निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी कि, तक्रारदार -मेसर्स श्री. गणेश एजन्सीज् यांचा मालक असून अडाणी विल्मर लि.(Fortune Brand) या गोडेतेलाचा वितरक आहे. त्याने अडाणी विल्मर लि. यांना सामनेवालेमार्फत रु.7,00,000/- चे बँक हमीपत्र दिले होते. त्याने दि.18.09.2008 चे सामनेवाले यांना पत्र पाठवून त्यांना कळविले होते कि, त्यांनी या हमीपत्राची रक्कम अडाणी विल्मर लि. यांना देऊ नये. तसेच सामनेवाले यांचे मॅनेजर –श्री.पै यांचेशी चर्चा करुन त्याबाबत त्यांनाही सांगितले होते व त्यांनी मार्गदर्शन केल्यावरुनच त्याने दि.18.09.2008 चे पत्र पाठविले होते. हे पत्र तक्रारदाराने तक्रारीच्या निशाणी-ए ला दाखल केले आहे. तक्रारदाराची तक्रार कि, असे असूनही सामनेवाले यांनी त्याला न विचारता सदरच्या हमीपत्राची रक्कम रु.7,00,000/- अडाणी विल्मर लि. यांना दि.15.10.2008 रोजी दिली. त्याबद्दल सामनेवाले यांनी त्याला दि.15.10.2008 रोजीच्या पत्राने कळविले, त्या पत्राची छायांकित प्रत तक्रारीच्या निशाणी-बी ला दाखल आहे. 2 तक्रारदाराचे म्हणणे कि, हमीपत्राची रक्कम अडाणी विल्मर लि. यांना देण्यात सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे. त्याने सामनेवाले यांना त्याबाबत दि.08.07.2009 रोजी नोटीस दिली होती. तक्रारदाराचे म्हणणे कि, सामनेवाले यांच्या या कृत्यामुळे त्याच्या व्यवसायाचे खूप नुकसान झाले. अडाणी विल्मर लि. यांच्याकडून येणे असलेली रक्कम त्याला मिळू शकली नाही, त्याच्या व्यवसायात गोंधळ होऊन त्याचे कर्मचा-यांना रिकामे बसावे लागले. मात्र, त्याला त्यांचा पगार द्यावा लागला. मानसिक त्रासामुळे त्याचे स्वास्थ बिघडले. पैशाच्या अडचणीमुळे तो त्याच्या मुलीला योग्य त्या कॉलेजला पाठवू शकला नाही. सामनेवाले यांचेकडून रु.7,00,000/- परत मिळावेत, त्यावर द.सा.द.शे.12 दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.7,00,000/- नुकसान भरपाई मिळावी तसेच खर्चापोटी रु.35,000/- मिळावेत, यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार केली आहे. 3 सामनेवाले यांनी तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे कि, तक्रारदाराच्या विनंतीवरुन त्यांनी अडाणी विल्मर लि. यांना रु.7,00,000/- ची हमीपत्रं दिली होती. ती बिनशर्त होती, म्हणून तक्रारदारांनी जरी त्यांना कळविले होते कि, या हमीपत्राची रक्कम अडाणी विल्मर लि. यांना देऊ नये तरी Indian Contract Act च्या कलम-126 नुसार त्यांनी केलेल्या कराराची पूर्तता करणे त्यांची जबाबादारी होती. तक्रारदार व अडाणी विल्मर लि. यांच्यात काही वाद असल्यास किंवा त्यांच्या व्यवहाराच्या काही अटी व शर्ती असल्यास त्याचेशी त्याचा काही संबंध नाव्हता. अडाणी विल्मर लि.यांनी मागणी केल्यानंतर, हमीपत्राची रक्कम त्यांना देणे हि त्यांची जबाबदारी होती. अडाणी विल्मर लि. यांनी मागणी केल्यानंतर त्यांनी हमीपत्रांची रक्कम रु.7,00,000/- त्यांना दिली, हि त्यांचे सेवेत न्युनता नाही. तक्रारदार आता त्यांची रक्कम देण्याचे नाकारु शकत नाही. त्यांना पैसे परत देण्याऐवजी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली त्यात काही तथ्य नाही, ती रद्द करण्यात यावी. 4 आम्हीं तक्रारदारातर्फे वकील –श्री.देशमुख व कौन्सील श्री.लहीरी लोडैया यांचा युक्तीवाद ऐकला, तोंडी युक्तीवादाच्या वेळी सामनेवाले व त्यांचे वकील, गैरहजर राहिले. आम्ही कागदपत्रं वाचली. सामनेवाले यांनी अडाणी विल्मर लि. यांना दिलेल्या चार हमीपत्रांच्या छायांकित प्रतीं दाखल केल्या आहेत. त्यावरुन असे दिसते कि, सामनेवाले यांनी हि चार, एकूण रक्कम रु.7,00,000/- चे हमीपत्र अडाणी विल्मर लि. यांना तक्रारदाराच्या विनंतीवरुन दिली होती. या हमीपत्रांच्या शर्ती व अटीवरुन हे स्पष्ट आहे कि, सदरची हमीपत्रं बिनशर्त होती व सामनेवाले –बँकेला ती रद्द करण्याचा अधिकार नव्हता. तक्रारदाराने त्याचेत व अडाणी विल्मर लि. यांचेत झालेल्या कराराच्या शर्ती व अटींचा भंग केला किंवा पेमेंट केले नाही तर अडाणी विल्मर लि. च्या केवळ मागणीवरुन व त्याबद्दलच्या त्यांच्या प्रमाणपत्रांवरुन सामनेवाली –बँक हमीपत्राची रक्कम अडाणी विल्मर लि.च्या मागणीप्रमाणे देण्यास जबाबदार होते. तक्रारदार व अडाणी विल्मर लि. यांच्यात काही वाद असल्यास त्याचेशी सामनेवाले यांचा काही संबंध नव्हता. या हमीपत्राच्या अट क्र.5 वरुन असे दिसते कि, बॅंकेने जी हमी दिली होती, ती हमीपत्राच्या कालावधीत बँकेला अडाणी विल्मर लि. यांच्या पूर्व संमतीशिवाय रद्द करण्याचा अधिकार नव्हता. तक्रारदाराला किंवा तक्रारदाराच्या विनंतीवरुन सामनेवाले –बँकेला ही हमीपत्रं रद्द करण्याचा / मागे घेण्याचा अधिकार होता असा कोठेही या हमीपत्रांत उल्लेख केलेला नाही. त्यामुळे जरी तक्रारदाराने सामनेवाले बँकेला कळविले कि, या हमीपत्रांची रक्कम अडाणी विल्मर लि. यांना देऊ नये तरी हमीपत्राच्या शर्ती व अटीनुसार अडाणी विल्मर लि.यांनी मागणी केल्यानुसार त्यांना पैसे देण्याची बँकेची जबाबदारी होती. त्यामुळे अडाणी विल्मर लि. यांना हमीपत्राची रक्कम देण्यात सामनेवाले यांच्या सेवेत न्युनता आहे असे म्हणता येत नाही. तक्रारदार व अडाणी विल्मर लि. यांच्यात पैशांविषयी काही वाद असल्यास तक्रारदार योग्य त्या न्यायालयात दाद मागू शकतात. सदरच्या तक्रारीत मंचाला तथ्य दिसत नाही, ती रद्द होण्यास पात्र आहे. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.242/2011 (846/2009)रद्दबातल करण्यात येत आहे. (2) उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |