जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –15/2011 तक्रार दाखल तारीख –31/01/2011
कु.संगीता बाबासाहेब जाधव
वय – 12 वर्षे, धंदा – शिक्षण
अ.पा.क.राजाभाऊ पि.सुंदरराव जाधव
वय – 35 वर्षे, धंदा – व्यापार व शेती
रा.जुने भगवान विद्यालय, तेरवी लाईन, बीड
ता. जि.बीड ...तक्रारदार
विरुध्द
1. मा.शाखाधिकारी,
एल.आय.सी.ऑफीस, नगर रोड, बीड
ता.जि.बीड
2. मा.मुख्याधिकारी साहेब,
नगर परिषद,बीड,ता.जि.बीड ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- वकिल – आर.एस.कुक्कडगांवकर,
सामनेवाले 1 तर्फे :- वकिल – ए.पी.कुलकर्णी,
सामनेवाले 2 तर्फे :- वकिल – एस.व्ही.शिंदे,
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार ही विमापत्र क्रं.984821663 मध्ये नॉमीनी असून अज्ञान आहे. तीचा अज्ञान पालन करता म्हणून विमापत्रातील राजाभाऊ सुंदरराव जाधव यांचे नाव आहे.
तक्रारदार कु. संगिता पि. बाबासाहेब जाधव हिचे वडील कै.बाबासाहेब सखाराम जाधव हे सामनेवाले नं.2 नगर परिषद बीड कार्यालयात पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून नौकरी करत होते. ते नौकरीत असताना सामनेवाले नं.1 कडून वरील क्रमांकाचे विमापत्र रक्कम रु.1,00,000/- चा विमा घेतला होता. हप्ते त्यांचे पगारातुनच सामनेवाले नं.2 कडून सामनेवाले नं.1 कडे दरमहा करत होते. सदर विमापत्र हे ता.10.10.2007 ला काढली होती तीचा महिना हप्ता रु.1,135/- होता.
ता.8.4.2010 रोजी वडील बाबासाहेब जाधव –ह्दय विकाराने मयत झाले. मृत्यू पर्यन्त ते सामनेवाले नं.2 यांचे सेवेत होते.
सामनेवाले नं.1 यांनी ता.30.10.2010 रोजी मा.मुख्य अधिकारी, नगर परिषद बीड सामनेवाले नं.2 यांनी पत्र दिले त्यात स्पष्ट नमुद केले की, सदर कर्मचा-यांचे हाते ता. 1.4.2010 रोजी जमा केले आहेत. सदर हप्ते हे 7/2009 ते 2/2010 या कालावधीचे एकुण 8 हाप्ते जमा केले. ती रक्कम स्विकाल्या बाबतची पावती सामनेवाले नं.2 यांना दिली आहे.
त्यानंतर 8 दिवसानी म्हणजेच ता.8.4.2010 रोजी तक्रारदाराचे वडील मयत झाले. याचा अर्थ असा हातो की, विमापत्र तक्रारादाराचे वडील मयत झाले त्यावेळेस बंद नव्हे ते चालू आवस्थेत होते.
सामनेवाले नं.1 यांनी सामनेवाले नं.2 कडे खुलासा मागणी पत्र ता.30.10.2010 ला दिले. सदर पत्रात सामनेवाले नं.2 यांना ता.1.11.2010 रोजी मिळाले.
सामनेवाले नं.1 यांनी ता.12.11.2010 रोजी तक्रारदाराना पत्र पाठवून मयताचा दाव्याची रक्कम देता येणार नाही, असे कळविले. परंतु सोबत सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 कडे जमा केलेली वरील रक्कम रु.9,080/- चा चेक तक्रारदारांना दिला तो त्यांनी स्विकारला नाही. परंतु तक्रारदाराचे उतर व चेक सामनेवाले नं.1 यांनी ता.1.1.2011 राजी परत केले. उत्तरात मयत दाव्याची संपूर्ण रक्कम 8 दिवसाचे आत देण्याची विंनती केली. उत्तराची एक प्रत सामनेवाले नं.2 यांना दिली.
