::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सदस्या कल्पना जांगडे(कुटे))
१. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
२. अर्जदार हा राजीव गांधी अभियांञीकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे नोकरी करतो. सदर महाविद्यालयाचे व्यवस्थापनाने गैरअर्जदार क्र.१ विमा कंपनीकडून आपल्या सर्व कर्मचा-यांची आरोग्य गृप विमा पॉलिसी काढली असून सदरहू विमा पॉलिसीचा क्र.२८१८०१/४६/१२/ ८५००००००५४ हा आहे. सदर गृप विमा पॉलिसीचे लाभ धारकांच्या यादीमध्ये अर्जदार व त्याचे कुटूंबाचे व्यक्तींचे नावे आहेत. गैरअर्जदार क्र.१ ने सर्व लाभ धारकांना ओळखपञे जारी केलेले आहे. या विमा पॉलिसीचा वार्षीक प्रिमीयम राजीव गांधी अभियांञीक महाविद्यालय चंद्रपूरचे व्यवस्थापन नियमीतपणे गैरअर्जदार क्र.१ कडे भरणा करते.
३. गैरअर्जदार क्र.१ विमा कंपनीने तिच्याकडे आलेल्या विमा दाव्याचा निपटारा करण्याकरीता तज्ञ अशा गैरअर्जदार क्र.३ गेनिन्स इंडिया लिमिटेड ची नियुक्ती केलेली आहे. सदर कंपनी गैरअर्जदार क्र.1 यांना विमा दावा निपटारा करण्याकरीता मदत करते. माञ, विमा दावा देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.1 यांची आहे. सदर विमा पॉलिसीबद्दल अर्जदार व तिचे कुटूंबाचे सदस्य यांचा प्रत्येकी २ लाख रुपयाचा वैद्यकीय विमा काढण्यात आलेला आहे. सदर पॉलिसी अस्तित्वात असतांना दि.२५.३.२०१३ रोजी अर्जदारास हृद्य विकाराचा झटका आल्यामुळे त्यांनी डॉ.बुक्कावार चंद्रपूर यांचेकडे उपचार घेतले व त्यांचे सल्ल्यानुसार इंन्जीओग्राफी व ईन्जीओप्लॉस्टीचे उपचार करण्याकरीता अर्जदार दि.१३.४.२०१३ रोजी गैरअर्जदार क्र.२ चे दवाखान्यात हैद्राबाद येथे भरती झाले. अर्जदाराने भरती झाल्यानंतर विमा पॉलिसी असल्याचे सांगितल्याने गैरअर्जदार क्र.२ ने गैरअर्जदार क्र.१ कडे अर्जदाराचे विमा पॉलिसी असल्याने अर्जदारावर उपचार करतांना येणा-या खर्चाची माहिती दिली. त्यानंतर गैरअर्जदार क्र.१ ने दि.१५.४.२०१३ रोजी अर्जदाराचे उपचाराकरीता गैरअर्जदार क्र.२ दवाखान्याला १ लाख रुपयाचे अधिकार दिले. गैरअर्जदार क्र.२ ला गैरअर्जदार क्र.१ कडून अधिकार प्राप्त झाल्यानंतर दि.१६.४.२०१३ रोजी अर्जदारावर ईन्जीओप्लॉस्टी करण्यात आली व दि.१७.४.२०१३ रोजी अर्जदाराला गैरअर्जदार क्र.२ ने सुट्टी दिली. अर्जदारास दवाखान्यातून सुट्टी देतांना गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास रुपये २,४८,८७६/- चे अंतरीम देयक दिले व अर्जदारास सांगीतले की, गैरअर्जदार क्र.१ ने जरी १ लाख रुपयाची मंजूरी दिली असली तरी विमा कंपनीकडून रुपये १,८५,३४४/- मंजूर झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला रुपये ६३,५३२/- भरावे लागतील, त्याप्रमाणे अर्जदाराने रुपये ६३,५३२/- चा भरणा गैरअर्जदार क्र.२ कडे केल्यानंतर त्यानी अर्जदारास सुट्टी दिली. गैरअर्जदार क्र.२ कडून अर्जदारास पाठविलेली दि.८.१०.२०१३ ची नोटीस व त्यासोबत रुपये २,४८,८७६/- चे बील प्राप्त झाले, त्यामध्ये रुपये १,०५,३४४/- ची मागणी गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास केली. यावरुन गैरअर्जदार क्र.१ ने गैरअर्जदार क्र.२ ला कमी पैसे दिल्याचे दिसते. अर्जदाराचा विमा हा २ लाख रुपयाचा असल्यामुळे व उपचाराचे बील रुपये २,४८,८७६/- असल्यामुळे गैरअर्जदार क्र.१ ची २ लाख रुपयाची जबाबदारी असून सुध्दा त्यांनी फक्त रुपये ८०,०००/- गैरअर्जदार क्र.२ ला देवून अर्जदाराप्रती अनुचीत व्यवहार पध्दतीचा अवलंब करुन सेवेत न्युनता दिली. सबब, अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
४. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेली सेवा न्युनतापूर्ण व अनुचीत व्यापार पध्दती ठरविण्यात यावी. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने गैरअर्जदार क्र.२ ला उर्वरीत विमा रक्कम अर्जदाराचे उपचारापोटी द्यावे, असा आदेश अर्जदाराकरीता गैरअर्जदार क्र.1 विरुध्द मिळण्याचा आदेश व्हावा. तसेच अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई रुपये १,००,०००/- व तक्रार खर्चापोटी रुपये १५,०००/-गैरअर्जदारांनि देण्याचा आदेश व्हावा अशी प्रार्थना केली .
५. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 हजर होवून त्यांनी नि. क्रं. १० वर आपले लेखीउत्तर दाखल केले व त्यात नमूद केले की, गैरअर्जदारास अर्जदाराचे ग्रुप विमा पॉलिसी रुपये २,००,०००/- व गैरअर्जदार क्र.१ कडे आलेल्या विमा दाव्याचा निपटारा करण्याकरीता गेनिन्स इंडिया लिमिटेड ची नियुक्ती केलेली आहे. तसेच अर्जदाराचा गैरअर्जदार क्र.२ कडे गैरअर्जदार क्र.१ ने अर्जदाराचे उपचाराकरीता गैरअर्जदार क्र.२ ला रुपये १,००,०००/- दिल्यानंतर गैरअर्जदार क्र.२ ने दि.१६.४.२०१३ रोजी अर्जदाराची इंजिओप्लॉस्टी केली, याबाबत वाद नाही. गैरअर्जदाराने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, गेनिन्स इंडिया लिमिटेडने दिलेले दस्त क्र.अ-६ हे रुपये १,००,०००/- रकमे पर्यंतचे अधिकार दिलेले आहे असे दर्शविते म्हणून सदर प्रकरणात गेनिन्स इंडिया लि. ही आवश्यक पार्टी आहे. सदर बाब अर्जदाराने सुध्दा नमूद केलेली आहे की, विमा दावा निकाली काढण्याकरीता गैरअर्जदार क्र.१ ने तज्ञाचा गेनिन्स इंडिया लिमिटेडची नियुक्ती केली आहे. परंतु अर्जदाराने गैरअर्जदार क्र.१ यांना नुकसान पोहचविण्यासाठी सदर गेनिन्स इंडिया लिमिटेडला मुद्दाम पक्ष बनविले नाही. गैरअर्जदार क्र.१ ने गेनिन्स इंडिया लि.च्या निर्देशानुसार अर्जदारास टिडीएस ची रक्कम रुपये ८०००/- कापून रुपये ७२,०००/- गैरअर्जदार क्र.२ ला दिलेले आहे. गैरअर्जदार क्र.१ ने अर्जदारा सोबत अनुचीत व्यवहार पध्दतीचा अवलंब केला नाही तसेच सेवेत न्युनता दिली नाही. सबब अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
६. गैरअर्जदार क्र.२ यांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा ते मंचासमक्ष हजर न झाल्याने नि.क्र.१ वर दि.११.८.२०१४ रोजी गैरअर्जदार क्र.२ विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
७. गैरअर्जदार क्र.३ यांना अर्जदाराने रजी.पोस्टाने नोटीस पाठवली व अर्जदाराने दि. २५.०१.२०१८ रोजी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम २८ अ अन्वये दाखल केलेल्या अर्जानुसार गैरअर्जदार क्र.३ विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
८. अर्जदाराचा तक्रारअर्ज,दस्तावेज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद, गैरअर्जदार क्र.१ यांचे लेखीउत्तर, लेखीउत्तरालाच शपथपञ समजण्यात यावे अशी नि. क्र. १५ वर पुर्सीस, लेखी युक्तीवाद आणि लेखीयुक्तीवादालाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावे अशी नि. क्र.२०वर पुर्सीस दाखल तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(१) अर्जदार गैरअर्जदारांचा ग्राहक आहे काय ? होय
(२) गैरअर्जदार क्र. १यांनी अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला होय
आहे काय ?
(३) गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय ?
