निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार कंपनीचा बि-बियाणे व शेतीपुरक वस्तुंचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे व या व्यवसायाकरीता त्यांचे जाबदेणार बँकेमध्ये चालू खाते आहे व तक्रारदारांचे या चालू खात्यामार्फत आर्थिक व्यवहार तसेच धनादेशाचे व्यवहारही सुरु होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खात्यावरील धनादेश वटविताना धनादेशावर तक्रारदारांच्या संचालकांची नमुन्याप्रमाणे स्वाक्षरी व कंपनीचा संचालकांचा शिक्का धनादेशावर असणे आवश्यक होते, त्याशिवाय त्यांच्या खात्यामधून धनादेश वटविणार नव्हते. दि. 7/7/2009 रोजी जाबदेणार बँकेच्या शाखेमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने तक्रारदारांच्या कार्यालयामधून धनादेश चोरून त्यावर संचालक म्हणून खोटी सही करुन व त्यावर कंपनीचा खोटा शिक्का मारुन तो वटविण्याकरीता बँकेकडे सादर केला. हा धनादेश क्र. 147308 रक्कम रु. 1,45,000/- करीता होता. या धनादेशाची रक्कम जाबदेणारांनी स्वाक्षरीची पडताळणी न करता दिली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशित तत्वानुसार रक्कम रु. 50,000/- किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम खात्यामधून काढताना रक्कम घेणार्या व्यक्तीच्या ओळखपत्राबाबत माहिते घेणे व त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते. तसेच धनादेशाची रक्कम 50,000/- पेक्षा जास्त असताना व सादर करण्यात आलेला धनादेश बेअरर आहे याची जाणीव व माहिती असताना, सदर रक्कम मागणार्या इसमास त्याच्या नावाबाबत अथवा त्याच्या ओळखेबाबत काहीही विचारपूस न करता जाबदेणारांनी त्या इसमास रक्कम दिली, हा जाबदेणारांचा निष्काळजीपणा आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, धनादेशावरील सही ही संचालकांची नव्हती, तसेच शिक्का चुकीचा उमटविला होता आणि धनादेश बेअरर असल्यामुळे व तो घेऊन येणारी व्यक्ती ही तक्रारदारांच्या संचालकांपैकी कोणीही नाही, हे माहिती असताना, धनादेशावर पैसे काढणार्या व्यक्तीचे पूर्ण नावही लिहिलेले नसताना, जाबदेणारांनी निष्काळजीपणा करुन व सेवेमधील कमतरतेमुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम रु. 1,45,000/- चा अपहार झाला, व यासाठी जाबदेणार जबाबदार आहेत. तक्रारदारांनी दि. 9/7/2009 रोजी या धनादेशाच्या अपहाराबाबत अज्ञात इसमाविरुद्ध खडक पोलिस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी जाबदेणार बँकेमध्ये चौकशी केली व त्यांच्याकडे तक्रारदारांचे सह्यांचे व शिक्क्यांचे नमुने पाहण्यास मागितले, हे नमुने जाबदेणारांकडे नव्हते म्हणून जाबदेणारांनी दि. 15/7/2009 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांच्या सहीचे नमुन्यांचे कार्ड गहाळ झाल्याचे कळविले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, यावरुन तक्रारदारांच्या सहीचे नमुन्यांचे कार्ड उपलब्ध नव्हते व जाबदेणारांनी सहीची आणि शिक्क्यांची पडताळणी केली नाही, हे दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 29/7/2009 रोजी जाबदेणारांना वकीलामार्फत नोटीस पाठविली, नोटीस मिळूनही जाबदेणारांनी तक्रारदार कंपनीस रक्कम दिली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 1,45,000/- 18% व्याजदराने, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/-, तक्रारीचा खर्च रक्कम रु. 10,000/- व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांचे चालू खाते हे व्यावसायिक कारणाकरीता होते. खाते उघडताना तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे दिली होती, हे जाबदेणार मान्य करतात. तक्रारदारांच्या चेअरमनने खाते उघडताना जो फॉर्म व नमुना स्वाक्षरी आणि शिक्का दिला होता त्याची पडताळणी करुनच धनादेश वटविला गेला. दि. 7/7/2009 रोजी अज्ञात इसमाने तक्रारदारांच्या कार्यालयामधून धनादेश चोरून त्यावर संचालक म्हणून खोटी सही करुन व त्यावर कंपनीचा खोटा शिक्का मारुन तो वटविण्याकरीता बँकेकडे सादर केला, हे जाबदेणारांना मान्य नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, सही व शिक्क्याची क्रॉस चेकिंग केल्यानंतरच त्यांनी सदरचा धनादेश क्लिअर केला. तक्रारदार कंपनीच्या कार्यालयामधून धनादेश व शिक्का चोरीला गेला असेल तर त्यासाठी जाबदेणार हे जबाबदार ठरत नाहीत. धनादेश क्लिअर करताना जाबदेणार बँकेच्या कर्मचार्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स नुसारच पडताळणी करुन धनादेश क्लिअर केला आहे, यामध्ये त्यांची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही, म्हणून प्रस्तुतची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्यापुष्ठ्यर्थ श्री. दिलीप भिसे यांचे शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार कंपनीच्या म्हणण्यानुसार, अज्ञात इसमाने तक्रारदारांच्या कार्यालयामधून धनादेश क्र. 147308 चोरून त्यावर संचालक म्हणून खोटी सही करुन व त्यावर कंपनीचा खोटा शिक्का मारुन तो वटविण्याकरीता बँकेकडे सादर केला व रक्कम रु. 1,45,000/- काढून घेतले. तसेच, बँकेने सही व शिक्क्याची पडताळणी न करता, रक्कम घेऊन जाणार्या इअसमाची विचारपूस न करता किंवा त्याची ओळख न पटविता रक्कम दिली. तक्रारदारांनी या सर्व आरोपांकरीता कुठलाही पुरावा मंचामध्ये दाखल केला नाही. तसेच जाबदेणार बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स नुसार पडताळणी न करता धनादेश क्लिअर केला, याबाबतही कोणताही पुरावा दाखल केला नाही. दि. 15/7/2009 रोजी जाबदेणारांनी तक्रारदार कंपनीस पत्र पाठवून, शिफ्टींगच्या दरम्यान त्यांचा अकाऊंट ओपनिंग फॉर्म गहाळ झाला असल्याचे व त्यांच्याकडे तक्रारदारांच्या नमुना स्वाक्षर्याचे कार्ड असल्याचे आणि नविन अकाऊंट ओपनिंग फॉर्म सादर करण्याबद्दल कळविल्याचे दिसून येते. यावरुन जाबदेणारांकडे तक्रारदारांच्या नमुना स्वाक्षर्याचे (Specimen signature) कार्ड असल्याचे स्पष्ट होते. म्हणून, तक्रारदार जाबदेणारांविरुद्ध त्यांची तक्रार सिद्ध करु शकले नाहीत, असे मंचाचे मत आहे.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.