Maharashtra

Sindhudurg

RBT/CC/09/22

Shri. Sanjeev Balkrishna Shirsat - Complainant(s)

Versus

Branch Officer,The New India Assurance Company Ltd. - Opp.Party(s)

Shri. Viresh Rawool & Shri. Pravin Kalsekar

09 Jan 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Sindhudurg
C-Block, Sindhudurgnagari,Tal-Kudal,Dist-Sindhudurg,Pin-416812
 
Complaint Case No. RBT/CC/09/22
 
1. Shri. Sanjeev Balkrishna Shirsat
A/P Banda,Sawantwadi,Sindhudurg
...........Complainant(s)
Versus
1. Branch Officer,The New India Assurance Company Ltd.
A/P Kudal,Sindhudurg
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Exh.No.63

सिंधुदुर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग

रिमांड तक्रार प्रकरण क्रमांक 22/2009

                                       तक्रार दाखल झाल्‍याचा दि . 05/03/2009

                               तक्रार रिमांड झाल्‍याची दि.    24/12/2013

                           तक्रार निकाल झाल्‍याचा दि.  25/11/2014

श्री संजीव बाळकृष्‍ण शिरसाट

रा.बांदा, ता. सावंतवाडी,

जिल्‍हा सिंधुदुर्ग                                                      ... तक्रारदार

      विरुध्‍द

शाखाधिकारी,

दि न्‍यु इंडिया ऍश्‍युरंस कंपनी लि.

कुडाळ, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.          .. विरुध्‍द पक्ष.

 

                                                                 

                        गणपूर्तीः-  1) श्रीम. अपर्णा  वा. पळसुले. अध्‍यक्ष                                                                                                                               

                                 2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्‍य                     

                                 3) श्रीमती वफा ज. खान, सदस्‍य.

तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री व्‍ही.एस. राऊळ                                        

विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री व्ही.पी. चिंदरकर

 

निकालपत्र

(दि.25/11/2014)

द्वारा : मा.अध्‍यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.

      1)    प्रस्‍तुतची तक्रार सामनेवालाने जेसीबी मशीनच्‍या विम्‍यासंदर्भात दिलेल्‍या सदोष सेवेबाबत दाखल करण्‍यात आलेली आहे. तक्रारीचा थोडक्‍यात तपशील खालीलप्रमाणे –

      2)    तक्रारदार हे जेसीबी जेएस 75 या मशीनचे मालक आहेत.  सदर मशीनचा इंजिन नं.4H-2067/0200022 चेसीस नं.JS/1009009 असा असून सदर मशीनचा विमा विरुध्‍द पक्ष यांचेककडून पॉलिसी नं. 152201/31/05/00013705 ने ता.13/2/2006 ते 12/2/2007 या कालावधीकरीता उतरविण्‍यात आलेला होता. ता.2/3/2006 रोजी सकाळी 10 ते 10.30 च्‍या दरम्‍यान सदर मशीन मणेरी – कुडासे या ठिकाणी काम करत असतांना सदर मशीनला आग लागून सदरची मशीनचे पूर्णपणे नुकसान झाले. सदर अपघाताबाबत दोडामार्ग आऊटपोस्‍ट येथे कळवण्‍यात आले. तसेच त्‍याचदिवशी तक्रारदाराने वि.प. कंपनीला देखील अपघाताबाबत कळवले. त्‍यानंतर तक्रारदाराने वि.प. कंपनीकडे क्‍लेम नं. 152201/31/06/01/90000002 या नंबरने नुकसान भरपाई मिळणेबाबत मागणी केली.  तसेच आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे वि.प. कंपनीला दिली. वि.प. कंपनीने कंपनीच्‍या आदेशानुसार सर्व्‍हेअर श्री. डिगे यांनी  घटनास्‍थळी जाऊन वि.प. चे शाखा व्‍यवस्थापक यांचे उपस्थितीत सदर मशीनची पाहणी केली व त्‍याचा अहवाल सादर केला. तथापि वि.प. कंपनीने तक्रारदाराच्‍या मागणीनुसार विमा क्‍लेमची रक्‍कम दिली नाही.  याउलट तक्रारदार यांचेकडे अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी केली. त्‍यामुळे तक्रारदाराने वि.प. यांना ता.25/9/2008 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली.  त्‍यानंतर तक्रारदाराने ता.18/10/2008 तसेच 16/12/2008 रोजी स्‍मरणपत्रे पाठविली सदरची स्‍मरणपत्रे मिळूनही वि.प. यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम मंजूर करणेबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. सबब तक्रारदाराने त्‍यांना झालेल्‍या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाबददल रु.1 लाख नुकसानभरपाई तसेच विम्‍याची रक्‍कम रु. 13,05,000/-,  10 टक्‍के व्‍याजासह वि.प. यांचेकडून देववावेत म्‍हणून प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली आहे. 

