(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 20.09.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये अर्ज दाखल केला असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार हा ढोपटाळा येथील रहिवासी असून, वेस्टर्न कोल फिल्डमध्ये नोकरी करतो. अर्जदाराचा पगार हा गै.अ.क्र.1 कडे असलेल्या अर्जदाराचे खाते क्र.30275706597 मध्ये परस्पर जमा होतो. राजुरा येथे गै.अ.क्र. 1 चे ए.टी.एम. उपलब्ध नसल्यामुळे व गै.अ.क्र.2 चे ए.टी.एम. राजुरा येथे उपलब्ध असल्यामुळे, तसेच, गै.अ.क्र.1 चे ग्राहकांना गै.अ.क्र.2 चे ए.टी.एम. वापरण्याची मुभा आहे. अर्जदाराने, दि.10..4.2010 रोजी सकाळी 8-00 वाजताचे सुमारास गै.अ.क्र.2 चे राजुरा स्थित ए.टी.एम. मध्ये जावून पगाराची रक्कम जमा झाली आहे की नाही हे अर्जदाराला पाहिजे असल्यामुळे, त्याने ए.टी.एम. चा वापर करुन मिनी स्टेटमेंट काढले. त्यानुसार, दि.10.4.2010 रोजी अर्जदाराचे खात्या रुपये 28,157/- उपलब्ध होते. त्यानंतर, दि.12.4.2010 पुन्हा गै.अ.क्र.2 चे राजुरा येथील ए.टी.एम. मध्ये सकाळी 7-00 वाजताचे सुमारास जावून स्टेटमेंट काढले असता, दि.10.4.2010 रोजी रुपये 66,687.86 खात्यामध्ये जमा झाले अशी नोंद असलेले स्टेटमेंट अर्जदारास प्राप्त झाले. सदर स्टेटमेंटमध्ये अर्जदाराच्या खात्यामधून ए.टी.एम. मधून दि.10.4.2010 रोजी रुपये 10,000/- काढण्यात आल्याचे दर्शविलेले आहे. 2. यानंतर, अर्जदाराने गै.अ.क्र.1 कडे त्याच दिवशी जावून पासबूक मधील नोंद अद्यावत करुन घेतल्या. त्यामध्ये, पुन्हा अर्जदाराचे खात्यातून दि.12.4.2010 रोजी रुपये 3000/- काढल्याचे व रुपये 3000/- जमा केल्याची नोंद दिसून आली. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 कडे दि.10.4.2010 रोजी रुपये 10,000/- अथवा दि.12.4.2010 रोजी रुपये 2000/- खात्यातून काढले नसतांना सुध्दा तशी नोंद अथवा व्यवहार झाल्याची नोंद अशी तक्रार गै.अ.क्र.1 कडे केली. परंतु, गै.अ.क्र.1 ने, अर्जदाराच्या तोंडी तक्रारीवर दुर्लक्ष केले. त्यामुळे, अर्जदाराने दि.12.4.2010 रोजी लेखी तक्रार गै.अ.क्र.1 ला दिली. अर्जदाराने, त्याचदिवशी लेखी रिपोर्ट पोलीस स्टेशन, बल्लारपूर यांना दिली. अर्जदाराने दि.13.4.2010 रोजी गै.अ.क्र.2 ला सुध्दा लेखी तक्रार देवून खात्यातून कमी झालेले रुपये 10,000/- परत देण्याची विनंती केली. वास्तविक, रिझर्व बँकेचे नियमानुसार 12 दिवसाचे आंत गै.अ. बँकेने अर्जदाराचे खात्यातून नमूद केल्याप्रमाणे पैसे न काढता खात्यात नोंदी झाल्या असल्यास रक्कम ग्राहकाचे खात्यात जमा करायला पाहिजे. परंतु, गै.अ.ने अर्जदाराच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेता अर्जदाराचे खात्यातून दि.10.4.2010 रोजी कमी झालेली रुपये 10,000/- खात्यात वळती केले नाही, ही गै.अ.ने अवलंबलेली अनुचीत व्यापार पध्दती असून, न्युनतापूर्ण सेवा आहे. 3. गै.अ.क्र.1 ने दि.4.7.2010 ला उत्तर नोटीस पाठवून रुपये 10,000/- परत करण्यास नकार दिला. अर्जदाराने दि.10.4.2010 व 12.4.2010 रोजी ए.टी.एम. कार्ड वापरुन कोणतीही रक्कम खात्यातून काढली नाही व म्हणून 12.4.2010 रोजीची रुपये 3,000/- ची नोंद गै.अ.क्र.1 ने पुन्हा 3000/- रुपये जमा खात्यात दाखवून परत घेतली आहे. परंतु, दि.10.4.2010 ची नोंद गै.अ.क्र.1 परत करण्यास नाकारीत आहे. त्यामुळे, गै.अ.क्र.1 व 2 यांनी अर्जदारास दिलेली सेवा न्युनतापूर्ण व गै.अ.क्र.1 ने अवलंबलेली पध्दत अनुचीत व्यापार पध्दत आहे असे ठरविण्यात यावे. गै.अ.क्र.1 ने अर्जदाराचे खात्यातून दि.10.4.2010 रोजी वळती केलेले 10,000/- रुपये 18 टक्के व्याजासह अर्जदारास देण्यात यावे. दि.10.4.2010 रक्कम अर्जदाराचे पदरी पडेपावेतो रोज रुपये 100/- नुकसान भरपाई देण्यात यावी. अर्जदारास झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी व केसच्या खर्चापोटी रुपये 10,000/- देण्यात यावे. 4. अर्जदाराने नि.4 नुसार 12 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार दाखल करुन गै.अ.स नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1 ने हजर होऊन नि.13 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.10 नुसार लेखी उत्तर व नि.11 नुसार 1 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. 5. गै.अ.क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले केले की, अर्जदाराचा पगार गै.अ.क्र.1 कडे खाते क्र.30275706597 मध्ये जमा होतो, याद वाद नाही. यात शंका नाही की, गै.अ.क्र.1 ही भारताचीच नव्हेतर परदेशात सुध्दा बँकींग व्यवसाय करणारी प्रतिष्ठीत बँक असून भारतातील एक अग्रणी बँक आहे. हे म्हणणे खोटे असल्यामुळे अमान्य की, ढोपटाळा गावापासून बल्लारशा हे 10 कि.मी. अंतरावर आहे. हे म्हणणे मान्य की, गै.अ.क्र.1 चे ए.टी.एम. सेंटर राजुरा येथे उपलब्ध नाही. हे म्हणणे माहिती अभावी अमान्य की, दि.10.4.2010 रोजी, अर्जदार यांनी ए.टी.एम.चा वापर करुन मिनी स्टेटमेंट काढले. त्यानुसार, दि.10.4.2010 रोजी अर्जदाराचे खात्यात रुपये 28,157/- जमा होते. हे म्हणणे सुध्दा मान्य की, अर्जदार यांनी गै.अ.क्र.2 चे राजुरा येथील ए.टी.एम. वर जावून स्टेटमेंट काढले असता, दि.10.4.2010 रोजी रुपये 66,687.86 पैसे खात्यात जमा होते. याद वाद नाही की, अर्जदाराने खात्यातून ए.टी.एम. मधून दि.10.4.2010 रोजी रुपये 10,000/- काढल्यामुळे स्टेटमेंट मध्ये रुपये 10,000/- असल्याची नोंद आहे. हे म्हणणे मान्य की, पासबुक मध्ये दि.12.4.2010 रोजी रुपये 3000/- काढल्याचे व 3000/- पुन्हा जमा केल्याची नोंद आहे. हे म्हणणे मान्य की, दि.12.4.2010 ला गै.अ.क्र.1 कडे अर्जदाराने तक्रार केली. हे म्हणणे मान्य की, दि.16.4.2010 रोजी अर्जदाराने छापील फार्म मध्ये तक्रारी दिली. अर्जदार यांनी, स्वतः ए.टी.एम. कार्डचा वापर करुन पैसे काढल्यामुळे सदर रक्कम पुन्हा अर्जदाराचे खात्यात जमा करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. अर्जदाराने स्वतः ए.टी.एम. कार्डचा वापर करुन पैसे उचल केल्यामळे पुन्हा अर्जदारास सदर रक्कम मागण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. 6. गै.अ.क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले आहे की, खातेदाराने ए.टी.एम. कार्ड सदर मशीनमध्ये इनसर्ट केल्याशिवाय मशीन कामच करीत नाही. दि.10.4.2010 रोजी अर्जदाराने स्वतः किंवा त्यांचे मार्फत कोणीतरी सदर ए.टी.एम. कार्डचा वापर करुन त्याचे ए.टी.एम. कम डेबीट कार्ड क्र.6220180307800092305 व्दारे त्यांचे खाते क्र.30275706597 मधून 08:10:10 वाजता रुपये 10,000/- काढलेले आहेत. सदर रुपये 10,000/- ची ए.टी.एम.व्दारे उचल केल्यानंतर गै.अ.क्र.2 चे ए.टी.एम. मशीनमधून सुध्दा तेवढी रक्कम कमी झालेली आहे. अर्जदाराने जाणून-बुजून त्याचे ए.टी.एम. कार्डचा नंबर तक्रारीत नोंद केलेला नाही. तसेच, ए.टी.एम कार्डची झेरॉक्स सुध्दा दाखल केली नाही. अर्जदाराची तक्रार खोटी असून अर्जदाराने ए.टी.एम. कार्डचा वापर करुन दि.10.4.10 रोजी उचल केली असल्याने अर्जदारास पुन्हा रुपये 10,000/- परत मागण्याचा अधिकारच नाही. गै.अ.क्र.1 ने कोणतीही अनुचीत व्यापार पध्दत अवलंबलेली नाही. अर्जदाराची तकार मुळातच खोटी व बनावटी आहे. त्यामुळे तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. 7. गै.अ.क्र.2 ने अर्जदाराचे लेखी उत्तरातील बहुतांश कथन नाकबूल केले आहे. गै.अ.क्र.2 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार हा गै.अ.क्र.2 चा खातेदार नाही. तसेच, तो गै.अ.क्र.2 चा ग्राहक नाही. अर्जदराने खोट्या व बनावटी माहितीच्या आधारे मंचात खोटी तक्रार दाखल केली आहे. वास्तविक, अर्जदाराने खाते क्र.0000003027506596 मधून दि.10.4.2010 ला सकाळी 8.10 वाजता गै.अ.क्र.2 चे ए.टी.एम. मधून रुपये 10,000/- काढलेले आहे. त्याची रितसर नोंद गै.अ.क्र.2 च्या ब्रॅन्च लॉग मध्ये घेण्यात आलेली आहे. अर्जदाराने निव्वळ खोट्या व बनावटी माहितीच्या आधारे तक्रार मंचात दाखल केलेली असल्याने, गै.अ.क्र.2 विरुध्द तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. 8. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि. 14 नुसार रिजाईन्डर दाखल केले. गै.अ.क्र.1 ने नि.18 नुसार 2 व नि.22 नुसार 2 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.1 ने लेखी उत्तरातील मजकुर हा रिजॉईन्डरचा भाग समजण्यात यावे अशी पुरसीस नि.20 नुसार दाखल केली. गै.अ.क्र.2 ने नि.24 सोबत 2 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, रिजॉईन्डर शपथपञ व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 9. अर्जदार हा गै.अ.क्र.1 चा खातेदार असून, खाता क्र.30275706597 असा आहे आणि त्या खात्यावर ए.टी.एम. कार्ड सुविधा दिलेली आहे. अर्जदार डब्ल्यु.सी.एल. मध्ये नौकरीवर असून त्याचा पगार त्याचे बचत खात्यात जमा होतो, याबाबत वाद नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील वादाचा मुद्दा असा आहे की, दि.10.4.10 रोजी ए.टी.एम.व्दारे रुपये 10,000/- उचल केल्याचे गै.अ.क्र.1 यांनी त्याचे खाते उता-यात दाखविले, परंतु, प्रत्यक्षात अर्जदाराने रक्कम उचल केली नाही, तरी खात्यातील रुपये 10,000/- काढले असल्याने, ती रक्कम अर्जदारास देण्यात यावी. अर्जदाराने मागणी करुनही अवैधपणे कपात करण्यात आलेले रुपये 10,000/- गै.अ. यांनी खात्यात जमा केले नाही. 10. अर्जदाराने, दि.10.4.2010 ला सकाळी 8-08 मिनीटांनी गै.अ.क्र.2 चा ए.टी.एम.चा वापर करुन मीनी स्टेटमेंट काढला असता, खात्यात रुपये 28,157/- जमा असल्याचे स्लीप टॅक्स न.1913 प्रमाणे आहेत. अर्जदाराने पुन्हा दि.12.4.10 ला मीनी स्टेटमेंट काढला असता, त्याचे खात्यातून दि.10.4.10 रोजी ए.टी.एम व्दारे रुपये 10,000/- काढले असल्याचे आढळून आले. अर्जदाराने ती रक्कम काढलेली नसल्यामुळे लगेच गै.अ.क्र.1 ला रिपोर्ट दिला, तसेच पोलीस स्टेशन बल्लारशा येथे सुध्दा रिपोर्ट दिला. अर्जदाराने त्याच्या प्रती अ-4, अ-5 वर दाखल केलेल्या आहेत. गै.अ.क्र.1 व 2 यांच्या लेखी बयानानुसार आणि केलेल्या युक्तीवादानुसार अर्जदाराने दि.10.4.10 ला रुपये 10,000/- ए.टी.एम.व्दारे विड्राल केले, त्याची नोंद जे.पी.लॉक मध्ये 10.10 मिनीटांनी झालेली आहे. गै.अ. यांनी असा युक्तीवाद केला की, ए.टी.एम. मशीनमध्ये ए.टी.एम.कार्ड घातल्या शिवाय (Insert) मशीन काम करीत नाही. गै.अ.क्र.1 यांचे कथनानुसार रुपये 10,000/- उचल केल्यामुळे त्याची नोंद खात्यात झालेली आहे. त्यामुळे ती रक्कम देण्याचा प्रश्न येत नाही. गै.अ.क्र.1 च्या कथनानुसार असे ही, म्हणणे आहे की, मॅन्युअली इंटरफेअर करता येत नाही. गै.अ.क्र.1 चे हे म्हणणे जरी संयुक्तीक असले तरी त्यांच्याच कथनावरुन आणि अर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन ग्राह्य धरण्यास पाञ नाही. अर्जदाराने, अ-3 वर खातेपुस्तकाच्या उताराची प्रत दाखल केली आहे. सदर पुस्तकाचे अवलोकन केले असता, दि.10.4.10 ला ए.टी.एम. कार्ड क्र.6220180907800092305 या क्रमांकाच्या कार्ड व्दारे रुपये 10,000/- काढल्याचे दाखविले आहे. जरी, असे गृहीत धरले की, अर्जदाराने रुपये 10,000/- ए.टी.एम. व्दारे विड्राल केले म्हणून त्याचे खात्यातून रुपये 10,000/- कपात होऊन रुपये 18,157 शिल्लक राहील, या बाबीवरुन गै.अ.क्र.1 चे म्हणणे नुसार ग्राह्य आहे. परंतु, याचीच दूसरी बाजू अशी की, दि.12.4.10 ला अर्जदाराचे खात्यातून त्याच ए.टी.एम.क्रमांकाव्दारे रुपये 3000/- काढण्यात आले आणि परत बँकेकडून रुपये 3000/- खात्यात जमा करण्यात आले आहोत. त्यात गै.अ.क्र.1 ने नोंद घेतलेल्या आहेत, त्या खालील प्रमाणे.
दिनांक | विवरण | चेक क्र. | आहरित राशि | जमा की गई राशि | खाता शेष | संक्षिप्त हस्ताक्षर | 10.4.10 | 6220180907800092305 | | 10000 | | 18157 | | 10.4.10 | डब्ल्यु.सी.एल.ढोपताला एरीएस | | | 66687.86 | 84844.84 सीआर | | 12.4.10 | 6220180907800092305 | | 3000 | | 81844.86 सीआर | | 12.4.10 | सी.ओ.आर. सी.एस.एच. डब्ल्यु.डी.एल. | | | 3000 | 84844.86 | |
11. वरील नोंदीचे अवलोकन केले असता, दि.10.4.10 ला असे गृहीत धरले की, अर्जदाराने स्वतः ए.टी.एम. चा वापर करुन रुपये 10,000/- ची उचल केली, तसेच दि.12.4.10 ला ए.टी.एम. चा वापर करुन रुपये 3000/- ची उचल केली, तर गै.अ.क्र.1 तर्फे पुन्हा त्याच दिवशी खात्यात रुपये 3000/- सीओर सी.एस.एच. डब्ल्यु.डी.एल. अशी नोंद करुन जमा कां केले ? गै.अ. यांच्या संक्षिप्तानुसार सी.ओ.आर म्हणजे दुरुस्ती/शोधन/Correction, तर सी.एस.