(घोषित दि. 18.09.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचे कुटूंब मौ.नळविहरा ता.जाफ्राबाद जि.जालना येथील रहिवाशी असून शेती करुन उदरनिर्वाह करतात.
तक्रारदारांच्या पत्नी सौ.शांताबाई माधवराव पवार यांचा दिनांक 23.04.2006 रोजी अपघाती मृत्यू झाला. तक्रारदारांनी अपघातानंतर सदर घटनेची माहीती टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथे दिली असता पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर ची नोंद केली. तसेच मयताचे प्रेत पोस्टमार्टमसाठी टेंभूर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दिले असता संबंधित वैद्यकीय अधिका-यानी अहवाल दिला.
तक्रारदारांच्या पत्नी प्रवासी क्रमांक एम.एच. 21 सी - 1239 मध्ये बसून दिनांक 23.04.2006 रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. सदरील जिपचा यूनायटेड इंडीया इन्शूरन्स कंपनी लि. शाखा खामगाव यांचेकडे विमा उतरविलेला असल्यामुळे तक्रारदारांनी जालना अपघात विमा प्राधिकरण येथे दाखल केलेल्या विमा दावा क्रमांक 154/2006 निकाली झाला आहे.
तक्रारदारांनी दिनांक 12.11.2011 रोजी गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्ताव पोस्टाने पाठवला. परंतू गैरअर्जदार यांनी विलंबाच्या कारणास्तव सदर प्रस्ताव नाकारला आहेअशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीला सदर अपघाताची माहीती एन.एस.सी.नंबर 153106 या प्रकरणात झालेली असून विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारला आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झाले असून लेखी म्हणणे दिनांक 25.06.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानूसार तक्रादारांनी विमा प्रस्ताव दिनांक 01.12.2011 रोजी म्हणजेच अपघातानंतर 5 वर्षे 8 महीन्याच्या विलंबाने दाखल केला आहे. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने विलंबाच्या योग्य कारणास्तव तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नाकारला आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्या पत्नीचा दिनांक 23.04.2006 रोजी अपघाती मृत्यू झाला असून जिप क्रमांक एम.एच.21 सी – 1239 चे मालक श्री. भानूदास भोंडे यांनी वाहनाची वैयक्तीक अपघात विमा पॉलीसी 636048 दिनांक 06.03.2006 ते 05.03.2007 या कालावधीकरीता (9 + 1) प्रवासी अपघाती विमा घेतल्याचे दिसून येते. सदरील विमा पॉलीसी बाबत तक्रारदारांना माहीती असणेची शक्यता नाही. सदर जिपचे मालक श्री. भानूदास भोंडे यांनी अपघाता विषयी गैरअर्जदार विमा कंपनीला माहीती देणे आवश्यक होते. तक्रारदारांनी मोटार अपघात न्यायालयात दाखल केलेल्या विमा दावा क्रमांक 153/2006 या प्रकरणात गैरअर्जदार विमा कंपनीला सदर अपघाता विषयी माहीती मिळाल्याचे दिसून येते. तक्रारदारांना विमा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब झाला आहे. परंतू सदर पॉलीसी जिपचे मालक श्री.भानूदास भोंडे यांनी गैरअर्जदार यांचेकडून घेतलेली आहे. गैरअर्जदार यांना विमा पॉलीसी मान्य आहे, अपघात विम्याच्या कालावधीत झाला आहे. अपघाता विषयी माहीती मोटार अपघात न्यायालयात गैरअर्जदार विमा कंपनीला विहीत मूदतीत झालेली आहे. विमा प्रस्तावा करीता आवश्यक ती कागदपत्रे सदर प्रकरणात दाखल आहेत. विमा प्रस्ताव अपघातानंतर विनाविलंब दाखल करण्याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीच्या (Directory) मार्गदर्शक सूचना आहेत. परंतू बंधनकाकर (Mandatory) नाहीत. अशा परिस्थितीत गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा प्रस्ताव अयोग्यरित्या नाकारला असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार विमा कंपनीची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांना विम्याची देय रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना विमा पॉलीसीची देय रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्या पासून तीस दिवसात द्यावी.
- वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दारासहीत देण्यात यावी.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.