(घोषित दि. 16.01.2015 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदार यांनी त्यांचे अर्जात असे नमुद केले आहे की, अर्जदार हे अकोलादेव ता.जाफ्राबाद जि.जालना येथील रहिवशी आहेत. अर्जदार यांनी शेती अंतर्गत दुग्ध व्यवसाय सुरु केला आहे. सदर व्यवसायाकरीता त्यांनी म्हशी विकत घेतल्या आहेत. अर्जदार यांनी सदर म्हशींचा गैरअर्जदार यांचेकडे विमा घेतलेला आहे. ज्याचा पॉलीसी क्रमांक 231202/47/11/01/00001106 असा असुन, पॉलीसी कालावधी दिनांक 16.01.2012 ते 15.01.2015 पर्यंत आहे. सदर पॉलीसी अन्वये अर्जदार यांनी रुपये 30,000/- चा अपघाती विमा घेतलेला होता. दिनांक 30.09.2014 रोजी अर्जदार यांच्या शेतातील गोठयामध्ये म्हशीला सर्पदंश झाल्याचे अर्जदार यांचे लक्षात आले. अर्जदार यांनी तात्काळ पशुधन विकास अधिकारी यांना मृत म्हशी बाबत कल्पना दिली व दिनांक 01.10.2014 रोजी विमा कंपनीला कळविल्यानंतर व विमा कंपनी यांचे निर्देशानुसार म्हशीचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनामध्ये म्हशीच्या कानाला असलेला गैरअर्जदार यांनी दिलेला टॅग (बिल्ला क्रमांक) युआयआय 231202-32432 हा असताना त्याची एक साईड म्हशीच्या कानातून तुटली. सदर तुटलेला टॅग तुटलेल्या बाजुसह पशुधन विकास अधिकारी यांनी दिनांक 10.10.2014 रोजी गैरअर्जदार यांना दिलेला आहे.
दिनांक 10.10.2014 रोजी पशुधन विकास अधिकारी यांचे मार्फत पशु विम्याचे दावा पत्र, व्हेटर्नरी सर्फीफिकेट, शवविच्छेदन अहवाल, म्हशीचे मुल्यमापन प्रमाणपत्र, पंचनामा, विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत, टॅग क्रमांक 231202-32432, मृत जनावराचे फोटो व शवविच्छेदन सेवा शुल्क पावतीसह दिनांक 10.10.2014 रोजी गैरअर्जदार विमा कंपनी यांचेकडे दाखल केला आहे. परंतु गैरअर्जदार हे विमा दावा देण्यास टाळाटाळ करीत होते व दिनांक 10.11.2014 रोजी म्हशीचा टॅग तुटलेला असल्याने विमा कंपनी यांनी विमा दावा देण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जदार यांनी विद्यमान मंचामध्ये तक्रार दाखल केली असुन त्यांनी विमा रक्कम, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व खर्चापोटी रुपये 5,000/- असे एकुण रुपये 45,000/- ची मागणी अर्जदार यांनी केली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाने नोटीस बजावली असता गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब नि.09 वर दाखल केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार यांच्या म्हशीचा विमा पॉलीसी क्रमांक 231202/47/11/01/00001106 दिनांक 16.01.2012 हा त्यांनी काढला असल्याची बाब त्यांना मान्य आहे. परंतु अर्जदाराने विमा दावा दाखल करतेवेळी अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील पॉलीसीच्या करारानुसार अट क्रमांक 6 मध्ये नमुद केल्या प्रमाणे अर्जदाराने सदर विमा दाव्या सोबत म्हशीच्या कानातील बिल्ला क्रमांक युआयआय 231202/32432 हा गैरअर्जदार यांना पुरविणे आवश्यक होते. परंतु अर्जदाराने सदरचा विमा दाव्यासोबत सदर बिल्ला गैरअर्जदार यांना पुरविला नाही. त्यामुळे पॉलीसी करारातील अट क्रमांक 6 चा भंग अर्जदाराने केलेला आहे. त्यामुळे अर्जदाराच्या मयत म्हशीचा विमा दावा गैरअर्जदार यांनी नाकारला आहे.
तक्रारदारांच्या वतीने अॅड पी.एम.परिहार व गैरअर्जदारांच्या वतीने अॅड संदीप देशपांडे यांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्र व दोनही पक्षाच्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे का ? होय
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाचा व दाखल कागदपत्रांचा विचार केला असता असे दिसुन येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे त्यांच्या म्हशीचा विमा पॉलीसी क्रमांक 231202/47/11/01/00001106 दिनांक 16.01.2012 हा त्यांनी काढला असल्याची बाब त्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या नि.04 वरील दस्तऐवजावरुन दिसुन येते. त्याच प्रमाणे अर्जदार याची म्हैस दिनांक 30.09.2014 रोजी सर्पदंश झाल्याने मयत झाली. त्यानंतर अर्जदार यांनी सदर बाब पशुधन विकास अधिकारी, जाफ्राबाद यांना कळविली. त्यानंतर दिनांक 01.10.2014 रोजी सदर म्हशीचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनामध्ये म्हशीच्या कानाला असलेला गैरअर्जदार यांनी दिलेला टॅग (बिल्ला क्रमांक) युआयआय 231202-32432 हा असताना त्याची एक साईड म्हशीच्या कानातून तुटली. सदर तुटलेला टॅग तुटलेल्या बाजुसह पशुधन विकास अधिकारी यांनी दिनांक 10.10.2014 रोजी गैरअर्जदार यांना दिलेली आहे. सदर बाब पशुधन विकास अधिकारी यांनी गैरअर्जदार विमा कंपनीला पाठविलेल्या पत्र क्रमांक जाक्र/तालपसचि जा/पशुविमा/133/2014 नुसार दिलेल्या पत्रावरुन दिसुन येते. त्याच प्रमाणे सदर पत्रासोबत सहपत्र म्हणून क्रमांक 7 वर बिल्ला क्रमांक युआयआय 231202 हा सुध्दा दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे व सदर पत्रावर गैरअर्जदार यांची पोहोच घेतलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी म्हशीच्या कानातील बिल्ला क्रमांक युआयआय 231202-32432 हा दिलेला नाही व त्या कारणाने अर्जदार यांचा विमा दावा नाकारला आहे, या म्हणण्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून येत नाही. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देऊन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदारास त्याच्या मयत म्हशीच्या विमा दाव्याची रक्कम रुपये 30,000/- (अक्षरी रुपये तिस हजार फक्त) द्यावेत.
- गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदारास नुकसान भरपाई पोटी रुपये 3,000/- (अक्षरी रुपये तिन हजार फक्त) व तक्रार खर्चा पोटी रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
- आदेश क्रमांक 1 व 2 चे पालन सदर आदेशा पासून 45 दिवसाचे आत करावे, न केल्यास वरील रकमेवर तक्रारदारास रक्कम हातात मिळेपर्यंत 9 टक्के व्याज दराने पैसे द्यावेत.