जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २३८/२०११
तक्रार दाखल दिनांक – २६/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २९/०५/२०१४
अशोक रावण पाटील
उ.व. ६३ धंदा – रिटायर्ड/ जेष्ठ नागरिक
रा.३७ प्रमोद नगर, देवपूर धुळे . तक्रारदार
विरुध्द
ब्रॅन्च मॅनेजर,
भारतीय स्टेट बॅंक,
प्रमोद नगर शाखा
रा.प्लॉट नं.२२ प्रमोद नगर,
श्रेयस कॉलनी जवळ,
देवपूर धुळे - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एम.ए. पाटील)
(सामनेवाला नं.१ व ३ तर्फे – अॅड.श्री.एम.एस. पाटील)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री. एस.एस. जोशी)
१. सामनेवाले यांनी सेवेत कसूर केली म्हणून तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर मिळालेली रककम रूपये ५,००,०००/- चार वर्षांच्या मुदत ठेवीसाठी सामनेवाले यांच्याकडे ठेवली होती. त्याची मुदत दि.१३/१०/२००७ ते दि.१३/१०/२०११ अशी होती. मुदतीनंतर तक्रारदार यांना रूपये ७,१३,८१८/- मिळतील असे सामनेवाले यांच्यातर्फे सांगण्यात आले होते. त्याचे लेखी आश्वासन मुदत ठेव पावतीच्या रूपाने तक्रारदार यांना देण्यात आले होते. मुदत संपल्यानंतर तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडे गेले असता सामनेवाले यांनी त्यांच्या खात्यात रूपये ६,८३,१९४/- इतके जमा केले. त्याबाबत तक्रारदार यांनी चौकशी केली असता त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही. तक्रारदार यांनी लेखी अर्ज केल्यानंतर उर्वरित रक्कम टीडीएस म्हणून कपात केल्याचे त्यांना कळविण्यात आले. टीडीएस कपातीबाबत सामनेवाले यांनी पैसे ठेवतांना किंवा त्यानंतर कोणतीही माहिती दिली नाही असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली असून टीडीएस कपातीची रक्कम, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम, तक्रारीचा खर्च अशी एकत्रित नुकसान भरपाई रूपये ५५,२२७/- सामनेवाले यांच्याकडून १२% व्याजासह मिळावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पासबूक व त्यातील नोंदीची प्रत, सामनेवाला यांच्याकडे दिलेला तक्रारी अर्ज, सामनेवाला यांनी त्या अर्जावर दिलेले उत्तर, सामनेवाला यांनी सन २००८-०९ या वर्षासाठी तक्रारदाराचा परस्पर भरलेला अर्ज नं.१६ए, सन २००९-१० या वर्षासाठी परस्पर भरलेला अर्ज नं.१६ए, सन २०१०-११ या वर्षासाठी परस्पर भरलेला अर्ज नं.१६ए, पॅन कार्ड आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी मंचात हजर होवून आपला खुलासा दाखल केला, त्यात त्यांनी म्हटले आहे की सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत कसूर केलेली नाही. आयकर भरणे हा कायदाच आहे. रूपये १०,०००/- पेक्षा जास्त व्याज मिळत असल्यास ठेवीदाराच्या ठेवीमधून परस्पर आयकर कापने बॅंकेवर बंधनकारक असल्यामुळे सामनेवाले यांच्या विरोधात तक्रार करण्याचा तक्रारदार यांना अधिकार नाही. फॉर्म नं.१५एच हा भरणे जर आवश्यक असेल तर ठेवीदारानेच तो भरून दिला पाहिजे. जर कर कपात केली असेल तर फॉर्म नं.१६ए कलम ३१(१)(बी) हा भरणे व आयकर खात्याला पाठविणे ही जबाबदारी सामनेवाले यांची होती व आहे. नियमाप्रमाणे बॅंकेत पॅनकार्ड असल्यास दहा टक्के रक्कम कर म्हणून कापणे आणि पॅन कार्ड नसल्यास २० टक्के रक्कम आयकर म्हणून कापणे बॅंकेवर बंधनकारक आहे. तक्रारदार यांनी दि.२२/१०/२००७ रोजी फॉर्म १५एच भरलेला होता. त्यामुळे त्यांना याबाबतची माहिती नव्हती हे म्हणणे संयुक्तिक नाही. तक्रारदार यांनी केवळ गैरसमजातून खोटी तक्रार केली आहे. तक्रारदार यांना मुदतीनंतर मुदत ठेवीची रक्कम रूपये ७,१३,८१८/- मिळतील ही गोष्ट खरी आहे. मात्र त्यातून नियमाप्रमाणे आयकर कपात होत असते. त्याबाबतची सूचना ठळक जागी लावलेली आहे. त्याबाबत तक्रारदार यांना तोंडी सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारदार यांना दि.१३/१०/२०११ रोजी रूपये ७,१३,८१८/- मिळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. या बाबीचा विचार करून तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५. सामनेवाले यांनी खुलाशासोबत तक्रारदाराचा खाते उतारा दाखल केला आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांचा खुलासा, त्यासोबत त्यांनी दाखल केलेला खाते उतारा पाहता आणि उभय पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुददे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत का ? होय
