(घोषित दि. 18.09.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचे पती श्री. नरसिंग रुपसिंग काकरवाल हे शेतकरी असून दिनांक 05.05.2010 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. सदर अपघाताची माहीती करमाड पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर ची नोंद केली. मयताचे प्रेत पोस्टमार्टमसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवले, संबंधित वैद्यकीय अधिका-यानी पोस्टमार्टम अहवाल दिला.
तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव तालूका कृषी अधिकारी अंबड यांचे मार्फत चुकीने दि न्यु इंडिया इशोरन्स कंपनीकडे पाठवला. सदरील विमा प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे गैरअर्जदार 2 यांनी पाठवला नाही. त्यामुळे तक्रारदारांना नूकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 25.06.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासहीत प्राप्त झालेला नाही.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 2 हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 26.04.2012 रोजीच्या पत्रान्वये दाखल केले आहे. गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी गैरअर्जदार 2 यांचेकडे विमा प्रस्ताव दिनांक 01.08.2011 रोजी दाखल केला असून गैरअर्जदार 2 यांनी दिनांक 16.08.2011 रोजी सदर प्रस्ताव डेक्कन इन्शुरन्स अण्ड रि इन्शुरन्स प्रा.लि. यांचेकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठवला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचे यूक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पतीच्या मृत्यूनंतर नूकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजेने अंतर्गत विमा प्रस्ताव तक्रारदारांनी दिनांक 01.08.2011 रोजी आवश्यक कागदपत्रासहीत दाखल केल्याचे दिसून येते. तसेच गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव दिनांक 01.08.2011 रोजी प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करीता डेक्कन इन्शूरन्स कंपनीकडे दिनांक 16.08.2011 रोजी पाठवला. सदर योजने अंतर्गत असलेल्या शासनाच्या परिपत्रकानूसार डेक्कन इन्शूरन्स कंपनीने संबंधित विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीच्या दिनांक 05.09.2011 रोजीच्या पत्रानूसार सदरचा प्रस्ताव त्यांचेकडे पाठवल्याचे दिसून येते. अपघाताच्या कालावधीमध्ये न्यू इंडीया इन्शुरन्स कंपनीचा शासनाबरोबर विमा करार झालेला नसल्यामूळे त्यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नाकारला. तक्रारदारांचा कोणताही दोष नसूनही गैरअर्जदार विमा कंपनीकडे प्रस्ताव न पाठविल्यामूळे विमा प्रस्ताव नामंजूर झाल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते.
सदर प्रकरणात डेक्कन इन्शूरन्स कंपनीला पार्टी केलेले नाही, त्यामुळे सदरचा प्रस्ताव न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीकडे का पाठवला ? या बाबत खूलासा होत नाही.
तसेच तक्रारदारांचा विमा प्रस्ताव योग्य त्या विमा कंपनीकडे म्हणजेच गैरअर्जदार 1 यांचेकडे डेक्कन इन्शूरन्स कंपनीने का पाठवला नाही ? या बाबतही खूलासा होत नाही. तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत असलेल्या शासनाच्या परिपत्रकातील निर्देशानूसार गैरअर्जदार 2 यांचेकडे विहीत मुदतीत व आवश्यक कागदपत्रासहीत विमा प्रस्ताव दाखल केला आहे. परंतू सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे प्राप्त न झाल्यामूळे प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही होवू शकली नाही. अशा परिस्थितीत विलंबाचा तांत्रिक मुद्दा वगळून तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे पूढील कार्यवाहीस्तव पाठवणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नूकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासहीत गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात दाखल करावा.
- गैरअर्जदार 1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा विमा प्रस्ताव विलंबाचा तांत्रिक मुद्दा वगळून दाखल करुन घेवून विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसाचे आत गुणवत्तेवर निकाली करावा.