मंचः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष : श्री.एन.डी.कदम, सदस्य.
: श्रीमती. एस.एल.देसाई सदस्या.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
तक्रारदार :गैरहजर.
सामनेवाले :वकील श्री.शिराजी यांचे मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही विमान प्रवाशांना सेवा सुवीधा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या विमानाने दिनांक 2.4.2008 रोजी मुंबई ते लंडण व लंडण ते झुरीच असा प्रवास केला व प्रवास दरम्यान तक्रारदारांच्या दोन बॅगा सा.वाले यांच्या विमानामध्ये ठेवण्यसात आल्या होत्या. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांना झुरीच विमानतळावर दोन बॅगापैकी एक बॅग मिळाली. व एक बॅग परत देण्यात आली नाही. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे त्या बॅगेमध्ये ब-याच महत्वाच्या व महागडया वस्तु होत्यास. तक्रारदारांना ती बॅग दिनांक 8.4.2008 रोजी परत देण्यात आली. दरम्यान तक्रारदारांना आवश्यकत्या वस्तु खरेदी कराव्या लागल्या. तसेच कपडे खरेदी करावे लागले. तक्रारदारांना त्याकामी 598.30 फ्रॅक खर्च करावा लागला. वरील प्रवासास यापुढे प्रथम टप्पा असे संबोधिले जाईल.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणं दिनांक 25.4.2008 रोजी तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीसह लंडण ते लॉस एन्जलीस असा सा.वाले यांच्या विमानाने प्रवास केला व त्यांच्याकडे असलेल्या चार बॅगापैकी केवळ एक बॅग तक्रारदारांना परत मिळाली व तीन बॅगा लॉस एन्जलीस विमानतळावर तक्रारदारांना परत देण्यात आल्या नव्हत्या. दिनांक 25.4.2008 ते 27.4.2008 चे दरम्यान सा.वाले त्या बॅगांचा शोध घेत होते. दरम्यान तक्रारदारांच्या कुटुंबामध्ये लग्न होते व त्याकामी तक्रारदारांनी भारीचे कपडे व भेट वस्तु आवश्यक होत्या. तक्रारदारांनी त्या आवश्यक असलेल्या वस्तु व कपडे खरेदी केले. व भेट वस्तु कुरीयरने पाठवीणेकामी त्यांचे नातेवाईकांना मुंबई येथे विनंती केली. व कुटुंबीयांकडून त्या वस्तु तक्रारदारांना प्राप्त झाल्या. याकामी तक्रारदारांना जवळपास 600 डॉलर्स वस्तु खरेदी करणेकामी खर्च करावा लागला. या व्यतिरिक्त कुरीयरने वस्तु पाठवीणेकामी त्यांचे नातेवाईकांना बराच खर्च करावा लागला. याकामी तक्रारदारांनी नुकसान भरपाईची मागणी केली असतांना सा.वाले यांनी केवळ 75 + 50 = 125 डॉलर्स तक्रारदारांना देऊ केले. जे अगदीच अपुरे होते. या घटणेस प्रवासाचा दुसरा टप्पा असे संबोधीले जाईल.
3. प्रवासाच्या तिस-या टंप्यामध्ये तक्रारदार त्यांच्या पत्नीसह दिनांक 15.5.2008 रोजी सा.वाले यांच्या विमानाने लंडण येथे येत होते. परंतु विमानास उशिर झाल्याने तक्रारदारांचे लंडण ते मुंबई हे विमान चुकले. परीणामतः तक्रारदारांना लंडण येथे हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. त्याची व्यवस्था सा.वाले यांनी केली. परंतु टॅक्सी प्रवासाकामी तक्रारदारांना 154 पौड खर्च करावा लागला. हया घटणेस प्रवासाचा तिसरा टप्पा असे संबोधीले जाईल.
4. तक्रारदारांच्या कथने प्रमाणे तक्रारदारांना स्वतः बराच खर्च करावा लागला. सा.वाले यांच्या कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांना मानसीक त्रास, कुचबणा व आर्थिक नुकसान सोसावे लागले. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिनांक 9.6.2008 रोजी नुकसान भरपाई बद्दल मागणी पत्र सादर केले. व सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांच्या मागणीच्या फक्त 50 टक्के रक्कम देऊ केली. त्यानंतर तक्रारदारांनी संपुर्ण मागणी मान्य करणेकामी सा.वाले यांचेकडे पत्र व्यवहार केला. परंतु सा.वाले यांनी त्यास दाद दिली नाही. त्यानंतर सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुवीधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे. व नुकसान भरपाई बद्दल रु.5 लाख सा.वाले यांनी तक्रारदारांना अदा करावेत अशी दाद मागीतली.
