निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/11/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/11/2012
तक्रार निकाल दिनांकः- 25/09/2013
कालावधी 09 महिने. 30 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अनुसयाबाई भ्र.विश्वनाथराव कदम. अर्जदार
वय 55 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.पी.एम.कुलकर्णी.
रा.भिसेगांव,ता.सोनपेठ,जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. अॅड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मयत मुलाचा जिप क्रमांक एम.एच.-22 यु.-0032 चा अपघात विमादावा प्रस्ताव नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार ही मयत गजानन विश्वनाथराव कदम यांची आई असून मयत गजानन हा क्रुझर जिप क्रमांक एम.एच.-22 यु.-0032 चा मालक होता सदर जिप ही गैरअर्जदाराकडे दिनांक 23/09/2010 ते 22/09/2011 पर्यंतच्या कालावधी करीता विमाकृत केली होती.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 19/02/2011 रोजी मयत गजानन सदर जीप घेवुन परभणी – पाथरी रोडने जात असताना मौजे पेडगाव शिवरात गाडी आली असता अचानक एका अज्ञात वाहनाने सदर जिपला पाठी मागुन धडकल्याने वाहन चालकाचा वाहना वरील ताबा सुटला व वाहन रोडखाली उतरुन रोडच्या बाजुला झाडाला जावुन धडक दिली व अपघात झाला व अर्जदाराच्या जिपचे बरचसे नुकसान झाले. त्यानंतर सदर घटनेची माहिती गैरअर्जदाराना ताबडतोब देण्यात आली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदारास सदर अपघाता बद्दल माहिती मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने सर्व्हेअरची नेमणुक केली व संबंधीत सर्व्हेअरने घटनास्थळावर वाहनाची तपासणी केली व अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सांगणेवरुन सदर जिप मे,साई मोटार्स परभणी येथे दुरुस्ती करण्यासाठी लावले व अर्जदार यांनी सदर वाहनाचे सर्व कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना, वाहन दुरुस्तीचा खर्च रु. 41,100/- ई. कागदपत्रे ताबडतोब गैरअर्जदाराना सोपविण्यात आले त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास जिपची नुकसान भरपाई रक्कम लवकरच देण्यात येईल असे कळविले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने अपघात नुकसान भरपाई बाबत गैरअर्जदारास अनेक वेळा विचारणा केली असता वारंवार वेगवेगळी कारणे देवुन टाळाटाळ करण्यात आली. अर्जदाराचा मुलगा दिनांक 26/11/2011 रोजी मयत झाला. ही बाब गैरअर्जदारांना कळविण्यात आली, व त्यानंतर अचानक दिनांक 02/07/2012 रोजी गैरअर्जदाराने, अर्जदारास जिप चालवण्याचा परवाना आर.सी.बुक व वाहन दुरुस्तीहचे बील न दिल्याने आपला नुकसान भरपाई दावा नामंजूर करण्यात येते असे कळविले.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, ड्रायव्हींग लायसेंस व आर.सी.बुकची कागदपत्रे प्रस्ताव दाखल करते वेळी दिले होते, व वाहन दुरुस्तीची माहिती अर्जदार यांना नाही व ती केवळ मयत गजानन यांना माहिती होती त्यामुळे गैरअर्जदाराने केलेल्या वाहन तपासणी नुसार 41,100/- देण्यात यावे.व तसेच अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने जाणुन बुजून आवश्यक नसलेल्या कागदपत्रांची मागणी करुन अर्जदाराचा अपघात दावा फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यास अर्जदारास भाग पाडले. व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश करावे की, वाहन नुकसान भरपाई अंतर्गत गैरअर्जदाराने अर्जदारास 41,100/- रु द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह घटनेच्या तारखे पासुन द्यावेत. व तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- व दाव्याच्या खर्चा पोटी 5,000/- अर्जदारास गैरअर्जदाराने देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 5 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये विमा कंपनीचे अपघात दावा नाकारल्याचे पत्र, आर.सी.बुक, पॉलिसीची प्रत, ड्रायव्हींग लायसेंसची प्रत, अर्जदाराने गैरअर्जदारास कायदेशिर नोटीसीची ऑफीस प्रत व गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले उत्तर कागदपत्रे दाखल केली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना लेखी म्हणणे सादर करण्याकरीता नोटीसा काढण्यात आल्या.गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार केस ही खोटी व बनावटी आहे व ती खर्चासह खारीज होणे योग्य आहे.गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचा मयत मुलगा नामे गजानन विश्वनाथ कदम जो की, जीप क्रमांक एम.एच.-22 यु.-0032 चा मालक आहे.त्याने सदरच्या जिपची अपघाताची माहिती गैरअर्जदारास दिल्यावर गैरअर्जदाराने सर्व्हेअरची नियुक्ती केली व सर्व्हेअरने सदर गाडीचा स्पॉट सर्व्हे केला व त्यानंतर सदर जिपच्या दुरुस्तीसाठी साई मोटार्सकडे नेले व सर्व्हेअर डि.एस. नलबलवार यांनी फायनल सर्व्हे रिपोर्ट तयार केला व त्यात त्याने सदर जिपची अपघातात 41,100/- रु.नुकसान झाले म्हंटले आहे. त्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 09/09/2011 व 13/03/2012 ला अर्जदारास ड्रायव्हींग लायसेंस, आर.सी.बुक, व दुरुस्तीचे बिल दाखल करण्यास सांगीतले, परंतु अर्जदाराच्या मुलाने ते दाखल केले नाही, म्हणून शेवटी 28/03/2012 रोजी विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम नो क्लेम म्हणून नाकारला. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा गाडीचा अपघात विमा नाकारला आहे व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदाराने आपले लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदाराने नि.क्रमांक 17 वर 5 कागदपत्रांच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये सर्व्हेअर रिपोर्टचा अहवाल, गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 09/09/2011 रोजी पाठवलेले पत्र, गैरअर्जदाराने अर्जदारास 13/03/2012 रोजी पाठवलेले पत्र व दिनांक 28/03/2012 रोजीचे रेप्युडेशन लेटर, ई.कागदपत्रे दाखल केले आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मुलाची जिप नं.एम.एच.-22 यु.-0032
चा अपघात विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचा मुलगा मयत नामे गजानन विश्वानाथ कदम हा जिप क्रमांकएम.एच.-22 यु.-0032 चा मालक होता. ही बाब नि.क्रमांक 5/2 वरील दाखल केलेल्या आर.सी.बुकच्या प्रतीवरुन सिध्द होते.सदरच्या जिपचा विमा अर्जदाराच्या मुलाने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती व ज्याचा कालावधी 23/09/2010 ते 22/09/2011 पर्यंत होता ही बाब नि.क्रमांक 5/3 वर दाखल केलेल्या विमा पॉलिसीच्या प्रत वरुन सिध्द होते. सदरच्या जिपचा अपघात विमा कालावधी मध्ये झाला होता ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे.
अर्जदाराच्या मुलाच्या सदरचा जिपचा अपघात नुकसान दावा गैरअर्जदाराकडे अर्जदाराने दाखल केला होता. व तो दावा गैरअर्जदार विमा कंपनीने फेटाळला होता ही बाब नि.क्रमांक 5/1 व नि.क्रमांक 17/6 वर दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते.गैरअर्जदाराने अर्जदारास सदर जिपचे आर.सी.बुक व ड्रायव्हींग लायसेंस व बिलाचे कागदपत्रे मागणी केली होती व ती अर्जदाराने त्याची पुर्तता न केल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा गाडीचा अपघात विमा दावा फेटाळला होता ही बाब देखील नि. क्रमांक 17/6 वर दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते. अर्जदाराने सदर कागदपत्रां पैकी आर.सी.बुक व ड्रायव्हींग लायसेंस मंचासमोर दाखल केली आहेत. व ती नि.क्रमांक 5 वर आहेत.व अर्जदाराचे म्हणणे की बिलाच्या पावती बाबत त्याच्या मयत मुलासच माहिती असले कारणाने ती सादर करु शकत नाही व ही बाब खरी आहे असे मंचास वाटते. गैरअर्जदाराने अर्जदाराचा गाडीचा अपघात विमा सदर गाडीचे कागदपत्र व बिलाची मागणी करुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. कारण गैरअर्जदाराने स्वतः त्याच्या लेखी जबाबात मान्य केले आहे की, सदरच्या जिपची अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्व्हेअर नियुक्त केला व त्याच्या फायनल रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराच्या जिपचे 41,100/- रु.चे नुकसान झाले आहे.त्यामुळे गैरअर्जदाराने परत अर्जदारास बिलाची मागणी करणे योग्य नाही. व अर्जदाराचा गाडीचा अपघात विमा फेटाळणे हे नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे. निश्चितच अर्जदार सदर जिपचा अपघात दावा नुकसान भरपाई रक्कम रु. 41,100/- गैरअर्जदाराकडून मिळणेस पात्र आहे.यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास विमादावा फेटाळून मानसिक त्रास दिला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास रुपये 41,100/- फक्त (अक्षरी रु.एकेचाळीसहजार
एकशे फक्त) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत द्यावेत.
3 मानसिक त्रासापोटी रु.10,000/- फक्त (अक्षरी रु.दहाहजार फक्त) व तक्रार अर्ज
खर्चापोटी रु.2,000/- फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त) गैरअर्जदाराने अर्जदारास
आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.