तक्रारदार खालील प्रमाणे मागणीस पात्र आहे.
1. पॉलिसी क्र. 984821663 :- रु. 1,00,000/-
2. त्यावरील लाभ :- रु. 35,000/-
3. मानसिक त्रासाबद्दल :- रु. 10,000/-
4. तक्रार खर्च :- रु. 5,000/-
एकुण रुपये:- 1,50,000/-
विनंती की, वरील रक्कम रु.1,50,000/- त्यावर द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे
व्याजासह सामनेवालेंनी तक्रारदारांना देण्या बाबत आदेश व्हावा.
सामनेवाले नं.1 यानी त्यांचा खुलासा ता.1.6.2011 रोजी दाखल केला. सामनेवाले नं.1 यांनी त्यांचे खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारली आहेत. विमा पत्र क्र.984821663 मयत बाबासाहेब सुंदरराव जाधव यांचे नावाची होती. ते नगर परिषद, बीड येथे कामास होते त्यांचे विम्याचा हाप्ता त्यांचे पगारातुन कपात करुन सामनेवाले नं.2 मार्फत दिले जात होते.
जुलै,2009 ते फेब्रुवारी,2010 मधील कालावधीतील हप्ते थकीत होते त्याचा भरणा केलेला नव्हता, त्यामुळे विमापत्र बंद स्थितीत होते.
नगर परिषद, बीड यांनी वरील कालावधीचे देयक हे ता.1.4.2010 रोजी हाप्त्याची रक्कम सामनेवाले नं.2 यांनी पाठविली ती स्विकारली आहे. परंतु सदरची रक्कम ता.15.4.2010 रोजीचे पत्राने नगर परिषद बीड यांनी त्यावरील दंड व्याजाची सुट देण्या बाबत विंनती केली. विमाधारक ता.8.4.2010 रोजी मयत झाले होते आणि वरील हाप्ते सदर विमापत्रात ता.15.4.2010 रोजी नगर परिषद, बीड यांचे पत्रान्वये जमा करण्यात आली. त्यामुळे मृत्यू समयी विमाधारकाची विमा पॉलीसी ही बंद स्थितीत होती. सदरची बाब लक्षात घेता, विमा कंपनीने रक्कम रु.9,080/- हाप्त्याची रक्कम तक्रारदारांना चेकद्वारे पाठविली होती. सदरचा चेक त्यांनी स्विकारला नाही. याबाबत सामनेवालेंनी तक्रारदारांना ता.30.10.2010 व 12.11.2010 रोजीचे पत्र दिले आहे.
सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केलेली नाही, त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
सामनेवाले नं.2 न्यायमंचाची नोटीस मिळाल्यानंतर वकिला मार्फत हजर झाले. परंतु त्यांनी त्यांचा लेखी खुलासा न्यायमंचात ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार वेळेत सादर केला नाही. म्हणुन सामनेवाले नं.2 चे लेखी खुलाश्या शिवाय प्रकरण चालविण्याचा निर्णय न्यायमंचाने ता.4.5.2011 रोजी घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाले नं.1 यांचा खुलासा, शपथपत्र, तक्रारदाराचे विद्वान वकिल आर.एस.कुक्कडगांवर यांचा लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले. सामनेवाले नं.1 यांचे विद्वान वकिल ए.पी.कुलकणी यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले नं.2 गैरहजर त्यांचा युक्तिवाद नाही.
तक्रारीतील कागदपत्र पाहता, बाबासाहेब सुंदरराव जाधव हे नगर परिषद, बीड येथे नौकरीत असताना त्यांच्या हयातीत सामनेवाले नं.1 यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- चा त्यांचे त्यांचे जीवनावरील विमा पत्र क्रमांक तक्रारीत दिलेले विमा पत्र घेतले होते. सदर विमा पत्र ता.10.10.2007 रोजी घेतले होते, त्याचा मासिक हप्ता रु.1,135/- होता. सदरचे हप्ते हे सामनेवाले नं.2 नगर परिषद बीड यांनी त्यांचे पगारातुन कापून सामनेवाले नं.1 कडे पाठवावयाचे होते.
