!रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.139/2008. तक्रार दाखल दि.4-12-2008. तक्रार निकाली दि.20-2-2009.
श्री.दामोदर जयराम सुतार. रा.आंबेवाडीनाका (तटकरे निवास) ता.रोहा, जि.रायगड. ... तक्रारदार.
विरुध्द
1. शाखाधिकारी, दि गोरेगांव को.ऑप.अर्बन बँक लि. शाखा वरसगांव, ता.रोहा, जि.रायगड. 2. जनरल मॅनेजर, दि गोरेगांव को.ऑप.बँक लि. मुख्य कार्यालय गोरेगांव, ता.माणगांव, जि.रायगड. 3. प्रशासक, दि गोरेगांव को.ऑप.बँक लि. मुख्य कार्यालय गोरेगांव, ता.माणगांव, जि.रायगड. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य तक्रारदारांतर्फे – स्वतः विरुध्दपक्षातर्फे – स्वतः - निकालपत्र - द्वारा मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस
तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातंर्गत ही तक्रार दाखल केली असून तिचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
2. सामनेवाले हे को.ऑप.अर्बन बँक असून तिची शाखा वरसगांव ता. रोहा येथे आहे. तक्रारदारांनी बँकेकडून 2/12/02 रोजी रु. एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्याची फेडही त्यांनी केलेली आहे. कर्ज घेतेवेळी तक्रारदारांना सामनेवाले यांनी काही रकमा एफ.डी. मध्ये ठेवण्यास सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी एकूण रक्कम रु. 40,000/- प्रत्येकी 20,000/- रु. प्रमाणे दोन मुदतठेवी ठेवल्या. त्यापैकी पावती क्र. 4092 दि. 5/9/08 रोजी संपणार होती व त्याची रक्कम 20,328/- होणार होती. तर दुसरी पावती क्र. 4581 दि 2/12/08 रोजी संपणार असून त्याची रक्कम रु. 20,328/- होणार होती. अशी एकूण रक्कम रु. 40,656/- त्याला ठेवपावती पोटी मुदतीनंतर मिळणार होती. तसेच त्याने रु. 2500/- चे शेअर्स बँकेकडून कर्जापोटी घेतले होते. तीही रक्कम त्यास मिळणे आवश्यक होते. यासंदर्भात त्याने बँकेला व प्रशासकांना पत्र दिले. तर त्यांनी उत्तर दिले नाही. तक्रारदार बँकेत चौकशीला गेला असता, मॅनेजरने त्यांस सांगितले की, तुमचे पैसे आम्हाला कर्ज खात्यात जमा करता येणार नाहीत. सामनेवाले हे ठेवपावतीची रक्कम देत नाहीत तसेच ती रक्कम त्यांच्या दुस-या कर्जखात्यातही वळती करीत नाहीत. परंतु कर्जखात्यावर मात्र व्याज लावीत आहेत व ठेवपावतीवर व्याज देत नाहीत. तरी याचा विचार करुन त्यांच्या तक्रारीचा विचार करावा असे त्यांचे म्हणणे आहे.
3. त्यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, जुलै 2005 च्या पुरामध्ये त्यांच्या व्यवसायाचे म्हणजेच झेरॉक्स मशिन, कॉम्प्युटरचे नुकसान झाले त्यामुळे त्यांनी 8/8/05 रोजी 75,000/- रु. कर्ज घेतले. त्यापैकी त्यांनी 25,000/- कर्ज ऑगस्ट 08 पर्यंत व्याजासह दिले व 51,534/- इतकी रककम शिल्लक आहे. तरी त्यांचे म्हणणे असे की, त्यांनी बँकेकडे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमा त्यास व्याजासह परत द्याव्यात तसेच शेअर्सची रक्कमही परत द्यावी व ही सर्व रक्कम त्याचे कर्ज खात्यावर व्याजासह जमा करावी. 4. अर्जासोबत त्यांनी आपल्या तक्रारी साठी त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच त्यांनी 9/9/08 रोजी बँकेस दिलेले पत्र, जे प्रशासक यांनी स्वीकारलेले आहे त्याची सत्यप्रत, तसेच ठेवपावत्यांच्या झेरॉक्स, शेअर्स सर्टिफिकेट, कर्ज खात्याचा उतारा, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. 5. तक्रार दाखल झाल्यावर सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. ते याकामी हजर झाले. त्यांनी आपले म्हणणे कागदपत्रांच्या यादीसह नि. 10 व 11 वर दाखल केले आहे. तसेच आपले जबानीच्या म्हणण्या प्रित्यर्थ प्रतिज्ञापत्र नि. 12 वर दाखल केले आहे. 6. सामनवाले यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांची तक्रार काही अंशी कबूल केली व ठेव खात्याची रक्कम त्यांना देण्याची नाही हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदारांनी त्यांचेकडून रक्कम 75,000/- चे 29/6/06 रोजी हायर पर्चेस कर्ज घेतले असून 30/11/08 पर्यंत 52,935/- अधिक व्याज इतकी रक्कम त्यांचेकडून येणे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने 1/12/08 पासून त्यांचा बँकींग परवाना रद्द केला व सहकार आयुक्त पुणे यांनी 10/12/08 रोजी आदेश काढून बँक अवसायनात काढली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने 5/11/07 रोजी आदेश देऊन ठेवी परत करण्यावर निर्बंध घातले व रु. 1,000/- पर्यंत ठेवी परत करण्याचे आदेश दिले. तसेच संचालक मंडळही बरखास्त केले आहे. 7. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने तसेच बँक अवसायनात काढण्याचा आदेश असल्यामुळे भागभांडवल परत करता येणार नाही परंतु रक्कम रु. 1,00,000/- पर्यंतच्या ठेवींस विमा संरक्षण असल्याने त्या परत करता येतील. असे त्यांनी म्हणणे दाखल केले व तसेच त्यांनी ठेव खात्याची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करु शकतो व कर्ज खाते बंद करु शकतो असे म्हटले आहे.
8. याकामी, उभयपक्षांमध्ये बोलणी होऊन सामनेवालेंनी तक्रारदारांच्या ठेवीची रक्कम रु. 40,656/- देण्याचे मान्य केले व त्याबाबत नि. 14 वर लेखी म्हणणे दाखल केले. परंतु तक्रारदारांकडून हायर पर्चेस कर्ज खाते क्र. 40 च्या पोटी येणे रककम रु. 52,235.60/- इतकी येणे आहे. त्यातून त्यांची ठेव रककम वजा केली असता रु. 11579.60/- इतकी रक्कम तक्रारदारांकडून त्यांना देय लागते. ही रक्कम त्यांनी दरमहा रु. 1200/- प्रमाणे मासिक हप्ता देऊन 11 महिने पूर्ण करावे व कर्जापोटी राहिलेली रक्कम रोख दिल्यास ते कर्जखाते बंद करु शकतात असाही त्यांनी पर्याय सुचविला व जोपर्यंत विमा कंपनीकडून ठेवीची रक्कम प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्ज रकमेवर बँक व्याज आकारणार असे त्यांनी लिहून दिले. याप्रमाणे तक्रारदारांना त्यांनी तडजोडीचा प्रस्ताव दिला. यावर नि. 15 अन्वये तक्रारदारांनी म्हणणे देऊन असे कळविले की, त्याची ठेवीची रक्कम कर्जखात्यात वळती करण्यास हरकत नाही व तक्रार निकाली काढावी. त्यासोबत त्यांनी असेही म्हटले की, त्यांच्या ठेवपावतीवर मुदत संपल्यापासून त्यांना व्याज द्यावे. सोबत त्यांनी 9/9/08 रोजीचे पत्र जे बँकेस त्यांनी दिले होते ते त्यांनी दाखल केले व त्यांचे म्हणणे असे आले की, त्यांनी 9/9/08 रोजीच बँकेस ठेवपावतीच्या रकमा कर्जखात्यापोटी वर्ग करण्यास सांगितल्या होत्या. त्यामुळे त्याचे व्याज त्यास मिळणे आवश्यक आहे. 9. याबाबत बँकेचे असे म्हणणे की, त्यांनी पावत्या रिन्यू करुन घेतल्या नसल्याने त्यास व्याज देता येणार नाही. 10. याबाबत उभयपक्षकारांचे युक्तीवाद ऐकले. बँकेने ज्यावेळी ठेवपावतीची मुदत संपली त्यावेळी 8 टक्के हा व्याजदर चालू होता असे सांगितले. मंचाचे मते, तक्रारदारांनी 9/9/08 रोजीच म्हणजेच एका पावतीची रक्कम संपल्यावर 4 दिवसांत व दुस-या पावतीची मुदत संपायच्या 3 महिने आधीच ठेवपावतीची रक्कम कर्जखात्यात वर्ग करण्यास कळविले होते. तशी पोच कागदपत्रांत दिसून येत आहे. बँकेने तसे न केल्याने ती बँकेची चूक आहे. त्यामुळे त्यांच्या ठेवपावतीची मुदत संपल्यापासून त्यास 8 टक्के प्रमाणे व्याजाची रक्कम मिळावी असे मंचाचे मत आहे. सबब, सामनेवालेंनी त्यांच्या ठेवपावतीच्या रकमा 40,656/- त्याचे कर्ज खात्यात वर्ग करावी तसेच ते वर्ग करेपर्यंत मुदत संपल्याच्या तारखेपासून त्या दोन्ही पावत्यांवर दरमहा 8 टक्के प्रमाणे व्याजही द्यावे व सर्व मिळून रक्कम कर्जखात्यात वर्ग करावी. उर्वरित बँकेची येणे रक्कम तक्रारदाराकडून समान 11 महिन्यांत व्याजासह वसूल करावी. असा आदेश पारीत करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
11. सबब, हे मंच याकामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे. - अंतिम आदेश - अ. सामनेवालेंना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांच्या दोन्ही ठेवपावत्यांवर मुदत संपल्यापासून 8 टक्के प्रमाणे व्याज द्यावे. तसेच ही व्याजाची रक्कम त्यांनी कबूल केलेल्या रकमेत म्हणजेच 40,656/- (रु.चाळीस हजार सहाशे छपन्न मात्र) मध्ये मिळवून तक्रारदारांच्या हायर पर्चेस कर्ज खाते क्र. 40 मधून म्हणजेच देय रक्कम रु. 52,235.60/-(रु.बावन्न हजार दोनशे पस्तीस पैसे साठ मात्र) मधून वजा करावी व उर्वरित येणे रक्कम तक्रारदारांकडून समान 11 महिन्यांत व्याजासह वसूल करावी. ब. तक्रारदारांस असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी कर्जखात्याची वरीलप्रमाणे वजावट करुन येणारी देय रक्कम समान 11 महिन्यांत व्याजासह सामनेवालेंना द्यावी. क. उभयपक्षकारांनी आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेच्या 45 दिवसांचे आत करावे. ड. खर्चाबाबत कोणतेही आदेश करण्यात येत नाही. इ. या आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना पाठविण्यात याव्यात. दिनांक :- 20/2/2009. ठिकाण :- रायगड – अलिबाग. ( भास्कर मो .कानिटकर ) ( आर.डी.म्हेत्रस ) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Shri B.M.Kanitkar | |