एकतर्फा आदेश (दिः 18 /01/2011 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे संक्षिप्त कथन असे की, त्यांनी विरुध्द पक्षाला इंग्रजीच्या शिकवणीसाठी रु.12,000/- दिले. या मोबदल्यात विरुध्द पक्षाने त्यांनी नियुक्त केलेल्या शिक्षकाला त्यांचे ठाणे येथील घरच्या पत्तयावर 20 तासिका शिकविण्यासाठी पाठविण्यात येईल असे कबुल केले होते. विरुध्द पक्षाचे शिक्षक गणेश यांनी मे महिन्यात 6 तासीका घेतल्या व इतर तासिकेसंदर्भात विरुध्द पक्ष त्याला कळवेल असे सांगितले. विरुध्द पक्ष संस्थेने पर्यायी व्यवस्था केली नाही. अनेक वेळा संपर्क साधण्यात आला तसेच दुरध्वनी करण्यात आले मात्र विरुध्द पक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने तक्रारीत नमुद केल्यानुसार नुकसान भरपाई व न्यायीक खर्च मिळावा असे त्याचे म्हणणे आहे. तक्रारीच्या समर्थनार्थ निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र, निशाणी 3(1) ते 3(3) अन्वये दस्तऐवज दाखल करण्यात आले. त्यात विरुध्द पक्षाने दि.24/02/2009 ची पावती दि.27/05/2009 चा अर्ज, पोस्टाची पावती, याचा समावेश आहे. 2. विरुध्द पक्षाला मंचाद्वारे निशाणी 5 अन्वये नोटिस जारी करण्यात आली. कुरियर पोचपावती, निशाणी 5 अभिलेखात उपलब्ध आहे. विरुध्द पक्ष मंचासमक्ष उपस्थित झाला नाही. मंचाने परत एकदा निशाणी 6 अन्वये विरुध्द पक्षाला नोटिस जारी केली व दि.27/09/2010 रोजी त्यांनी हजर रहावे असे निर्देश दिला मात्र विरुध्द पक्ष हजर झाला नाही व त्यांनी जबाब दाखल न केल्याने सदर प्रकरण ग्राहक ... 2 ... (तक्रार क्र.661/2009) कलम 13(1)(ब)(2) अन्वये एकतर्फी सुनावणीसाठी ठेवण्यात आले. मंचासमक्ष हजर असणा-या तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकण्यात आले व त्यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र व दस्तऐवजांचा अवलोकन करण्यात आले. त्याआधारे असे स्पष्ट होते की दि.24/02/2009 रोजी त्याने विरुध्द पक्षाकडे रु.12,000/- शुल्काचा भरणा केला त्याची पावती दाखल करण्यात आलेली आहे. त्यात कोर्स डिटेल (English Conversation Course of 20 lectures of 1 hour each) असा उल्लेख आहे. स्वाभाविकपणे विरुध्द पक्षाने एकुन 20 तासिका इंग्रजी संभाषणा संदर्भात घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याने केवळ 6 तासिका घेतल्या त्यामुळे दि.24/05/2009 रोजी विरुध्द पक्षाला नोंदणिकृत डाकीने पत्र पाठवीले त्यापत्राची प्रत, पोचपावत्या अभिलेखात उपलब्ध आहे. मंचाला असे आढळते की रु.12,000/- एवढी मोठी रक्कम घेऊनही 20 तासीकांपैकी 6 तासीका विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घेतल्या व प्रशिक्षण अर्ध्यावर खंडीत झाले. विरुध्द पक्षाची सदर कृती ग्राहक कायद्याचे कलम 2(1)(ग) अन्वये दोषपुर्ण सेवा ठरते. सबब ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्याला अपेक्षित सेवा विरुध्द पक्षाने न दिल्याने तो चांगल्यारितीने इंग्रजी बोलण्यास असमर्थ ठरला व त्याची गैरसोय झाली. त्यामुळे न्यायाचे दृष्टिने विरुध्द पक्षाने त्याला त्यांचेकडुन घेतलेली रक्कम रु.12,000/-परत करणे अपेक्षित ठरते. तसेच त्यांचा लेखी तक्रारीची दखल न घेतल्याने त्याला सदर तक्रार दाखल करणे भाग पडले असल्याने विरुध्द पक्ष मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई व न्यायिक खर्च रु.3,000/- देण्यास पात्र आहेत. 3. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1.तक्रार क्र. 661/2009 मंजुर करण्यात येते. 2.आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाचे आत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास प्रशिक्षण शुल्क रु.12,000/-(रु. बारा हजार फक्त) परत करावे तसेच नुकसान भरपाई व न्यायिक खर्च रू.3,000/-(रु. तीन हजार फक्त) असे एकुण रु.15,000/- (रु.पंधरा हजार फक्त) द्यावे. 3.विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन न केल्यास तक्रारकर्ता उपरोक्त संपुर्ण रक्कम आदेश पारित तारखेपासुन ते रक्कम फिटेपावेतो द.सा.द.शे12% व्याजासह विरुध्द पक्षाकडुन वसुल करण्यास पात्र राहतील.
दिनांक -18/01/2011 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |