(मा.अध्यक्ष श्री.आर.एस. पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांचे खात्यावर असलेले रक्कम रु.4,83,612/- व त्यावरील व्याज मिळावे, मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रक्कम रु.5,00,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा यासाठी अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द हा तक्रार अर्ज या मंचासमोर दि.05/03/2012 रोजी दाखल केलेला आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज दाखल करुन घेण्यास पात्र आहे काय? याबाबत अर्जदार यांचे म्हणणे एकून घेण्यात यावे असे आदेश दि.05/03/2012 रोजी करण्यात आलेले आहेत.
अर्जदार यांनी पान क्र.13 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
अर्जदार यांनी पान क्र.1 लगत तक्रार अर्ज, पान क्र.2 लगत प्रतिज्ञापत्र, नि.6 लगतचे कागदयादी सोबत पान क्र.7 ते पान क्र.12 लगत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेली आहेत.
या कामी तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्र कलम 4 मध्येच “अर्जदार यांचे खात्यावर जमा करण्यात आलेला चेक नं.261296 हा रु.5,26,237/- इतक्या रकमेचा चेक परत आलेला असून वटवण्यात आलेला नाही.” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. अर्जदार यांनीच दाखल केलेले पान क्र.7 व पान क्र.9 चे कागदपत्रांचा विचार होता चेक नं.261296 हा चेक न वटता परत आलेला आहे हे स्पष्ट होत आहे. म्हणजेच अर्जदार यांचे सेव्हींग खात्यावर रक्कम रु.5,26,237/- ही रक्कमच जमा झालेली नाही, त्यामुळे अर्जदार यांचे सेव्हींग खात्यावरील शिल्लक रक्कम कमी झालेली आहे. अर्जदार यांनी त्यांचे मित्र अखील शेख यांना चेक नं.961996 चा रु.85,000/- चा जो चेक दिलेला होता, तो चेक अर्जदार यांचे सेव्हीग खात्यावर योग्य तितकी रक्कम शिल्लक नसल्यामुळे सामनेवाला यांनी न वटता परत केलेला आहे असे दिसून येत आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांचेकडून सकृतदर्शनी सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता झालेली नाही असेच दिसून येत आहे.
तक्रार अर्ज कलम 11 अ मध्ये अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून खात्यावर जमा असलेली रक्कम रु.4,83,612/- व त्यावरील व्याज अशी रक्कम वसूल होवून मिळावी अशी मागणी करीत आहेत. अर्जदार यांचे या मागणीचा विचार होता अर्जदार हे या कामी पुर्णपणे दिवाणी दाव्यातील स्वरुपाची मागणी करीत असून सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरतेबाबत अर्जदार हे तक्रार अर्जामध्ये कोणतीही मागणी करीत नाहीत हे स्पष्ट होत आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढील प्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
2(2011) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 55. दयाराम भिका आहिरे
नाशिक विरुध्द कोटक महिंद्र बँक लि.शाखा नाशिक.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.