रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.80/2007. तक्रार फेरसुनावणीस आल्याचा दि.8-2-2010. तक्रार निकाली दि.30-7-2010. श्री.उत्पलकुमार सामंता, रुम नं.14, 5वा मजला, प्लॉट नं.2, नील रेजन्सी, सेक्टर 3, नवीन पनवेल, ता.पनवेल, जि.रायगड. ... तक्रारदार. विरुध्द
1. कॅम्प मोटर्स, पाटील हॉस्पिटलजवळ, मुंबई पुणे हायवे, पनवेल, ता.पनवेल, जि.रायगड. 2. हॅन मोटर्स प्रा.लि., कार्तिक कॉम्प्लेक्स, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटचे समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई. 3. टाटा मोटर्स लि. पॅसेंजर कार बिझनेस युनिट, 8वा मजला, सेंटर नं.1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई. ... विरुध्दपक्षकार. उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदारतर्फे वकील –श्री.जयेश जोशी. सामनेवालें 1 तर्फे वकील- श्री.संतोष म्हात्रे. सामनेवाले 2तर्फे वकील- श्री.यतीन शहा सामनेवाले 3 तर्फे वकील- श्री.अमित देशमुख. -निकालपत्र -
द्वारा- मा.सदस्य, श्री.भास्कर मो.कानिटकर. 1. तक्रारदारांची तक्रार मंचाने दि.14-12-07 रोजी निकाली काढली होती. याबाबतीत सामनेवाले 1 यानी मा.राज्य आयोगाकडे अपील केले असता मा.राज्य आयोगाने दि.8-2-10 रोजी ही केस मंचाकडे फेरसुनावणीसाठी पाठवली होती. त्यामध्ये या मंचाने पारित केलेल्या आदेशामधील रु.38,000/- ही रक्कम धंदयातील नुकसानीपोटी दिली गेली आहे व ती कायद्यातील तरतुदीप्रमाणे देता येत नाही. त्यामुळे मा.राज्य आयोगाने सर्व पक्षकारांना मंचापु्ढे दि.8-2-10 रोजी हजर रहाण्याची तारीख नेमली होती. तेव्हापासून 3 महिन्याचे मुदतीत तक्रार निकाली करण्याचे आदेश देण्यात आले, परंतु मुळ तक्रारदार हे मंचापुढे नेमलेल्या दिवशी हजर झाले नाहीत. सामनेवाले 1 हे दि.8-2-10 रोजी हजर झाले होते व त्यानी नि.29 अन्वये अँड.संतोष म्हात्रे यांचे नावे वकीलपत्र दाखल केले. सामनेवाले 2 ने सुध्दा दि.8-2-10 रोजी नि.31 अन्वये अँड. यतीन शहा यांचे नावे वकीलपत्र व नि.32 अन्वये लेखी जबाब दाखल केला आहे. त्याचे पृष्टयर्थ नि.33 अन्वये सामनेवाले 2 ने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तक्रारदार हे मंचापुढे नेमलेल्या तारखेला हजर न झाल्याने मंचाने नि.23 अन्वये नोटीस काढून 22-2-10 तारीख सुनावणीसाठी नेमली. नि.36 अन्वये सामनेवाले 1 ने लेखी जबाब दाखल केला आहे. त्याचे पृष्टयर्थ नि.37 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल आहे. नि.50 अन्वये तक्रारदारानी काही कागद मंचापुढे दि.23-6-2010 रोजी दाखल केले. नि.53 अन्वये सामनेवाले 3 यानी अँड.अमित देशमुख यांचे नावे वकीलपत्र दाखल केले आहे. दि.23-6-10 रोजी सामनेवाले 3 याना योग्य मुदत देऊनही त्यानी म्हणणे दिले नाही म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशी आदेश पारित केला. याबाबत मंचाने 23-7-10 रोजी सुनावणीचे दिवशी तक्रारदारातर्फे वकील, सामनेवाले 1 व 3 तर्फे वकील व सामनेवाले 2 चे वकील विलंबाने हजर झाले. सामनेवाले 3 तर्फे म्हणणे देणेकामी मुदतवाढीचा अर्ज दाखल. सदर अर्ज नामंजूर करणेत आला. तक्रारदारांचे व सामनेवाले 1 व 2 चे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. नंतर प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले. सदर कामी तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला- मुद्दा क्र.1 - सदर तक्रार या मंचाच्या भौगोलिक क्षेत्रात येते काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2- तक्रारदाराना सामनेवालेकडून त्रुटीपूर्ण सेवा मिळाली आहे काय? उत्तर - सामनेवाले 1 व 2 तर्फे देण्यात आली आहे, क्र.3 तर्फे नाही. मुद्दा क्र.3- तक्रारदारांची मागणी त्यांचे विनंतीनुसार मंजूर करता येईल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1- 2. या कामी सामनेवाले 1 ते 3 यांचेकडून त्रुटीचा विचार करता तक्रारदारानी कोणते कागद दाखल केले आहेत हे पहाणे आवश्यक आहे. यावरुन असे दिसते की, सामनेवाले 1 ने सुरुवातील आपले म्हणणे दिले आहे. सामनेवाले 2 व 3 हे नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशी आदेश करण्यात आले होते. परंतु सामनेवाले 1 ने दिलेल्या म्हणण्याला पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र दिले नव्हते. आपल्या लेखी म्हणण्यात त्यानी तक्रारदाराना शोरुममधून गाडी खरेदी केल्याचे त्यानी मान्य केले होते. परंतु दि.8-10-05 रोजीचे पत्रामध्ये त्याने लिहील्याचे मान्य केले. आता ही तक्रार मा.राज्य आयोगाच्या आदेशानुसार फेरसुनावणीसाठी आल्यावर आता सामनेवाले 1 ने आपले लेखी म्हणणे देताना मंचाच्या भौगोलिक क्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला आहे. या कामी मंचाने आधी दिलेल्या निकालाचे वेळी हा मुद्दा सामनेवालाने मांडला नव्हता. परंतु फेर सुनावणीसाठी संधी मिळाल्यावर त्यानी हा मुद्दा या वेळी नव्याने मांडलेला आहे. वास्तवीक असे ते करू शकत नाहीत. तरीही मूळ तक्रारीसोबत जोडलेल्या त्याच्या सामनेवाला 2 ला त्यानी दिलेल्या दिनांक 8-10-2005 च्या पत्रा प्रमाणे सामनेवाला यांचा पत्ता पनवेल येथीलच आहे. त्याना नोटीसही त्यावेळी तेथेच मिळलेली आहे. सामनेवाला 1 ने दिनांक 8-10-2005 चे लिहीलेले पत्र खोटे असल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतू या पत्राची सत्यता पहाण्यासाठी मंचाने कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाला असे आढळून आले की, दिनांक 8-10-2005 च्या पत्रावरील सही व शिक्का तसेच सामनेवाला क्र.1 चे जे वकीलपत्र दाखल केले आहे त्यावर असलेली सही या दोन्ही एकाच व्यक्तीने केल्या आहेत. फक्त वकीलपत्रावर कॅम्प मोटर्सचा शिक्का नाही. परंतु प्रत्यक्षात जे म्हणणे सामनेवाल्यानी दिले आहे त्यावरील सही मात्र वेगळया व्यक्तीची आहे. त्याचा आधार घेत सामनेवाले असे कथन करीत आहेत की त्यानी दिनांक 8-10-05 चे पत्र दिले नाही. परंतु मंचाला हा त्याचा युक्तिवाद पटत नाही कारण कागदपत्रावरून दिनांक 8-10-05 चे पत्रावरील व वकील पत्रावरील सही एकाच व्यक्तिची असल्याचे दिसते. मंचाच्या मते सामनेवाल्याने हे पत्र दिलेले आहे. परंतू ते आता नाकारीत आहेत. त्यानी हे अशा प्रकारचे म्हणणे देणे व त्यावर दुस-या व्यक्तिला सही करण्यास सांगणे हे सामनेवाले क्रमांक 1 चे वर्तन मंचाची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे ही तक्रार चालविण्याची भौगोलिक अधिकारीता या मंचास आहे असे मंचाचे ठाम मत आहे. सबब या मुद्दयाचे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2- 3. सामनेवाला 1 हा वरील पत्राप्रमाणे “Champ Motors (All cars {New & Used} Shopmall)” मोटार गाडया विकणारा आहे. परंतू आता निशाणी 36 वर दिलेल्या नवीन लेखी जबाबाच्या परिच्छेद 6 मध्ये तो स्वतः वित्तपुरवठा करणारी संस्था आहे असे कथन करीत आहे. परंतू आपल्या निशाणी 18 वरील पहिल्या लेखी जबाबत असे काहीही म्हटलेले दिसत नाही. या कामी सामनेवाला 1 याने निशाणी 44/1 वर दाखल केलेल्या आयसीआयसीआय बँकेचे पत्र हे दिनांक 14 नोव्हेंबर 2008 चे आहे व त्यात “At ICICI Bank we value the relationship we have had with you over a period of time” तसेच त्या कागदाला लागून एक कागदाची छायांकित प्रत दिनांक 23-05-07ची जोडली आहे प्रत ती सत्यप्रत असे म्हटलेले नाही तरीही त्यावरून सामनेवाला 1 हा 2005 पासून अर्थपुरवठा करणारी संस्था आहे असा अर्थ काढणे धाडसाचे असल्याचे मंचाचे मत आहे. ही त्याची पुन्हा मिळालेल्या संधीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. यात तक्रारदारांची तक्रार ही उत्पादनातील दोषा बाबत नसून तांत्रिक तृटींबाबत आहे. एक तर सामनेवाला 1 व 2 यानी संगनमत करून तक्रारदाराना सेवा देण्यास टाळटाळ केल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारदारानी गाडीच विकत घेतलेली नाही असा सूर या दोघनीही लावलेला आहे. माननीय राज्य आयोगाने ही तक्रार फेरसुनावणीसाठी केवळ व्यावसायिक नुकसानी देता येत नसल्याने पाठविल्याचे दिसून येत आहे. सामनेवाले 3 विरुध्द तक्रारदारांची उत्पादनातील दोष या प्रकारची कोणतीही तक्रार नसल्याने त्याने तक्रारदाराना सेवा देण्याचा प्रश्नच येत नाही असे मंचाचे मत असल्याने त्यांचेविरुध्दची तक्रार नामंजूर करणेत येत आहे. सबब सामनेवाले 1 व 2 यानी तक्रारदारांस त्रुटीपूर्ण सेवा दिली असल्याने या मुदृयाचे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.3 - 4. तक्रारदारानी मंचाला सामनेवालेकडून रु.85,160/- ही रक्कम दि.17-12-05 पासून व्याजासह मिळणेची विनंती केली आहे. ती रक्कम त्याने कशी काढली त्याचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. एस्टीमेटची रक्कम रु.21,160/- डॅमेज्ड बॅकसाईड पेंट सामनेवालेच्या वर्कशॉपमध्ये- रु.11,000/- नवीन स्टेपनी टायर रिंगसह रु.10,000/- व्यावसायिक नुकसान रु.38,000/- टेलिफोन व पत्रव्यवहार खर्च रु. 5,000/- एकूण ------------------------------ रु.85,160/- ही तक्रारदारांची मागणी फारच अवास्तव असल्याचे मंचाचे मत आहे शिवाय "व्यावसायिक नुकसान" ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार देता येत नसल्याने ही तक्रार फेरसुनावणीसाठी परत पाठविण्यात आली असल्याने ते मंजूर करता येत नाही. ज्याअर्थी तक्रारदाराने सामनेवाले 2 यांचेकडून निषेधाने कोणतेही काम करुन न घेता गाडी परत घेतली व त्याना काहीही पैसे दिले नाहीत, त्याअर्थी ते पैसे म्हणजे रु.21,160/- त्याला परत मागता येणार नाहीत. सबब त्याला रंगकामासाठी रु.11,000/-, नवीन स्टेपनी, टायर रिंगसह रु.10,000/- व संबंधित टेलिफोन, पत्रव्यवहारापोटी रु.5,000/- असे एकूण रु.26,000/- सामनेवालेनी दि.17-12-05 पासून द.सा.द.शे.5 टक्के दराने व्याजासह सामनेवाले 1 व 2 ने वैयक्तिक व संयुक्तीकरित्या द्यावेत असे मंचाचे मत आहे. न्यायिक खर्च याबाबत तक्रारदाराला मा.राज्य आयोग व पुन्हा या मंचाकडे यावे लागल्याने निश्चितच जास्त झाला आहे. त्यामुळे सामनेवाले 1,2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रु.10,000/- तक्रारदाराला द्यावेत असे मंचाचे मत आहे. 5. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- 1. आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात सामनेवाले 1 व 2 ने वैयक्तिक व संयुक्तीकरित्या खालील आदेशाचे पालन करावे- अ. तक्रारदाराना रु.26,000/- (रु.सव्वीस हजार मात्र) दि.17-12-05 पासून द.सा.द.शे.5 टक्के व्याजाने द्यावेत. ब. न्यायिक खर्चापोटी रु.10,000/-(रु.दहा हजार मात्र) द्यावेत. वरील कलम अ मधील रक्कम सामनेवाले 1,2 ने विहीत मुदतीत न दिल्यास तक्रारदारांस ती द.सा.द.शे.5 टक्के व्याजाने व कलम ब मधील रक्कम वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारास राहील. 2. सामनेवाले 3 विरुध्द तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. 3. सर्व सामनेवालेनी स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 4. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पुरवण्यात याव्यात. ठिकाण- रायगड-अलिबाग. दि.30-7-2010. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
| HONORABLE Shri B.M.Kanitkar, Member | HONORABLE Hon'ble Shri R.D.Mhetras, PRESIDENT | , | |