जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/230 प्रकरण दाखल तारीख - 09/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 14/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य महेताबखॉनपि.जीलेखॉन पठान, वय वर्षे 37 व्यवसाय ऑटो ड्रायव्हर, अर्जदार. रा.पिरबुरहाण, गल्ली नं.5, नांदेड. विरुध्द. 1. शाखा व्यवस्थापक, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक, गैरअर्जदार. बरारा टॉवर, कलामंदिर, नांदेड. 2. शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, तारासिंग मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन.कुलकर्णी. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - एकतर्फा गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.व्ही.एम.पवार. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, त्यांचे गैरअर्जदार क्र.2 यांचे बँकेत खाते असुन त्याचा क्रमांक 5927 एटीएम सुवीधेसह आहे. अर्जदारास रु.5,000/- ची गरज असल्या कारणाने त्यांनी भाग्यनगर येथील गैरअर्जदार क्र. 1 च्या एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी दि.15/06/2009 रोजी अंदाजे 8 ते 9 वाजता जाऊन प्रक्रीया पुर्ण केली केली व स्क्रिनवर नेटवर्क प्रॉब्लेम असे लिहुन आले. एटीएम खराब असल्यामुळे ते निघुन गेले त्यानंतर दि.03/07/2009 रोजी परत एटीएम मशीनद्वारे रु.100/- काढले असता रु.5,000/- कमी झाल्याचे त्यांचे लक्षात आले म्हणुन अर्जदाराने फार्म क्र.030709 ओ.ए.टी.ए. भरुन गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे तक्रार केली यानंतरही रु.5,000/- देण्याचे टाळले. अर्जदाराच्या खात्यातुन रक्कम कमी होण्यास गैरअर्जदार क्र.1 व 2 एकत्रित व संयुक्तीकरित्या जबाबदार आहेत. त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला. अर्जदाराची मागणी आहे की, खात्यातुन कमी झालेली रु.5,000/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- गैरअर्जदारांकडुन मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस पाठविण्यात आली असता, त्यांना नोटीस मिळुनही ते हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. यात अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 2 चे खातेदार असले तरी गैरअर्जदार क्र. 1 ची एटीएम मशीन बिघडल्यामुळे व गैरअर्जदार क्र.1 च्या चुकीमुळे अर्जदाराचे पैसे मिळाले नाहीत यात त्यांचा कुठलाही दोष नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी. गैरअर्जदार क्र.1 च्या एटीएम मधुन पैसे काढतांना अर्जदाराचे गैरअर्जदार क्र. 2 च्या खात्यात पुरेशी रक्कम होती. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दि.03/07/2009 रोजी लेखी अर्ज दिला. गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र. 1 ला दि.23/08/2009 रोजी पत्र देऊन तक्रार कळविले, तक्रारीसह दि.15/06/2009 रोजीचे जेपी लॉग तपासुन एटीएम त्याच दिवशी तपासले असता, त्यात रु.5,000/- जास्त निघाले असतील तर गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे ताबडतोब पाठवावे असे लेखी कळवलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 च्या वरिष्ठ कार्यालया मार्फत चौकशी होऊन दि.05/11/2009 रोजी त्यांच्या मुंबई कार्यालयाकडुन गैरअर्जदारक्र. 2 यांचेकडे अर्जदाराचे रु.5,000/- खाते क्र.5927 ला जमा झालेले आहेत. त्याबाबत खाते उतारा सोबत जोडलेले आहे. अर्जदाराने मागीतलेले व्याज व मानसिक त्रासाबद्यलचीरक्कम देण्यास गैरअर्जदार क्र. 2 हे जबाबदार नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी दि.15/07/2009 रोजी एटीएम मधुन रु.5,000/- ची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, ती निघाली नाही म्हणुन त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे तक्रार केली व त्यांनी त्यांची तक्रार गैरअर्जदार क्र. 1 ला कळविले याबाबत दि.15/06/2009 चे जेपी लॉग गैरअर्जदार क्र. 1 ने तपासले व एटीएम कॅश तपासले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे एटीएम मध्ये त्या दिवशी रु.5,000/- ची रक्कम जास्त निघाली आहे. म्हणुन त्यांनी हे प्रकरण चालू असतांना गैरअर्जदार क्र. 1 च्या मुंबई कार्यालयाने रु.5,000/- ची रक्कम दि.05/11/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे अर्जदारांच्या खाते क्र.5927 मध्ये जमा केलेली आहे, त्याबाबचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे. अर्जदारास त्यांची रक्कम वापस मिळाल्यामुळे आंता त्यांची तक्रार शिल्लक राहीलेली नाही तरी देखील तक्रार प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदाराने त्वरीत चौकशी न करता दि.05/11/2009 पर्यंत चौकशीसाठी वेळ घेतला या चौकशीसाठी थोडासा वेळ लागु शकतो. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्या एटीएमचा उपयोग केलेला आहे त्यामुळे त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी असतांना ते गप्प राहीले. एटीएम हे मॅन्युअल नसुन मशीनद्वारे ऑपरेट होतो त्यामुळे त्यांनी मुद्याम चुक केली आहे असे वाटत नाही. मशीनमधील दोषामुळे ही चुक झालेली आहे व गैरअर्जदाराने ते मान्यही केलेले आहे तरी देखील गैरअर्जदार क्र. 1 च्या चुकीमुळे अर्जदारास मानसिक त्रास झालेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व दावा खर्च रु.1,000/- द्यावे. 3. गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द आदेश नाही. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |