(घोषित दि. 28.03.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी आकाश अॅटो, धुळे यांचे मार्फत एम.एच.18 टी.सी. 90 ही गाडी 7,20,000/- किंमतीला खरेदी केली. त्यासाठी दि चिखली अर्बन को.ऑप. बॅंक यांचेकडून 3,00,000/- रुपयाचे कर्ज घेतले. वरील गाडीचा विमा तक्रारदारांनी दिनांक 04.10.2011 ते 03.10.2012 या कालावधीसाठी गैरअर्जदार युनायटेड इन्शुरन्स कंपनी, धुळे यांच्या कार्यालयात काढला. सदरच्या गाडीला आर.टी.ओ ऑफीस, धुळे यांनी तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर दिनांक 31.10.2011 रोजी गाडीला एम.एच. 21 व्ही. 4347 हा क्रमांक आर.टी.ओ जालना यांनी दिला.
दिनांक 31.12.2011 रोजी रात्री गाडीला अंबड जवळ अपघात झाला. या अपघाता बाबत दिनांक 01.01.2012 रोजी पोलीस स्टेशन, तालुका जालना येथे फिर्याद देण्यात आली. गैरअर्जदारांचे सर्वेक्षक श्री.नाकाडे यांनी दिनांक 02.01.2012 रोजी तसेच औरंगाबादचे सर्वेक्षक श्री.अय्यर यांनी दिनांक 24.01.2012 रोजी सर्वेक्षण केले. गैरअर्जदारांनी दिनांक 05.04.2012 रोजी गाडी 2,00,000/- किंमतीत प्रज्ञा देशपांडे, औरंगाबाद यांना विकली त्याचे पैसे गैरअर्जदारांनी तक्रारदारांना दिले.
तक्रारदारांनी गाडीचे पुर्ण नुकसान मिळावे म्हणून गैरअर्जदारांच्या देवपूर, धुळे शाखेला पत्र दिले. परंतू अद्याप पावेतो तक्रारदारांना विमा रक्कम मिळालेली नाही म्हणून त्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे. या अंतर्गत ते रुपये 5,20,000/- व त्यावरील व्याज मागत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत चिखली अर्बन बॅंकेचा खाते उतारा, विमा पॉलीसीची प्रत, गाडीच्या खरेदीची व नोंदणीची कागदपत्रे, सौ.प्रज्ञा देशपांडे यांनी दिलेली पावती, वाहन चालकाचा परवाना इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांच्या लेखी जबाबानुसार सदर तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. कारण धुळे येथील गैरअर्जदारांच्या शाखेला प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नाही. विमा पॉलीसी अंतर्गत वाहनाची विमा रक्कम 6,66,580/- अशी आहे. तसेच सर्वेक्षकाने केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार गाडीचे नुकसान Repair basis नुसार रुपये 5,49,279/- एवढे झालेले आहे. तर गाडीची सॅलव्हेज कॉस्ट म्हणून सलीम खान अकोला यांनी 2,80,000/- देवू केली होती. त्यानुसार गैरअर्जदारांनी खालील प्रमाणे हिशोब केला.
IDV | Rs. 6,66,580/- |
Less Excess | Rs. 500/- |
Less Salvage | Rs. 2,80,000/- |
Net Payable | Rs. 3,86,080/- |
Rounded up to Rs. 3,86,000/- |
आणि त्यानुसार तक्रारदारांना 3,86,880/- रुपये दिले. तक्रारदारांनी सॅलव्हेज कॉस्ट म्हणून सौ.प्रज्ञा देशपांडे यांचेकडून रुपये 2,00,000/- स्विकारले. त्याची पावती मंचात दाखल आहे. म्हणजेच तक्रारदारांना एकूण 5,86,880/- रुपये एवढी रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे या घटनेत गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.
तक्रारदारांनी जालना येथील गैरअर्जदारांच्या शाखेला प्रतिपक्ष केले त्यांचा यात काही संबंध नसतांना देखील गैरअर्जदारांनी वरील प्रमाणे नुकसान भरपाई तक्रारदारांना दिलेली आहे. म्हणून तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी. तसेच गैरअर्जदार यांच्या जालना शाखेला अनावश्यक प्रतिपक्ष केले म्हणून त्यांना दंड लावण्यात यावा.
गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत श्री.अय्यर यांचा सर्वे रिपोर्ट, श्री.नाकाडे यांचा सर्वे रिपोर्ट, अपघातग्रस्त गाडीची छायाचित्रे गैरअर्जदारांनी तक्रारदारांना रुपये 3,86,000/- दिल्याची पावती, दावा मंजूरीचे पत्र इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदारांनी नि.15 अन्वये गैरअर्जदार यांच्या धुळे शाखेला प्रतिपक्ष करण्याचा अर्ज दिला. तो मंजूर करण्यात आला. प्रतिपक्ष 2 मंचा समोर हजर झाले व त्यांनी प्रतिपक्ष 1 ने दाखल केलेला जबाब हाच आमचा जबाब समजण्यात यावा अशी पुर्सीस दिली.
तक्रारदारांतर्फे अॅड.व्दा.बा.मंत्री व गैअरर्जदारांतर्फे अॅड.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील गोष्टी दिसतात.
तक्रारदारांच्या गाडीचा दिनांक 31.12.2011 रोजी अपघात झाला. त्यानंतर दिनांक 08.01.2012 रोजी श्री.नाकाडे यांनी स्पॉट सर्वे केला. तर दिनांक 17.03.2012 रोजी श्री.अय्यर यांनी अंतिम सर्वे केला. श्री.अय्यर यांच्या अहवालानुसार गाडीच्या नुकसानीचे त्यांनी एकूण 5,49,279.50 असे मुल्यांकन काढले आहे.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या पावतीनुसार त्यांनी स्वखुशीने त्यांची गाडी रुपये 2,00,000/- या किंमतीला औरंगाबाद येथील सौ.प्रज्ञा देशपांडे यांना विकलेली दिसते.
दाखल कागदपत्राचे अवलोकन करता तक्रारदारांच्या गाडीचे सर्वेक्षकाने केलेले मुल्यांकन रुपये 5,49,279.50 असे होते. तक्रारदारांना दिनांक 05.10.2012 रोजी 3,86,880/- एवढी रक्कम तर रुपये 2,00,000/- दिनांक 05.04.2012 रोजी मिळालेली आहे. म्हणजेच तक्रारदारांनी एकूण 5,86,880/- एवढी रक्कम मिळालेली दिसते. तक्रारदारांना सर्वेक्षकाच्या अहवालाच्या मुल्यांकनापेक्षा अधिक रक्कम मिळालेली आहे.
तक्रारदारांच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार गाडीची I.D.Value 6,66,580/- असतांना व गाडीचे पुर्ण नुकसान झालेले असतांना त्यांना वरील संपूर्ण रक्कम मिळाली पाहीजे. तसेच तक्रारदारांनी रुपये 3,86,880/- हे उशीराने दिल्यामुळे त्यावरील व्याजही मिळाले पाहीजे. परंतू सर्वेक्षक श्री.अय्यर यांनी सविस्तर सर्वेक्षण अहवाल दाखल केला आहे. त्या अहवालाला आव्हान देणारा कोणताही पुरावा मंचा समोर नाही. त्यामुळे मंच सर्वेक्षण अहवालावर विश्वास ठेवत आहे. तक्रारदारांच्या गाडीला दिनांक 31.12.2011 रोजी अपघात झाला. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली. त्यात गाडीची पॉलीसी गैरअर्जदार यांच्या धुळे शाखेत काढलेली असतांना धुळे शाखेला प्रतिपक्ष केलेले नव्हते. केवळ गैरअर्जदारांच्या जालना शाखेलाच प्रतिपक्ष करण्यात आले होते. गैरअर्जदारांचा लेखी जबाब आल्यानंतर दुरुस्ती करुन गैरअर्जदारांच्या धुळे शाखेला प्रतिपक्ष करण्यात आले. तरी देखील गैरअर्जदारांनी त्यांना वरील प्रमाणे विमा रक्कम अदा केली आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यायच्या सेवेत काहीही कमतरता केलेली नाही. म्हणून तक्रारदार उपरोक्त विमा रकमेवर व्याज मिळण्यास पात्र नाहीत असे मंचाचे मत आहे.
सर्वेक्षकाने केलेल्या अहवाला नुसार गाडीच्या नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना प्राप्त झालेली असल्यामुळे प्रस्तुत तक्रार नामंजूर करणे न्याय्य ठरेल असा निष्कर्ष मंच काढत आहे.
मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.