DR.RAJGOPAL KHANDELWAL filed a consumer case on 07 Jan 2015 against C.K.RAJAN in the Satara Consumer Court. The case no is CC/13/190 and the judgment uploaded on 09 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 190/2013.
तक्रार दाखल ता.13-11-2013.
तक्रार निकाली ता. 7-1-2015.
डॉ.राजगोपाल खंडेलवाल,
रा.330 कसबा पेठ, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा. ....तक्रारदार.
विरुध्द
\सी.के.राजन,
एस/ओ.के.पी.कृष्णन,
शालीनाम कोतंबबरंबा (पी.ओ.)
कोजीकोड-8, केरळ राज्य. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.घोरपडे
जाबदार- एकतर्फा आदेश
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यांनी पारित केला.
1. तक्रारदारानी सदर तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 नुसार दाखल केला असून तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
जाबदारांचे मालकीचे 1-2 तोशिबा सिटी स्कॅनर मॉडेल एशियन वर्ष 2005 स्कॅप युनिट आहे. जाबदारानी सदरचे मशीन तक्रारदाराना रक्कम रु.2,50,000/-ला विकण्याचे ठरवले. सदरचे मशीन हे प्रोफाईल डायग्नोस्टीक सेंटर बी-402 फेम एपीटी 747 गुरुवार पेठ पुणे या ठिकाणी व रक्कम रु.7,00,000/- (रु.सात लाख मात्र) हे फलटण डायग्नोस्टीक सेंटर लक्ष्मीनगर फलटण येथे पोहोचवणेचे जाबदारानी मान्य व कबूल केले. जाबदारानी दोन मशीन पाठवणेचे मान्य करुनही केवळ एकच मशीन पुणे येथे पाठविले, परंतु फलटण येथे दुसरे मशीन पाठविले नाही. तक्रारदार व जाबदारांमध्ये सदरच्या दोन्ही सिटीस्कॅन मशीन विक्रीबाबत दि.14-11-09 रोजी विक्री करार झाला. सदर कराराप्रमाणे तक्रारदारानी आर.टी.जी.एस.पध्दतीने संपूर्ण रक्कम जाबदाराना दिलेली आहे. सदरची रक्कम जाबदारांचे कालिकत शाखा-केरळ येथील इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये असलेल्या खाते क्र.7714 ला जमा आहे. सदरची रक्कम ही जाबदारानी घेतली आहे. तक्रारदाराना पुणे येथील डायग्नोस्टीक सेंटर येथे सिटीस्कॅन मशीन घेणेसाठी रु.2,50,000/- जाबदाराना दयावे लागले आहेत. तसेच डायग्नॉस्टीक सेंटर फलटण येथे मशीन घेणेसाठी जाबदाराना रक्कम रु.7,00,000/- दयावे लागले आहेत. तक्रारदाराना सदर दोन्ही मशीनसाठी वाहतूक, इन्स्टॉलेशन चार्जेस साठी रु.13,00,000/- खर्च करावे लागले आहेत. जाबदारानी सदरची रक्कम तक्रारदाराकडून स्विकारली असलेचे फौजदारी खटला क्र.593/2010 या खटल्याचे कामी मान्य केलेले आहे परंतु जाबदारानी अर्जदाराना फलटण येथील डायग्नॉस्टीक सेंटर येथे सिटीस्कॅन मशीन न पाठवून सेवेत त्रुटी निर्माण केली आहे. या प्रकारामुळे तक्रारदाराना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदारांचे कशानेही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे तक्रारदाराना जाबदाराकडून रु.13,00,000/- वसूल करणेसाठी व सेवेत जाबदारानी त्रुटी निर्माण केल्याने सदर तक्रारअर्ज जाबदाराविरुध्द दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदारानी जाबदाराना दि.3-3-2012 रोजी नोटीस पाठवून सेवेत दोष/उणीवा निर्माण केल्याचे नोटीस देऊन कळवले व झालेला खर्च रु.13,00,000/- व नोटीस खर्चाचे रु.1500/-ची मागणी केली. जाबदारानी नोटीस स्विकारुनही तक्रारदाराना सिटीस्कॅन मशीन पाठविले नाही व सेवेत त्रुटी निर्माण करुन रु.13,00,000/- खर्च करणेस भाग पाडले जाबदारानी आज करतो,उदया करतो असे सांगूनही पूर्तता केली नाही त्यावेळी तक्रारअर्जास कारण या मंचाचे अधिकारकक्षेत घडले व घडत आहे. तक्रारदाराना जाबदाराकडून फलटण येथील सिटी स्कॅन मशीन देणेबाबत निर्माण केलेल्या त्रुटीपोटी व झालेल्या नुकसानीपोटी असे एकूण रु.13,01,500/- वसूल होऊन मिळावेत. तक्रारदाराना तक्रारअर्जाचा खर्च जाबदाराकडून वसूल होऊन मिळावा. येणेप्रमाणे तक्रारअर्ज दाखल केला आहे.
