(घोषित दि. 23.01.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे
तक्रारदारांचे पती श्री भाऊसाहेब श्रावण दाभाडे हे शेतकरी असून कुंभारी ता.भोकरदन जि.जालना येथील रहीवाशी आहेत. दूर्देवाने दिनांक 09.06.2010 रोजी शेतात ट्रॅक्टरचालवित असताना झालेल्या अपघातात जखमी होवून दिनांक 12.06.2010 रोजी मृत्यू पावले. सदर अपघाताची पोलीस स्टेशन भोकरदन यांना माहीती मिळाल्यानंतर गुन्हा क्रमांक 21/2010 ची नोंद होवून आकस्मित मृत्यूची नोंद झाली.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नूकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता कृषी अधिकारी भोकरदन यांचेकडे विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासहीत दाखल केला. कृषी अधिका-यांनी सदर प्रस्ताव गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे पाठवला. गैरअर्जदार 1 यांनी दिनांक 31.12.2010 रोजीच्या पत्रान्वये अपूर्ण कागदपत्र दिनांक 24.11.2010 पर्यंत प्राप्त न झाल्यामुळे विमा प्रस्ताव नामंजूर केला. तक्रारदारांना गैरअर्जदार 1 यांचे पत्र दिनांक 14.02.2011 रोजी मिळाले.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 24.10.2010 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानुसार शासनाने दिनांक 10.08.2009 रोजीच्या पत्रान्वये शेतक-या करीता प्रत्येकी रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 15.08.2009 ते 14.08.2010 या कालावधीची घेतलेली आहे. तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू दिनांक 12.06.2010 रोजी झालेला असून पोलीसांनी दिनांक 30.07.2010 रोजी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. गैरअर्जदार 1 यांनी योग्यरित्या तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर केला आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 2 यांनी पोस्टाद्वारे लेखी म्हणणे दिनांक 22.08.2011 रोजी दाखल केले असून गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव दिनांक 06.09.2010 रोजी प्राप्त झालेला असून सदर प्रस्तावामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता अनेकवेळा तक्रारदारांना कळवले. परंतू तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदारांचा अपूर्ण प्रस्ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे दिनांक 21.12.2010 रोजी पाठवला. गैरअर्जदार 1 विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजी तक्रारदारांच्या प्रस्तावाची फाईल बंद करण्यात आली.
तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्र, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री जी.एन.ढवळे व गैरअर्जदार 1 यांचे विद्वान वकील श्री संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू दिनांक 12.06.2010 रोजी झालेला असून गैरअर्जदार 2 कबाल इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक 03.09.2010 रोजी आवश्यक कागदपत्रांसहीत दाखल झाल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार 1 विमा कंपनीच्या दिनांक 31.12.2010 रोजीच्या पत्रानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांच्या कारणास्तव नामंजूर केल्याचे दिसून येते. सदर पत्रानूसार कोणत्या कागदपत्रांची पूर्तता झाली नाही ? या बाबत खूलासा होत नाही. तसेच गैरअर्जदार यांनी तक्रारदारांकडे कागदपत्रांची मागणी केल्याबाबतचा कोणताही पुरावा न्याय मंचासमोर नाही. गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानूसार वैद्यकीय प्रमाणपत्र व ड्रायव्हींग लायसन्सची मागणी तक्रारदारांकडे केल्यानंतरही कागदपत्राची पुर्तता झालेली नाही.
तक्रारदारांचा विमा प्रस्तावामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र व ड्रायव्हींग लायसन्स या कागदपत्रांची पुर्तता न झाल्यामूळे विमा प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे सदर कागदपत्रांची पुर्तता करणे योग्य होईल. तसेच गैरअर्जदार 1 यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव विलंबाचा मुद्दा वगळून गुणवत्तेवर निकाली करणे योग्य आहे असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे वैद्यकीय प्रमाणपत्र, ड्रायव्हींग लायसन्स ही कागदपत्रे आदेश मिळाल्यापासून 1 महिन्यात द्यावी.
- गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांची वरील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्यात तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करावा.
- खर्चा बाबत आदेश नाही