निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- आदेश तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाला कॅनडा-बँक यांची शाखा सांताक्रुझ–पूर्व, यांचेकडे तक्रारदारांचे चालू खाते क्रमांक 3571 होते. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे दि.07 जानेवारी, 2009 रोजी त्यांनी सामनेवाला–बँकेकडे जाऊन रक्कम उचलणे कामी धनादेश दिला व त्यांना टोकण देण्यात आले. तथापि, तक्रादारांना टोकणप्रमाणे धनादेशाची रक्कम देण्यात आली नाही, तक्रारदार परत आले. 2 तक्रारदारांनी दि.9 जानेवारी, 2009 च्या पत्राव्दारे सामनेवाला –बँकेकडे आपली तक्रार नोंदविली तथापि, त्यांला उत्तर देण्यात आले नाही. त्यानंतर तक्रारदारांस असे समजले कि, तक्रारदारांचे चालू खात्यातील रक्कम अन्य खात्यामध्ये बेकायदेशिरपणे व अनाधिकृतपणे वळती केली आहे. सामनेवाला यांनी रक्कम रु.5,325/- हे चालू खात्यातील रक्कम अन्य खात्यात वळती केल्यामुळे तक्रारदारांची गैरसोय व कुंचबना झाली. सामनेवाला यांचेविरुध्द सेवासुविधा पुरविण्यात त्यांनी कसुर केली, या स्वरुपाचा आरोप तक्रारदारांना झाल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार या मंचात दाखल केली. 3 सामनेवाला यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यात असे कथन केले कि, तक्रारदारांनी कॅनकॅरी व कॅनकॅश असे दोन आगाऊ उचलीची खाती सामनेवाला यांचेकडे चालू केली होती, त्या दोन्हीं खात्यामध्ये थकबाकी होती. त्या खात्यातील थकबाकी वसूल करणेकामी सामनेवाला यांनी मा.उच्च न्यायालयाने प्रस्तुतच्या तक्रारदारांच्या विरुध्द दोन दावे दाखल केलेत जे प्रलंबित आहेत. 4 प्रस्तुतची रक्कम रु.5,275/- व्यवहाराबद्दल सामनेवाला यांनी असे कथन केले कि, तक्रारदारांचे चालू खाते क्रमांक 3571 मधून रक्कम रु.2,575/- ही सामनेवाला यांनी कॅनकॅश आगाऊ उचल खाते या खात्यामध्ये खात्यात थकीत बाकी बद्दल जमा केली होती. त्यामुळे दि.4 ऑक्टोबर, 2010 रोजी तक्रारदारांचे चालू खाते क्र.3571 मध्ये फक्त 56 पैसे शिल्लक होते व त्यांनी दि.4 ऑक्टोबर, 2010 रोजी रक्कम रु.4,200/- चा धनादेश वटला जाऊ शकत नव्हता. सामनेवाला यांनी असे कथन केले कि, सामनेवाला यांनी त्यांना असलेल्या अधिकारान्वये त्यांनी वरील कार्यवाही केली व त्यांना ते कायदयाप्रमाणे अधिकार आहेत असे कथन केले. 5 तक्रारदारांनी वरील कैफियतीला प्रती उत्तराचे शपथपत्र दाखल केले व असे कथन केले कि, चालू खात्यातील रक्कम कर्ज खात्याकडे वर्ग करण्याचा सामनेवाला यांनी धारणाधिकार (Right of Lien) नव्हता व कायदयाप्रमाणे सामनेवाला यांची वरील कृती ही बेकायदेशीर असून सामनेवाला यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली आहे. 6 तक्रारदार व सामनेवाला यांनी आपली कैफियत व युक्तीवाद दाखल केला. त्यानुरुप निकालाकामी खालील मुद्दे उपस्थित होतात. क्र. | मुद्दे | उत्तरे | 1 | सामनेवाला यांनी तक्रारदारांचे चालू खाते क्र.3571 यामधील रक्कम रु.5,275/- या उचल खाते मधील थकाबाकीबद्दल वर्ग करण्याची कृती बेकायदेशीर असून सामनेवाला यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब सिध्द केली काय ? | नाही | 2 | अतिम आदेश ? | तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो. |