त्यांचे मृत्यूपूर्वी जुलै,2009 ते फेब्रुवारी,2010 या कालावधीचे एकुण 8 हप्ते थकल्यामुळे सदरचे विमापत्र हे बंद स्थितीत होते.
श्री.बाबासाहेब सुंदरराव जाधव यांच्या मृत्यु –ह्दय विकाराने ता.8.4.2010 रोजी झाला.
ता.1.4.2010 ला सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 कडे जुलै,2009 ते फेब्रुवारी,2010 कालावधीचे विम्याचे थकीत हाप्ते ता.1.4.2010 रोजी जमा केले आहे. ही बाब सामनेवाले नं.1 यांनी मान्य केली आहे. परंतु सदरची रक्कम ही संबंधीत विम्याच्या पत्रात ता.15.4.2010 रोजी सामनेवाले नं.2 ला दिलेलेल्या पत्रानुसार जमा करण्यात आली. त्यावेळी त्यादरम्यान विमाधारक बाबासाहेब सुंदरराव जाधव यांचा मृत्यू झाला होता. सदरचे विमापत्र हे बंद अवस्थेत होते. ही बाब लक्षात आल्यावर सामनेवालेंनी विमाधारकाचे नॉमीनीला म्हणजेच तक्रारदारांना विमापत्रात सामनेवाले नं.2 यांनी पाठविलेली जुलै,2009 ते फेब्रुवारी,2010 या 8 हप्त्याची रक्कम परत पाठविली आहे. सामनेवाले नं. 2 यानी विमा हप्ता रक्कमा पाठवल्या, त्या सामनेवाला नं.1 यांना मिळाल्याचे सामनेवाले नं.1 यांचे खुलाशात नमूद केले आहे. त्यांची अँडजेस्टमेंट ता.15.04.2010 पत्रानंतर करण्यात आली. हा व्यवहार सामनेवाला नं.1 चा अंतर्गत व्यवहार आहे. त्याचेशी विमेदाराचा सरळ संबंध नाही. विमेदार ता.08.04.2010 रोजी मयत झाला त्यांचे मृत्यूपूर्वीच विमा कंपनीस विमा पत्रातील थकीत हप्ते मिळालेले आहे. यात विमेदारांचा कसूर नसतांना अंतर्गत व्यवहारात विमा कंपनीस हप्ते जमा करण्यास उशिर झाला त्यामुळे विमा कंपनी या तांत्रिक बाबीवर तक्रारदाराचा दावा नाकारु शकत नाही. विमेदारास विमा पत्रातील त्यांच्या मृत्यू पत्रात मिळणारी नियमाप्रमाणे देय रक्कम विमा कंपनीने देणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. ती जबाबदारी योग्य रितीने विमा कंपनीने पार पाडली नाही. म्हणून सेवेत कसूर केला असे न्यायमंचाचे मत आहे. विमा कंपनीने तक्रारदारांना नियमाप्रमाणे देय रक्कम देणे उचित होईल.
सेवेत कसूरी स्पष्ट झाल्याने तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाची रक्कम रु.2,000/- व खर्चाची रक्कम रु.1,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
।। आदेश ।।
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना विमा पॉलिसीतील नियमाप्रमाणे देय होणारी रक्कम आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत अदा करावी.
3. वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास तारीख 15.04.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाले क्र.1 जबाबदार राहतील.
4. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) व दाव्याच्या खर्चापोटी रु.1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त ) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत अदा करावेत.
5. सामनेवाले क्र.2 विरुध्दची तक्रार रदद करण्यात येते.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी.भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड