:: नि का ल प ञ ::
( मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ मा सदस्या )
(पारीत दिनांक : 08/08/2013)
1) अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराचे संक्षेपात म्हणणे असे की, अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदाराचे वडील श्री रघुनाथ जुमनाके यांचे पेन्शनचे 6 वे वेतन आयोगानुसार दिनांक 17/10/2008 ला वाढीव रक्कम रुपये 50,497/- चा क्र 167489 असेलेला धनादेश गैरअर्जदार क्र. 1 (बॅक ऑफ महाराष्ट्र) चंद्रपूर यांच्याकडे पाठविला होता. गै.अ.क्र. 1 यांनी अर्जदाराचे वडीलाचे मृत्यु झाल्याने त्यांचे खाते बंद केले व सदर धनादेश अर्जदाराचे खाते क्र 60061872848 वर न वटविला तसेच रघुनाथ जुमनाके यांचे वारस व नॉमिनी बाबत कोणतीही चौकशी न करता सदर धनादेश गै.अ.क्र.2 चे कार्यालय प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांना परत पाठविला.
2) अर्जदाराला सहरहू धनादेश परत पाठविल्याची माहिती होताच अर्जदाराने दिनांक 02/06/2010 रोजी गै.अ.क्र. 1 यांना भेट दिली असता गै.अ.क्र. 1 यांनी गै.अ.क्र. 2 यांना अनुक्रमे दि. 02/06/2010 व दिनांक 27/07/2010. ला लेखी पञ पाठवून धनादेशाची रक्कम अर्जदाराचे नावाने नॉमिनी म्हणून देण्याची विनंती केली. त्यानुसार गै.अ.क्र. 2 यांनी त्यांचे प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाऊन्ट पेन्शन, द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी. 14 यांना पाठविले आहे. गै.अ.क्र.1 यांनी दिनांक 15/12/2012 रोजी पुन्हा पञ अर्जदाराला दिले आहे. त्यामध्ये अलाहाबाद वरुन पैसे धनादेश आल्यानंतर अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करण्यास येईल असे सांगण्यात आले आहे. परंतू बरेच कालावधी लोटून सुध्दा सदर धनादेशाची रक्कम अर्जदाराला किंवा अर्जदाराचे खात्यात जमा झाली नाही. अर्जदाराने याबाबत दिनांक 09/02/2012 रोजी लेखी पञ दिले तरी गै.अ. यांनी अर्जदाराला रक्कम मिळविण्याबाबत आवश्यक ती काळजी घेतली नाही. त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले तसेच गै.अ. कडे जाणे येणे करावे लागले म्हणून अर्जदाराने सदरहु तक्रार दाखल करुन दोन्ही गैरअर्जदार यांनी शारीरीक व मासिक ञासापोटी रक्कम रुपये 40,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- व धनादेशाची रक्कम रुपये 50,417 दिनांक 02/04/2010 पासुन द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह अर्जदारास संयुक्तपणे अथवा वेगवेगळेपणे अर्जदाराला द्यावे असा आदेश गैरअर्जदार विरुद्ध पारित करावा अशी मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्ररीच्या कथनापुष्ठार्थ निशानी क्र. 5 नुसार 14 दस्तऐवज दाखल केले आहे.
3) गैरअर्जदार क्र. 1 ला नोटीस तामिल झाल्यावर पुरेशी संधी देऊनही हजर न झाल्याने त्यांचे विरुद्ध निशानी 1 वर एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण एकतर्फा चालले. गैरअर्जदार क्र.2 ने हजर होऊन निशानी 8 प्रमाणे आपले लेखी उत्तर दाखल केले आहे.
गै.अ.क्र 2 च्या म्हणण्यानुसार अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 2 चे ग्राहक नाही तसेच नाकबुल केले की, 6 व्या वेतनआयोगाची थकीत रक्कम रुपये 50,497/- गै.अ.क्र.2 यांनी दिनांक 02/04/2010 रोजी धनादेश क्र. 167489 द्वारे गै.अ.क्र. 1 बॅक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे पाठविली होती तसेच हे सुद्धा नाकबुल केले की, गै.अ.क्र. 1 हयांनी गै.अ.क्र.2 यांना दिनांक 02/06/2010 आणि दिनांक 27/06/2010 रोजी पञे दिली. वास्तविक सदरहु पञे गै.अ.क्र. 1 हयांनी प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांना लिहिलेली आहेत व आपले विशेष कथनामध्ये नमुद केले की, अर्जदाराचे वडील रघुनाथ जुमनाके हे गै.अ.क्र.2 यांच्याकडे कार्यरत होते व दिनांक 30/06/2003 रोजी सेवानिवृत्त झाले. गै.अ.क्र. 2 यांनी कार्यप्रणालीनुसार श्री रघुनाथ जुमनाके यांच्या पेन्शनची रक्कम प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांच्याकडे मागणी व मंजूरी करीता कागदपञासह पाठविली होती व ती मंजूर केली. पेन्शन मंजूरी प्राप्त झाल्यानंतर गै.अ.क्र. 2 यांनी पेन्शनची मंजूर कागदपञे व Nomination Form A गै.अ.क्र. 1 यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचा-याला पेन्शनची रक्कम देण्याकरीता पाठविली त्या अनुषंगाने गै.अ.क्र.1 यांच्याकडे श्री रघुनाथ जुमनाके यांच्या खात्यामध्ये त्यांची पेन्शन जमा करीत होते. पेन्शन ची रक्कम देण्याची जबाबदारी गै.अ.क्र. 1 यांचेकडे होती. परंतू जुमनाके यांचे दिनांक 17/10/2008 चे मृत्युनंतर गै.अ.क्र. 1 यांनी मृतक रघुनाथ सखाराम जुमनाके यांचे वारसदारांचे नावे Form A त्यांच्याकडे उपलब्ध होता. त्यांची सहानिशा न करता त्यांचेकडे असलेली पेन्शनची जमा रक्कम त्यांनी प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांचे गै.अ.क्र. 2 यांना कुठलीही कल्पना न देता परस्पर पाठवून दिली यात गैरअर्जदार क्र. 2 चा कोणतही दोष नाही. अर्जदाराचा दि. 15/09/2011 रोजीचा अर्ज गै.अ.क्र. 2 यांना प्राप्त झाला. तेव्हा अर्जदाराला मदत करण्याच्या दृष्टीने गै.अ.क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना अनुक्रमे दिनांक 19/09/2011 व दिनांक 10/04/2012 रोजी तसेच दिनांक 09/12/2011 रोजी प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांना पञ पाठवून पेन्शनची थकीत रक्कम देण्यास विनंती केली.
गै.अ.क्र. 2ने अर्जदाराला पेन्शन ची थकीत रक्कम मिळण्यापासून वंचित ठेवले नाही अथवा त्याबाबत कोणताही दिरंगाई केली नाही तसेच गै.अ.क्र. 2 चा कोणताही संबंध राहीलेला नाही. गै.अ.क्र.1 ने शहानिशा न करता पेन्शनची संपूर्ण थकीत रक्कम प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांना पाठवून दिली. अर्जदाराने काहीही कारण नसलेला गै.अ.क्र. 2 यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली. सदरहु तक्रार नियमबाह्य व मुदतबाह्य आहे तसेच अर्जदारव गै.अ.क्र. 2 यांचा कोणताही ग्राहक व मालक असा संबंध नसल्यामुळे सदरहु तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
अर्जदाराने व गैरअर्जदार क्र. 2 ने अनुक्रमे निशानी 12 व 11 नुसार शपथपञ दाखल केले आहे. तसेच अर्जदाराने व गैरअर्जदार क्र. 2 ने अनुक्रमे निशानी 14 व 13 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गै.अ.क्र. 2 यांनी दाखल केलेले दस्तऐवज व लेखी युक्तीवादावरुन खालिल मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्यांच्या सेवेत न्युनतापूर्ण होय
व्यवहार केला आहे काय ?
2) अर्जदार मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पाञ होय
आहे काय?
3) अंतिम आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे अर्ज मंजूर.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 बाबत.
या प्रकरणात अर्जदाराचे वडील रघुनाथ जुमनाके हे गै.अ.क्र 2 चे जनरल मॅनेजर, आयुध निर्माणी चांदा यांचेकडे नोकरीस होते. आणि त्याच्या सेवानिवृत्ती लाभाची वाढीव रक्कम रुपये 50,497/- ही गै.अ.क्र.2 कडून देय होती, याबाबत गैरअर्जदाराचा आक्षेप नाही. तसेच सदर रक्कम गैरअर्जदार क्र. 2 चे कार्यालय असलेल्या प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांनी धनादेश क्र.167489 दिनांक 02/04/2010 अन्वये गै.अ.क्र. 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा तुकुम यांचेकडे रघुनाथ जुमनाके यांच्या पेन्शन खात्यात जमा करण्यासाठी पाठविला याबाबतही उभयपक्षात वाद नाही.
वरील धनादेश गै.अ.क्र. 1 ला मिळाला परंतु यापूर्वी खातेदार रघुनाथ जुमनाके हे मरण पावल्यामुळे त्याचे पेन्शन खाते गै.अ.क्र 1 ने बंद केले होते त्यामुळे त्यांनी सदरचा चेक गैरअर्जदार क्र. 2 चे कार्यालय असलेल्या प्रिन्सीपल कन्ट्रोलर डिफेन्स अकाउन्ट (पेन्शन), द्रोपदीघाट, अलाहाबाद, यु.पी.- 14 यांचेकडे परत पाठविला. गै.अ.क्र. 1 ने मय्यत रघुनाथ जुमनाके यांचे खाते बंद करण्यापूर्वी त्याच्या वारसनाची नोंद घेऊन त्यांना कळविणे आवश्यक होते परंतू त्याबाबतची कारवाई न करता आणि अर्जदारास कोणतीही माहिती न देता त्याच्या वडीलाचे खाते बंद केले व वाढीव पेन्शन ची रक्कम रुपये 50,497/- परत पाठविली. ही बाब गै.अ.क्र. 1 ने त्यांचे ग्राहक असलेल्या रघुनाथ जुमनाके यांचे वारसानप्रती सेवेतील ञुटी आहे. तसेच सदर बाब माहीत झाल्यावर अर्जदाराने गै.अ.क्र. 1 व 2 यांना चेकची परत केलेली रक्कम द्यावी म्हणून विनंती केल्यावर गै.अ.क्र. 2 यांच्या अलाहाबाद येथील कार्यालयाने सदरची रक्कम परत पाठविणे आवश्यक होते परंतु गै.अ.क्र. 2 च्या विनंती नंतरही सदर कार्यालयाने वाढीव पेन्शनची रक्कम अर्जदारास दिली नाही हा गैरअर्जदार क्र. 2 व त्याचे अलाहाबाद येथील वरीष्ठ कार्यालय त्याचे सेवक असलेल्या रघुनाथ जुमनाके यांचे वारसाप्रती असलेल्या कर्तव्यातील ञुटीपूर्ण व्यवहार आहे कारण नॉमिनी म्हणून रघुनाथ जुमनाके यांचे खात्यावर अर्जदाराचे नाव नोंदविले आहे.
वरीलप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 आणि त्यांचे अलाहाबादवरील कार्यालयाने मय्यत जुमनाके यांचे वारस असलेल्या देयक असलेली 50,497/- ची असलेली वाढीव पेन्शन दिनांक 02/04/2010 पासून देण्यास कसूर केला आहे. सदरची रक्कम देण्यास गै.अ.क्र. 1 व 2 हे संयुक्त व वैयक्तीकरित्या जबाबदार आहे म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविले आहे.
गैरअर्जदारांनी अर्जदारास देय असलेली रक्कम रुपये 50,497/- दिनांक 02/04/2010 पासून अनधिकृतरित्या रोखून ठेवली आहे म्हणून सदर रकमेवर व्याजरुपात नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पाञ आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
अर्जदाराचा अर्ज खालिल प्रमाणे मंजूर करण्यात येते.
1) अर्जदाराला गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेशाच्या दिनांकापासून 2 महिण्याचे आंत वाढीव पेन्शनची रक्कम रुपये 50,497/- दिनांक 02/04/2010 पासून अर्जदाराचे हातात रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाप्रमाणे वैकक्तीक व संयुक्तरित्या द्यावी.
2) या कारवाईचा खर्च रुपये 1,000/- गै.अ.नी अर्जदारास 2 महिन्याचे आंत द्यावा.
3) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठवावी.
चंद्रपूर
दिनांक - 08/08/2013