(घोषित दि. 21.10.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचे वकील गंगाधर लक्ष्मण दराडे यांचा दिनांक 11.02.2012 रोजी जळाल्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. वरील घटने संदर्भात कदीम जालना पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू 00/2012 अन्वये नोंद करण्यात आली. त्यानंतर मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब घेण्यात येऊन अकस्मात मृत्यू बाबत अंतीम अहवाल देण्यात आला.
तक्रारदारांचे वडील हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नावे उज्जैनपुरी ता.बदनापूर जि.जालना येथे शेत जमीन होती. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना ही कल्याणकारी योजना राबविली आहे. त्या अंतर्गत सन 2012 – 2013 साठी औरंगाबाद विभागाचा विमा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे जमा केला आहे. वरील योजने अंतर्गत तक्रारदारांनी विहीत नमुन्यात विमा प्रस्ताव आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 21.06.2013 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांना कळविले की, “घटनास्थळ पंचनाम्यानुसार अपघातग्रस्ताने नशेत अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या केली आहे. त्यामुळे नियमानुसार आत्महत्येशी संबंधित दावा कंपनी ग्राहय धरु शकत नाही.” या कारणाने गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांचा दावा नाकारला.
तक्रारदार म्हणतात की, घटना दिनांक 11.02.2012 रोजी झाली. परंतू दिनांक 29.12.2012 रोजी घटनास्थळ पंचनामा व इतर जबाब घेण्यात आले आहेत. तसेच अपघाता नंतर लगेचच दिनांक 13.12.2012 रोजी शवविच्छेदन करण्यात आले. त्यात Cause of death is due to superficial to deep burns 84 % असे लिहिले आहे. त्याच प्रमाणे शवविच्छेदन अहवालात कोठेही मयताचे शरीरात अंमली पदार्थाचा अंश असल्याचे म्हटलेले नाही व व्हीसेरा राखून ठेवलेला नाही. त्यामुळे तक्रारदार म्हणतात की, त्यांचे वडील यांचा मृत्यू अपघाताने जळून झालेला आहे. असे असतांना देखील गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांना ही आत्महत्या आहे या घटनास्थळ पंचनाम्यातील नोंदीवर विसंबून तक्रारदारांचा विमा प्रस्ताव चुकीने नाकारला आहे. ही गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. तक्रारदार शेवटी विमा रक्कम रुपये 1,00,000/- 12 % व्याज दरासहीत मागत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांचा दावा नाकारल्याचे पत्र, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांचे जबाब, अकस्मात मृत्यूचा अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, गाव नमुना 7/12 व 6 क चा उतारा, फेरफार उतारा इत्यादि कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांच्या जबाबानुसार त्यांना तक्रारदारांचा विमा प्रस्ताव प्राप्त झाला. तो त्यांनी दिनांक 28.03.2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठविला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 21.06.2013 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नाकारला.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचाचे नोटीस मिळूनही मंचा समोर हजर झाले नाहीत. म्हणून तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात आली. तक्रारदारांचे वतीने श्रीमती पल्लवी किनगावकर यांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. त्यांनी सांगितले की, घटनेनंतर सुमारे 20 दिवसांनी घटनास्थळ पंचनामा व इतरही तपास करण्यात आला. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्याच प्रमाणे मृत्यू जर नशेच्या भरात अंगावर रॉकेल टाकून घेवून केलेली आत्महत्या असली तरी शवविच्छेदन अहवालात मयताच्या शरीरात कुठल्या तरी अमली पदार्थाचा अंश सापडावयास हवा होता पण तो दिसत नाही. त्याच प्रमाणे मयताचा व्हिसेरा देखील तपासणीसाठी पाठविलेला नाही. अशा परिस्थितीत मयताचा मृत्यू ही आत्महत्या नसून तो अपघातच होता असे दिसते. असे असतांना देखील गैरअर्जदारांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव चुकीने नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात यावी व त्यांना व्याजासह विमा रक्कम देण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- अकस्मात मृत्यूच्या संदर्भात घटनास्थळ पंचनामा व साक्षीदाराचे तपास टिपण आहे. त्यातील घटनास्थळ पंचनाम्यात गुन्हा करण्याची पध्दत यात नशेत अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या केली असा स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो. त्याच प्रमाणे मयताच्या पत्नी कमलाबाई, तक्रारदार स्वत:, पंढरीनाथ दराडे, गणेश घुगे व इतर साक्षीदारांच्या जबाबात देखील मयत गंगाधर यांनी नशेत कमलाबाई यांची नजर चुकवून अंगावर रॉकेल ओतून घेतले व स्वत: पेटवून घेतले असा उल्लेख केलेला दिसतो. अशा परिस्थितीत केवळ शवविच्छेदन अहवालात अंमली पदार्थाचा उल्लेख नाही व घटनास्थळ पंचनामा उशीराने झालेला आहे. म्हणून मयताचा मृत्यू आत्महत्या नाही असे म्हणता येणार नाही असे मंचाला वाटते.
- दाखल कागदपत्रांवरुन गंगाधर यांचा मृत्यू अंगावर रॉकेल ओतून घेवून केलेली आत्महत्या आहे असे स्पष्ट दिसते.
- शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार शेतक-यांचा मृत्यू अपघाताने झाला असेल तरच त्यांचे वारस विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. मयताने आत्महत्या केलेली असल्यामुळे तक्रारदार या योजनेच्या लाभास पात्र नाहीत.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांचा दावा मयताचा मृत्यू आत्महत्येने झाला असल्यामुळे तक्रारदारांना विमा योजनेचा लाभ देता येणार नाही. या कारणाने नाकारला यात त्यांच्याकडून कोणतीही सेवेतील कमतरता अथवा त्रुटी झालेली नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.