(मा. सदस्या अँड. सौ.व्ही.व्ही. दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून मानसिक, शारिरीक व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून रु.5000/- मिळावेत, अनामत ठेव रु.2000/- यावर दि.24/12/2010 पासून 18 टक्के दराने व्याज मिळावे, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी या कामी पान क्र.16 लगत लेखी म्हणणे, पान क्र.17 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दा विचारात घेतलेला आहे.
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे चालण्यास पात्र आहे
काय?- नाही.
2) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
वि वे च न
या कामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.26 लगत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आलेला आहे तसेच अर्जदार यांचे वतीने अँड.चंदन जाधव यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने या कामी अँड.ए.एम.गरेवाल यांनी युक्तीवाद केलेला आहे.
सामनेवाला यांचेवतीने युक्तीवाद करतांना “मा.राष्ट्रीय आयोग व मा.सर्वोच्च न्यायालय यांचेकडील नुकतेच पारित झालेले निकालपत्रानुसार सामनेवाला यांचेविरुध्द अर्जदार यांनी आर्बिट्रेशन अँक्ट प्रमाणे दाद मागणे गरजेचे आहे.” असे कथन करण्यात आलेले आहे.
या कामी सामनेवाला यांनी पान क्र. 29 लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत.
1) 2011 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 551 प्रकाश वर्मा विरुध्द आयडीया
सेल्युलर लि.व इतर
2) 2009 सि.टी.जे. सर्वोच्च न्यायालय पान 1062. जनरल मॅनेजर टेलिकॉम
विरुध्द एम. कृष्णन व इतर.
वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामध्ये “टेलिफोन ग्राहक व टेलिफोन अँथॉरिटी यांचेमध्ये कोणत्याही बाबतीत वाद उत्पन्न झाल्यास अर्बिट्रेशन प्रोसिडींगमध्येच दाद मागणे गरजेचे आहे” (Any disputes between a subscriber and the telegraph authority could be resolved only by taking recourse to arbitration prociding )असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.
वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा विचार करता कोणत्याही टेलिफोन ग्राहक धारकास म्हणजे मोबाईल व लँडलाईन ग्राहकास टेलिफोन बील किंवा टेलिफोन बाबत कोणत्याही तक्रारीसाठी टेलिफोन अँथॉरिटीविरुध्द दाद मागावयाची असल्यास आर्बिट्रेशन अँक्ट मधील तरतुदीनुसारच दाद मागावी लागेल हे स्पष्ट होत आहे.
वरील वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राबाबत काही जादा युक्तीवाद सांगावयाचा आहे काय? अशी विचारणा युक्तीवादाचे वेळी अर्जदार यांचे वकिल यांना केली असता अँड चंदन जाधव यांनी जादा युक्तीवाद करण्याचे नाही असे सांगितले आहे.
सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टांचे निकालपत्रांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे चालण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
जरुर तर अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द आर्बिट्रेशन अँक्ट मधील तरतुदीनुसार योग्य ती दाद मागावी असे या मंचाचे मत आहे.
वरील प्रमाणे सर्व कारणांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.