ग्राहक क्र. 154/2014.
तक्रार दाखल ता.17/07/2014
अर्ज निकाल तारीख: 22/04/2015
कालावधी: 0 वर्षे 09 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) हणमंत काशिनाथ राठोड,
वय – 57 वर्षे, धंदा – शेती,
रा. दत्त मंदिराच्या मागे, उमरगा,
ता. उमरगा, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) शाखा व्यवस्थापक,
टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड,
एम्प्लायमेंट चौक, ढेपे हॉस्पिटल जवळ, दक्षिण सोलापूर.
2) मुख्यधिकारी / विभागीय अधिकारी,
टाटा मोटार्स फायनान्स लि.
दोस्ती पिनॅकल, युनिट नं.303, 3 रा. मजला,
प्लॉट नं. ई-7, रोड नं.22, वागळे स्टेट,
ठाणे (पश्चिम) 400604. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एन.एम. तोडकरी.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधीज्ञ : श्री.आर.ए.पिलखाने.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा
अ) विरुध्द पक्ष (विप) यांनी टाटा जीप घेण्यासाठी वित्त पुरवठा केल्या नंतर तक्रारकर्ता (तक) कडून परतफेड होतांना विप ने बेकायदेशीरपणे जास्तीची रक्कम वसूल केली ती परत मिळावी व नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक ने ही तक्रारी दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे
1) तक ला टाटा स्पेशीओ ही जीप घेण्याची होती व त्यासाठी वित्त पुरवठा पाहिजे होता. त्यामुळे तक ने वित्त पुरवठादार विप यांचेशी संपर्क साधला व वित्त पुरवठयाची मागणी केली. विप यांनी रु.3,66,600/- अर्थ सहाय्य देण्याचे मान्य केले. त्याबद्दल मे 2006 मध्ये त्यांच्यामध्ये लेखी करार झाला. कर्जाची परतफेडीपोटी पहिला हप्ता रु.12,400/- व नंतर 46 हप्ते रु.7,700/- चे देऊ करण्याचे ठरले. तक ने विप कडे 46 कोरे चेक सही करुन दिले. तक ने एम.एच. 25 ए. 2845 हे वाहन खरेदी घेतले.
2) विप ने पहिला हप्ता रु.12,400/- च्या ऐवजी रु.17,059/- परस्पर वसूल केला. तक ने सर्व चेक वटण्याची काळजी घेतली पण विप ने मुद्दाम चेक उशीरा दिले. दि.16/07/2008 रोजी रु.3,463/- ओ.डी.सी. म्हणून वसूल केले. दि.22/07/2008, दि.24/01/2008 दि.15/02/2008 या दिवशी एकदम 2 चेक बँकेत जमा केले. मार्च 2009 चा चेक फेब्रूवारी मध्ये दाखल केला त्यामुळे वटला नाही. विप ने तक कडून अधीकची रक्कम रु.8,922/- वसूल केली आहे तसेच रु.35,785/- ओव्हर डयू चार्जेस मागितले आहेत त्यामुळे तक ला बेबाकी प्रमाणपत्र नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. ते मिळण्यासाठी ही तक्रार दि.17/07/2014 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
3) तक ने तक्रारी सोबत दि.18/03/2014 ची नोटिस, रिपेमेंट शेड्यूल, चेक व डी.डी.च्या प्रती, कराराची प्रत व बँक स्टेटमेंट हजर केलेले आहे.
ब) विप ने हजर होऊन दि.02/09/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल केले गेले नाही असे म्हंटलेले आहे. योग्य प्रकारे ओव्हर डयू चार्जेस लावून तक कडून रु.56,975/- येणे आहे ते वसूल झाल्याशिवाय नाहरकत प्रमाणपत्र देता येणार नाही असे विप ने म्हंटले आहे. ही तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही असा आक्षेप घेतला आहे..
क) तक ची तक्रार त्यानी दाखल केलेले कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) ही तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचास आहे काय ? नाही.
2) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
4) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 :
1) विप क्र.1 जि. सोलापूर येथील आहे. विप क्र.2 जि.ठाणे येथील आहे. तक ने म्हंटले आहे की तो विप कडे गेला व वित्त पुरवठयाची मागणी केली म्हणजेच या मंचाच्या कार्यक्षेत्रात ही गोष्ट घडली नाही. जो करार झाला आहे तो सुध्दा या मंचाच्या कार्यक्षेत्रात झाल्याचे दिसून येत नाही. विप ने या मंचाच्या कार्यक्षेत्रात येऊन वित्त पुरवठा केला असे तक चे म्हणणे नाही व तसे संभवतपण नाही त्यामुळे ही तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार येत नाही म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देतो.
मुद्दा क्र. 2 व 3 :
2) तक ची तक्रार अशी आहे की विप ने त्याच्याकडून रु.8,922/- जास्तीचे वसूल केले. तसेच ओ.डी.सी. म्हणून रु.35,785/- ची मागणी केली. विप ने तक ला वित्त पुरवठा केला याबद्दल वाद नाही. विप ने करार हजर केला आहे. त्याप्रमाणे कर्ज रक्कम रु.3,00,000/- होती ती रक्कम 47 मासिक हप्त्यामध्ये फेडायचे होते. सुमारे चार वर्षाच्या कालावधीसाठी रु.66,600/- व्याज दयायचे होते. कारण फेडायची रक्कम रू.3,66,600/- दाखविलेली आहे. करारामध्ये पोस्ट डेटेड चेक देण्याची अट आहे ती 46 हप्त्यांसाठी असणार.
3) हे खरे आहे की बँक स्टेटमेंट मध्ये दि.16/05/2006 रोजी रु.17,859/- ची डेबीट एन्ट्री आहे पहिला हप्ता रु.12,400/- ठरलेला होता हे विप ला मान्य आहे त्यामुळे विप ने जास्तीची रक्कम घेतल्याचे दिसते. तक चे विप कडील खात्याचा उतारा हजर करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे रु.56,975/- तक कडे येणे आहे. त्यामध्ये बँक चार्जस व रिटेनर चार्जेस अंर्तभूत आहेत. मुख्य रक्कम ओव्हर डयू चार्जेस ची रु.37,050/- ची आहे. जरी विप ने चेक बँकेत देण्यास उशीर केला तरीसुध्दा हप्ता वेळेवर देण्याची तक ची जबाबदारी टळत नाही त्यामुळे तक ने जे येणे आहे ते दिलेच पाहिजे त्यामुळे विप ने सेवेत त्रुटी केली अगर तक अनुतोषास पात्र आहे असे आमचे मत नाही म्हणून आम्ही मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आादेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते
2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.