार मोबाईल 07 महिने निर्विघ्नपणे वापरल्यावर पुन्हा दिनांक 28-05-2014 रोजी दुरुस्तीसाठी दिला. वास्तविक पाहता तक्रारकर्त्याच्या मोबाईलची वॉरंटी संपल्यावरही विरुध्दपक्ष क्रमांक 4 ने सदर मोबाईल नि:शुल्क दुरुस्ती करुन दिलेला असतांनाही व तक्रारकर्त्याने त्यावेळी विनातक्रार स्विकारला असतांनाही केवळ नवीन मोबाईल मिळावा, या अपेक्षेने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार दंडासहित खारीज करण्यात यावी अशी विरुध्दपक्ष क्रमांक 1, 3 व 4 यांची मागणी असतांनाही तक्रारकर्ता हा विदयार्थी असल्याने सदर मंच तक्रारकर्त्याला कडक समज देऊन तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करत आहे. न्यायिक खर्चाबद्दल कुठलेही आदेश नाही.
अं ति म आ दे श
तक्रारकर्त्याच्या तक्रारीत कुठलेही तथ्य न आढळल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
न्यायीक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.