5. सा.वाले हजर होऊन त्यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदार हे परदेशामध्ये अलंकार व दागिन्याचे प्रदर्शनाकामी गेले होते म्हणजे त्यांचे व्यवसायाकामी गेले असल्याने तक्रारदारांनी सा.वाले यांची सेवा वाणिज्य व्यवसायाकामी स्विकारली असल्याने तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (डी) प्रमाणे ग्राहक होऊ शकत नाहीत असा आक्षेप घेतला. सा.वाले यांनी असेही कथन केले की, प्रथम टंप्यातील तक्रारदारांना कराव्या लागलेल्या खर्चा बद्दल व नुकसानी बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना 598.30 फ्रॅक्स अदा केलेले आहेत. दुस-या टंप्याचे नुकसान भरपाईच्या मागणी बद्दल सा.वाले यांनी असे कथन केले की, Carriage by Air Act. 1972 मधील तरतुदीनुसार विमान कंपनीच्या प्रवासात बॅग हरवल्यास, विलंब झाल्यास द्याव्या लागणा-या नुकसान भरपाईची मर्यादा निश्चीत केलेली असून त्या मर्यादे पर्यतच सा.वाले तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी अवास्तव नुकसान भरपाईची मागणी केलेली असून तक्रारदार अप्रमाणिक आहेत असाही आरोप केला आहे. सा.वाले यांनी देऊ केलेले 125 डॉलर्सची नुकसान भरपाई योग्य आहे असे ही सा.वाले यांनी कथन केले. तिस-या टंप्याचे संदर्भात तक्रारदारांची लंडण येथे हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती व त्यांना कुठलाही खर्च करावा लागला नाही असेही कथन सा.वाले यांनी केले.
6. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. त्या सोबत सा.वाले यांना दिलेल्या पत्राच्या प्रती हजर केल्या. तसेच वस्तु खरेदी केल्या बद्दल देयकाच्या प्रती तसेच कुरीयर सेवेने नातेवाईकांनी पाठविलेल्या वस्तु बद्दलच्या देयकाची प्रत हजर केली. सा.वाले यांनी त्यांचे अधिकारी श्री.संजय सोनी यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. सा.वाले यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. तर तक्रारदारांनी लेखी निवेदन दाखल करुन त्यांचा तोंडी युक्तीवाद हा लेखी युक्तीवादा प्रमाणेच आहे असे निवेदन केले. सा.वाले यांनी काही न्याय नर्णयाच्या प्रती हजर केल्या.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व न्याय नीर्णयाच्याप्रती यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुवीधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? |
होय. |
2 |
अ) तक्रारदार सा.वाले यांचेकडून त्या बद्दल नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ?
ब) असल्यास किती ? |
होय.
रु.50,000/- |
3. |
अंतीम आदेश |
तक्रार अशतः मंजूर. |
कारण मिमांसा
9. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या विमानाने तक्रारीमध्ये नमुद केलेल्या तिन्ही टंप्यामध्ये प्रवास केला व सा.वाले यांनी आपल्या विमानामध्ये त्यांना विमानसेवा दिली व तक्रारदारांनी त्या बद्दल सा.वाले यांचकडे तिकिटाचे पैसे जमा केले या बद्दल वाद नाही. सा.वाले असे कथन करतात की, तक्रारदार हे स्विझरलंड ब्रेसेल येथे घडयाळे व दागिने याचे प्रदर्शनात भाग घेणेकामी गेले होते, जो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. या प्रकारे तक्रारदार आपल्या व्यवसायाकामी विदेशात गेले असल्यासने तक्रारदारांनी वाणिज्य व्यवसायाकामी सेवा सुवीधा स्विकारलेली असल्याने तक्रारदार ग्राहक या सज्ञेमध्ये बसत नाहीत असे कथन केले. तक्रारदारांनी आपल्यास तक्रारीच्या परिच्छेद क्र.ई मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हे विदशातील प्रदर्शनामध्ये भाग घेण्याकरीता तसेच त्यांचे कुटुंबामध्ये एका लग्नामध्ये भाग घेण्याकरीता सा.वाले यांच्या विमानाने विदेशात गेले होते. या प्रकारे तक्रारदार हे केवळ आपल्या व्यवसायाचे निमित्ताने विदेशात गेले नव्हते तर प्रदर्शनात भाग घेणे व लग्नामध्ये सहभागी होणे या दुहेरी हेतुने गेले होते. तक्रारदार यांचे सोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या. या वरुन तक्रारदार केवळ वाणिज्य व्यवसायाकामी विदेशात गेले होते. असा निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे सा.वाले यांचे या मुद्यावरील आरोप निरर्थक ठरतो.
10. तक्रारदारांच्या तक्रारीतील व पुराव्याचे शपथपत्रातील कथना प्रमाणे तक्रारदारांना पहिल्या टंप्यातील प्रवासाचे दरम्यान झुरीच विमानतळावर दोन बॅगापैकी एक बॅग परत देण्यात आली व एक बॅग दिनांक 8.4.2008 रोजी मिळाली जी सा.वाले यांना सापडली नव्हती. दरम्यान तक्रारदारांनी आवश्यक त्या कपडयांची व वस्तुंची खरेदी केली त्याकामी त्यांना खर्च करावा लागला. या बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना 598.30 स्विडीस फ्रँक अदा केलेले आहेत, जी बाब तक्रारदारांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे पहील्या टंप्यातील नुकसान भरपाईचे बद्दल चर्चा करण्याची आवश्यकता उरत नाही.
11. तक्रारदारांचा दुस-या टंप्यातील प्रवास हा दिनांक 25.4.2008 रोजी लंडण ते लॉस एंन्जलीस असा होता व त्या दरम्यान तक्रारदारांच्या चार बॅगापैकी केवळ एक बॅग तक्रारदारांना परत देण्यात आली व इतर तिन बॅगा ब-याच उशिराने परत देण्यात आल्या. दरम्यान तक्रारदारांच्या कुटुंबामध्ये लग्न असल्याने तक्रारदारांना आवश्यक त्या वस्तुंची खरेदी करावी लागली. लग्नामध्ये भेट वस्तु देणेकामी तक्रारदारांनी त्यांचे मुंबई येथील नातेवाईकांकडे निरोप केला व मुंबई येथील नातेवाईकांनी तक्रारदारांना डी.एच.एल. या कुरीयर मार्फत दोन पार्सल पाठविली तर बॉम्बे एक्सप्रेस या कुरीयर मार्फत एक पार्सल पाठविले. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये असे कथन केले आहे की, दुस-या टंप्यात त्यांना आवश्यक ते कपडे व वस्तु खरेदी करण्याकामी 600 डॉलर्स खर्च करावा लागला. या व्यतिरिक्त कुरीयर सेवेने वस्तु पाठवीणेकामी त्यांना रु.12,700/- व रु.15,123/- असा खर्च करावा लागला. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत पृष्ट क्र.15 येथे दुस-या टंप्यामध्ये ज्या वस्तु खरेदी कराव्या लागल्या त्या वस्तुंच्या देयकाची प्रत दाखल केलेली आहे. त्यातील नोंदी वरुन तक्रारदारांना वेग वेगळया वस्तु खरेदी करणेकामी 600 डॉलर्स खर्च करावा लागला त्याची भारतीय रुपयामध्ये त्या वेळेचा एक डॉलर म्हणजे रु.42/- हया प्रमाणे रु.25,200/- किंमत होती. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या चारपैकी तिन बॅगा वेळेवर परत न दिल्याने तक्रारदारांना स्वतःचे पैशातून वस्तु खरेदी कराव्या लागल्या व त्याकामी आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
12. सा.वाले यांनी या संदर्भात असे कथन केले आहे की, Carriage by Air Act. 1972 मधील तरतुदीप्रमाणे तसेच वॉर्सा कराराप्रमाणे विमान कंपनीची नुकसान भरपाईची जबाबदारी ही मर्यादीत असून ती प्रति किलोग्रॅम 20 यू.एस.डॉलर अशी येते. व त्यापेक्षा अधिक नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत. सा.वाले यांनी या संदर्भात मा.राष्ट्रीय आयोगाचा MS GARGI PARSAI V/S M/S K.L.M. ROYAL DUTCH AIRLINES 2003(2) CPR 1 (NC)हा न्यायनीर्णय सोबत जोडला आहे. त्यामध्ये प्रवाशाने आपल्या बॅगेमध्ये मौल्यवान वस्तु आहेत ही माहिती विमान कंपनीला दिली नव्हती. त्यामुळे परिशिष्ट 1 नियम 22 (2) Carriage by Air Act. 1972 प्रमाणे विमान कंपनी फक्त 20 यु.एस.डॉलर्स अदा करण्यास जबाबदार आहेत असा अभीप्राय नोंदविला. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी600 डॉलर्सची केलेली वस्तुंची खरेदी ही भारीच्या किंवा मौल्यवान वस्तुची नव्हती. तर अत्यावश्यक वस्तुंची होती. तक्रारदारांच्या चार पैकी तिन बॅगा आढळून येत नसल्याने तक्रारदारांना निश्चीतच तक्रारदारांचे स्वतःचे व पत्नीचे बाहेर जाण्याचे कपडे, दैनंदिन वापराचे कपडे, टॉयलेट नॅफकीन इ.वस्तु खरेदी कराव्या लागल्या असतील. या वस्तु मौल्यवान सदरामध्ये मोडत नाहीत. मुळातच सा.वाले यांनी परीपत्रक जारी करुन प्रवाशांची माफी मागीतली होती. प्रवाशांनी आवश्यक त्या वस्तु खरेदी कराव्यात व देयकाची प्रत दाखविल्यास प्रवाशांना त्या बद्दल परतावा दिला जाईल असे निवेदन केलेले होते. त्या प्रकारचे लेखी निवेदन दिनांक 15.5.2008 रोजीचे तक्रारदारांनी तक्रारीचे पृष्ट क्र.75 वर दाखल केलेले आहे. त्यामध्ये सा.वाले यांच्या विमान कंपनीने असे निवेदन केले होते की, सा.वाले विमान कंपनी व अन्य विमान कंपन्या यांना सामानाची ने-आण करण्यासाठी गैरसोय होती परीणामतः प्रवाशांची कुचंबणा होते. प्रवाशांनी स्वतःच्या वस्तु खरेदी केल्यास अथवा हॉटेलमध्ये स्वतः व्यवस्था केल्यास विमान कंपनी त्या देयकाप्रमाणे परतावा देईल. मुळातच सा.वाले विमान कंपनीने पहील्या टंप्यातील गैरसोई बद्दल व तक्रारदारांना कराव्या लागलेल्या खरेदी बद्दल 598.30 स्विडन फ्रँक तक्रारदारांना दिलेले आहेत. ती देखील नुकसान भरपाई विमान प्रवासाचे दरम्यान तक्रारदारांच्या बॅगा उशिराने परत केल्याबद्दल होती. त्याच अनुरोधाने दुस-या टंप्याचे गैरसोईबद्दल असे म्हणावे लागेल की, तक्रारदारांनी जर त्यांना आवश्यक असणारी वस्तु व कपडे खरेदी केले असतील तर सा.वाले यांनी तक्रारदारांना देयका प्रमाणे ती रक्कम परतावा देणे आवश्यक होते. तक्रारदारांची या संदर्भातील मागणी 600 डॉलरची असून तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्र.15 येथे देयकाची प्रत जोडलेली आहे. त्या देयकाची बेरीज 600 डॉलर होत नाही असे सा.वाले यांचे कथन नाही. त्या वरुन सा.वाले यांनी रु.42/- प्रति डॉलर त्या वेळेच्या प्रचलीत दराने 600 डॉलरचे रु.25,200/- अदा करणे आवश्यक आहे. या मुद्यावर सा.वाले यांनी तक्रारदारांना एकंदर 125 डॉलर देऊ केले होते परंतु ती रक्कम सा.वाले यांनी अदा केलेली आहे असे सा.वाले यांच्या कैफीयतीमध्ये कथन नाही. ती केवळ देऊ केलेली रक्कम आहे. या उलट सा.वाले यांनी कैफीयतीमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी ती देय रक्कम नाकारली आहे. या वरुन दुस-या टंप्यातील नुकसान भरपाई बद्दल सा.वाले तक्रारदारांना रु.25,200/- नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
13. दुस-या टंप्यामध्ये तक्रारदारांना त्यांचे नातेवाईकांचे लग्नास सहभागी होणे असल्याने त्यांनी मुंबईतील नातेवाईकांकडून कुरीयर सेवेव्दारे काही वस्तु मागविल्यास, ज्या त्यांना कुरीयरव्दारे पोहचत्या करण्यात आल्या. त्या बद्दलचे देयकाची प्रत तक्रारदारांनी पृष्ट क्र.16 येथे जोडलेली आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे त्यांचे नांवे वस्तु डी.एच.एल. कुरीयरव्दारे दोन पार्सल पाठविण्यात आली. त्याकामी रु.12,700/- येवढा खर्च आला. व बॉम्बे एक्सप्रेस या कुरीयर सेवेव्दारे 1 पार्सल लॉस एन्जलस येथे पाठवीणेकामी रु.15,123/- येवढा खर्च आला. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारदारांना हया वस्तुची आवश्यकता त्यांचे नातेवाईकांचे लग्नामध्ये भेट देणेकामी व भारीचे कपडे वापरणेकामी होती. त्या भेट वस्तु ही काही आवश्यक बाब म्हणता येणार नाही. सा.वाले यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये ती बाब समाविष्ट नव्हती. सबब तक्रारदारांनी हा अनावश्यक खर्च स्वतःचे प्रतिष्टेसाठी केलेला खर्च असल्याने त्याची प्रतिपुर्ती देण्यास सा.वाले जबाबदार आहेत असा निष्कर्ष काढता येत नाही.
14. प्रकरणाच्या तिस-या टंप्याचे संदर्भात तक्रारदारांचे असे कथन आहे की, तक्रारदार सा.वाले यांचे विमानाने लंडण येथे पोहचणार होते व तेथून लंडन ते मुंबई या विमानामध्ये त्यांची जागा राखीव होत्या. तथापी सा.वाले यांचे विमान लंडण येथे उशिरा पोहोचल्याने तक्रारदारांचे लंडण ते मुंबई हे विमान चुकले व तक्रारदारांना तिस-या टंप्यामध्ये लंडण येथे दिनांक 15.5.2008 रोजी मुक्काम करावा लागला. तक्रारदारांच्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.ग मध्ये ही बाब मान्य केलेली आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना लंडण येथील हॉटेलमध्ये निवासाची सोय केली परंतु विमानतळावरुन हॉटेलवर जाण्याकरीता तक्रारदारांना 154 पौड खर्च करावा लागला. तक्रारदारांनी त्याची पावती पृष्ट क्र.15 येथे जोडलेली आहे. तक्रारदारांनी परतीचा प्रवासाकामी देखील (हॉटेल ते विमानतळ ) 154 पौडाची मागणी केलेली आहे. परंतु त्याची देयके दाखल नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी तिस-या टंप्यामध्ये टॅक्सी खर्चकामी विमानतळ ते हॉटेल या खर्चाबद्दल 154 पौड म्हणजे त्या वेळच्या दराप्रमाणे 154 X 84 = 12,776/- येवढी नुकसान भरपाई सा.वाले यांना तक्रारदारांना अदा करावी लागेल. या प्रकारे दुस-या व तिस-या टंप्यातील नुकसान भरपाई बद्दल रु.25,200 + 12,776/- एकत्रित रु.37,976/- अशी अदा करावी लागेल.
15. या व्यतिरिक्त तक्रारदारांना प्रवासाचे दरम्यान मानसीक त्रास, कुचंबणा, सहन करावी लागली. त्यानंतर तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार वकील नेमुन दाखल करावी लागली. या सर्व बाबी विचारात घेता सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्चा बद्दल एकंदर रु.50,000/- अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
16. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 47/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमान सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा
पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रित रु.50,000/- न्याय नीर्णयाची प्रत मिळाल्यापासून चार आठवडयाचे आत अदा करावी. अन्यथा मुदत संपल्यापासून त्या रक्कमेवर 9 टक्के व्याज याप्रमाणे तक्रारदारांना परत करावेत असा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.