कारणमिमांसाः- 7 सामनेवाला यांचेकडे चालू खाते क्र.3571 होते, ही बाब मान्य आहे. त्याचप्रमाणे, सामनेवाला यांचेकडे तक्रारदारांच्या कॅनकॅरी व कॅनकॅश ही दोन उचल खाती होती ही देखील बाब मान्य आहे. सामनेवाला यांनी दोन उचल खात्यातील थकबाकी बद्दल तक्रारदारांच्या विरुध्द मा.उच्च न्यायालयात दोन वेगळे दावे दाखल केले आहेत व ते प्रलंबित आहेत, ज्याचा तपशील सामनेवाला यांच्या परिच्छेद क्र.1 मध्ये आलेला आहे. 8 सामनेवाला यांनी त्यांचे कैफियतीचे परिच्छेद क्र.4 मध्ये असे कथन केले कि, सामनेवाला यांनी तक्रारदारांचे चालू खाते क्र.3571 मधील रक्कम रु.5275 ही कॅनकॅश उचल खातेकडे वर्ग केली होती. तक्रारदारांचे 3571 हे चालू खात्यामध्ये 56 पैसे बाकी होते. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खात्यानुसार त्याचे पृष्ठ क्र.11 वरील नोंदीवरुन ही बाब स्पष्ट होते. वरील व्यवहार दि.3 ऑगस्ट, 2010 रोजीचे उत्तर तक्रारदारांनी दि.4 ऑक्टोबर, 2008 रोजी रक्कम रु.4,200/-चे धनादेश सामनेवाला यांचेकडे देऊन खाते क्र.3571 मधून रु.4,200/- रक्कम उचलण्याचा प्रयत्न केला. त्या खात्यामध्ये केवळ 56 पैसे बाकी असल्यामुळे रु.4,200/- चा धनादेश अदा होणे शक्यच नव्हते. 9 वरील परिस्थितीत सामनेवाला यांनी रु.5,275/- तक्रारदारांचे चालू खाते क्र.3571 मधून कॅनकॅश उचल खाते रु.5,275/- वर्ग करण्याची कृती ही बेकायदेशीर व अनाधिकृत होती काय ? एवढाच मुद्दा शिल्लक राहतो. 10 या संदर्भात सामनेवाला यांनी कराराचा कायदा कलम-171 यावर भर दिला. यामध्ये बँकेला अन्य काही वेगळा करार नसला तरी वस्तुवर धारणाधिकार असतो. या संदर्भात, मा.सर्वोच्च न्यायालयाने सिंडीकेट बँक विरुध्द विजयकुमार या प्रकरणामध्ये बँकेचा धारणाधिकार यांचा तपशीलवार, ऊहापोह केलेला आहे व बँकेला खातेदाराने जमा केलेल्या सर्व ठेवींवर व रक्कमेवर धारणाधिकार असतो हे मान्य केलेले आहे. त्याच प्रमाणामध्ये बँकेला खातेदारांची एक खात्यांतून दुस-या खात्यात रक्कम वर्ग करणे व ठेवींची रक्कम वळती करणे/करुन घेणे हा धारणाधिकार असतो असे विवेचन केले. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदार व सामनेवाला यांच्या दरम्यान काही वेगळा करार झाला नव्हता व सामनेवाला – बँकेला वरील परिस्थितीचा धारणाधिकार नव्हता असे कथन तक्रारदारांनी दाखल केले नाही. वेगळा करार नसताना सामनेवाला यांच्या कृतीवर कराराचा कायदा कलम-171 प्रमाणे कार्यवाही समर्थनीय ठरते. सामनेवाला यांनी त्यांची कृतीचे पृष्ठर्थ कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एआयआर कर्नाटक, 201 यामधील न्यायनिर्णयावर भर दिला आहे. त्या न्यायनिर्णयात कर्नाटक उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा वरील प्रकरणाचा आधार घेतला आहे व कलम -171 प्रमाणे बँकेला खातेदाराचे ठेवीचे संदर्भात किंवा खात्याच्या सदंर्भात थकबाकीची रक्कम वळती करुन घेण्याचा धारणाधिकार असतो हे मान्य केले. 11 याउलट, तक्रारदारांनी त्यांचे युक्तीवादाच्या पृष्ठर्थ गोहाटी उच्च न्यायालयाच्या एआयआर 2002 गोहाटी पृष्ठ क्र.1 या न्यायाचा आधार घेतला. या प्रकरणामध्ये बँकेला मुदत ठेवीतील रक्कमेवर धारणाधिकार नसतो असे विवेचन केले आहे. त्या प्रकरणातील घटनाक्रम तपासून पहाता असे दिसून येते कि, बँकेने थकीत कर्जापोटी काही रक्कम वळती करुन घेतली होती असे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे मा.सर्वोच्च न्यायालयाचा 1992 मधील निकालाचा गुहाटी उच्च न्यायालयाने उल्लेख केला होता असे ही दिसून येते. सबब, गुहाटी उच्च न्यायालयाचा निकाल तक्रारदारांचे कथनास पृष्ठी देत नाही. 12 वरील परिस्थितीमध्ये, सामनेवाला हयांची कृती कराराचा कलम-171 प्रमाणे व त्यावर धारणाधिकार बँकेस मिळत असल्याने समर्थनीय ठरते. वरील परिस्थितीत, तक्रारदारांच्या चालू खात्यातील थकीत कर्जाच्या खातेकडे रक्कम वळती करुन घेण्याचे सामनेवाला –बँकेची कृतीतील ही सेवासुविधा पुरविण्यात कसुर होती असे म्हणता येणार नाही. वरील विवेचनानुसार, तक्रारीतील तक्रारदार हे दादीं मिळणेस पात्र आहेत असे ही म्हणता येणार नाही. सबब, या प्रकरणी पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश (1) तक्रार विनाखर्च रद्द करण्यात येते. (2) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य देण्यात येतात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |