निकाल
(घोषित दि. 13.12.2016 व्दारा श्री.सुहास एम आळशी, सदस्य)
तक्रारदाराने त्याच्या तक्रार अर्जामध्ये असे नमुद केले आहे की, तो पाथ्रुड (ताडा) ता. जि. जालना येथील रहिवासी असुन शेती करतो. त्याचे बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा नेर ता. जि.जालना येथे बचत खाते आहे, त्याचा क्र. 60146607126 हा आहे. तक्रारदार अे.टी.एम.कार्डाचा वापर करतो. दिनांक 31/3/2016 रोजी त्याचे खात्यामध्ये 70968/- रुपये जमा होते. दि. 30/04/2016 रोजी सायंकाळी तक्रारदाराचा भ्रमणध्वनी क्र. 9520087626 वर त्याला भ्रमणध्वनी क्र. 918521592809 वरुन कॉल आला व मी बॅकेचा क्षेत्रीय अधिकारी बोलतो आहे असे सांगुन, तक्रारदाराला त्याच्या ए.टी.एम. कार्डाचे पिनबाबत चौकशी करण्यात आली. सदर पिन क्रमांक तक्रारदाराने समोरचे व्यक्तीला सांगितला. त्यानंतर लगेचच 5 मिनिटांनी तक्रारदाराचे खात्यातुन 100/- रुपये काढण्यात आले. पुन्हा 3 मिनिटांचे अंतराने पाच पाच हजार असे 10,000/- व नंतर पुन्हा 10,000/- असे एकुण 20,100/- काढण्यात आल्याचे मेसेजेस तक्रारदाराला प्राप्त झाले व तक्रारदाराचे खात्यात 50,368/- रुपये शिल्लक राहिले.
तक्रारदार याचे खात्यातुन वरील प्रमाणे पैसे काढल्यानंतर त्याने प्रतिपक्षाकडे जावून त्याचे ए.टी.एम. व खाते ब्लॉक करण्याबाबत विनंती केली. प्रतिपक्ष्ा यानी खाते ब्लॉक केल्याबाबत सांगितले. दिनांक 01/05/2016 रोंजी प्रतिपक्षानी तक्रारदाराला 18002334526 हा क्रमांक दिला. त्यावर तक्रारदाराने वरील प्रमाणे पैसे काढल्याबाबत कळविले. दि. 02/05/2016 रोजी तक्रारदाराचे खात्यातुन 8.28 मिनिटानी रुपये 49,000/- काढल्याचा मेसेज प्राप्त झाला व त्याच दिवशी 8.31 वाजता रु. 1000/- काढल्याबाबतचा मेसेज प्राप्त झाला, असे नमुद करुन जर बॅकेने वेळीच तक्रारदाराचे खाते ब्लॉक केले असते तर त्याचे वरील प्रमाणे नुकसान झाले नसते, असे तक्रारीत नमुद केले आहे. विनंती कलमामध्ये तक्रारदाराने ऑन लाईन सुविधेद्वारे काढल्यात आलेले 20,100/-, खाते ब्लॉक केल्यानंतर काढण्यात आलेले रु. 50,000/- व नुकसान भरपाईचे रु. 10,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत बॅकेचे खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत, पोलीस स्टेशनच्या अर्जाची झेरॉकस प्रत, पुराव्याचे शपथपत्र असे दस्त दाखल केले आहेत.
या बाबत प्रतिपक्ष यांनी नि.क्र. 8 नुसार जबाब दाखल केला त्यामध्ये तक्रारदाराने तक्रारअर्जात नमुद केलेल्या मजकुराबाबत काहीही माहिती नाही. तक्रारदाराने ए.टी.एम.कार्डाचे पिनबाबत गुप्तता ठेवायला पाहिजे होती, एम.टी.कार्डासोबत दिलेल्या उपायोगाकरीता पुस्तिका व कोड ऑफ बॅंकस कमीटमेन्टस ऑफ कस्टमर्स – 2014 या पुस्तिकेनुसार पुढील कार्यवाही करायला पाहिजे होती. सदर पुस्तिकेनुसार पान क्र. 19,20 व परिच्छेद क्र. 9,12,16 नुसार व पान क्र.24 मधील परिच्छेद 7 नुसार एम.टी.एम. पीन कोड (पासवर्ड) चे गोपनियतेचा भंग झाल्यास बॅकेची जबाबदारी राहणार नाही,त्याबाबतची जबाबदारी ग्राहकाची असेल, असे सांगितले आहे. तक्रारदाराचे चुकीकरीता तो स्वतःच जबाबदार असल्याने तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे नमुद केले आहे.
तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद व प्रकरणातील दाखल दस्तऐवज यावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुददे येतात.
मुद्दे आदेश
1) प्रतिपक्षाची सेवा देण्यात त्रुटी आहे काय ? नाही.
2) आदेश काय? अंतिम आदेशानुसार.
कारणमिमांसा
मुद्दा कं. 1 चे उत्तर - सदर प्रकरणाचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, दि. 30/04/2016 रोजी सायंकाळी तक्रारदाराचा भ्रमणध्वनी क्र. 9520087626 वर त्याला भ्रमणध्वनी क्र. 918521592809 वरुन कॉल आला व बॅकेचा क्षेत्रीय अधिकारी बोलतो आहे असे सांगुन, तक्रारदाराला त्याच्या ए.टी.एम. कार्डाचे पिनबाबत चौकशी करण्यात आली. सदर पिन क्रमांक तक्रारदाराने समोरचे व्यक्तीला सांगितला,त्यानंतरच तक्रारदाराचे खात्यातुन पैसे कमी झाले. प्रतिपक्ष यांनी ए.टी.एम कार्ड वापराची पुस्तिका प्रकरणात दाखल केली आहे. सदर पुस्तिकेतील पान क्र. 19,20 व परिच्छेद क्र. 9,12,16 नुसार व पान क्र.24 मधील परिच्छेद 7 नुसार एम.टी.एम. पीन कोड (पासवर्ड) चे गोपनियतेचा भंग झाल्यास बॅकेची जबाबदारी राहणार नाही,त्याबाबतची जबाबदारी ग्राहकाची असेल, असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. ए.टी.एम.पिन बाबतची माहिती ही ग्राहकाशिवाय कोणासही माहिती असणे अपेक्षित नाही व ए.टी.एम.पिन क्रमांक ही वैयक्तिक वापराची बाब आहे त्याची माहिती बॅंकसुध्दा विचारु शकत नाही. तक्रारदाराने त्याचा पिनकोड वरील भ्रमणध्वनीवर सांगून नियमांचा व गोपनियतेचा भंग केला व त्यामुळेच त्याचे नुकसान झालेले आहे, असे दिसुन येते.
दिनांक 31/3/2016 रोजी तक्रारदाराचे खात्यामध्ये 70968/- रुपये जमा होते. दि. 30/04/2016 रोजी तक्रारदाराचे खात्यातुन 100/- रुपये काढण्यात आले. पुन्हा पाच पाच हजार असे दोनदा मिळुन 10,000/- व नंतर त्याच दिवशी पुन्हा 10,000/- असे एकुण 20,100/- काढण्यात आले. तशा एंन्ट्रीज तक्रारादाराचे पासबुकवर आहेत व दि. 02/05/2016 रोजी तक्रारदाराचे खात्यातुन रुपये 49,000/- व रु. 1000/- काढल्याबाबत नोंद आहे. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाराचे ए.टी.एम.खात्यातुन रक्कम विड्रॉल झाल्याबरोबर त्याने बॅकेला कळविले व शाखाधिकारी यांनी त्याचे खाते ब्लॉक केल्याचे सांगितले. दि. 01/05/2016 रोजी त्याने 18002334526 या क्रमांकावर कस्टमर केअरला कळविले. त्यानंतरही त्याचे खात्यातुन दि. 02/05/2016 रोजी 49000/- व 1000/- रुपये काढल्याचे म्हटले आहे. तक्रारदार हा बॅकेमध्ये आला असल्याची व तक्रारदाराची रक्कम वरील प्रमाणे काढण्यात आल्याबाबत काहीही माहिती नसल्याचे प्रतिपक्षाने म्हटले आहे. तक्रारदाराने प्रकरणात त्याने बॅकेला दिलेला लेखी अर्ज, मेसेजेस, खाते ब्लॉक केल्याचा पुरावा, संभाषणाची ध्वनीफित, असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही व तो त्याची तक्रार पुराव्यानिशी सिध्द करु शकला नाही. तक्रारदाराची तक्रार सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदाराची होती. तक्रारदाराच्या केवळ लेखी तक्रार अर्जाचे आधारे प्रतिपक्षाला नुकसान भरपाईचा आदेश देणे योग्य होणार नाही. वरील विवेचनावरुन प्रतिपक्ष यांनी तक्रारदाराला सेवा देण्यात त्रुटी केलेली नाही, असा निष्कर्ष मंच काढीत आहे व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना