निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्हाण, सदस्य ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने सामनेवाले-बँकेच्या घाटकोपर शाखेकडे रु.9.50 लाखाच्या गृह कर्जासाठी अर्ज केला. त्यानुसार, सामनेवाले यांनी दि.12.08.2002 रोजी एचएल क्र.10434 अन्वये तक्रारदाराला वर नमूद कर्जाची रक्कम मंजूर केली. ज्याची प्रत सोबत जोडण्यात आली आहे. सामनेवाले यांनी या गृह कर्जासाठी 11% कमी-अधिक होणारा व्याज व्याजदर लावला होता. हे कर्ज तक्रारदाराच्या सदनिका क्र.204, मोरज रेसीडन्सी नवी मुंबईसाठी मंजूर करण्यात आले होते. या कर्जाची परतफेड 15 वर्षात दरमहा रु.10,763/- याप्रमाणे करायची होती. कर्जाची परतफेड नियमितपणे, त्याचप्रमाणे, काहीवेळा घाऊक रक्कम देण्यात आली. व्याजाचा दर कमी असताना सामनेवाले यांनी ज्यादा व्याजाची आकारणी केली आहे असून यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 2 याप्रकरणी जादा व्याजाच्या आकारणीबाबत तक्रारदाराने सामनेवाले यांचेशी संपर्क केल्यानंतर जादा आकारणी केलेले व्याज परत करण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात तशी कृती सामनेवाले यांचेकडून झालेली नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 3 दि.17.11.2006 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांना पत्र पाठवून व्याज दराबाबत पुर्नविलोकन करण्यात यावे तसेच कर्ज करारनाम्याची प्रत व अनुषांगिक कागदपत्रं देण्यात यावी अशी विनंती केली. परंतु सामनेवाले यांचेकडून याबाबतची पूर्तता करण्यात आली नाही. तक्रारदारचे म्हणणे की, सामनेवाले यांनी नेहमीच त्यांच्या गृहकर्जावरील व्याजाची अधिकची आकारणी केली. त्यामुळे याप्रकरणी तक्रारदाराने दि.19.02.2008 रोजी प्रकरण मार्गी लावण्यासाठी कायदेशीर नोटीस दिली, त्याची प्रत सोबत ठेवण्यात आली. या नोटीसला सामनेवाले यांचेकडून दि.08.03.2008 रोजी उत्तर देण्यात येऊन तक्रारदार हे थकबाकीदार असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले. परंतु त्याकरिता, सामनेवाले यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. 4 तक्रारदाराचे म्हणणे की, सामनेवाले यांनी गृह कर्जावर कमी दर असताना अधिकच्या व्याजाची आकारणी केली ती कमी करण्याकरिता संपर्क साधून अर्ज विनंत्या करण्यात आल्या, कायदेशिर नोटीस पाठविण्यात आली परंतु त्यांचेकडून तक्रारदाराला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे तक्रारदाराला बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाले यांचेकडून या अधिकच्या व्याजाची आकारणी करण्यात आल्यामुळे तक्रारदाराला रु.6,00,000/- चा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून त्यांनी या मंचासमोर दि.31.06.2008 रोजी अर्ज दाखल करुन खालीलप्रमाणे विनंत्या केल्या. 1 सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या रक्कम रु.6,00,000/- मानसिक त्रास, शारिरीक त्रास, आर्थिक भूर्दंड म्हणून नुकसानभरपाईची रक्कम द्यावी. 2 या अर्जाचा खर्च द्यावा व अनुषांगिक दाद मिळावी. 5 सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन तक्रारीत नमूद केलेले आरोप नाकारले. तक्रार खोटी, बिनबुडाची, बेकायदेशीर व गैरसमजुतीवर आधारलेली आहे तसेच तक्रारदार हे ग्राहक नसल्यामुळे सामनेवाले यांचे सेवेत कमतरता असल्याचे ते म्हणू शकत नाहीत, त्यामुळे तक्रार रद्दबातल करण्यात यावी अशी सामनेवाले यांची विनंती आहे. त्यांचे म्हणणे की, तक्रारदार यांनी बरेच मुद्दे या मंचापासून लपवून ठेवले आहेत. ते पारदर्शकपणे मंचासमोर आलेले नाहीत. सामनेवाले यांचे सेवेत कमतरता नाही किंवा त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही ही तक्रार या मंचासमोर चालणारी नाही. 6 तक्रारदाराने व्याजाच्या संदर्भात तक्रारीत जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्याकरिता त्यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराचा हा मुद्दा खोडसाळपणाचा असून त्या मुद्दयांमध्ये काही तथ्य नसल्याचे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. 7 तक्रारदाराच्या मागणीनुसार, सदनिका क्र.204, मोरज रेसीडन्सी, नवी मुंबईकरिता रु.9.50 लाख एवढी रक्कम गृहकर्ज म्हणून मंजूर करण्यात आली. या रक्कमेकरिता द.सा.द.शे.11% बदलता व्याजदर मंजूर केलेल्या कर्जाच्या आदेशात नमूद करण्यात आलेला आहे. हे कर्ज दरमहा समान हप्त्यात रु.10,673/- प्रमाणे 108 हप्त्यात व 15 वर्षात परतफेड करायची आहे. याकरिता तक्रारदाराने कर्ज करारनामा व अनुषांगिक कागदपत्रांवर सहयां केलेल्या आहेत. त्यांनी त्यांची सदनिका सामनेवाले यांचेकडे गहाण म्हणून ठेवलेली आहे. कर्ज करारनाम्याच्या कलम-6 नुसार बदलत्या व्याजदरानुसार कर्जाच्या हप्त्याची रक्कम दरमहा नियमितपणे भरण्याची ग्वाही तक्रारदाराने दिलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराला दि.12.02.2002 मध्ये गृहकर्ज मंजूर केलेले असून त्यानंतर, वेळोवळी व्याजदरामध्ये जे बदल झाले, त्याबाबतची तपशीलवार माहिती त्यांनी कैफियतीच्या परिच्छेद क्र.6 मध्ये दिली आहे. 8 तक्रारदाराने सामनेवाले यांना पाठविलेल्या दि.19.02.2008 च्या नोटीसला सामनेवाले यांचेकडून त्यांच्या दि.08.03.2008 च्या पत्राने उत्तर देण्यात आले. नोटीसमधील आरोप नाकारण्यात येऊन या प्रकरणी विचारविनीमय व चर्चा करण्याकरिता तक्रारदाराला बोलाविण्यात आले परंतु तक्रारदार आले किंवा नाहीत याचा उल्लेख उत्तरात करण्यात आलेला नाही. 9 तक्रारदाराने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, गृहकर्जाच्या करारानुसार, दरमहा हप्त्याची रक्कम नियमितपणे भरलेली नाही. सप्टेंबर, 2002 ते ऑगस्ट, 2008 या 72 महिन्याच्या एकूण हप्त्याची रक्कम रु.7,74,936/- पैकी रक्कम रु.6,53,563/-, 72 महिन्यांनंतर भरली पैकी या कालावधीतील रक्कम रु.1,21,373/- तक्रारदाराकडे शिल्लक राहीली. तक्रारदार हे मासिक हप्ते भरण्यामध्ये त्यांचा अनियमित होते. तक्रारदाराला बदलता व्याजदर त्याने घेतलेल्या कर्जासाठी मंजूर करण्यात आला होता, त्यानुसार, कैफियतीच्या परिच्छेद क्र.6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आर.बी.आय.च्या धोरणानुसार कर्जावरील व्याजाची आकारणी करण्यात आली. ही वसुली वर नमूद केलेल्या परिस्थितीत नियमानुसार करण्यात आलेली असल्यामुळे त्यांच्या सेवेत कमतरता नाही असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. कारण, दि.28.08.2002 ते दि.31.03.2006 या कालावधीमध्ये बदलत्या व्याजानुसार, व्याजाची रक्कम रु.3,47,727/- पुनर्गणिती करण्यात आली होती. पुनर्गणिती करुन रक्कम रु.2,89,562/- एवढी व्याजाची रक्कम घेऊन रु.58,165/- एवढे अधिकचे व्याजाची रक्कम तक्रारदाराला परत करण्यात आली. ही बाब तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेली नाही. 10 तक्रारदार यांनी मासिक हप्त्याची रक्कम नियमितपणे भरलेली नसल्यामुळे ते कर्ज करारानुसार, थकबाकीदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे नाव थकबाकीदार यादीत टाकून त्यांचे संबंधीत खाते एन.पी.ए.म्हणून घोषित करण्यात आले. 11 तक्रारदाराने घेतलेल्या कर्जासाठी 11% व्याजदर मान्य करण्यात आला होता, त्यानुसार बँकेच्या धोरणानुसार व आर.बी.आय.च्या निर्देषानुसार, संबंधीत कालावधीमध्ये व्याजामध्ये जो बदल झाला त्यानुसार व्याजाची आकारणी करण्यात आली. त्यामुळे कमी दर असताना अधिकचा दर सामनेवाले यांनी घेतला हा तक्रारदाराचा आरोप सामनेवाले यांनी नाकारला. मागणी करुन देखील कर्ज करारनाम्याची प्रत व अनुषांगिक दस्तऐवज सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेला नाही हा आरोप देखील सामनेवाले यांनी नाकारला. तक्रारदार यांनी केलेली मागणी खोटी व गैरसमजुतीवर आधारलेली असल्यामुळे ती नाकारण्यात यावी व तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी सामनेवाले यांची विनंती आहे. 12 तक्रार अर्ज, त्या सोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं, प्रतिनिवेदन, लेखी युक्तीवाद, पुरावा शपथपत्रं, सामनेवाले यांची कैफियत, पुरावा शपथपत्रं, लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्रांची पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. 13 तक्रारदार यांनी सामनेवाले –बँकेकडून त्यांची सदनिका क्र.204, मोरझ रेसीडेन्सी, नवी मुंबईकरिता सामनेवाले यांच्या घाटकोपर शाखेतून रु.9.50 लाख एवढे गृहकर्ज 11% बदलत्या व्याजदराने घेतले. याबाबत, सामनेवाले यांच्याबरोबर जो कर्ज करारनामा करण्यात आला, त्यानुसार, ही घेतलेली गृहकर्जाच्या रक्कमेची दरमहा रु.10,763/- प्रमाणे 15 वर्षात परतफेड करावयाचे होती. कर्ज करारपत्राची प्रत सोबत जोडण्यात आलेली नाही. परंतु कर्ज मंजूर केलेल्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे. त्यामध्ये, 11% बदलत्या व्याजदर नमूद करण्यात आलेला आहे तसेच या गृहकर्जापोटी काही अटीं शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत. तक्रारदाराचे म्हणणे की, सामनेवाले यांनी कमी व्याजदर असताना त्यांचेकडून अधिकचा व्याजदर आकारणी करुन घेतल्यामुळे त्यांना रु.6 लाखाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. यामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदाराची फसवणूक केलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारदाराने नियमितपणे परतफेडीची रक्कम सामनेवाले यांना दिलेली असताना सामनेवाले यांनी त्यांची फसवणूक केलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. परंतु या पृष्ठर्थ, त्यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही की, जेणेकरुन तक्रारदाराने सामनेवाले यांना नियमितपणे परताव्याची रक्कम दिलेली आहे. यावर विश्वास ठेवता येईल. त्यामुळे तक्रारदाराच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. 14 सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकारलेले असून तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली नाही असे नमूद केले आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या दि.12.08.2002 च्या तक्रारीसोबत जोडण्यात आलेल्या पत्रावरुन, ऑगस्ट, 2002 मध्ये सामनेवाले यांनी तक्रारदाराला गृहकर्ज 9.50 लाख मंजूर केल्याचे दिसून येते. हे कर्ज समान मासिक हप्त्यात 15 वर्षात परत करायचे असून या कर्जासाठी 11% बदलत्या व्याजदर लावण्यात आल्याचे नमूद केले आहे आणि या पत्रांमध्ये असे नमूद केले आहे की, “Rate of interest stipulated herein is subject to revision / variation by the Bank from time to time as per RBI guideline without any notice”. त्याप्रमाणे, सामनेवाले यांनी कैफियतीच्या परिच्छेद क्र.6 मध्ये त्या काळातील बदलत्या व्याजदराचा तपशील दिलेला आहे, त्यानुसार, संबंधीत कर्जाच्या, व्याजाची आकारणी सामनेवाले यांचेकडून करण्यात आली आहे. तक्रारदाराने ऑगस्ट, 2002 मध्ये गृहकर्ज घेतल्यानंतर त्याचा परतावा नियमितपणे केलेला नाही म्हणून सामनेवाले यांनी सप्टेंबर, 2002 ते ऑगस्ट, 2008 पर्यंतच्या कालावधीतील कर्ज फेडीच्या रक्कमेची केलेली एकूण परिगणती कैफियतीच्या परिच्छेद क्र.10 मध्ये नमूद केली आहे. त्यापैकी, तक्रारदाराने रु.7,74,936/- पैकी रु.6,53,563/- एवढी रक्कम एक गठ्ठा भरलेली असून त्यावेळी तक्रारदाराने द्यावयाची रक्कम रु.1,21,373/- शिल्लक असल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेता, तक्रारदाराने नियमितपणे कर्जफेडीची रक्कम सामनेवाले यांना अदा केलेली नाही हे दिसून येते. मोघमरित्या नियमितपणे कर्जफेड केली असे कथन तक्रारदाराने केले आहे. परंतु याकरिता कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी ऑगस्ट, 2002 ते मार्च, 2006 च्या देय व्याजाची आकारणी रु.3,47,727/- केलेली असून या रक्कमेपैकी त्या दिवशी जी जास्तीची रक्कम आकारण्यात आली होती. ती रक्कम रु.58,165/- तक्रारदाराला परत केली. ही रक्कम तक्रारदाराला परत मिळाल्याचे त्याने त्याच्या तक्रारीत नमूद केलेले नाही, त्या अर्थी, तक्रारदाराने ज्या बाबीं लपविलेल्या आहेत त्यापैकी ही एक बाब आहे. वरील विवेचन लक्षात घेता, सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता आहे असे दिसून येत नाही. सदर तक्रारीमध्ये काही तथ्य असल्याचे दिसून येत नाही ती रद्द होण्यास पात्र आहे. सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.34/2011(239/2008) रद्दबातल करण्यात येते. (2) या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |