तक्रारदार स्वत:
अॅड सुजाता तांबे जाबदेणारांकरिता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष यांचे नुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 22 फेब्रुवारी 2013
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी वैयक्तिकरित्या जाबदेणार बँके विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केली आहे. त्यातील कथने खालीलप्रमाणे-
1. सदर तक्रारदार यांचे खाते जाबदेणार बँकेत तक्रार दाखल करण्याच्या आधी 5 वर्षापासून चालू आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार बँकेमधून ए.टी.एम कार्ड घेतलेले होते. दिनांक 3/11/2010 रोजी जाबदेणार बॅंकेच्या रास्ता पेठ, पुणे येथे असलेल्या ए.टी.एम मधून रुपये 9000/- काढण्यासाठी तक्रारदारांनी सदरच्या ए.टी.एम कार्ड वापरले होते. त्यावेळी त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून त्वरीत त्यांनी ए.टी.एम जवळ असणारे कर्मचारी श्री. श्रीकांत निखळ यांना या गोष्टीची कल्पना दिली. त्यांनी देखील ए.टी.एम कार्ड वापरुन पाहिले. पेपर रोल संपल्यामुळे तक्रारदारांना पावती मिळाली नाही. तक्रारदारांनी त्वरीत जाबदेणार यांच्या टिळक रोड शाखेत तक्रार नोंदविली. त्यावेळी उपस्थित असलेले मॅनेजर सौ. मोरे यांनी तक्रार नोंदवून घेतली व पैसे मिळतील परंतू थोडे दिवस लागतील असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी अनेक वेळा बँकेत जाऊन रकमेची मागणी केली. समर्थ पोलिस स्टेशन येथे तक्रारदारांनी बँके विरुध्द तक्रार अर्ज पाठविला व बँकेला दिनांक 30/12/2010 रोजी लेखी तक्रार अर्ज दिला. दिनांक 24/12/2010 रोजी जाबदेणार बँकेने लेखी कळविले की तक्ररदारांना दिनांक 3/11/2010 रोजी रुपये 9000/- ए.टी.एम मधून मिळाले आहेत व व्यवहार पूर्ण झाल्याबद्यलचा अहवाल मिळालेला आहे, त्यामुळे तक्रारदारांची मागणी मान्य करता येत नाही. तक्रारदारांना त्यांच्या खात्यामधून रुपये 9000/- मिळाले नाही म्हणून सदरील तक्रार तक्रारदार यांनी दाखल केली आहे. त्यामध्ये तक्रारदार यांनी ए.टी.एम व्यवहारातील रुपये 9000/- मिळावेत, त्यावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज मिळावे, त्याचप्रमाणे त्यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 10,000/- नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी तक्रारदार करतात.
2. जाबदेणार शाखेनी या प्रकरणात हजर राहून आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांनी तक्रारीतील सर्व कथने नाकारली. जाबदेणार यांच्या कथनानुसार दिनांक 3/11/2010 रोजी तक्रारदारांनी ए.टी.एम कार्ड वापरुन रुपये 9000/- ची मागणी केली होती, त्याचदिवशी सदरची रक्कम त्यांच्या खात्यात नावे पडली आहे. सदरची रक्कम तक्रारदारांना मिळालेली आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही स्वरुपाची दाद मागता येणार नाही. जाबदेणार बँकेने चौकशी करुन ए.टी.एम मधील नोंदी तपासून पाहिल्या. त्यात सदरची रक्कम तक्रारदारांना मिळालेली आहे असे आढळून आले. त्याचप्रमाणे जाबदेणार बँकेनी मुंबई शाखेकडून याबाबतची माहिती मागविली. त्यावेळी त्यांना असे कळविण्यात आले की सदर ए.टी.एम मशिन मधून रक्कम बाहेर पडलेली आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार दिनांक 3/11/2010 रोजी ट्रान्झॅक्शन क्र 344 ने दुपारी 3.50 वा. मिनिटांनी रुपये 9000/- मशिनच्या बाहेर आले होते. सदरची माहिती तक्रारदारांना कळविली होती. तथापि त्यांनी प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केली आहे. जाबदेणार यांना प्रत्येकी रुपये 10,000/- नुकसान भरपाई दयावी व तक्रार फेटाळण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
3. या प्रकरणातील कागदोपत्री पुरावा, दोन्ही पक्षकारांची कथने, प्रतिज्ञापत्र यांचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मुद्ये निष्कर्ष
[1] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना
निकृष्ट दर्जाची सेवा दिलेली आहे असे
सिध्द होते काय ? होय
[2] अंतिम आदेश ? तक्रार मंजूर
कारणे-
प्रस्तुत तक्रारीत तक्रारदार यांच्या वतीने बँकेत दाखल केलेला तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्याचप्रमाणे बँकेने तक्रारदार यांना पाठविलेली पत्रे इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. जाबदेणार यांनी देखील दोन्ही पक्षकारांच्या दरम्यान झालेला पत्र व्यवहार त्याचप्रमाणे वरिष्ठ बँकेकडे केलेला पत्र व्यवहार व खाते उतारा दाखल केलेला आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार ए.टी.एम कार्डचा वापर करुन रुपये 9000/-ची मागणी केली होती परंतू त्यांना सदरची रक्कम मिळालेली नाही, परंतू खात्यावर नावे पडलेली आहे. तक्रारदार यांनी यासंबंधी सदर व्यवहाराच्या वेळी हजर असलेले वॉचमन श्री. श्रीकांत निखळ यांच्या सहीचा अर्ज देखील जाबदेणार यांच्याकडे दिलेला होता. चौकशीच्या वेळी सदरचा वॉचमन नोकरी सोडून गेलेला होता, त्यामुळे त्याचा पुरावा दाखल करण्यात आलेला नाही. जाबदेणार यांच्या कथनानुसार त्यांच्या उपलब्ध असलेल्या पुराव्या नुसार सदरची रक्कम तक्रारदार यांना देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने जाबदेणार यांनी कोणताही पुरावा अथवा तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. सदर व्यवहारा संबंधी जाबदेणार यांच्याकडे व्हिडीओ रेर्कॉडींग उपलब्ध असतांना देखील सदरचा पुरावा दाखल करण्याचे जाबदेणार यांनी टाळले आहे. अशा परिस्थितीत जाबदेणार यांच्या विरुध्द भारतीय पुराव्याचा कायदा कलम 114 ग नुसार प्रतिकूल निष्कर्ष काढण्यास वाव आहे. जाबदेणार यांच्याकडे व्हिडीओ रेकॉर्डीग असतांना देखील त्यांनी का दाखल केले नाही याचे कोणतेही कारण जाबदेणार बँकेनी दिलेले नाही. या मंचासमोर असलेल्या पुराव्यानुसार असे स्पष्ट होते की तक्रारदारांनी सदर व्यवहारा नंतर रिजनल ऑफिस मध्ये लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीत देखील त्यांनी ए.टी.एम जवळ असलेले वॉचमन श्री. श्रीकांत निखळ यांचा संदर्भ दिला होता त्यांच्याकडे या व्यवहारा बाबत कोणतीही चौकशी जाबदेणार बँकेने केली नाही. सदरचे कर्मचारी हे जाबदेणार बँकेचे कर्मचारी असून देखील त्याचा पुरावा महत्वपूर्ण होता. परंतू सदरचा पुरावा जाबदेणार बँकेने मंचा समोर आणला नाही. त्याचप्रमाणे जाबदेणार बँकेनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे तांत्रिक सल्लागार यांचा देखील पुरावा दाखल केलेला नाही. यावरुन असे सिध्द होते की तक्रारदार यांनी जरी ए.टी.एम कार्ड वापरले होते तरी त्यांना रुपये 9000/- मिळालेले नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम तक्रारदार जाबदेणार बँकेकडून वसूल करण्यास पात्र आहेत. तक्रारदार हे त्यांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत.
वर उल्लेख केलेल्या विवेचनाच्या आधारे संबंधीत मुद्यांचा निष्कर्ष तक्रारदार यांच्या बाजूने काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना ए.टी.एम कार्ड वापरण्या बाबतच्या सेवेत कमतरता केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
[3] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रक्कम रुपये 9000/- दिनांक 3/11/2010 पासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावेत.
[4] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या नुकसान भरपाई पोटी तक्रारदारांना रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.