निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 27/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2013
तक्रार निकाल दिनांकः- 09/10/2013
कालावधी 07महिने. 04 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष
श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
नारायण पिता बाबुराव लबडे. अर्जदार
वय 43 वर्षे. धंदा.व्यवसाय. अॅड.ए.डी.खापरे.
रा.धनलक्ष्मी नगर, बी.रघुनाथ कॉलेज जवळ,
जिंतूर रोड, परभणी.
विरुध्द
1 शाखाधिकारी. गैरअर्जदार.
महाराष्ट्र ग्रामीण बँक,शाखा गायकवाड कॉम्प्लेक्स. अॅड.माधुरी क्षिरसागर.
क्रिडा संकुलाचे बाजुला.परभणी.
2 मुख्य शाखा व्यवस्थापक.
मुख्य कार्यालय,महाराष्ट्र ग्रामीण बॅंक,
मुख्य कार्यालय, नांदेड.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदाराने त्याच्या खात्यावर रक्कम जमा असतांना देखील त्याने दिलेला चेक न वटवताच परत करुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे पूढील प्रमाणे, अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा खातेदार असून त्याचा खाते क्रमांक 5042292388-0 असा आहे. अर्जदाराचे पूढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने बजाज फायनान्स लि. कंपनीस त्याच्या एम.एच. 22-ए.बी. – 6483 या गाडीच्या हप्त्यापोटी दिला होता, सदर चेक 16/01/2013 ला बजाज फायनान्सने गैरअर्जदार बँकेकडे चेक वटण्यासाठी पाठवला असता, गैरअर्जदार बँकेने खात्यांत अपुरे रक्कम असा शेरा देवुन चेक न वटवता परत केले. सदरची बाब बजाज फायनान्स कंपनीने तक्रारदारास कळवले व कलम 138 खाली अर्जदारावर कार्यवाही करु व वाहन जप्त करु असे सांगीतले. त्यानंतर अर्जदाराने बँकेत जावुन सदरचा प्रकार सांगीतला, पण गैरअर्जदार बँकेचे अधिकारी एकण्याच्या मनःस्थितीत नव्हते व अर्जदारास असे सांगीतले की, बँकेने बरोबर रिपोर्ट दिला आहे.
अर्जदाराचे पूढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या खात्यावर 4,136/- रुपये जमा असतांना देखील दिनांक 16/01/2013 रोजी बँकेने 2,365/- रुपयांचा चेक परत केला त्यामुळे अर्जदाराची मानहानी झाली, तसेच फायनान्स कंपनीकडे त्याची पत कमी झाली. व त्यांनी अर्जदारास वेळेत हप्ता भरला नाही म्हणून 350/- रुपये दंड आकारला. अर्जदार हा रक्तदाबाचा रुग्ण असल्यामुळे त्याला या सर्व घटनेचा मनःस्ताप झाला व त्याला दवाखान्यांत देखील जावे लागले व हे सर्व गैरअर्जदार बँकेच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहे. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास त्याला फायनान्स कंपनीने लावलेल्या दंडापोटीचे 350/- रुपये देण्याचे आदेश व्हावेत व तसेच त्याला झालेल्या मनःस्तापा बद्दल रुपये 25,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 5,000/- देण्याचे आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व तसेच नि.क्रमांक4 वर 5 कागदपत्रांच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यात बजाज अॅटो फायनान्स लि.ची पेनॉल्टीसह पावती, अकाऊंट स्टेटमेंट, पासबुक कॉपी, बँकेची पावती, स्टेटमेंट ऑफ अकाऊंट इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीसा काढण्यात आल्या. गैरअर्जदार क्रमांक 1 वकील मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 10 वर आपला लेखी जबाब दाखल केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ती खर्चासह फेटाळणे योग्य आहे. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, अर्जदाराचे त्यांचेकडे बचत खाते आहे व त्यानी अर्जदाराला चेक बुक दिले होते. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, दिनांक 09/01/2013 रोजी तक्रारदाराने त्यांचे खात्यात 2500/- रु.जमा केले होते, Axis Bank तर्फे चेक आल्यानंतर संबंधीत क्लार्कच्या नजरचुकीने व कामाच्या गडबडीत दुसरेच खाते पाहून अर्जदाराच्या खाते मध्ये अपुरी रक्कम शेरा दिला.
गैरअर्जदार क्रमांक 1 चे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदार त्यांचेकडे आल्यानंतर झालेली चुकीची कबुली दिली व नजर चुकीने झाल्याचे मान्य केले व अर्जदाराला झालेल्या दंडाची रक्कम देण्याची तयारी गैरअर्जदाराने दाखविली, परंतु अर्जदाराने बँकेत आरडा ओरड करुन आता तुम्हाला कोर्टात खेचतो म्हणून जास्तीची नुकसान भरपाई मागीतली. गैरअर्जदाराचे अर्जदाराला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा हेतु नव्हता, निव्वळ जास्त रक्कम मिळण्याच्या हेतुने अर्जदाराने ही खोटी तक्रार दाखल केली आहे. व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र दाखल केले नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांना मंचाची नोटीस तामिल होवुनही मंचासमोर गैरहजर त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराच्या खात्यात पुरेशी रक्कम
असतांना देखील अपुरी रक्कम दाखवून त्याचा चेक न वटवता
परत पाठवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 चा खातेदार आहे. ही अॅडमिटेड फॅक्ट आहे.तसेच अर्जदाराने 16/01/2013 रोजी अॅक्सीस बँके तर्फे आलेला अर्जदाराचा चेक त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम असतांना देखील गैरअर्जदार क्रमांक 1 ने खात्यात अपुरी रक्कम असे कारण दाखवुन तो चेक न वटवता परत केला, ही बाब देखील गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात मान्य केली आहे. व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे की, सदर चुक ही नजर चुकीने व गडबडीत झाली हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. सदरच्या गैरअर्जदाराच्या चुकीमुळे अर्जदारास 350/- रुपयांचा नाहक दंड भरावा लागला व यास गैरअर्जदार क्रमांक 1 जबाबदार आहेत व तसेच अर्जदाराला झालेल्यामानसिक
त्रासास गैरअर्जदार क्रमांक 1 हेच जबाबदार आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदरची चुक करुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली. अर्जदाराचे म्हणणे की, मानसिक त्रासाबद्दल 25,000/- रुपये गैरअर्जदारांनी अर्जदारास द्यावे हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण सदरची बँक ग्रामीण बँक असून त्यात पैसे सर्वसमान्य जनतेचा गुंतलेला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
रु. 350/- फक्त (अक्षरी रु. तीनशे पन्नास फक्त) अर्जदारास द्यावे
3 या खेरीज गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास झालेल्या मानसिकत्रासापोटी
रु.10,000/- फक्त ( अक्षरी रु. दहाहजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी
रु.2,000/- फक्त ( अक्षरी रु. दोनहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.