प्रस्तुत कामात जाबदारांना नोटीस लागू होऊनही ते मंचात हजर न झालेने त्यांचेविरुध्द मंचाने दि.15-7-2014 रोजी एकतर्फा आदेश पारित केला आहे म्हणून सदर कामी जाबदारांचे म्हणणे नाही.
2. नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.5 कडे तक्रारदारांची कागदयादी दाखल, नि.5/1 व 5/2 कडे दि.14-11-09 चे अँग्रीमेंट टु सेल, नि.5/3 कडे अँड.घोरपडे यांनी जाबदारास पाठवलेली नोटीस, नि.5/4 कडे फौ.ख.क्र.593/2010 च्या निगो.इन्स्ट्रुमेंट अँक्टखाली जाबदारानी दाखल केलेल्या केसच्या निकालपत्राची सहीशिक्क्याची प्रत, नि.6 कडे तक्रारदाराची पत्तापुरसीस, नि.7,8,9 कडे जाबदारास मंचाकडून पाठवलेल्या नोटीसा, नि.9/1 कडे विलंबमाफीचा अर्ज, नि.10 कडे त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, नि.11 कडे जाबदारांचा नोटीस अहवाल आलेला असून नोटीस बजावलेली नाही. जाबदार हे फलटण कोर्टात फौजदारी खटल्याची तारीख नेमली असलेने जाबदाराना नोटीस बजावणी होणेसाठी हाती लखोटा मिळणेसाठीचा तक्रारदारांचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.12 कडे जाबदाराना मंचाची नोटीस, नि.13 व 14 कडे जाबदारांची नोटीसची पोहोचपावती, नि.15 कडे तक्रारदाराचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, नि.16 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.17 कडे तक्रारदारांचा विक्रीकराराच्या मूळ स्टॅम्प दाखल करणेसाठी परवानगी अर्ज, अर्ज मंजूर. नि.18 कडे कागदयादी व 18/1 कडे मूळ स्टॅम्प दाखल. नि.19 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, इ.कागदपत्रे दाखल आहेत.
3. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, तसेच तक्रारदारानी दाखल केलेली पुराव्याची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, इत्यादी सर्व दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मे.मंचाने खालील मुद्दे काढले आहेत-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदारांमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांची रक्कम देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
4. तक्रारदारानी जाबदारांकडून दोन सिटी स्कॅन मशीन्स मागविलेली होती. त्यातील एक सिटीस्कॅन मशीन हा फलटण येथे पोहोविणेचे होता व दुसरे पुणे येथे पोहोचविणेचे होते. त्यातील एका मशीनची किंमत रक्कम रु.7,00,000/- होती व दुस-या मशीनची किंमत रु.2,50,000/- होती. जाबदारानी तक्रारदाराना रक्कम रु.2,50,000/-चे मशीन हे पुणे येथे पोहोच केले. परंतु रक्कम रु.7,00,000/-चे मशीन आजपर्यंत पोहोच केले नाही. तक्रारदार व जाबदारांमध्ये करार झालेला असून तक्रारदारानी जाबदारांचे सर्व पैसे अदा केले आहेत. परंतु त्यांना रु.7,00,000/-चे मशीन रक्कम देऊनही मिळालेले नाही.
सदर कामातील तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे गुरुवार पेठ पुणे व लक्ष्मीनगर, फलटण येथे स्वतःचे हॉस्पिटल आहे. जाबदार हे वर नमूद पत्त्यावर रहातात. त्यांचे मालकीचे 1-2 तोशिबा सिटी स्कॅनर मॉडेल एशियन वर्ष 2005 स्क्रॅप युनिट आहे. तक्रारदारानी जाबदाराना पुणे व फलटण येथे सिटीस्कॅन मशीन्स पाठविणेसाठी रक्कम रु.13,00,000/- दिले व त्यानुसार त्यांचेशी स्टॅम्पपेपरवर करारही केला, त्यानुसार पुणे येथील तक्रारदारांच्या डायग्नोस्टीक सेंटरसाठी सिटीस्कॅन मशीन घेणेसाठी रु.2,50,000/- व फलटण येथील डायग्नोस्टीक सेंटरच्या सिटीस्कॅन मशीनसाठी रक्कम रु.7,00,000/- देऊ केले. सदरची रक्कम तक्रारदारानी जाबदारांचे कालिकत शाखा केरळ येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत असलेल्या खाते क्र.7714 ला करारात ठरलेप्रमाणे आर.टी.जी.एस.पध्दतीने संपूर्ण रक्कम जाबदारांचे खाती जमा केली. जाबदारानी सदरची रक्कम तक्रारदारांकडून स्विकारली असलेचे फौजदारी खटला क्र.593/2010मध्ये मान्य केले आहे.