      3) वि.प. यांना नोटीस बजावल्‍यानंतर वि.प. हे अधिकृत प्रतिनिधीमार्फत या मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.11 सोबत म्‍हणणे दाखल करुन सदरच्‍या तक्रार अर्जास परिच्‍छेदनिहाय उत्‍तर देऊन अर्जातील मजकूर नाकारलेला आहे. वि.प.च्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरची तक्रार मुदतबाहय असल्‍यामुळे नामंजूर करण्‍यात यावी. तसेच सदर वाहनावर लार्सन अॅंड टर्बो या फायनांस कंपनीच्‍या कर्जाचा बोजा असल्‍यामुळे सदर कंपनीला पक्षकार करणे आवश्‍यक होते. सबब आवश्‍यक पक्षकार न केल्‍यामुळे तक्रारीस Non joinder of necessary parties  ची बाधा येत असल्‍यामुळे सदर तक्रार नामंजूर करण्‍यात यावी. तसेच सदर जेसीबी मशीनचा ‘वाणिज्‍य’ कारणासाठी वापर केला असल्‍यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयानुसार ‘ग्राहक’ या संज्ञेखाली  येत नसल्‍यामुळे सदरची तक्रार नामंजूर करावी तसेच सदर जेसीबी मशीनची आर.टी.ओ. कार्यालयात नोंदणी करण्‍यात आलेली नाही व जेसीबी चालकाकडे वाहन चालवण्‍याचा वैध परवाना नव्‍हता.  वि.प. यांनी तक्रारदाराकडून वेळोवेळी कागदपत्रांची मागणी करुन देखील तक्रारदाराने सदरची कागदपत्रे वि.प. कंपनीला सादर केली नाहीत. सबब सदरची तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

      4) तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.5 कडे एकूण 22 तसेच नि.42 कडे एकूण 23  तसेच नि.45 कडे एकूण  6, नि.49 कडे 2 कागद दाखल केलेले आहेत. याउलट वि.प. ने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत नि.13 सोबत एकूण 29 कागद दाखल केले आहेत.

      5) तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीसोबत नि.2 वर स्‍वतंत्र शपथपत्र दाखल केले असून नि.5 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार इंश्‍युरंस कव्‍हर नोटची प्रत, प्रिमियम भरल्‍याची पावती, जेसीबी चालकाचा जबाब, पंचनामा डिगे सर्व्‍हेअर यांनी तक्रारदारास पाठविलेले पत्र, जेसीबी इंडिया यांनी दिलेले पत्र, तक्रारदाराने विमा कंपनीला पाठविलेले पत्र व लिगल नोटीसची प्रत दाखल केली.

      6) विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराच्‍या तक्रारीवर घेतलेला आक्षेपाचा मुद्दा खोडून काढणेसाठी तक्रारदाराने त्‍याचे पुराव्‍याचे स्‍वतंत्र शपथपत्र नि.16 वर दाखल केले.  त्‍यावर उलटतपासाची  प्रश्‍नावली विरुध्‍द पक्षातर्फे नि.17 वर देण्‍यात आली.  त्‍याची शपथपत्रावर उत्‍तरावली तक्रारदाराने नि.19 वर दाखल केली आहे.  तसेच आपला पुरावा संपल्‍याची पुरसीस तक्रारदाराने नि.20 वर दाखल केली.  त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या विमा कंपनीतर्फे पुराव्‍याचे स्‍वतंत्र शपथपत्र नि.23 वर दाखल करणेत आले.  त्‍यावर तक्रारदाराचे वतीने उलटतपासाची प्रश्‍नावली नि.25 वर देण्‍यात आली.  त्‍याची शपथेवर उत्‍तरावली विमा कंपनीच्‍या प्रतिनिधीने  नि.31 वर दाखल केली.  तसेच विमा कंपनीतफे सर्व्‍हेअर श्री गवंडे व सर्व्‍हेअर श्री डिगे यांचे पुराव्‍याचे शपथपत्र अनुक्रमे नि.32 व 36 वर दाखल करणेत आले.  या दोन्‍ही साक्षीदारांनी उलटतपास अनुक्रमे नि.33 व नि.37 वरील प्रश्‍नावलीने करण्‍यात आले.  तर त्‍यांची शपथेवर उत्‍तरावली साक्षीदारास अनुक्रमे नि.35 व नि.38 वर देण्‍यात आली.  त्‍यानंतर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठेवण्‍यात आले.

      7) त्‍यानंतर ता.30/10/2009 रोजी या मंचाने अंतीम आदेश पारीत केला. सदर आदेशाविरुध्‍द विरुध्‍द पक्ष यांनी  First Appeal No.123/2010 मा.राज्‍य आयोगाकडे दाखल केले. सदरचे अपिल मंजूर करण्‍यात आले व तक्रारदाराने वि.प. यांच्‍या ता.22/1/2007, 14/02/2007, 20,02/2007 व 02/03/2007 या पत्रातील मागणी केलेली माहिती तक्रारदारांनी पुरवावी  व त्‍यानंतर या कामी पुन्‍हा निर्णय करावा असे आदेश अपिलाचे कामी देणेत आले.

