निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/02/2014
तक्रार नोदणी दिनांकः- 14/02/2014 तक्रार निकाल दिनांकः- 13/05/2014
कालावधी 02 महिने. 29 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आदर्श पिता प्रदिप गोलेच्छा, अर्जदार
वय 25 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.पी.एम.कुलकर्णी.
रा. वसमत ता. वसमत जि.हिंगोली.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. अॅड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्पलेक्स, स्टेशन रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा वाहन अपघात भरपाईचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा वसमत येथील रहिवाशी असून त्याच्याकडे त्याच्या मालकीचा एक टँकर आहे. ज्याचा क्रमांक MH-38-0078 असा आहे. सदर टँकरवर अर्जदाराचा उदरनिर्वाह चालतो. अर्जदाराने सदरचे टँकर गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केला आहे. व सदर विम्याचा कालावधी 31/07/2010 ते 30/07/2011 पर्यंत वैध होता व विम्याचा क्रमांक 230601/31/10/01/00004205 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरचा टँकर दिनांक 02/07/2011 रोजी सदर टँकर मध्ये डिझेल भरण्यासाठी सोलापूरला जात असतांना परभणी गंगाखेड रोडवर दैठना गावाच्या शिवारात आले असता, समोरुन एक वाहन भरधाव वेगात येवुन अर्जदाराच्या टँकरला कट मारले, त्यामुळे टँकर बाजुला घेत असतांना सदरचा टँकर पलटी झाला व अपघात झाला सदर अपघातात अर्जदाराच्या टँकरचे भरपूर नुकसान झाले व सदर अपघाताची घटना ही समोरुन आलेल्या वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने घटना घडली.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघाता बाबत अर्जदाराने पोलीस ठाणे दैठणा येथे माहिती दिली व तसेच गैरअर्जदाराना सदर घटनेची माहिती ताबडतोब दिली.
अर्जदाराचे म्हणणे की, अपघाता बद्दल विमा कंपनीस माहिती दिल्यानंतर विमा कंपनीने सदर वाहनाची पाहणी करणे करीता सर्व्हेअर म्हणून श्री. रज्जाक शेख यांची नेमणुक केली व अर्जदाराने सदरचा टँकर दुरुस्तीसाठी गॅरेजवर लावले, त्यानंतर विमा कंपनीने श्री.गोविंद उत्तरवार यांचेकडून वाहनाचा अंतीम सर्व्हे केला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर वाहनाची सर्व कागदपत्रे, ड्रायव्हींग लायसेंस, वाहन दुरुस्तीचे अंदाज खर्च, इ. कागदपत्रे विमा कंपनीकडे दिली व सदर वाहन दुरुस्तीसाठी अर्जदारास 1,50,000/- खर्चा बद्दल विमा कंपनीस अंदाज पत्रक देण्यात आले.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने सदरचे वाहन दुरुस्त करुन घेतल्यानंतर वाहन दुरुस्तीचे मुळ बिले, विमा कंपनीस दिल्यानंतर वाहन नुकसान भरपाईसाठी चौकशी केली असता, लवकरच नुकसान भरपाई देण्यात येईल. असे सांगीतले, अर्जदार हा दिनांक 15/01/2014 रोजी विमा कंपनीकडे गेले असता, त्यास दिनांक 28/03/2012 चे पत्राव्दारे आवश्यक कागदपत्रे न दिल्याने आपला क्लेम नामंजूर करण्यात आले, असे अर्जदारास कळविले, परंतु सदरचे विमा कंपनीचे पत्र अर्जदारास मिळाले नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने क्लेमफॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडलेली होती व विमा कंपनीने मुद्दामहून टाळाटाळ करण्यासाठी चुकीचे कारण दाखवुन विमादावा नामंजूर करुन विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार विमा कंपनीस असा आदेश द्यावा की, अर्जदाराच्या सदर वाहन नुकसान भरपाई पोटी 1,50,000/- रु. द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे घटनेच्या तारखे पासून अर्जदारास द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 5 कागदपत्राच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये घटनास्थळ पंचनामा, विम्याची प्रत, वाहन नोंदणी प्रत, ड्रायव्हींग लायसेंस, विमा कंपनीचे पत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्य आहे. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराकडून त्याच्या टँकरची MH-38-0078 च्या अपघाता बद्दल आम्हास माहिती मिळाल्यानंतर विमा कंपनीने ताबडतोब Govt. Surveyor म्हणून वाहनाची पाहणी करणे करीता श्री. गोविंद उत्तरवार यांना नियूक्त केले होते. व Final and Bill check Report प्रमाणे अर्जदाराच्या वाहनाचे 86,400/- रु. चे नुकसान झाले होते, परंतु अर्जदाराने सदर टँकर वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसेंस विमा कंपनीकडे दाखल न केलेमुळे व तसेच इतर आवश्यक ती कागदपत्रे सादर न केलेमुळे विमा कंपनीने दिनांक 28/03/2012 च्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला व ते पॉलिसीच्या नियम व अटी प्रमाणे योग्यच आहे. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ विमा कंपनीने नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 15 वर 1 कागदपत्राच्या यादीसह 1 कागदपत्र दाखल केली आहे. ज्यामध्ये Final Bill Check Report ची प्रत आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचे टँकर क्रमांक
MH-38-0078 चे वाहन अपघातात झालेली नुकसान भरपाई
देण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा टॅंकर क्रमांक MH-38-0078 चा मालक आहे. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमाक 4/3 वरील आर.सी.बुकच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराने सदरचा टॅंकर गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केला होता, व सदर विम्याचा कालावधी 31/07/2010 ते 30/07/2011 पर्यंत वैध होता व पॉलिसी क्रमांक 230601/31/10/01/00004205 असा होता, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराचे सदर टँकरचा दिनांक 02/07/2011 रोजी परभणी गंगाखेड रोड वरील दैठणा शिवारात सुरेश खंडेराव कुलकर्णी यांचे शेताजवळ पलटी होवुन अपघात झाला होता. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/1 वरील दैठणा पोलीस ठाणेच्या क्राईम नं. 6/11 च्या घटनास्थळ पंचनाम्याच्या प्रतीवरुन सिध्द होते.
तसेस अर्जदाराच्या सदर टँकरचा अपघात पॉलिसीच्या वैध कालावधी मध्ये झाला होता, ही बाब देखील सदर कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या सदर टँकरच्या अपघाता वेळी सदरचे टँकर प्रदीप बाबुराव पटणे हे चालवत होते. ही बाब देखील नि.क्रमांक 4/1 वरील घटनास्थळ पंचनाम्याच्या प्रतीवरुन दिसून येते. सदर वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसेंस अर्जदाराने मंचासमोर नि.क्रमांक 4/4 वर पुरावा म्हणून दाखल केला आहे. सदर ड्रायव्हींग लायसेंस मंचाने अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, सदर वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसेंस Hazardous चे 09/07/2011 पर्यंत वैध होते. म्हणजेच अपघाता दिवशी वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसेंस वैध होते.
अर्जदाराने सदर वाहनाचे अपघातात झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीकडे Claim दाखल केल्यानंतर विमा कंपनीने 28/03/2012 च्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा No Claim म्हणून बंद केला होता व बंद करण्याचे कारण अर्जदाराने कागदपत्राची पुर्तता केली नाही, असे दर्शविले होते. ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील विमा कंपनीच्या पत्रावरुन सिध्द होते. याबाबत अर्जदाराने मंचासमोर येवुन परत एकदा सांगीतले की, विम्यादाव्या सोबत सर्व आवश्यक ती कागदपत्रे त्यांनी जोडली होती. तसेच अर्जदाराने परत एकदा सर्वच कागदपत्रे मंचासमोर दाखल केली आहेत. व तसेच अर्जदाराने मंचासमोर येवुन म्हंटले आहे की, विमा कंपनीने सदरचे पत्र अर्जदारास पाठविले नाही. याबाबत विमा कंपनीने अर्जदारास सदरचे कागदपत्र पाठवले होते. याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा विमा कंपनीने मंचासमोर आणला नाही यावरुन हे सिध्द होते की, विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा चुकीचे कारण दाखवुन No Claim म्हणून बंद केला होता. हे सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघाता मध्ये त्याच्या वाहनाचे 1,50,000/- चे नुकसान झाले होते, हे मंचास योग्य वाटत नाही. कारण याबाबत अर्जदाराने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. याबाबत विमा कंपनीचे लेखी जबाबात म्हणणे की, अर्जदाराकडून त्याच्या वाहनाची अपघाता बद्दल विमा कंपनीस माहिती मिळाल्यानंतर विमा कंपनीने सर्व्हेअर म्हणून गोविंद उत्तरवार यांची नियुक्ती केली होती व सर्व्हेअरच्या Final Bill Check Report प्रमाणे अर्जदाराच्या वाहनाचे 86,400/- रु. चे नुकसान झाले होते व सदरची बाब गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या नि.क्रमांक 15 वरील Final Bill Check Report च्या प्रतीवरुन सिध्द होते. असे असतांनाही विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवुन अर्जदाराचा विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन व No Claim म्हणून बंद करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराचे
टँकर क्रमांक MH-38-0078 चे अपघातात झालेली वाहन नुकसान भरपाई
म्हणून रु. 86,400/- फक्त ( अक्षरी रु. शहाएैंशीहजार चारशे फक्त )
अर्जदारास द्यावेत.
3 गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 1,000/- फक्त (अक्षरी रु. एकहजार
फक्त ) आदेश मुदतीत अर्जदारास द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.