निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 23/11/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/11/2012
तक्रार निकाल दिनांकः- 24/09/2013
कालावधी 09 महिने. 29 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
राजकुमार पिता नारायणराव शिंदे. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.पी.एम.कुलकर्णी.
रा.दत्त नगर, परभणी. ता.जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. अॅड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्यागाडीचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा दत्त नगर, परभणी येथील रहिवासी असून क्रुजर जिप क्रमांक एम.एच.-22 –एन- 4074 मालक आहे. व सदरच्या जिपचा विमा अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे विमाकृत केला होता, ज्याचा कालावधी 23/07/2010 ते 22/07/2011 असा होता. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 10/06/2011 रोजी सुखासिंग बावरी यांचे पुतण्याचे लग्न आर्वी ता.जि. वर्धा येथे असल्याने अर्जदार व सुखासिंग हे जवळचे मित्र असल्याने अर्जदार याने सदर लग्न कार्यामध्ये सुखासिंगच्या मैत्रीमुळे त्यांच्या घरच्या नातेवाईकाना घेवुन रात्री परभणी येथून निघाले. सदर जिप हिंगोली अकोला रोडवर असतांना रोडवर एक ट्रक ज्याचा क्रमांक एम.पी.09 –एच.एफ.-7954 बेजबाबदारपणे गाडीची पार्किंग लाईट चालू न ठेवता रस्त्यामध्ये उभे केले असल्यामुळे व सदरचे ट्रक अर्जदाराच्या जिपच्या ड्रायव्हरला न दिसल्याने अर्जदाराच्या जिपने ट्रकला पाठी मागून धडक दिली व त्यास अर्जदाराच्या गाडीचे बरेच नुकसान झाले. सदर घटने बाबत ताबडतोब पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामिण येथे फिर्याद दिली व गैरअर्जदारांना सदर घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर गैरअर्जदाराने सदर जिपची पाहणी करण्याकरीता सुनिल परळीकर सर्व्हेअर यांची नियुक्ती केली व सर्व्हेअरच्या सांगण्या नुसार सदर जिप श्री संत मोटर्स परभणी येथे दुरुस्त करण्यासाठी लावली. अर्जदाराने सदर वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना, वाहन दुरुस्तीचा खर्च रु.1,25,000/- इत्यादी कागदपत्रे ताबडतोब गैरअर्जदार यांना सोपवण्यात आले व गैरअर्जदाराने सदर जिपची नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल, असे कळवले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 03/09/2012 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास पत्र पाठवुन कळवले की, घटनेच्या वेळी सदर जिपमध्ये पैसे घेवुन वाहतुक केली असल्याने आपला नुकसान भरपाई दावा नामंजूर करण्यात येत आहे. असे कळवले, अर्जदाराचे या पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदार व सुखासिंग बावरी यांच्या मध्ये मैत्रीचे नाते होते व लग्न कार्यासाठी अर्जदार हा सुखासिंग यांच्या नातेवाईकांना घेवुन स्वतः गाडी चालवत होता. अर्जदाराने कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले नाही व अर्जदार हा त्याचे वाहन त्याच्या वैयक्तिक कार्यासाठी वापरत होते व कोठल्याही प्रकारची प्रवासी वाहतुक करीत नव्हते, गैरअर्जदाराने अयोग्य कारण दाखवून 15 महिन्याने अर्जदाराचा दावा फेटाळला. म्हणून अर्जदारास सदरची तक्रार मंचासमोर दाखल करण्यास भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश व्हावा की, गैरअर्जदाराने वाहन नुकसान भरपाई विमा अंतर्गत अर्जदारास रु. 1,25,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह घटनेच्या तारखे पासून देण्यात यावे. त्याच प्रमाणे मानसिकत्रासा बद्दल रु.25,000/- व दाव्याच्या खर्चा बद्दल रु.10,000/- अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अशी मंचास विनंती केली आहे.
नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये रेप्युडेशन लेटर, एफ.आय.आर.ची झेरॉक्स प्रत, स्पॉट पंचनामा, पॉलिसीची प्रत, ऑफिस लेटर, कॉपी ऑफ नोटीस रिप्लाय ई.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना मंचातर्फे लेखी निवेदन सादर करण्यासाठी नोटीसा काढण्यात आल्यावर, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 13 वर आपला लेखी निवेदन सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व सी.पी.अॅक्ट 1986 अंतर्गत सदरची तक्रार चालू शकत नाही व खारीज होणे योग्य आहे व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरच्या अपघाता दिवशी अर्जदाराचे जिप एम.एच. -22- एन- 4074 ही अवैधरित्या प्रवासी भाडे घेवुन वाहतुक करीत होती, व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे सदरचे वाहन जर भाडेपोटी वापरले तर विमा धारकास विमा क्लेम करण्याचा कोणताही एक अधिकार नाही. असे स्पष्ट नियम असतांना गैरअर्जदार विमा कंपनीने सदरील नियमा नुसार 03/09/2012 रोजी नो क्लेम म्हणून सदरची फाईल बंद केली होती व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदर गाडीच्या अपघाची माहिती दिल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने गव्हर्नमेंट सर्व्हेअरची नियुक्ती करुन सदरच्या जिपची पाहणी केली व त्यामध्ये 99,000/- चे नुकसान झाले असे म्हंटले आहे व सदर अपघाताच्या वेळी अवैध प्रवासी वाहतुक करीत असल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या गाडीचा अपघात विमा दावा फेटाळला व योग्य कारण दाखवूनच फेटाळला गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मंचास विनंती केली आहे.
नि.क्रमांक 14 वर गैरअर्जदाराने आपला शपथपत्र दाखल केलेला आहे. तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 15 वर 7 कागदपत्रांच्या यादीसह 7 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये एफ.आय.आर. ची प्रत, चार्जशिटची प्रत, बिलचेक रिपोर्ट, इनव्हेस्टीगेशन रिपोर्ट, राजकुमार शिंदे यांचे जबाब, सुरजित सिंग यांचे जबाब, रेप्युडेशन लेटर, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मालकीचे जिप क्रमांक
एम.एच.-22 –एन- 4074 या जिपचा अपघात विमादावा
फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा क्रुजर जिप क्रमांकएम.एच.-22 –एन- 4074 चा मालक होता ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. व सदरची जिप अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती व सदरचा विमा कालावधी 23/07/2010 ते 22/07/2011 पर्यंत वैध होता, ही बाब नि.क्रमांक 5/4 वरील दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होते, अर्जदाराची जिप क्रमांक एम.एच.-22 – एन- 4074 चा दिनांक 10/06/2011 रोजी संध्याकाळी 10.30 वाजता हिंगोली वसमत रोडवर अपघात झाला होता, ही बाब नि.क्रमांक 5/2 वरील दाखल केलेल्या एफ.आय.आर. च्या प्रतवरुन सिध्द होते, व तसेच सदरच्या अपघाता दिवशी अर्जदाराच्या वाहनाचा विमा कालावधी वैध होता ही बाब नि.क्रमांक 5/4 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते, तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराच्या गाडीचा अपघात विमादावा नाकारला होता ही बाब नि.क्रमांक 5/1 वरील दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते, सदरचा अर्जदाराचा अपघात विमादावा गैरअर्जदार विमा कंपनीने अपघाताच्या वेळी अर्जदाराने प्रवासी भाडे घेवुन वाहतुक केली व पॉलिसीच्या नियमांचा भंग केला, म्हणून नो क्लेम असे रिमार्क देवुन नाकारला ही बाब देखील नि.क्रमांक 5/1 वरील दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते, तसेच सदरच्या अपघाता मध्ये अर्जदाराच्या गाडीचे 99,000/- चे नुकसान झाले होते ही बाब देखील गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 13 वरील आपले लेखी जबाबात मान्य केले आहे,परंतु गैरअर्जदारानेच दाखल केलेल्या नि.क्रमांक 15 वरील मनोहर रामनारायणजी तोतला ( सर्व्हेअर अॅंड लॉस असेसर ) यांचे बिलचेक रिपोर्ट मेमो पाहिले असता अर्जदाराच्या गाडीचे नुकसान 99,000/- रुपयाचे झाले होते हे सिध्द होते. म्हणून अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या गाडीचे सदरच्या अपघता मध्ये रु.1,25,000/- चे नुकसान झाले होते हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. व त्याबद्दल अर्जदाराने कोणताही कागदोपत्री पुरावा मंचा समोर आणला नाही. अर्जदार निश्चित त्याच्या मालकीच्या गाडीचा अपघात विमादावा रक्कम रु. 99,000/- गैरअर्जदाराकडून मिळणेस पात्र आहे. व सदरची रक्कम गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिली आहे. गैरअर्जदार यांचे म्हणणे की, अर्जदाराने त्याची जिप अपघाता वेळी Hire & reward साठी वापरली होती हे मंचास योग्य वाटत नाही, कारण त्या बद्दलचा कोणताही सबळ पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर आणला नाही. तसेच Investigator ने दाखल केलेल्या Investigation Report मध्ये घेतलेल्या जबानीत देखील Contraversial statements आहेत.तसेच मा.राष्ट्रीय आयोगाने Revision petition No. 648/8 मध्ये New India assurance co. V/s Chandulal & Others या मध्ये असे म्हंटले आहे की, retired police Officer हे शपथेवर जबानी घेण्यास सक्षम नाहीत. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास रु.99,000/-
फक्त (अक्षरी रु.नव्यान्नऊ हजार फक्त ) द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.5,000/- फक्त
(अक्षरी रु.पाचहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- फक्त
(अक्षरी रु.दोनहजार फक्त) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.