The accused contended that the allegation of borrowal and issuance of cheque in discharge of the debt are false. The cheques involved in this case are stealthly removed from the possession of the accused and upon this a crime was registered against the complainant before Faltan Police Station, Maharashtra. The only transaction with the accused is in respect of sale of an old CT scan machine and he collected the entire amount due from the accused. He has not committed any offence as alleged and he is innocent to the charge leveled against him.
तसेच प्रस्तुतच्या फौजदारी खटल्यावरुन असे दिसून येते की, मुद्दामच हेतूपुरस्सरपणे जाबदारानी तक्रारदारास Negotiable Instruments Act ची खोटी केस दाखल करुन त्यात तक्रारदारास गुंतविण्याचा प्रयत्न केला, परंतु तक्रारदाराने दोन्ही मशीन्सची किंमत रक्कम रु.13,00,000/- R.T.G.S. पध्दतीने जाबदारास दिल्याने ती जाबदारांचे खात्यावर जमा दाखविल्याने तक्रारदाराने जाबदारांना पैसे देण्याचा प्रश्नच निकालात निघाला व जाबदाराने घेतलेला debtचा defense पोकळ ठरला. या एकूणच जाबदारांच्या वर्तनावरुन दिसून येते की, जाबदारांचा पहिल्यापासूनच तक्रारदारास फसविणेचा उद्देश होता व मशीन न देता तक्रारदाराचे पैसे गिळंकृत करावयाचे असेच त्याने ठरविले होते.
जाबदारानी दोन मशीन्स पाठवणेचे कबूल करुन व तसा करारही करुन दोन मशिनचे पैसेही तक्रारदाराकडून स्विकारले. प्रोफाईल डायग्नोस्टीक सेंटर बी- 402 फेम एपीटी 747 हे गुरुवार पेठ पुणे येथे जाबदारानी पोहोचवणेचे कबूल केलेप्रमाणे पुणे येथे पोहोचविले. परंतु जाबदारानी फलटण येथील डायग्नोस्टीक सेंटरला दुसरे सिटीस्कॅन मशीन पोहोचविलेच नाही. जाबदारानी फलटण येथील डायग्नोस्टीक सेंटरला मशीन पाठवणेसाठी तक्रारदाराकडून रक्कम रु.7,00,000/- स्विकारले होते. तक्रारदारांचे कथनानुसार मशीन वहातुकीसाठी व इन्स्टॉलिंग चार्जेससाठी रु.13,00,000/- खर्च करावे लागले आहेत. जाबदारानी सदर रक्कम तक्रारदारांकडून स्विकारली असलेचे फौजदारी खटल्यात मान्यही केले आहे. परंतु पुणे येथे एक मशीन पाठवले व फलटण येथे दुसरे मशीन पाठविलेच नाही व तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केली. दुस-या मशीनचे पैसे स्विकारुनही दुसरे मशीन न पाठविलेमुळे तक्रारदाराचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे तक्रारदारास नाहक शारिरीक व आर्थिक त्रास सोसावा लागला आहे व सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदारानी 3-3-12 रोजी वकीलामार्फत जाबदारास नोटीस पाठवून याबाबत कळविलेही आहे. जाबदारानी सदर नोटीस स्विकारली आहे परंतु मशीन मात्र पाठविले नाही. जाबदारानी आज पाठवितो, उद्या पाठवितो असे सांगूनही मशीन पाठविले नाही व तक्रारदारास रु.13,00,000/- पाठविणेस मात्र भाग पाडले. म्हणूनच नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.12,00,000/- जाबदाराकडून तक्रारदारास मिळणे मे.मंचास योग्य वाटते. वास्तविकतः तक्रारदारानी इन्स्टॉलिंग चार्जेस वगैरेची बिले सदर कामात दाखल करावयास हवी होती. परंतु फौजदारी खटल्यामध्ये जाबदारानी तक्रारदाराकडून रक्कम स्विकारलेचे मान्य केले असलेने ते ग्राहय धरणे मंचास न्यायोचित वाटते. म्हणून जाबदारानी फलटण येथे सिटीस्कॅन मशीन न पाठविल्यामुळे तक्रारदारांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागला आहे व या सर्वाला जाबदारच जबाबदार आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
5. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात.
आदेश
1. तक्रारदारास जाबदारांनी रु.12,00,000/-(रु.बारा लाख मात्र) द्यावेत व त्यावर दि.14-11-2009 पासून आदेश पारित तारखेपर्यंत द.सा.द.शे.10%ने व्याज द्यावे.
2. तक्रारदारास जाबदारानी तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- द्यावेत.
3. वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे.
तसे न केल्यास आदेश पारित तारखेपासून एकूण होणा-या रकमेवर तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6% ने व्याज अदा करावे.
4. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 अन्वये जाबदाराविरुध्द दाद मागू शकतील.
5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
6. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 7-1-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.