(४) आदेश काय ? अंशतः मंजूर
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
९. अर्जदार हा राजीव गांधी अभियांञीकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे नोकरी करतो. सदर महाविद्यालयाचे व्यवस्थापनाने गैरअर्जदार क्र.१ विमा कंपनीकडून आपल्या सर्व कर्मचा-यांची आरोग्य गृप विमा पॉलिसी काढली असून सदरहू विमा पॉलिसीचा क्र.२८१८०१/४६/१२/ ८५००००००५४ हा असून सदर गृप विमा पॉलिसीचे लाभ धारकांच्या यादीमध्ये अर्जदार व त्याचे कुटूंबातील व्यक्तींचे नावे आहेत. गैरअर्जदार क्र.१ ने सर्व लाभ धारकांना ओळखपञे जारी केलेले आहे. या विमा पॉलिसीचा वार्षीक प्रिमीयम राजीव गांधी अभियांञीक महाविद्यालय चंद्रपूरचे व्यवस्थापन नियमीतपणे गैरअर्जदार क्र.१ कडे भरणा करते. सदर पॉलिसीचे कव्हर व ओळखपञ नि.क्र.४ वर अनुक्रमे दस्त क्र.अ-१ व अ-२ वर दाखल आहे.
गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदाराकडून आलेल्या विमा दाव्याचा निपटारा करण्याकरिता गैरअर्जदार क्र.३ यांची नियुक्ती केलेली आहे.
अर्जदार हे गैरअर्जदार क्र.२ यांचेकडे दि.१३.४.२०१३ रोजी उपचाराकरीता दवाखान्यात भरती झाल्यानंतर अर्जदाराने उपरोक्त स्वास्थ्य विमा पौलीसी असल्याचे सांगितल्यानंतर गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदाराचे उपचाराकरीता येणा-या खर्चाची माहिती गैरअर्जदार क्र.१ यांना दिली. त्यानंतर गैरअर्जदार क्र .१ यांनी गैरअर्जदार क्र.२ यांना अर्जदाराचे उपचाराकरीता अधिकार दिल्यानंतर गैरअर्जदार क्र.२ यांनी अर्जदारावर दि.१६.४.२०१३ रोजी इंजीओप्लॉस्टी केली व त्यानंतर दि.१७.४.२०१३ रोजी अर्जदारास सुट्टी दिली. या संदर्भात अर्जदाराने नि.क्र.४ वर दस्त क्र.अ-६ अधिकार पञ, अ-७ डिसचार्ज कार्ड दाखल केले आहे. दाखल दस्तावेजावरून तसेच सदर बाब ही उभय पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे हे सिध्द होते .सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. २ व ३ बाबत ः-
१०. तक्रारीत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते कि अर्जदाराचा गैरअर्जदार क्र.१ यांचेकडे रु.२,००,०००/-चा स्वास्थ्य विमा आहे व गैरअर्जदार क्र ३ यांनी गैरअर्जदार क्र. २ दवाखान्याला अर्जदाराचे उपचाराकरीता १ लाख रुपयाचे अधिकार दिले.गैरअर्जदार क्र.२ यांनी गैरअर्जदार क्र.१ कडून अधिकार प्राप्त झाल्यानंतर दि.१६.४.२०१३ रोजी अर्जदारावर ईन्जीओप्लॉस्टी केली व दि.१७.४.२०१३ रोजी अर्जदारास गैरअर्जदार क्र.२ यांनी सुट्टी दिली. अर्जदारास दवाखान्यातून सुट्टी देतांना गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास रुपये २,४८,८७६/- चे अंतरीम देयक दिले व अर्जदारास सांगीतले की, गैरअर्जदार क्र.१ ने जरी १ लाख रुपयाची मंजूरी दिली असली तरी विमा कंपनीकडून रुपये १,८५,३४४/- मंजूर झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला रुपये ६३,५३२/- भरावे लागतील, त्याप्रमाणे अर्जदाराने रुपये ६३,५३२/- चा भरणा गैरअर्जदार क्र.२ कडे केल्यानंतर त्यानी अर्जदारास सुट्टी दिली.परंतु दि.८.१०.२०१३ रोजी गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास पाठवलेल्या नोटीस सोबत रुपये २,४८,८७६/- चे बील प्राप्त झाले, त्यामध्ये रुपये १,०५,३४४/- ची मागणी गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास केली, यावरून गैरअर्जदार क्र.१ ने गैरअर्जदार क्र.२ ला कमी रक्कम दिली हे स्पष्ट होते. अर्जदाराचा विमा हा २ लाख रुपयाचा आहे व उपचाराचे बील रुपये २,४८,८७६/- असल्यामुळे गैरअर्जदार क्र.१ ची २ लाख रुपयाची जबाबदारी असून सुध्दा गैरअर्जदार क्र.१ ने गैरअर्जदार क्र.३ गेनिन्स इंडिया लि.च्या निर्देशानुसार फक्त रुपये ८०,०००/-पैकी गैरअर्जदार क्र.१ ने अर्जदारास टिडीएस ची रक्कम रुपये ८०००/- कापून म्हणजे रुपये ७२,०००/- गैरअर्जदार क्र.२ ला दिलेले आहे. परंतु गैरअर्जदार क्र.१ व ३ यांनी विमा रक्कम देताना वजा/कमी केलेली रक्कम ही पौलीसिच्या च्या अटी व शर्तीमध्ये नमूद होती व सदर कमी /वजा केलेली रक्कम ही उपरोक्त पौलीसिच्या अटी व शर्तीनुसारच केलेली आहे हे गैरअर्जदार क्र.१ व ३ यांनी दस्तावेज वा पुरावा दाखल करुन सिद्ध केले नाही. तसेच १ लाख रुपयाचे वर म्हणजे १,८५,३४४/- मंजूरी गैरअर्जदार क्र.१व ३ ने दिली नाही हे गैरअर्जदार क्र.१ व ३ यांनी दस्तावेज वा पुरावा दाखल करुन सिद्ध केले नाही. गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास रुपये २,४८,८७६/- चे अंतरीम देयक दिले व अर्जदारास सांगीतले की, गैरअर्जदार क्र.१ ने जरी १ लाख रुपयाची मंजूरी दिली असली तरी विमा कंपनीकडून रुपये १,८५,३४४/- मंजूर झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला रुपये ६३,५३२/- भरावे लागतील, त्याप्रमाणे अर्जदाराने रुपये ६३,५३२/- चा भरणा गैरअर्जदार क्र.२ कडे केला हे अर्जदाराचे तक्रारीतील कथन गैरअर्जदार क्र.२ व ३ ने तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढले नाही. त्यामुळे ते ग्राह्य धरण्या योग्य आहे.
११. गैरअर्जदार क्र.१ ने लेखी उत्तरामध्ये गेनिन्स इंडिया लि. हे आवश्यक पक्ष आहेत व अर्जदाराने त्यांना तक्रारीमध्ये पक्ष बनवले नाही, या कारणाकरिता तक्रार खारीज करण्यात यावी असा आक्षेप घेतला असला तरी अर्जदाराने तक्रारीमध्ये दुरुस्ती करुन त्यांना पक्ष बनवले असल्याने सदर वादकथन निरर्थक आहे.
१२. गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास पाठवलेल्या नोटीस सोबत रुपये २,४८,८७६/- चे बीलामध्ये रुपये १,०५,३४४/- ची मागणी गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास केली हे सदर दस्तावेजावरून सिद्ध होते. सदर बिलाची रक्कम अर्जदाराने गैरअर्जदार क्र.२ यांना दिलेली नाही अशी पुर्सीस निशाणी क्र. २० वर दाखल आहे. गैरअर्जदार क्र.१ यांनी अर्जदाराने उपरोक्त पौलीसिनुसार गैरअर्जदार क्र.२ यांचेकडे उपचार घेतल्यानंतर गैरअर्जदार क्र.१ यांनी, त्यांची सदर पौलीसिप्रमाणे रु. २,००,०००/- पर्यंतची जबाबदारी असताना सुद्धा गैरअर्जदार क्र.२ यांना पूर्ण रक्कम न देऊन अर्जदाराप्रती अनुचीत व्यवहार पध्दतीचा अवलंब करुन सेवेत न्युनता दिली हे दस्तावेजावरून सिद्ध होते असे मंचाचे मत आहे तसेच गैरअर्जदार क्र.१ यांनी सदर पौलीसिप्रमाणे रु. २,००,०००/- पर्यंतची जबाबदारी असताना सुद्धा, गैरअर्जदार क्र.२ यांना पूर्ण रक्कम न दिल्याने अर्जदारास सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करावी लागली, त्यामुळे अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रास झाल्याने अर्जदार, गैरअर्जदार क्र.१ यांचेकडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र. ०२ व ०३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
१३. मुद्दा क्र. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(१) गाहक तक्रार क्र. १३५/२०१५ अंशतः मंजूर करण्यात येते.
(२) गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदारास विमा कराराप्रमाणे ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवा सुविधा देण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
(३) गैरअर्जदार क्र. १ यांनी, अर्जदाराने, गैरअर्जदार क्र. २ कडे विमा स्वास्थ्य पालीसी अंतर्गत घेतलेल्या उपचारापोटीची उर्वरित विमा दावा रक्कम रु. १,०५,३४४/- आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसाचे आत गैरअर्जदार क्र. यांना दयावी.
(४) गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई रक्कम रु. ५०,०००/- व तक्रार खर्चाची रक्कम रु.१०,०००/- आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसाचे आत दयावी.
(५) गैरअर्जदार क्र. ३विरुद्ध कोणताही आदेश नाही .
(६) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
कल्पना जांगडे (कुटे) किर्ती वैदय (गाडगिळ) उमेश वि. जावळीकर
सदस्या सदस्या अध्यक्ष