- सामनेवाले यांनी सेवेत कसूर केला आहे का ? नाही
- ? अंतिम आदेशाप्रमाणे
६. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्याकडे खाते आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सोयीसाठी याच सामनेवाले यांच्याकडे मुदत ठेवीची रक्कम रूपये ५,००,०००/- ठेवली होती. ही बाब सामनेवाले यांनी कबूल केली आहे. तक्रारदार यांचे खाते होते आणि त्यांनी मुदत ठेवीची रक्कम ठेवलेली होती हे सामनेवाले यांनी नाकारलेले नाही. या मुद्याबाबत उभयपक्षात कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
७. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदत ठेवीमध्ये रूपये ५,००,०००/- ठेवले होते. मुदतीनंतर म्हणजे दि.१३/१०/२०११ रोजी या रकमेपोटी व्याजासह रूपये ७,१३,८१८/- देण्याचे लेखी आश्वासन सामनेवाले यांनी दिले होते. तथापि मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांना वरील परिपक्व रक्कम मिळाली नाही. त्याऐवजी रूपये ६,८३,१९४/- इतकी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. म्हणजे तक्रारदार यांना रूपये ३०,६२४/- एवढी रक्कम कमी मिळाली. ही रक्कम टीडीएसपोटी कपात करण्यात आल्याचे सामनेवाले यांच्यातर्फे तक्रारदार यांना कळविण्यात आले. मुदत ठेवीसाठी रक्कम ठेवतांना सामनेवाले यांनी टीडीएस कपातीची कल्पना दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. टीडीएस कपातीबाबत संपूर्णपणे माहिती देणे ही सामनेवाले यांची जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडली नाही आणि सेवेत कसूर केली, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
तक्रारदार व सामनेवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा अर्ज क्र.१६ए हा सामनेवाले यांनी परस्पर भरून पाठविला. सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशात दिलेल्या माहितीनुसार, अर्ज क्र.१६ए हा आयकराच्या परताव्यासाठी असतो. तक्रारदार यांना त्या अर्ज क्र.१६ए चा आधार घेवून त्यांची कपात झालेली टीडीएसची रक्कम आयकर विभागाकडून परत मागण्याचा अधिकार आहे असे दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट होते.
तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे की, टीडीएस किंवा आयकराची रक्कम कपात करण्याबाबत दुमत नाही. मात्र त्यासंदर्भात सामनेवाले यांनी आवश्यक आणि पुरेशी माहिती देणे गरजेचे होते. टीडीएस किंवा आयकर कपातीबाबत सामनेवाले यांनी संपूर्ण माहिती दिली पाहिजे, ही तक्रारदार यांची अपेक्षा रास्त असली तरी ती सामनेवाले यांची जबाबदारी आहे याबाबतचा कोणताही दाखला, अटी व शर्ती तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नाही. त्यामुळे टीडीएस किंवा आयकर कपातीबाबत माहिती देतांना सामनेवाले यांनी कसूर केली हे तक्रारदार सिध्द करू शकलेले नाही असे आमचे मत बनले आहे. म्हणून मुददा क्र.’ब’ चे उत्तर नाही असे देत आहोत.
८. मुद्दा ‘क’ – वरील सर्व विवेचनाचा आणि उभयपक्षाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाचा विचार करता टीडीएस आणि आयकर कपातीबाबत योग्य आणि पुरेशी माहिती देणे सामनेवाले यांच्याकडून अपेक्षित असले तरी तसे करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदार दाखल करू शकले नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सेवेतील कसुरीसाठी सामनेवाला यांना दोषी धरता येणार नाही. म्हणून न्यायाच्या दृष्टीने आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
दे श
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
-
-
(श्री.एस.एस. जोशी)(सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (श्री.एएस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.