(घोषित दि. 23.01.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदाराच्या पतीचे वाहन अपघातात निधन झाल्यानंतर विमा रकमेची मागणी गैरअर्जदार यांनी नाकारली. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती शेतकरी होते त्यांची शिवनगिरी गट क्रमांक 59 येथे शेतजमिन आहे. अर्जदाराच्या पतीचे दिनांक 01.12.2008 रोजी वाहन अपघातात निधन झाले. या घटनेची नोंद सेलू येथील पोलीस स्टेशनला करण्यात आली असून घटनास्थळ पंचनामा, पोस्टमार्टम करण्यात आलेले आहे. अर्जदाराने दिनांक 28.01.2009 रोजी योग्य त्या कागदपत्रासह शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार यांनी अद्याप पर्यंत विमा रक्कम दिली नसल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून विमा रक्कम व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म, 7/12 चा उतारा, पोस्ट मार्टम अहवाल, फेरफार, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या योजने अंतर्गत आलेल्या प्रस्तावाची छाननी करुन, ते तपासून संबंधित विमा कंपनीकडे पाठविणे हे त्यांचे काम आहे. त्यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नसल्याचे सांगून त्यांना विनाकारण प्रतिवादी केल्याचे म्हटले आहे. अर्जदाराचा प्रस्ताव त्यांनी दिनांक 08.09.2009 रोजी विमा कंपनीकडे पाठविला असून विमा कंपनीने तो नाकारला असल्याचे अर्जदारास दिनांक 24.11.2010 रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार दिनांक 04.11.2009 रोजी त्यांच्याकडे विमा प्रस्ताव आलेला नाही. अर्जदाराच्या पतीच्या नावे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे नियमाप्रमाणे त्यांचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराचे पती मयत गणेशराव लाटे शेतकरी असून त्यांच्या नावे शिवनगिरी येथील भूमापन क्रमांक 59 येथे शेतजमिन आहे. मंचात दाखल केलेल्या पोस्टमार्टम अहवालावरुन अर्जदाराच्या पतीचे दिनांक 01.12.2008 रोजी वाहन अपघातात निधन झाले असून संबंधित पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद घेण्यात आलेली दिसून येते. अर्जदाराने योग्य त्या कागदपत्रासह विमा प्रस्ताव कृषी अधिकारी, परतूर यांच्या मार्फत दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनी यांनी अर्जदाराच्या पतीच्या नावे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे कारण सांगून विमा रक्कम नाकारली असल्याचे दिसून येते.
सुनावणी दरम्यान गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदाराने दाखल केलेल्या वाहन चालकाच्या परवान्या बाबत शंका उपस्थित करुन ते जारी करणा-या प्रादशिक परिवहन अधिका-यास लायसन्सच्या रजिस्टरसह साक्षीसाठी बोलाविण्याची विनंती मंचास केली. वाहन परवाना महत्वाचा असल्यामुळे व वाहन परवाना नसल्यामुळे गैरअर्जदार यांनी विमा प्रस्ताव नाकारल्यामुळे मंचाने गैरअर्जदार यांची विनंती मान्य केली व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांना वाहन परवान्याच्या सत्यतेची तपासणी करण्याबाबत दिनांक 26.08.2011 रोजी समन्स काढण्यात आले. दिनांक 21.01.2013 रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मंचात उपस्थित राहून त्यांचा जवाब दाखल केला. त्यांच्या जवाबानुसार एम.एच.23 डी 3904/2006 या क्रमांकाचा वाहन परवाना गणेश लक्ष्मणराव लाटे यांच्या नावे असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर गैरअर्जदाराने पुन्हा लायसन्स संदर्भातील फी भरण्याचे पुस्तक सादर करण्याची साक्ष नोटीस काढण्याची परवानगी मागितली. यावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास माजरीकर यांनी प्रस्तुत प्रकरणातील परवाना क्रमांक एम.एच. 23 डी 3904/2006 बीड कार्यालयातून दिनांक 25.04.2006 रोजी रितसर देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
वरील सर्व निरीक्षणावरुन आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या जवाबावरुन मयत गणेश लक्ष्मणराव लाटे यांच्या नावे वाहन परवाना असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे वाहन परवाना योग्य नसल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे चुकीचे असल्याचे सिध्द होते. या शिवाय मा. राज्य आयोग यांनी वाहन चालवण्याचा परवाना नसला म्हणून विमा रक्कम नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने मंचात दाखल केलेली तक्रार मान्य करण्यात येत असून अर्जदार विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
आदेश
- गैरअर्जदार 2 यांनी अर्जदारास 1,00,000/- रुपये (एक लाख रुपये फक्त) दिनांक 28.02.2009 पासून 9 टक्के व्याजासह 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार 2 यांनी अर्जदारास नुकसान भरपाई व खर्चा बद्दल 1,500/- (एक हजार पाचशे रुपये फक्त) 30 दिवसात द्यावे.