      8) त्‍यानंतर तक्रारदारांनी नि.55 कडे म्‍हणणे दाखल करुन वरीलप्रमाणे मागणी करण्‍यात आलेल्‍या माहितीबाबत खुलासा दाखल केला. त्‍यानंतर दोन्‍ही बाजुंचा युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तसेच वि.प.चा लेखी युक्‍तीवाद नि.61 कडे दाखल करण्‍यात आला. तक्रारीचा आशय, विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे, दोन्‍ही बाजूंचा पुरावा, युक्तिवाद यांचा विचार करता या मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

                   मुद्दे

निष्‍कर्ष

1

तक्रारदार हे ग्राहक आहेत का ? व सदरची तक्रार चालवणेचा अधिकार या मंचास आहे का ?

होय

2

तक्रारदाराच्‍या तक्रारीस मुदतीची बाधा येते का ?

नाही

3    

लार्सन अॅंड टर्बो फायनांस कंपनीला पक्षकार न केल्‍यामुळे तक्रार रद्द होणेस पात्र आहे का ?

नाही

4

ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत वि.प. कंपनीने त्रुटी केली आहे   का ?

होय

5

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

  • विवेचन -

9)    मुद्दा क्रमांक 1 -    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हे सदर जेसीबी मशीनचा वापर वाणिज्‍य कारणासाठी करीत असल्‍यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) अनुसार ग्राहक या संज्ञेखाली येत नाहीत असा आक्षेप घेतलेला आहे.  तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरचे मशीन तक्रारदार हे स्‍वतः वापरत  नव्‍हते.  सदरचे मशीन मल्‍लेला जनार्दन त्रीपाल रेड्डी या कंत्राटदाराला भाडयाने देण्‍यात आले होते.  म्‍हणून सदरचे मशीन नफा मिळवणेसाठी तक्रारदार वापरत होते. सबब तक्रारदार ग्राहक नाहीत असे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे.  तथापि दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदार हे सदर जेसीबी मशीनचे मालक आहेत तसेच तक्रारदाराने सदर मशीनचा विमा विरुध्‍द पक्ष कंपनीकडे उतरविलेला होता व त्‍याबाबतची सर्व कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली आहेत. सबब तक्रारदाराने विमा कंपनीकडून जेसीबी मशीनबाबत विमा सेवा घेतल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारदाराचे सदर मशीनचा नुकसान भरपाईचा दावा विमा कंपनीने निकाली काढला नाही. सदरची बाब सेवेतील त्रुटी या सदरात येते. सबब सेवेतील त्रुटी किंवा सदोष सेवा याबाबत तक्रार अर्ज चालवण्‍याचे अधिकार ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक मंचाला आहेत.  सबब विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेखाली येत नाहीत. त्‍यामुळे सदर प्रकरण चालवण्‍याचे अधिकार ग्राहक मंचाला नाहीत हे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे न्‍याय्य व योग्‍य वाटत नाही सबब तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष विमा कंपनीचे ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक आहेत व या मंचास सदरची तक्रार चालवण्‍याचे अधिकार आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

      10)   मुद्दा क्रमांक 2-   विरुध्‍द पक्ष यांनी सदरची तक्रार मुदतीत दाखल केली नाही असा बचाव केला आहे.  या मंचासमोरील पुरावा पाहता सदर मशीनचा अपघात 2/3/2006 रोजी झाला.  ता.2/3/2006 रोजी विरुध्‍द पक्ष यांचेकडे तक्रारदाराने विमा दावा सादर केला.  त्‍यानुसार विमा कंपनीने प्रथम दोन वेळा इंटरिम सर्व्‍हे केला.  त्‍यानंतर 31/1/2007 रोजी फायनल सर्व्‍हे केला. सर्व सर्व्‍हे रिपोर्ट विमा कंपनीकडे सादर केले होते.  तथापि विमा कंपनीने तक्रारदारांचा दावा मंजूरही केला नाहीं  किंवा नामंजूरही केला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने त्‍यांच्‍या वकीलामार्फत प्रथम दि.25/09/2008 ला, दुस-यांदा 18/10/2008 व तिस-यांदा 16/12/2008 ला रजिस्‍टर्ड नोटीस पाठविली; परंतु तक्रारदाराचा विम्‍याचा क्‍लेम  निकाली काढण्‍यात आला नाही.  तथापि वेळोवेळी पत्रे पाठवून कागदपत्रे मागीतली व विमा रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली म्‍हणजेच विरुध्‍द पक्ष यांनी या कामी अंतीम निर्णय न घेता सदरचे प्रकरण निकाली काढले नाही.  म्‍हणूनच तक्रारदाराने ता.24/2/2009 रोजी या मंचात तक्रार दाखल केली.  सबब तक्रार दाखल करणेस विरुध्‍द पक्ष यांच्‍या कृतीमुळे विलंब झाल्‍याचा दिसून येतो.  एकंदरीत पुराव्‍यावरुन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारांचा दावा मंजूर किंवा नामंजूर याबाबत अंतीम निर्णय घेतला नसल्‍याने तक्रार दाखल करणेस continuing cause of action  आहे असे या मंचाचे मत आहे.  सबब सदरचा तक्रार अर्ज continuing cause of action   असल्‍यामुळे  विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे मान्‍य करता येणार नाही. सबब सदरच्‍या तक्रारीस मुदतीची बाधा येणार नाही, या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा नं.2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

      11)   मुद्दा नं.3 – विरुध्‍द पक्षाच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर जेसीबी मशीनवर लार्सन अॅंड टर्बो या कंपनीचा बोजा असल्‍यामुळे सदर कंपनी आवश्‍यक पक्षकार आहे.  सदर कंपनीस पक्षकार न केल्‍यामुळे तक्रार नामंजूर करावी असे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे. तथापि तक्रारीचा आशय पाहता या तक्रारीचा विषय विमा कंपनीने अपघात विम्‍याबाबत अंतीम निर्णय घेतलेला नाही. सबब सदरची तक्रार विमा कंपनीने दिलेल्‍या सेवेतील त्रुटीबाबत आहे.  त्‍यामुळे  जरी त्‍या मशीनवर कर्जाचा बोजा असला तरी देखील सदरची कंपनी आवश्‍यक पक्षकार होऊ शकत नाही.  सबब सदर कंपनीस पक्षकार करणे कायदयानुसार जरुरीचे नाही. सबब विरुध्‍द पक्ष यांचा सदरचा आक्षेप नामंजूर होणेस पात्र आहे.  सबब मुद्दा क्र.3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

      12)   मुद्दा क्रमांक 4 व 5 – तक्रारदार हे जेसीबी मशीनचे मालक आहेत तसेच सदर मशीनचा विमा विरुध्‍द पक्ष कंपनीकडे  उतरविलेला होता ही बाब विमा कंपनीने सादर केलेल्‍या नि.40/1 व 40/2 वरील इंश्‍युरंस सर्टीफिकेटवरुन सिध्‍द होते. तसेच सदर वाहनाचा विमा रु.13,05,000 साठी उतरविलेला दिसून येतो. तसेच विम्‍याची मुदत ता.13/2/2006 ते 12/2/2007 होती हे दिसून येते.  सदर सर्टीफिकेटवर इंजिन नंबर व चेसीस नंबर नमुद आहे. तसेच सदर मशीन एस्‍कॉर्ट जेसीबी असे देखील नमूद आहे. सबब सदर जेसीबी मशीनचा विमा विरुध्‍द पक्षाकडे उतरविल्‍याचे दिसून येते. सदर जेसीबी मशीनचा अपघात 2/3/2006 ला  झाल्‍याचे विरुध्‍द पक्ष यांनी नाकारलेले नाही. तसेच सदरची बाब सिध्‍द करण्‍यासाठी नि.42/4 ते 42/6 कडील कागदपत्र पाहता जेएस 75 जेसीबी हे मशीन ता.2/3/2006 रोजी 10 ते 10.30 दरम्‍यान आग लागल्‍यामुळे सदरचे मशीन आगीत जळून खाक झाल्‍याचे सिध्‍द होते. तसेच तक्रारदाराने अपघातग्रस्‍त मशीनची नुकसान भरपाई मिळणेसाठी विमा कंपनीकडे विमा क्‍लेम 152201/31/06/01/90000002 ने दाखल केल्‍याचे दिसून येते. त्‍यानंतर विमा कंपनीने श्री. डिगे यांना इंटेरियम सर्व्‍हे करण्‍यासाठी नेमण्‍यात आलेले होते. त्‍यानुसार सर्व्‍हेअर श्री डिगे यांनी वेळोवेळी तक्रारदारांना पत्रे पाठवल्‍याचे  दिसून येते.  त्‍याबाबत सर्व कागदपत्रांची पुर्तता तक्रारदारांनी केलेली आहे.  ता.10/3/2006 ला प्रथम गवंडे सर्व्‍हेअर यांनी अपघात ठिकाणाला भेट देऊन स्‍पॉट सर्व्‍हे केला. सदरचा रिर्पोर्ट नि.13/1 कडे दाखल केलेला आहे.  त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी नियुक्‍त केलेले डिगे सर्व्‍हेअर यांनी Interim Survey करुन त्‍यांचा रिपोर्ट दि.14/06/2006 ला सादर केला व त्‍यानंतर दुस-यांदा Interim Survey करुन त्‍याचा अहवाल दि.16/01/2007 ला विमा कंपनीकडे सादर केला.  तसेच अंतिमतः फायनल सर्व्‍हे करुन फायनल अहवाल दि.31/01/2007 ला विमा कंपनीकडे सादर केला.  परंतु फायनल सर्व्‍हे  रिपोर्ट सादर केल्‍यानंतर 6 महिन्‍याच्‍या आत विमा कंपनीने विमा दावा निकाली काढणे आवश्‍यक होते; परंतु तक्रारदाराचा विमा दाव्‍याचा निकाल न लावता प्रकरण तसेच  पाडून ठेवले व तक्रारदाराचा विमा दावा मंजूर केला नाही किंवा नाकारला देखील नाही, ही ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेतील त्रुटी आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.

