( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक : 29 सप्टेबर, 2010 ) यातील तक्रारदार श्री प्रशांत अन्नाजी गावंडे यांची थोडक्यात तक्रार गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द अशी आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविली व विमा कंपनीशी करार करुन त्यांना विम्याच्या हप्त्याचा भरणा केला आहे. त्यामध्ये शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यास अपघाती विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्याची व्यवस्था आहे. सदर विमा गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे नोंदविण्यात आलेला आहे. मृतक जिजाबाई अन्नाजी गावंडे, जी तक्रारदाराची आई होती. तिचा अपघाती मृत्यु झाला. तिच्या नावे मौजा नसीरपूर (रिठी)/खैरगाव, तह. नरखेड, जिल्हा नागपूर येथे शेत क्रं.77 ज्याची आराजी 0.45 हे. आर. अशी शेती होती. तिचा दिनांक 11.2.2007 रोजी गॅसबत्तीचा स्फोटामुळे जळाल्याने मृत्यु झाला. त्यासंबंधी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. पुढे तक्रारदाराने विमा कंपनी कडे विमा दावा मिळण्याकरिता दस्तऐवजासोबत विमा दाव्याची मागणी केली. मात्र विमा कंपनीने दखल घेतली नाही. पुढे विमा कंपनीने दिनांक 28.3.2008 रोजी पत्र पाठवुन 7/12 उतारा मूळ प्रत (फेरफार पत्रक) मागीतले. त्यांची तक्रारदाराने पुर्तता केली. मात्र तरीही विमा कंपनीने विमा दावा रक्कम दिली नाही थोडक्यात गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा दावा नाकारला ही सेवेतील त्रुटी ठरते म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन, विमा रक्कम रुपये 1,00,000/-, 15 टक्के व्याजासह मिळावे व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 10,000/-, व दाव्याचा खर्च रुपये 5,000/- मिळावे अशी मागणी केली. यात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदाराने तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, तक्रारदारास मागणी करुनही तक्रारदाराने 6 क च्या दाखल्याची मुळ प्रत या कागदपत्राची पुर्तता केली नाही म्हणुन त्याचा दावा फेटाळण्यात आला. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार 7/12 ची प्रत, गाव नमुना 6-क,, फेरफार नोंदवहीची प्रत , मृत्यु प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, राशन कार्डची प्रत, दावा नाकारल्याचे पत्र, घटनास्थळ पंचानामा, इन्केवेस्ट पंचनामाची प्रत, तहसिलदाराचे पत्र, नोटीसची प्रत, डाक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत. तर गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला सोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही. तक्रारदाराचे प्रतिउत्तर दाखल केले नाही. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री. प्रकाश नौकरकर व गैरअर्जदारातर्फे वकील श्रीमती उन्नती मैराळ यांनी युक्तिवाद केला. #####- का र ण मि मां सा -##### सदर प्रकरणात गैरअर्जदार कंपनीने घेतलेला उजर तथ्यहीन वाटतो. त्याचे कारण असे आहे की, गैरअर्जदाराने तक्रारदाराकडे दस्तऐवज मागणीकरिता, दावा पत्र प्राप्त झाल्यानंतर दिनांक 28.3.2008 रोजी एक पत्र दिले त्यामध्ये केवळ 7/12 उतारा मूळ प्रत एवढीच मागणी केलेली आहे. 6 क च्या दाखल्याची मुळ प्रत या कागदपत्राची मागणी मुळीच केलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने सदरचा दाखला त्यांना मिळाला नाही असा उजर पूढे पश्चातबुध्दीने घेतला आहे हे स्पष्ट आहे. गैरअर्जदाराने युक्तिवादा दरम्यान मा. राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांचे समोरील अपील क्रं.1114/2008 मधे दिलेल्या निकालावर आपली भिस्त ठेवली. सदर निकालात मा.राज्य आयोगाने मागीतलेले दस्तऐवज दिलेले नाही ते देणे गरजेचे आहे, असा निकाल दिलेला आहे. त्यातील वस्तुस्थिती ही आमच्या पुढील प्रकरणात लागु होत नाही. गैरअर्जदाराने यथायोग्य कारण नसतांना सदरचा दावा नाकारला ही गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत. // अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदाराला रुपये 1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त ) आणि या रक्कमेवर विमा दावा नाकारल्याचा दिनांक 12.2.2009 पासुन प्रत्यक्ष रक्कम अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अशी मिळुन येणारी रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आत तक्रारदारास द्यावी. 3. गैरअर्जदार क्रं.1 ने, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार) व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त ) असे एकुण 6,000/- (रुपये सहा हजार ) तक्रारदारास द्यावे. 4. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं.1 यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे न पेक्षा गैरअर्जदार हे सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज देणे लागतील. 5. गैरअर्जदार क्रं.2 यांना मुक्त करण्यात येते.
| [HONABLE MRS. Mrs.Jayshree Yangal] Member[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |