(घोषित दि. 16.10.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार या टाका तालुका अंबड जि.जालना येथील रहिवाशी असून शेती करतात. त्यांचे पती कारभारी खुशालराव गितखाने यांचा मृत्यू दिनांक 18.01.2013 रोजी वाहन अपघातात झाला. वरील घटनेची नोंद गुन्हा रजिस्टर क्रमांक 01/2013 अन्वये गोंदी पोलीस स्टेशन तालुका अंबड येथे झालेली आहे. कारभारी गितखाने यांना वैद्यकीय उपचारासाठी अपेक्स हॉस्पीटल, औरंगाबाद येथे भरती करण्यात आले. तेथून दिनांक 18.01.2013 रोजी औषध उपचार करुन घरी आणले असता त्याच दिवशी रात्री सुमारे 09.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
कारभारी गितखाने हे शेतकरी होते व त्यांचे नावे गट नंबर 195 मौजे टाका ता.अंबड येथे शेत जमीन होती. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ही कल्याणकारी योजना राबविली आहे. या अंतर्गत ऑगस्ट 2013 ते ऑगस्ट 2014 या कलावधीसाठी विमा हप्ता गैरअर्जदार फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचेकडे भरला होता. या योजने अंतर्गत तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दिनांक 25.03.2013 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे मार्फत पाठविला. असे असतांना देखील विमा कंपनीने दिनांक 24.12.2013 रोजी तक्रारदारांना कळविले की, दाव्या संबंधिच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता तक्रारदारांनी केलेली नाही. म्हणून त्यांचा दावा बंद करण्यात आला. तक्रारदारांनी उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे गैरअर्जदार विमा कंपनी यांचेकडे पाठविली आहेत. परंतू मयत व्यक्तीचा मरणोत्तर पंचनामा अथवा शवविच्छेदन झालेलेच नाही व विमा कंपनीने वरील कागदपत्रां अभावी तक्रारदारांचा दावा नाकारला आहे. तक्रारदारांनी अपेक्स हॉस्पीटल यांनी दिलेले सर्टीफिकेट गैरअर्जदारांकडे पाठविले होते. तसेच ते मंचातही दाखल केलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांना प्रस्तुत विमा रक्कम व्याजासह मिळावी अशी प्रार्थना तक्रारदार करतात.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत गैरअर्जदारांचे विमा नाकारल्याचे पत्र, मयताचा वाहन चालवण्याचा परवाना, प्रथम खबर, मृत्यू प्रमाणपत्र, मयताचे नावाचा 7/12 चा उतारा, फेरफार पत्र, 8 अ चा उतारा, 6 क चा उतारा, अपेक्स हॉस्पीटल यांचे मेडीको लिगल प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचा समोर हजर होऊनही त्यांनी आपला लेखी जवाब दिला नाही. त्यामुळे मंचाने त्यांचे विरुध्द No Say आदेश पारीत केला. त्याच प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 2 हे मंचाची नोटीस मिळूनही मंचा समोर हजर झाले नाहीत. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तो रद्द करावा म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी नि.11 वर अर्ज दाखल केला तो मंचाने नामंजूर केला.
तक्रारदारातर्फे विव्दान वकील श्री.आर.व्ही.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. दोनही पक्षानी दाखल केलेली कागदपत्रे व मंचा समोरील सुनावणी यावरुन खालील मुद्दे सप्ष्ट होतात.
- दाखल कागदपत्रात मयताच्या नावाचा 7/12 चा उतारा, फेरफार पत्र व 8 अ चा उतारा आहे. त्यावरुन मयत कारभारी गितखाने हे शेतकरी होते व त्यांचे नावे मौजे टाका ता.अंबड जि.जालना येथे शेत जमीन होती. ही गोष्ट स्पष्ट होते.
- तक्रारदारांनी दाखल केलेल्या गाव नमुना 6 क चा उतारा व वारसाचे प्रमाणपत्र यावरुन तक्रारदार राधाबाई या मयताच्या पत्नी होत्या व आता त्यांच्या वारसदार आहेत. ही गोष्ट स्पष्ट होते.
- गैरअर्जदारांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव त्यांनी मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन अहवाल दाखल केलेला नाही म्हणून नाकारल्याचे दिसते. परंतू अपेक्स हॉस्पीटल यांच्या मेडीको लिगल प्रमाणपत्रात कारभारी गितखाने यांना दिनांक 30.12.2012 रोजी त्यांच्या दवाखान्यात Indoor Patient म्हणून भरती केल्याचे दिसते. त्यांना अपघातामुळे छाती, पोट, गळा अशा अनेक ठिकाणी गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असल्याचे त्यात नमूद केले आहे. एस.टी.सी क्रमांक 310/2013 मधील चार्जशीट वरुन आरोपी सोमनाथ यांच्या विरुध्द “दिनांक 30.12.2012 रोजी बबन मस्के व कारभारी गितखाने यांच्या मोटार सायकलला इनोव्हा कारने धडक दिली व दोघांनाही गंभीर जखमी केले. बबन मस्के हे दिनांक 08.01.2013 रोजी मरण पावले व कारभारी गितखाने हे अपेक्स हॉस्पीटल येथून औषध उपचार करुन घरी आणतांना दिनांक 18.01.2013 रोजी मरण पावले व या दोघांच्याही मृत्यूस आरोपी कारणीभूत आहे” असे नमूद केल्याचे दिसते. केवळ शवविच्छेदन झालेले नाही म्हणून तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू अपघाताने झालेला नाही असे म्हणता येणार नाही असे मंचाला वाटते. अपेक्स हॉस्पीटल यांचे प्रमाणपत्र, एस.टी.सी. नंबर 310/2013 मधील चार्जशीट, घटनास्थळ पंचनामा व मृत्यू प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांवरुन कारभारी गितखाने यांचा मृत्यू दिनांक 30.12.2012 रोजी झालेल्या मोटार अपघातामुळे झाला आहे असे दिसते.
- मयत कारभारी गितखाने हे शेतकरी होते व त्यांचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार राधाबाई या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत त्यांच्या पतीच्या मृत्यू बद्दल रुपये 1,00,000/- एवढी विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे मंचाला वाटते. त्याच प्रमाणे गैरअर्जदारांनी केवळ शवविच्छेदन झालेले नाही या कारणामुळे तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून वरील रकमेवर दावा नाकारल्याच्या दिवसा पासून 9 टक्के व्याज दराने व्याज मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना विमा रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) विमा नाकारल्याच्या दिवसा पासून म्हणजे दिनांक 24.12.2013 पासून तक्रारदारांना रक्कम प्राप्त होई पर्यंच्या कालावधीसाठी 9 टक्के व्याज दरासहीत द्यावी.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना तक्रार खर्च रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) द्यावा.