      13)   सदरच्‍या फायनल सर्व्‍हे रिपोर्टचे अवलोकन केल्‍यास तक्रारदाराचे जेसीबी मशीन शॉर्ट सर्कीटमुळे पूर्णतः जळून गेले असलेमुळे टोटल लॉस बेसीसवर सॉल्‍व्‍हेज वजा तक्रारदार हे रु.8,90,406/- मिळणेस पात्र आहे. तसेच रिपेअर बेसीस रु.19,18,380/- एवढया रक्‍कमेचे असेसमेंट डिगे सर्व्‍हेअर यांनी केलेले आहे. परंतु विमा कंपनीने रिपेअर बेसीसवर अथवा टोटल लॉस बेसीसवर तक्रारदाराचा क्‍लेम मंजूर केला नाही किंवा नामंजूरही केलेला नाही.  या विरुध्‍द ता.22/1/2007 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांकडून काही बाबतीत विचारणा केली. त्‍यानंतर त्‍याच मजकुराची पत्रे दि.2/3/2007, 22/1/2007, 14/2/2007, 20/2/2007 व 2/3/2007 रोजी तक्रारदारांना पाठविलेली आहेत.  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरची सर्व पत्रे समान मजकुराची आहेत आणि त्‍यामध्‍ये नमूद असलेल्‍या 8 बाबींबद्दल तक्रारादाराने दि.9/4/2007 रोजी उत्‍तर देऊन जरुर ती सर्व कागदपत्रे पाठविलेली आहेत. सदर दि.9/4/2007 च्‍या पत्राची नक्‍कल तक्रारदाराने नि.42/16 कडे हजर केलेली आहे. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार मुद्दा नं.1 काकुलो अर्थमुव्‍हर्स हे जेसीबी जेएस 75 या मशीनचे मेंटेनन्‍स कॉन्‍टॅक्‍टर होते व त्‍याबाबतचा सर्व्‍हीस रिपोर्ट विरुध्‍द पक्ष यांचेकडे पाठवण्‍यात आलेला आहे. तसेच सदर पत्रात तक्रारदारांनी जेएस 75 मशीनची लॉक कॉपी जोडत आहे असे कळवले होते. तसेच मुद्दा नं.2 बाबत दुस-या जेसीबी मशीनची लॉक कॉपी हरवलेबाबत कळवले आहे. मुद्दा नं.3 मोटर ड्रायव्हिंग लायसनबाबत तक्रारदाराचे म्‍हणणे असे की, सदर मशीनवर ऑपरेटर हा हुसेन बादशहा पिरसाहेब मुजावर होता  त्‍याचे ड्रायव्हिंग लायसन नि.49/2 कडे हजर केले आहे. सदर मशीन हे सदर मुजावर बादशहा हे ऑपरेट करत होते. सदर लायसन्‍स पाहता सदरचे व्‍हॅलीडिटी 24/7/96 ते 23/7/16 पर्यंतची दिसून येते. पूढे मुद्दा नं.4 चे जेसीबी मशीनचे आर.सी.बुक याबाबत तक्रारदाराचे म्‍हणणे असे की, जेसीबी मशीनसाठी रजिस्‍ट्रेशनची जरुरी नाही त्‍याकरीता आर.टी.ओ. ऑफिसने दिलेला दाखला नि.49/1 कडे दाखल केलेला आहे. सदर पत्रानुसार जेसीबी वाहनासाठी मोटर वाहन नोंदणी करणे आवश्‍यक नाही असे कळ‍वलेले आहे. म्‍हणून सदर जेसीबीचे आर.सी.बुक उपलब्‍ध नाही. म़ुद्दा क्र.5 बाबत जळालेल्‍या जेसीबी मशीनचा विमा 14/2/2003 पूर्वी का उतरविलेला नाही याबाबतचा खुलासा विरुध्‍द पक्ष यांनी मागविलेला आहे.  तक्रारदाराचे म्‍हणणे असे की आर.टी.ओ.कडे रजिस्‍ट्र्रेशन केल्‍याशिवाय कोणत्‍याही वाहनाचा विमा उतरवत नाही. त्‍यामुळे सदर वाहनाचा विमा दि.14/9/2003 पूर्वी उतरविणेत आलेला नव्‍हता. त्‍यामुळे  दुस-या जेसीबी मशीनचे विम्‍याबाबतचे डिटेल्‍स मागवण्‍यात आलेले होते.  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार आर्थिक संकटात असल्‍यामुळे विमा उतरविण्‍यात आलेला नव्‍हता. दुस-या दोन जेसीबी मशीनबाबत तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार घटनेचीवेळी त्‍यांचेकडे एकुण 3 जेसीबी मशीन होते. मुद्दा नं.8 जळालेले मशीन रिपेअरसाठी हलवण्‍यात आलेले नाही. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरचे मशीन दुर्गम भागात कामासाठी लावलेले होते. त्‍यामुळे सदरचे मशीन दुरुस्‍तीसाठी हलवणे अशक्‍य होते. तसेच सदरचे पूर्ण जळालेले मशीन ताब्‍यात ठेवण्‍यास डिलरने नकार दिला.  तसेच सदर मशीनचे मौल्‍यवान पार्ट संपूर्णता जळालेले होते.  त्‍यामुळे जळालेल्‍याच ठिकाणी मशीन ठेवणेस तक्रारदारांना कोणताही धोका वाटलेला नाही. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार विरुध्‍द पक्षाने विचारलेल्‍या 8 ही मुददयाबाबत तक्रारदाराने योग्‍य तो खुलासा तक्रारदाराने त्‍याच्‍या दि. 9/4/2013 च्‍या पत्रामध्‍ये केलेला असून त्‍याबाबत जरुर ते कागदपत्र दिलेले आहेत. तसेच सदरचा खुलासा हा या मंचाने विचारात  घ्‍यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरचे मशीन हे ओरिएंटल इंशुयरंस कंपनीकडे केव्‍हाही विमीत नव्‍हते ते दि.13/9/2003 रोजी युनायटेड इंडिया इंश्‍युरंस कंपनीकडे विमीत होते आणि त्‍या पॉलिसीचा हप्‍त्‍याचा चेक तक्रारदाराने दिलेला होता. तो चेक न वटल्‍यामुळे सदरची पॉलिसी आपोआप रद्द झाली. त्‍यामुळे सदर जेसीबीची एकच पॉलिसी वि.प. कंपनीकडे ता.13/2/2006 ते 12/2/2007 पर्यंत होती. तसेच इतर दोन जेसीबी मशीनचा विमा उतरविलेला नव्‍हता. म्‍हणजेच प्रस्‍तुतची विमा पॉलिसी ही जळालेल्‍याच मशीनची आहे हे सिध्‍द होते. त्‍याकरिता आणखी पुरावा देणेची जरुरी नाही.

