जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 25/2011
तक्रार दाखल दिनांक – 08/02/2011
तक्रार निकाली दिनांक – 31/12/2012
श्री.रविंद्र (गणेश)रामचंद्र ठाकरे. ----- तक्रारदार
उ.वय.-36 वर्षे, धंदा-व्यवसाय.
रा.अवधान,ह.मु.संतसेना मंदिराजवळ,
न्हावी कॉलनी,देवपूर,धुळे.
विरुध्द
बुलबुल ट्रॅव्हल्स. ----- विरुध्दपक्ष
नंदुशेठ गुप्ता. झाशी राणी चौक,
मनपा कॉम्प्लेक्स,धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षः श्री.डी.डी.मडके.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.वाय.शिंपी)
(विरुध्दपक्षा तर्फे – वकील श्री.आर.आर.कुचेरीया.)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्ष-श्री.डी.डी.मडके.)
------------------------------------------------------------------
(1) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा देऊन सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ते धुळे येथील रहिवासी असून तक्रारदारांच्या पत्नीच्या लहान बहिणीचे लग्न दि.23-11-2010 रोजी पिंपरी पुणे येथे असल्याने, धुळे येथून नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी विरुध्दपक्ष यांचेकडे चौकशी केली. तेव्हा विरुध्दपक्षाने चांगल्या कंडीशनमध्ये तसेच चांगले कुशन असलेली आरामदायी लक्झरी गाडी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने एकूण रु.26,500/- गाडीसाठी जमा केले व 3 X 2 सिट असलेली गाडी बुक केली. तसेच विरुध्दपक्ष यांनी गाडी दि.22-11-2010 रोजी रात्री 10 वाजता धुळे येथून प्रिंपीसाठी निघेल व परत दि.23-11-2010 रोजी रात्री 3 वाजता धुळयात परत येईल असे लिहून दिले.
(3) दि.22-11-2010 रोजी तक्रारदारांनी विरुध्दपक्षास दुरध्वनीवर संपर्क साधून ठरल्याप्रमाणे बुक केलेली गाडी पाठविण्यास सांगितले. विरुध्दपक्षाने रात्री 10.30 वाजता गाडी क्र.एम.एच.18 एम 1330 ही न्हावी कॉलनीत पाठविली आणि किरकोळ बिघाड झाल्याने उशिर झाल्याचे सांगितले. त्यानंतर गाडीत लोक बसल्यानंतर गाडी सुरुच झाली नाही. पुन्हा किरकोळ दुरुस्ती करुन रात्री 12.30 वाजता गाडी निघाली. परंतु गाडीच्या इंजिनमधून आवाज येऊ लागल्याने ड्रायव्हर गाडी हळू चालवत होता. त्यानंतर पहाटे 4.30 चे सुमारास संगमनेरच्या पुढे अचानक बंद पडली. तेथून पुढे पुणे 130 कि.मि. बाकी होते. त्यामुळे तक्रारदार व गाडीचा ड्रायव्हर खाजगी रिक्षाने संगमनेर येथे जावून मॅकेनिकला आणले. गाडी दुरुस्तीसाठी दि.23-11-2010 रोजी स्पेअर पार्ट, मजूरी, खाजगी रिक्षा यासाठी एकूण रु.4,495/- खर्च केले. त्या बिलावर गाडी दुरुस्त करणारा मॅकेनिक व ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर संदीप राजपुत यांची सही घेतली. यावेळी विरुध्दपक्षाचे ऑफीस व मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता विरुध्दपक्षाने मोबाईल बंद करुन ठेवला.
(4) लग्नाला वेळेवर जाणे गरजेचे असल्याने गाडी दुरुस्तीचा संपूर्ण खर्च तक्रारदाराने केला. त्यानंतर गाडी दि.23-11-2010 रोजी दुपारी 1 वाजता लग्नठिकाणी पोहोचली. त्यामुळे नियोजीत हळदीचा कार्यक्रम व लग्नकार्यास उशीर झाला. तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांना मानसिक व शारीरिक त्रास झाला. तसेच लग्नस्थळी उशीरा पोहोचल्यामुळे मुलाकडील लोकांकडून अपमानीत व्हावे लागले.
(5) परतीच्या प्रवासाला दि.23-11-2010 रोजी पुणे येथून संध्याकाळी 6.30 वाजता गाडी निघाली असता, गाडी सुरु करण्यास पुन्हा अडचण येऊ लागली. गाडीतील लोकांना, धक्का देऊन गाडी सुरु करावी लागली. रात्री गाडीचे लाईट लागत नसल्यामुळे सदरील ट्रॅव्हल गाडीचे पुढे एक गाडी लाईटासाठी चालवून अंधारात पुणे येथून निघालेली ट्रॅव्हल सकाळी 7 वाजता धुळयात पोहोचली. विरुध्दपक्षास या बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या असे म्हणून शिवीगाळ करुन अपमानीत केले.
(6) विरुध्दपक्ष यांच्या सांगण्याप्रमाणे ट्रॅव्हल्सचे रु.26,500/- रोख देऊनही विरुध्दपक्षाने जुनी, खराब गाडी पाठवून सदोष सेवा दिली. प्रवासात गाडीच्या दुरुस्तीसाठी दिलेले रु.4,495/- मागणी करुनही दिले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांना सदर तक्रार या न्यायमंचात दाखल करावी लागली आहे.
(7) त्यामुळे गाडी दुरुस्तीची रक्कम रु.4,495/-, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाचा खर्च रु.50,000/- तसेच अर्जाचा खर्च रु.7,500/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावा आणि इतर योग्य व न्याय्य हुकुम तक्रारदारांच्या लाभात व्हावेत अशी विनंती केली आहे.
(8) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.3 वर शपथपत्र तसेच नि.नं.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
(9) विरुध्दपक्ष यांनी त्यांचे म्हणणे नि.नं.13 वर दाखल केले असून, त्यात त्यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील सामनेवाले यांच्या विरुध्द केलेले कथन व मागणी हे संपूर्ण खोटे असून सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्यास काहीएक कसूर केलेला नाही. तक्रारदाराचे तक्रार कलम 2 मधील कथन सर्वसाधारणपणे बरोबर आहे. मात्र गाडीत किरकोळ बिघाड झाल्याने गाडी उशिरा आणली हे कथन पूर्णतः खोटे व बनावट आहे. गाडी रात्री 12.30 वा.निघाली हे म्हणणे देखील खोटे आहे. तक्रारदार व त्यांचे पाहुणे मंडळी यांच्या चुकीमुळे गाडी उशिरा रात्री 12.30 वाजता पिंप्री,पुण्याकडे जायला निघाली. तक्रारदार व त्यांचे पाहुणे मंडळी यांच्या आग्रहाखातर गाडी हॉटेल निसर्गरम्य जवळ थांबविली. तक्रारदार यांचे तक्रार कलम 4 व 5 मधील मजकुर देखील खोटा, चुकीचा आहे. वस्तुतः दि.23-11-2010 रोजी लग्न आटोपुन गाडी तेथुन 7 वाजता निघाली व सुस्थितीत कोणतीही अडचण न येता धुळे येथे रात्री 4.30 ते 5 वाजेचे दरम्यान पोहचली. मात्र गाडी दुरुस्तीचे बिल मिळेपर्यंत मी गाडी सोडणार नाही असे तक्रारदाराने सांगितल्यामुळे नाईलाजाने गाडी तक्रारदारांचे घरीच उभी करावी लागली. दुस-या दिवशी दि.24-11-2010 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांचे घरी जाऊन गाडी दुरुस्तीचे बीलाची रक्कम अदा करुन मुळ बीले ताब्यात घेतली. तक्रारदार यांचे तक्रार कलम 6 व 7 मधील कथन देखील खोटे, चुकीचे आहे.
(10) ट्रॅव्हल्सची गाडी एक यांत्रीक मशिनरी त्यात केव्हाही बिघाड होणे ही तांत्रीक बाब आहे. ती कोणाच्या आव्याक्यातील गोष्ट नाही. किरकोळ बिघाड झाल्यामुळे सदोष सेवा पुरविली हे पूर्णतः न पटणारे आहे. आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने सदरची खोटी व बनावट तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ती खर्चासह रद्द होण्यास पात्र आहे.
(11) जाबदेणार यांची गाडी सुस्थितीत होती. त्यासाठी आर.टी.ओ.धुळे यांचे गाडीचे फिटनेस सर्टीफीकेट दाखल केले आहे. तसेच गाडी ही पूर्ण सुस्थितीत असल्यामुळे गाडीचा विमा देखील उतरविला होता. जाबदेणार यांनी सदोष सेवा दिलेली नाही, सेवेत कसूर केलेला नाही. तक्रारदाराने जाबदेणार यांना कारण नसतांना तक्रार दाखल करुन खर्चात टाकले त्यामुळे तक्रार अर्ज कॉम्पेंसेटरी कॉस्टसह रद्द करण्यात यावा अशी शेवटी त्यांनी विनंती केली आहे.
(12) तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्षांचे कथन तसेच पुराव्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे व उभयपक्षाने केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर विष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? | ः होय. |
(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः होय. |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(13) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदारांनी विरुध्दपक्ष बुलबुल ट्रॅव्हल्स यांचेकडे, पिंपरी, पुणे येथे दि.23-11-2010 रोजीचे विवाहासाठी जाणे-येणेसाठी लक्झरी बस क्र.एम.एच.18 एम 1330 ही दि.04-10-2010 रोजी बुक केली होती. त्यासाठी करारा नुसार ठरल्या प्रमाणे एकूण रक्कम रु.26,500/- दिल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक असल्याचे सिध्द होते. दि.23-11-2010 रोजी दुपारी 12.21 वाजता विवाहाची वेळ निश्चित असल्याने, सदर वाहन दि.22-11-2010 रोजी रात्री 10.00 वाजता धुळयाहून निघेल आणि दि.23-11-2010 रोजी विवाह समारंभ आटोपल्यानंतर रात्री 03.00 वाजता धुळयात परतेल असे उभयतांमध्ये करारान्वये ठरले असल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते.
(14) असे असतांना विरुध्दपक्ष यांनी, लक्झरी बस क्र.एम.एच.18 एम 1330 ही ठरल्याप्रमाणे दि.22-11-2010 रोजी वेळेवर 10.00 वाजता न पाठवता रात्री उशीरा 10.30 वाजता पाठविली. उशीरा येऊनही प्रवासी घेऊन निघतेवेळी बस लवकर सुरु झाली नाही. तेथेच ती किरकोळ दुरुस्ती करुन रात्री 12.30 वाजता सुरु झाली. अशा प्रकारे धुळे येथून निघाल्यापासूनच सदर वाहन काहीना काही कारणाने मध्येच बंद पडत होते व पर्यायाने उशीरा प्रवास होत होता हे तक्रारदाराने शपथेवर कथन केले आहे. तसेच पुढे सदर वाहन संगमनेर जवळ पहाटे 4.30 वाजता बंद पडल्याने व सुरु न झाल्याने तक्रारदारास घटनास्थळावरुन संगमनेर येथे रिक्षाने रक्कम रु.400/- देऊन जावे यावे लागले आणि तेथून वाईद नामक वाहन मॅकेनिकला आणावे लागले. तसेच त्याचे सांगण्याप्रमाणे वाहनातील क्लच प्लेटमध्ये बिघाड झाल्याने व तो दुरुस्त करणे आवश्यक असल्याने तक्रारदारास दि.23-10-2010 रोजी लोकसेवा ऑटोमोबाईल मधून पावती क्र.363 व 364 द्वारे अनुक्रमे वाईद व नंदुशेठ यांचे नांवे अनुक्रमे रक्कम रु.2,515/- व रु.380/- देऊन स्पेअर पार्ट आणावे लागले आणि ते बसविणेसाठी मॅकेनिकला रु.1,200/- मजूरीपोटी द्यावे लागल्याचे दाखल पावत्यांवरुन सिध्द होते. या सर्व बाबीमुळे विवाहाची वेळ दि.23-10-2010 रोजी दुपारी 12.21 अशी निश्चित केलेली असतांना, वाहन उशीरा दुपारी 1.00 वाजता विवाहस्थळी पोहोचले. या सर्व बाबीमुळे साहजीकच तक्रारदार वधुपक्षास व वरपक्षास आणि नियोजित वधू-वरास प्रचंड मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. तसेस हल्लीच्या गतीमान युगात सर्वांनाच आपापले उद्योग-व्यवसाय व नोकरीचे कामकाज सांभाळून अशा प्रसंगात उपस्थित राहणेसाठी करावी लागणारी तजवीज व धावपळ यांचा विचार करता, पैशांपेक्षा वेळेला अधिक महत्व आहे असेच म्हणावे लागेल.
(15) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांच्या कुटूंबातील नियोजीत विवाहाचे वेळेचा व त्यांना होणा-या त्रासाचा कोणताही सारासार विचार न करता, गाडी बंद पडल्यानंतर तक्रारदारांनी दुरध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही, दुसरे सुस्थितीत चालू शकेल असे वाहन उपलब्ध करुन दिले नाही आणि तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासास कारणीभूत होऊनही त्याबद्दल नुकसान भरपाई दिली नाही. या सर्वार्थाने विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत त्रृटी असल्याचे सिध्द होते.
(16) विरुध्दपक्ष हे भल्यामोठया रकमेच्या मोबदल्यात, वाहन पुरविण्याचा व्यवसाय करीत आहेत. मात्र तक्रारदाराशी करार करुन प्रत्यक्षात अत्यंत नादुरुस्त असे वाहन पुरवून वाहन बंद पडल्यानंतर कोणतीही सेवा देण्याचे जाणीवपुर्वक टाळले आहे हे स्पष्ट होते. तसेच अशा घडामोडीनंतरही तक्रारदार ग्राहकाशी सविनय चर्चा न करता, आपल्या बचावार्थ केवळ वाहनाचे फीटनेस सर्टिफीकेट व विमा सर्टिफीकेटचे आधारे नुकसान भरपाई देण्याचे नाकारले आहे. वस्तुतः अशा सर्टिफीकेट्सचे आधारे विरुध्दपक्षास त्यांचे जबाबदारीतून व द्यावयाच्या सेवेतून मुक्त होता येणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. या सर्व बाबीचा विचार करता विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत निःसंदिग्धपणे त्रृटी असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(17) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदारांनी वाहन दुरुस्तीचा खर्च रु.4,495/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च रु.7,500/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावेत अशी विनंती केली आहे. परंतु आमच्या मते, वाहन दुरुस्तीचा खर्च रु.4,495/- या न्यायमंचात सदर तक्रारीची सुनावणी सुरु असतांना विरुध्दपक्षाकडून मिळाल्याचे तक्रारदारांनी नम्रपणे मान्य केले आहे. त्यामुळे सदर रक्कम पुन्हा देण्याचे कारण नाही. परंतु तक्रारदार मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.15,000/- तसेच तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(18) मुद्दा क्र. ‘‘क’’ - उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) विरुध्दपक्ष बुलबुल ट्रॅव्हल्स यांनी, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत, तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम 15,000/- (अक्षरी रु. पंधरा हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम 1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) दयावेत.
(क) उपरोक्त आदेश कलम (ब) मधील रक्कम मुदतीत न दिल्यास, विरुध्दपक्ष यांनी, तक्रार दाखल दि. 08/02/2011 पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह सदर रक्कम तक्रारदारास द्यावी.
धुळे.
दिनांकः 31-12-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.