एच. म्हणजे रोकड/Cash विड्रावल अशी नोंद घेतलेली आहे. या बाबीवरुन, अर्जदाराने दि.12.4.2010 ला जर पैसे ए.टी.एम.व्दारे पैसे विड्राल केले आहे, तरी गै.अ.क्र.1 ने त्याचे खात्यातून विड्राल केलेले रुपये 3000/- कपात करुन पुन्हा रुपये 3000/- जमा केले आणि शेष शिल्लर रुपये 84,844/- अशी दाखविली. अर्जदाराने व्यवहार (Transaction) केला, तरी गै.अ.क्र.1 नी खात्यात कपात केलेली रक्कम पुन्हा कशी काय जमा केली, यावरुन ए.टी.एम.चा वापर मॅन्युअली इंटरफेअर करता येत नाही, या गै.अ.क्र.1 च्या म्हणण्यात तथ्य नाही. गै.अ.क्र.1 नी आपले लेखी उत्तरात हे मान्य केले आहे की, पासबुकामध्ये दि..12.4.10. रोजी ‘3000/- काढल्याचे व 3000/- पुन्हा जमा केल्याची नोंद आहे.’ गै.अ.क्र.1 यांनी रुपये 3000/- दि.12.4.10 ला नगदी जमा केल्याचे दाखविले नाही किंवा तसा व्हाऊचरही सादर केले नाही, तर गै.अ.च्या संक्षिप्तानुसार दुरुस्ती करण्यांत आलेली आहे. म्हणजेच, दि.12.4.10 ला ए.टी.एम. व्दारे पैसे न काढता नोंद होऊ शकतो, तर दि.10.4.10 कां होऊ शकत नाही ? यावरुन, एक बाब स्पष्ट होते की, जशी दि.12.4.10 ला चुकीने ए.टी.एम. व्दारे विड्राल केल्याचे नोंद होऊ शकतो, त्याचप्रमाणे दि.10.4.10 ला ही होऊ शकतो, याकरीता, गै.अ.क्र.1 व 2 हे जबाबदार आहे आणि त्यामुळेच अर्जदार रुपये 10,000/- गै.अ.क्र.1 व 2 कडून वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या मिळण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 12. अर्जदाराने, नि.15 नुसार अर्ज दाखल करुन गै.अ.क्र.2 यांनी ए.टी.एम. मशीन मध्ये वापरण्यात आलेल्या नोंदीत ए.टी.एम. रोल आणि कॅमेरातून घेतलेले ए.टी.एम. मशीनचे छायाचिञीकरण मंचात दाखल करावे, अशी मागणी केली. सदर अर्ज मंचाने मंजूर करुन जेपीएस. रोल आणि फोटो दाखल करावे, असा आदेश देण्यात आला. गै.अ.क्र.2 ला दि.8.8.2011 च्या आदेशान्वये जेपीएस. रोल आणि ए.टी.एम. छायाचिञीकरणाचे फोटो दाखल करण्याचा निर्देश देऊनही, आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे त्याचा विरुध्द अर्थ (Adverse inference) असा निघतो की, गै.अ. यांनी आपली बाजू टाळण्याकरीताच छायाचिञीकरणाचे रोल दाखल केले नाही, तसेच जेपीएस. लॉक सुध्दा दाखल केलेले नाही. गै.अ.क्र.2 च्या CCT.V. फोटो दाखल करुन सत्य परिस्थिती मंचा समक्ष आणावयास पाहिजे होते. गै.अ.क्र.2 यांनी मंचाच्या आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे अर्जदाराचे म्हणण्यानुसार दि.10.4.10 ला पैसे काढले नाहीत, या म्हणण्यात सत्यता आहे. गै.अ.क्र.1 यांनी लेखी उत्तरात असे कथन केले की, अर्जदाराने स्वतः किंवा त्याचे मार्फत ए.टी.एम. कार्डचा वापर करुन पैशाची उचल केली, हे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही. अर्जदाराने लगेच दि.12.4.10 ला पोलीस स्टेशनला रिपोर्ट देवून त्याच्या नावाने असलेल्या ए.टी.एम. चा गैरवापर होत असल्याचा आक्षेप घेतला, तसेच दि.12.4.10 ला सी.सी.टीव्ही. कॅमेरावरुन चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी मागणी केली. गै.अ.