      14) एकदंरीत पुरावा पाहता फायनल सर्व्‍हे रिपोर्ट केल्‍यानंतर 6 महिन्‍याच्‍या आत विमा दावा निकाली काढणे आवश्‍यक होते.  तथापि विरुध्‍द पक्षाने विनाकारण वेळोवेळी पत्रे पाठवून नवीन मुद्दे उपस्थित केले.  वाहन चालकाच्‍या परवान्‍याबाबत नि.13/1 चा स्‍पॉट सर्व्‍हे पाहता त्‍यामध्‍ये चेचीस नंबर व इंजिन नंबर स्‍पष्‍टपणे नमूद करण्‍यात आले. तसेच जेसीबी मशीनचे ऑपरेटर मुजावर यांचा लायसन परवाना नं.50069068 असा नमूद केल्‍याचे दिसून येते तसेच नि.49/2 कडे ड्रायव्हिंग लायसन्‍सची झेरॉक्‍स प्रत पाहता घटनेच्‍यावेळी ड्रायव्‍हरकडे वाहन परवाना होता ही बाब सिध्‍द होते.

      15) तसेच जेसीबी मशीनची नोंदणी करण्‍याची आवश्‍यकता नाही याबाबत उप प्रादेशीक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांचे 49/1 कडे प्रमाणपत्र दाखल करण्‍यात आलेले आहे.  सदरचे जेसीबी मशीन चाकावर चालणारे नसुन चेनवर चालणारे आहे, त्‍यामुळे ते रस्‍त्‍यावर चालू शकत नाही.  त्‍यामुळे सदर वाहनाला दुस-या वाहनाने पाहिजे त्‍याठिकाणी न्‍यावे लागते.  त्‍यामुळे रजिस्‍टेशन व लायसन्‍स यासंदर्भात वि.प. यांनी केलेला बचाव मान्‍य करता येणार नाही. वि.प.चे वकील यासंदर्भात पूढील  निवाडयांवर अवलंबून राहतात.

1) 2013 CJ (Gau)(679)  New India Assurance Co. Ltd. V/s K. Vanlathanzuala

2) Kamal Deen V/s Iffco Tokio General Insurance Co.,  Hon’ble State Commission, Chandigad

सदरच्‍या निवाडयानुसार जेसीबी मशीन Construction equipment vehicle  या सदराखाली येत असल्‍यामुळे त्‍याकरीता रजिस्‍ट्रेशनची जरुरी असते तथापि सदरचे दोन्‍ही निवाडे महाराष्‍ट्राबाहेरच्‍या राज्‍याचे आहेत. मोटर व्‍हेईकल अॅक्‍टमधील तरतूद व इतर तरतूदी प्रत्‍येक राज्‍याने आपापल्‍या राज्‍यात थोडयाफार फरकाने लागू करुन घेतलेल्‍या असतात. या कामी सिंधुदुर्ग आर.टी.ओ.ने दिलेल्‍या दाखल्‍याचे अवलोकन करता सदर न्‍यायनिवाडयातील तत्‍वे या प्रकरणास लागू करणे उचीत होणार नाही. सबब सदरचे निवाडे वि.प. यांचे मदतीस येऊ शकणार नाहीत असे या मंचाचे मत आहे.

      16) एकंदरीत पुरावा पाहता तक्रारदारांनी त्‍यांचेकडे एकूण 3 जेसीबी मशीन असल्‍याचे कबुल केले आहे. तसेच जेएस 75 या जेसीबी मशीनचा विमा विरुध्‍द पक्ष कंपनीकडे उतरविण्‍यात आलेला आहे नि.42/23 मधील फोटोग्राफ मशीन पाहता सदर मशीन चेनवरील असून चाकांवर चालणारे नाही असे दिसून येते. तसेच सर्व्‍हे रिपेार्ट नि.13/1 व इंश्‍युरंस सर्टीफिकेट नि.40/1 पाहता इंजिन 40120670200022  आणि चेसीस नंबर1009009  असे दिसून येते म्‍हणजेच जळालेले जेसीबी मशीन याचाच विमा  वि.प. यांचेकडे उतरविलेला होता ही बाब शाबीत होते. कारण सदरचे सर्व्‍हेअर हे विमा कंपनीनेच नेमलेले होते आणि विमा कंपनीने नेमलेल्‍या सर्व्‍हेअरचा रिपोर्ट हा विमा कंपनीने मान्‍य करावयास हवा होता.  सबब फायनल सर्व्‍हे रिपोर्ट सादर केल्‍यानंतर 6 महिन्‍याच्‍या आत विमा कंपनीने विमा दावा निकाली काढणे आवयक होते तथापि विमा कंपीनीने तक्रारदारांचा विमा क्‍लेम मंजूर वा नामंजूर केला याबाबत कोणताही अंतीम निर्णय घेतल्‍याचे दिसून येत नाही. विमा कंपनीतर्फे  इंश्‍युरंस अॅक्‍टच्‍या तरतूदीनुसार कंपनीने नियुक्‍ती केलेले सर्व्‍हेअर हे अपघातग्रस्‍त वाहनाची तपासणी करुन  असेसमेंट रिपोट देतात त्‍यामुळे सर्व्‍हेअर हे आवश्‍यक व महत्‍वाचा इसम असून त्‍यांनी दिलेला अहवाल हा पुराव्‍यात अत्‍यंत महत्‍वाचा असतो. तक्रारदाराने सर्व्‍हेअरने केलेले असेसमेंट चुकीचे आहे असे कोठेही म्‍हटलेले नाही. किंवा त्‍या रिपेार्टवरुन कोणताही आक्षेप घेतलेला नाही. याउलट सर्व्‍हेअरने दिलेल्‍या13/12 कडील फायनल सर्व्‍हे रिपेार्टचे अवलोकन करता डिगे असोसिएटस यांनी टोटल लॉस बेसीसवर तक्रारदारचा विमा दावा मंजूर करावा अशी शिफारस केल्‍याचे दिसून येते Total Loss Basis वर सर्व्‍हेअरने केलेले वि‍वरण तपासल्‍यास तक्रारदाराचे जेसीबी वाहन पुर्णता जळून नष्‍ट झाल्‍यामुळे  जळालेला ढाचा अर्थात salvage 3,81,621/- रुपयात श्री दत्‍तकृपा एंटरप्रायझेस अर्थमुव्‍हर्स हे विकत घेणेस तयार असल्‍याचे पत्र  (नि.13/17) विरुध्‍द पक्ष कंपनीने दाखल केले आहे.  त्‍यामुळे सर्व्‍हेअरने सॅल्‍व्‍हेज या शिर्षकाअंतर्गत  रु.3,80,000/- ची कपात केली होती ती योग्‍य होती.  तसेच तक्रारदार व विमा कंपनी यांचे दरम्‍यान झालेल्‍या विमा करारानुसार विमा पॉलिसीमध्‍ये compulsory excess (नि.40/1)  रु.6525/- नोद केल्‍याचे दिसून येते.  त्‍यामुळे ही रक्‍कम less excess या शिर्षकाखाली सर्व्‍हेअरने कपात केली असून ती कपात देखील योग्‍य आहे; परंतु सर्व्‍हेअरने less cost of cause of loss या सदराखाली रु.28069/- ची केलेली कपात अजिबात संयुक्तिक नाही. तक्रारदाराचे जेसीबी मशीन, त्‍याच्‍या चालकाच्‍या चुकीमुळे जळाले नसल्‍याचे सर्व्‍हेअरने स्‍वतः  नमूद केले असून  शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्‍याचे मान्‍य केले आहे.  तसेच विमा पॉलिसीमध्‍ये अशा Cause of loss या सदराखाली कपातीचे कोणतेही कलम नाही.  एवढेच नव्‍हेतर डिगे सर्व्‍हेअर यांनी त्‍यांचे नि.13/16 वरील प्राथमिक सर्व्‍हे  क्र.II मध्‍ये अशी कपात केल्‍याचे दिसून येत नाही.  त्‍यामूळे ही रु.28069/- ची केलेली कपात रद्द होणेस पात्र आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हा Total Loss Basis वर रु.9,18,475/- एवढी रक्‍कम मिळणेस पात्र आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत असून salvage अंतर्गत रक्‍कम रु,3,80,000/- कपात करणेत आल्‍यामुळे जेसीबी मशीनचा जळालेला ढाचा तक्रारदार आपणाकडे ठेवू शकतात तसेच हा ढाचा कोणालाही विक्री करु शकतात.

      17) एकंदरीत पुरावा पाहता विरुध्‍द पक्ष कंपनीने तक्रारदारांच्‍या विमा क्‍लेमबाबत अंतीम‍ निर्णय घेणेस विलंब केला तसेच तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष यांनी विचारलेल्‍या 8 मुद्दयांबाबत स्‍पष्‍टीकरण देऊनही त्याचा विचार केला नाही. सबब  विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा अनिर्णीत ठेऊन ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत  त्रुटी केली आहे.  त्‍यामुळे तक्रारदारास आर्थिक, मानसिक , शारीरिक त्रास नक्‍कीच सहन करावा लागला असणार सबब विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारांना देण्‍यात येणा-या सेवेत त्रुटी केल्‍याचे दिसून येते.  सबब तक्रारदाराची तक्रार डिगे सर्व्‍हेअर यांनी दिलेल्‍या फायनस सर्व्‍हे रिपेार्टच्‍या अहवालानुसार कॉज ऑफ लॉस प्रमाणे रु. 9,18,475/- मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. तसेच मानसिक, आर्थिक त्रासाबाबत  रक्‍कम रु.7,000/-  व तक्रार अर्जाचे खर्चाकरीता रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब मुद्दा नं.4 व 5 चे उत्‍तर होकारार्थी असून खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.

                     आदेश

      1)    तक्रारदाराचीं तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

      2)    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारांना रक्‍क्‍म रु. 9,18,475/- (रुपये नऊ लाख अठरा हजार चारशे पंच्‍याहत्‍तर मात्र) व त्‍यावर  द.सा.द.शे 9%  व्‍याज ता.31/1/2007 पासून (डिगे असोसिएटस यांच्‍या फायनल सर्व्‍हे रिपोर्टच्‍या तारखेपासून) पूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत देण्‍यात यावी.

      3)    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या सेवेतील त्रुटीबाबत तसेच आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासाबाबत रक्‍कम रु.7,000/- तसेच तक्रार अर्जाचे खर्चाबाबत रु.3,000/- देणेबाबत आदेश पारीत करणेत येतात.

      4)    सदर आदेशाची अंमलबजावणी 45 दिवसांत करण्‍यात यावी. अन्‍यथा तक्रारदार ग्रा.सं.का. कलम 25 व 27 नुसार तक्रारदार विरुध्‍द पक्ष यांचेविरुध्‍द कार्यवाही करणेस पात्र राहतील.

5)  मा.राज्‍य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्‍था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्‍हणजेच दि.09/01/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्‍यात येतात.

ठिकाणः सिंधुदुर्गनगरी

दिनांकः 25/11/2014

 

 

 

                     Sd/-                                            Sd/-                                   Sd/-

(वफा ज. खान)                    (अपर्णा वा. पळसुले)              (कमलाकांत ध.कुबल)

         सदस्‍य,                   अध्‍यक्ष,                 सदस्‍य

जिल्‍हा  ग्राहक तक्रार निवारण  मंच,  सिंधुदुर्ग

 

प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्‍टाने रवाना दि.

प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने रवाना दि.

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.