(घोषित दि. 20.11.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदारांचे पती शिवदास घनश्याम शिंदे हे शेतकरी असून, दूर्देवाने दिनांक 03.03.2008 रोजी अपघाती निधन झाले. अपघातानंतर गेवराई पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर, मरणोत्तर पंचनामा केला. मयत व्यक्तीचे प्रेत पोष्ट मार्टमसाठी गेवराई येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे दिनांक 30.04.2008 रोजी आवश्यक कागदपत्रासहीत दाखल केला. अद्याप पर्यंत विमा प्रस्तावाबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही.
गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार त्यांचेकडे विमा प्रस्ताव दिनांक 12.04.2010 रोजी प्राप्त झाला. सदर प्रस्ताव दिनांक 15.08.2007 ते 14.08.2008 या कालावधीचा असून, दिनांक 14.11.2008 पर्यंत म्हणजेच 90 दिवसाच्या कालावधीत पॉलीसीतील अटी व शर्ती नूसार तक्रारदारांनी दाखल करणे आवश्यक होते. तक्ररदारांचा प्रस्ताव दिनांक 06.07.2010 रोजी गैरअर्जदार 2 यांचेकडे पाठवला. गैरअर्जदार 2 विमा कंपनीने दिनांक 24.11.2010 रोजीच्या पत्रान्वये विमा प्रस्तावाची फाईल बंद केल्याबाबत तक्रारदारांना कळवले.
गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांचा प्रस्ताव पॉलीसीचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसात दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदारांनी यापूर्वी तक्रार क्रमांक 71/2010 न्याय मंचात दाखल केली होती. सदरची तक्रार न्याय मंचाने खारीज केल्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
तक्रारदारांचे पतीच्या अपघाती मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने नूसार नूकसान भरपाईच्या रकमेची मागणी करण्याकरीता दाखल विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानूसार दिनांक 12.04.2010 त्यांचेकडे प्राप्त झाला. पॉलीसीचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसाच्या कालावधीत म्हणजेच दिनांक 14.11.2008 पर्यंत पॉलीसीतील अटी व शर्ती नूसार तक्रारदारांनी सदर प्रस्ताव दाखल करणे आवश्यक होते. गैरअर्जदार 2 विमा कंपनीने विमा प्रस्ताव मुदतीनंतर प्राप्त झाल्याच्या कारणास्तव फेटाळला आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने तांत्रिक कारणावरुन तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर करुन त्रूटीची सेवा दिली आहे. सदर योजने अंतर्गत दाखल झालेले विमा प्रस्ताव तांत्रिक कारणास्तव नामंजूर करणे नौसर्गिक न्यायच्या दृष्टीने योग्य नाही असे न्याय मंचाचे मत आहे.
महाराष्ट्र शासनाने सदर योजना कल्याणकारी विमा योजना राबविलेली असुन, गैरअर्जदार विमा कंपनीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विमा प्रस्तावा बाबतची कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच पॉलीसीतील विमा प्रस्ताव दाखल करण्याबाबत दिलेली 90 दिवसाची मूदत ही फक्त मार्गदर्शक सूचना (Directory)आहे,सदरची अट (Mandavary) बंधनकारक नसल्याचे महाराष्ट्र राज्य आयोगाच्या न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. विरुध्द नानासाहेब हनुमंतराव जाधव (CPR (2) (2005) page 25)न्याय निवाडयामध्ये नमूद केलेले आहे.
तक्रारदारांचे पती श्री.शिवदास धनश्याम शिंदे हे शेतकरी होते, ही बाब 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. त्यांचे पॉलीसीच्या कालावधीत दिनांक 03.03.2008 रोजी अपघाती निधन झाले असल्याची बाब एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, पोष्ट मार्टम रिपोर्टवरुन स्पष्ट होते. त्यामूळे तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार विमा कंपनीला आदेश करण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नूकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावेत.
- विहीत मुदतीतवरील रक्कम अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासह द्यावी.