क्र.1 ला सुध्दा रिपोर्ट देवून दि.10.4.10 व 12.4.10 च्या व्यवहाराची तक्रार दिली, तरी गै.अ. यांनी अर्जदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. गै.अ.क्र.2 यांनी आपले ए.टी.एम. सी.सी.टीव्ही. कॅमेरातून वस्तुस्थिती जाणून घ्यायला पाहिजे. तसेच, गै.अ.क्र.1 यांनी शहानिशा करुन, अर्जदारास रुपये 10,000/- मिळण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक होते. अर्जदाराने ए.टी.एम. कार्ड संदर्भातील प्रिटेंड फार्ममध्ये तक्रार केली, तरी गै.अ.यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, आणि अर्जदारास समाधानकारक उत्त्र दिले नाही. या सर्व बाबीवरुन गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्यात न्युनता केली, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 13. याच आशयाचे मत, मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, केरला, तिरुवनंतपुरम यांनी एका प्रकरणात दिले आहे. त्यातील मत या प्रकरणातील बाबीला तंतोतंत लागू पडतो. त्यातील महत्वाचा भाग येणे प्रमाणे.
ATM – Banking – Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(g) – Section 2(1)(0) – An NRI Accound opened by the complainant with the appellant bank when it also issued him an ATM card enabling him to withdraw money anywhere from its ATM outlets – A sum of Rs. 50,000/- got transferred by him from another bank to the appellant bank – He and his wife went to Dubai – A total of Rs.24,700/- withdrew using the ATM card on different dates – However, thereafter he could not withdraw any money – Complaint allowed by the District Forum – Appellant bank directed to pay Rs.15,000/- as compensation to the complainant with cost of Rs.1,000/- -- Appeal – No evidence whatsoever adduced showing that the complainant withdrew rs. 70,000/- and that the computer system either failed or did not work when he went to make further withdrawals – In such a situation, with no money in his pocket and in a foreign country, undoubtedly he must have felt miserable – Opposite party apparently did nothing to render him any help to get out of it – Deficiency in service fully proved – Awarded amount of Rs. 15,000/- with cost not on the high side – Appeal dismissed. ICICI Bank –Vs.- P.V.Rajesh 2010 CTJ 598 (CP) (SCDRC) Kerala, Thiruvananthapuram वरील कारणे व निष्कर्षावरुन, गै.अ.क्र.1 व 2 यांनी सेवा देण्यात न्युनता करुन, अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या अर्जदारास रुपये 10,000/- दि.10.4.2010 पासून द.सा.द.शे.9 % व्याजाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या, अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 7000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (3) अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्यात याव्यात.
| [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |