जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३७/२०११
तक्रार दाखल दिनांक – १७/०३/२०११ तक्रार निकाली दिनांक – २७/०८/२०१४
श्री. शरद यशवंत ठाकरे,
उ.व. – ३९, धंदा – शेती,
राहणार – मु.पो.विखरण,
विरुध्द
१) शाखा डाकपाल,
शाखा डाकघर, विखरण,
ता.शिरपुर, जि.धुळे.
२) प्रवर अधिक्षक,
डाकघर धुळे, विभाग धुळे.
३) पोस्ट मास्तर जनरल,
औरंगाबाद, रिझन औरंगाबाद. - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.डी.व्ही.घरटे)
(सामनेवालेतर्फे – अॅड.श्री.व्ही.जी. रवंदळे/प्रतिनिधी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
१. सामनेवाले यांच्याकडून काढण्यात आलेल्या ग्रामिण डाक विमा पॉलिसीचा प्रस्ताव स्विकृत करण्यासाठी सामनेवाले यांना आदेश द्यावेत या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तकार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते पूर्वी मु.पो.सोंडवा, जिल्हा जांबुआ, मध्यप्रदेश येथे राहत होते. तेथेच त्यांनी दि.१९/०१/२००२ रोजी डाक विभागातर्फे ग्रामिण डाक जीवन विमा पॉलिसी घेतली होती. पॉलिसीचा क्रमांक आर.-एम.पी.-आय.डी.-जी.वाय.-११८६८३२ असा होता. तर पॉलिसीचा मासिक हप्ता रूपये ९७०/- होता. पॉलिसीची मुदत दि.२७/०२/२०१२ पर्यंत होती. काही काळानंतर तक्रारदार मु.पो.विखरण, ता.शिरपूर, जि.धुळे येथे राहण्यासाठी आले. त्यांनी सोंडवा, जिल्हा जांबुआ, मध्यप्रदेश येथील व इंदूर येथील परिक्षेत्र अधिका-यांना कळविले की, त्यांची पॉलिसी विखरण ता.शिरपूर येथील टपाल कार्यालयात वर्ग करण्यात यावी आणि तेथेच तिचा हप्ता भरण्याची परवानगी द्यावी. इंदूर येथील परिक्षेत्र अधिका-यांनी तक्रारदाराच्या पॉलिसीची कागदपत्रे सामनेवाले क्र.३ यांच्याकडे पाठवून दिली व विखरण येथील टपाल कार्यालयाशी संपर्क करण्यास कळविले. दि.२१/०७/२००७ रोजी तक्रारदार यांनी विखरण येथील टपाल कार्यालयात पॉलिसीचा हप्ता भरला. मात्र त्यानंतर सामनेवाले क्र.१ व ३ यांनी त्यांच्या पॉलिसीचा पुढील हप्ता स्विकारला नाही. पॉलिसीचा प्रस्ताव जोपर्यंत स्विकृत होत नाही तोपर्यंत हप्ता भरण्यात येणार नाही असे त्यांनी सांगितले. या संदर्भात अनेकदा पाठपुरावा करूनही तक्रारदार यांच्या पॉलिसी संदर्भात सामनेवाले यांनी निर्णय दिला नाही. त्यामुळे त्यांना अखेर या मंचात तक्रार दाखल करावी लागली असे त्यांचे म्हणणे आहे. पॉलिसीचा प्रस्ताव स्विकृत करण्याचा आदेश सामनेवाले क्र.१ ते ३ यांना द्यावा, थकीत हप्त्यांची रक्कम भरण्यास मुदत मिळावी, थकीत हप्ते विना व्याज, विना दंड भरून घेण्यात यावे, पॉलिसीतील सर्व फायदे, व्याज, बोनस मिळावे, मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम पॉलिसीच्या नियमाप्रमाणे मिळावी, शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रूपये ५०,०००/- भरपाई मिळावी आदी मागण्या तक्रारदार यांनी केल्या आहेत.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पॉलिसीची प्रत, डाक विभागाकडून तक्रारदार यांना आलेले पत्र, तक्रारदार यांनी इंदूर परिक्षेत्राच्या अधिका-यांना पाठविलेले पत्र, इंदूर परिक्षेत्राच्या अधिका-यांनी औरंगाबाद येथील अधिका-यांना पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी औरंगाबाद येथील अधिका-यांना पाठविलेले पत्र, पासबुकाची प्रत आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी हजर होवून संयुक्त खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आणि चुकीची आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या पॉलिसी स्थानांतरासंदर्भात योग्य प्रकारे पाठपुरावा केलेला नाही. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया त्यांनी पार पाडलेली नाही. त्यांची पॉलिसी स्थानांतरीत होवू शकत नाही, असे सामनेवाले यांनी कधीही म्हटलेले नाही किंवा त्यांच्या पॉलिसीचा हप्ता स्विकारण्यात येणार नाही, असेही सामनेवाले यांनी म्हटलेले नाही. तक्रारदार यांनी पॅलिसी स्थानांतरासंदर्भात आणि तिच्या पुनरूज्जीवनासंदर्भात त्यांना वेळीच कळविण्यात आले होते. तथापि, त्यांनी आवश्यक प्रकिया पार पाडली नाही. त्यामुळे त्यांच्या पॉलिसीचे पुनरूज्जीवन होवू शकले नाही. यात सामनेवाले यांनी सदोष सेवा दिली किंवा सेवा देण्यात त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. म्हणूनच तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
५. खुलाशासोबत सामनेवाले यांनी त्यांचे दि.१९/१२/२०११, दि.३०/०१/२०१२ रोजीचे पत्र, दि.०७/०४/२०११ रोजीचे पत्र, दि.०९/०४/२०११ रोजीचे पत्र व दि.२३/०५/२०११ रोजीचे पत्र दाखल केले आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ ते ३ यांचा संयुक्त खुलासा, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे
ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ग्रामिण डाक विमा पॉलिसी घेतली होती. तिचा क्र. आर.-एम.पी.-आय.डी.-जी.वाय.-११८६८३२ असा होता. तक्रारदार यांनी या पॉलिसीची छायांकीत प्रत दाखल केली आहे. पॉलिसीच्या हप्त्यांबाबत त्यांनी पासबुकाची छायांकीत प्रत दाखल केली आहे. ही बाब सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशात मान्य केली आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असल्याचे सिध्द होते. म्हणूनच मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब ’- तक्रारदार यांनी ज्यावेळी पॉलिसी घेतली त्यावेळी ते मु.पो.सोंडवा, जिल्हा जांबुआ, मध्यप्रदेश येथे राहत होते. काही काळानंतर तक्रारदार हे मु.पो. विखरण ता.शिरपूर, जि.धुळे येथे राहण्यासाठी आले. त्यावेळी तक्रारदार यांनी पॉलिसी स्थानांतरीत करण्याची मागणी केली. विखरण येथील टपाल कार्यालयात त्यांच्याकडून एक हप्ता स्विकारण्यात आला. मात्र त्यांनतर पुढील हप्ते स्विकारण्यास सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी नकार दिला. त्यामुळे पॉलिसीचे हप्ते थकीत झाले आणि बराच पाठपुरावा करूनही टपाल विभागाच्या अधिका-यांनी पॉलिसीचा प्रस्तव मंजूर केला नाही. अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे.
तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ त्यांची विमा पॉलिसी आणि भारतीय डाक विभागाने त्यांना पाठविलेले पत्र जोडले आहे. त्याचबरोबर तक्रारदार यांनी इंदूर येथील क्षेत्रिय अधिका-यांना पाठविलेले पत्र आणि त्यावर संबंधित अधिका-यांनी औरंगाबाद येथील क्षेत्रिय अधिका-यांना पाठविलेले पत्रही जोडले आहे. आपल्या पत्रात तक्रारदार यांनी संबंधित पॉलिसी विखरण ता.शिरपूर, जिल्हा धुळे येथे स्थानांतरित करण्याची विनंती केली आहे. इंदूर येथील क्षेत्रिय अधिका-यांनी पत्र क्रमांक जी.वाय.-११८६८३२/ग्रा.डा.जी.बी. अन्वये तक्रारदार यांच्या पॉलिसीच्या स्थानांतरास अनुमती दिली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी दिनांक ११/०८/२००९ रोजी औरंगाबाद येथील टपाल अधिका-यांना पत्र पाठविले आहे. त्यात पॉलिसीच्या पुनरूज्जीवनाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आहे. अशाच आशयाचे पत्र तक्रारदार यांनी दि.१६/०७/२०१०, दि.३०/०९/२०१० रोजी पाठविले होते. त्याच्या प्रतीही त्यांनी दाखल केल्या आहेत.
दि.०७/०४/२०११ रोजी धुळे येथील मुख्य टपाल कार्यालयाने विखरण येथील टपाल कार्यालयाला, तक्रारदार शरद यशवंत ठाकरे यांना पाठविलेली पत्रे, आणि विखरण येथील टपाल कार्यालयाने दिनांक २३/०५/२०११ रोजी धुळे येथील प्रवर अधीक्षकांना पाठविलेले पत्र सामनेवाले यांनी दाखल केले आहे. धुळे येथील टपाल कार्यालयाने विखरण येथील पाठविलेल्या पत्रात तक्रारदार यांची पॉलिसी पुनरूज्जीवीत करण्यासाठी त्यांच्याकडून वैद्यकिय प्रमाणपत्र, दोन व्यक्तींचे परिचय पत्र आणि टपाल अधिका-यांचा अहवाल आदी कागदपत्रे भरून पाठविण्याचे कळविले आहे. तर तक्रारदार शरद ठाकरे यांना त्यांच्याकडे थकीत झालेली हप्त्याची रक्कम व व्याज रूपये ६३,२८५/- तातडीने भरण्याचे कळविले आहे. विखरण येथील टपाल कार्यालयाने धुळे कार्यालयाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, संबंधित विमाधारकाने त्यांना दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजे दिनांक ३०/०४/२०११ पर्यंत पैसे भरले नाही.
वरील पत्रव्यवहाराचे अवलोकन केले असता आमच्या असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांच्या दोन स्वतंत्र मागण्या होत्या. त्यांची पहिली मागणी पॉलिसी स्थानांतरीत करण्याची होती. ती मागणी इंदूर येथील क्षेत्रीय टपाल कार्यालयाने मंजूर केली होती. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या अन्य पत्रांवरून त्यांच्या पॉलिसीचे हप्ते थकले होते आणि त्यामुळे पॉलिसी मृत झाली होती. तिच्या पुनरूज्जीवनासाठी त्यांनी वेगळी मागणी केली होती. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या पत्रांवरून त्यांची ती मागणीही मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना काही कागदपत्रे दाखल करण्यास आणि त्यांच्याकडे थकीत झालेली हप्त्यांची रक्कम भरण्यास कळविण्यात आले होते. मात्र तक्रारादार यांनी मुदतीत ती रक्कम भरल्याचे दिसत नाही. विखरण येथील टपाल कार्यालयाने तसा अहवाल धुळे येथील कार्यालयाकडे पाठविला होता. वरील विवेचनाचा विचार करता आणि तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा आधार घेता सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या होत्या असे दिसते. यावरून सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली हे तक्रारदार सिध्द करू शकलेले नाही. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क ’- वरील सर्व मुद्यांचा आणि विवेचनाचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली किंवा सेवा देण्यात त्रुटी केली हे सिध्द होवू शकलेले नाही. त्यामुळे सामनेवाले यांच्याविरूध्द कोणतेही ओदश करता येणार नाही असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.