जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 545/2010.
तक्रार दाखल दिनांक : 17/09/2010.
तक्रार आदेश दिनांक : 01/08/2013. निकाल कालावधी: 02 वर्षे 10 महिने 15 दिवस
श्री. वलीअहमद पाचूभाई शेख (मयत) यांचे कायदेशीर वारसदार :-
(1) जहिराबी वलीअहमद शेख, वय 66 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. 355, बेगमपेठ, सोलापूर.
(2) म. इक्बाल वलीअहमद शेख, वय 52 वर्षे,
व्यवसाय : अगरबत्ती व्यवसायिक.
(3) शौकतअली वलीअहमद शेख, वय 50 वर्षे,
व्यवसाय : अगरबत्ती व्यवसायिक.
(4) म. हनिफ वलीअहमद शेख, वय 48 वर्षे,
व्यवसाय : अगरबत्ती व्यवसायिक.
(5) अकबरअली वलीअहमद शेख, वय 38 वर्षे,
व्यवसाय : अगरबत्ती व्यवसायिक.
(6) अब्बास वलीअहमद शेख, वय 36 वर्षे,
व्यवसाय : अगरबत्ती व्यवसायिक.
(7) मौलाअली वलीअहमद शेख, वय 34 वर्षे,
व्यवसाय : अगरबत्ती व्यवसायिक.
(8) अल्तापअली वलीअहमद शेख, वय 30 वर्षे,
व्यवसाय : अगरबत्ती व्यवसायिक,
सर्व रा. 355, बेगमपेठ, सोलापूर्. तक्रारदार
विरुध्द
(1) शाखाधिकारी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.,
शाखा जैन बोर्डींग कॉम्प्लेक्स, बाळीवेस, सोलापूर.
(2) शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा : ट्रेझरी,
114, शेळके चेंबर्स, सिध्देश्वर पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एम. कोनापुरे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : जी.एच. कुलकर्णी
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.एन. देशपांडे
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे तक्रारदार यांचे चालू खाते असून त्यांच्याकडून तक्रारदार यांच्या अगरबत्ती तयार करणे व विक्री करण्याच्या व्यवसाय/दुकानाचा विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विमा उतरविण्यात येतो. त्याप्रमाणे तक्रारदार यांच्या दुकानाचा विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दि.7/2/2009 ते 6/2/2010 कालावधीसाठी स्टॅन्डर्ड फायर अॅन्ड स्पेशन पेरिल्स पॉलिसी क्र.161201/11/08/11/00001154 अन्वये रु.1,00,000/- चा विमा उतरविण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या व्यवसायाचे ठिकाण (दुकान) अनेक वर्षापासून घर नं. 26, बेगम पेठ, सोलापूर येथे आहे आणि व्यवसायाशी निगडीत असलेला माल त्यांचे गोडाऊन असलेल्या म्यु. घर नं. 60, खोली नं. 17, सिध्देश्वर पेठ, सोलापूर येथे आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी पूर्वीपासून आजतागायत त्यांचे गोडाऊन असलेल्या म्यु. घर नं. 60, खोली नं. 17, सिध्देश्वर पेठ, सोलापूर करिता विमा उतरविलेला आहे. दि.8/12/2009 रोजी मध्यरात्री त्यांच्या अगरबत्ती गोडाऊनला आग लागली आणि त्यांचा रु.2,00,000/- चा माल पुर्णत: जळून खाक झाला. त्याबाबत पोलीस पंचनामा करण्यात येऊन विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नियुक्त केलेले सर्व्हेअर श्री. एस.एस. मंगळुरे यांनी घटनास्थळाचा सर्व्हे केला आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या सूचनेप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करुन विमा दावा मंजूर करण्याची विनंती केली असता पॉलिसीमध्ये नमूद न केलेल्या मिळकतीमध्ये आग लागलेली असल्यामुळे विमा रक्कम देय नसल्याचे कळविले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे अगरबत्ती मालाच्या नुकसान भरपाईपोटी रु.2,00,000/- व्याजासह मिळण्यासह मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांचे कथनानुसार तक्रारदार हे ‘ग्राहक’ नाहीत व त्यांच्यामध्ये ‘ग्राहक विवाद’ नाही. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. तक्रारीमध्ये सखोल पुरावा येणे असल्यामुळे दिवाणी न्यायालयापुढे तक्रार चालू शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार वहीदभाई पी. शेख यांचे नांवे व विरुध्द पक्ष क्र.2 मार्फत दि.7/2/2009 ते 6/2/2010 कालावधीकरिता रु.1,00,000/- ची विमा पॉलिसी 26, बेगमपेठ, सोलापूर येथे स्थित दुकानाकरिता उतरविलेली होती. सदर पॉलिसी त्यामध्ये नमूद अटी व शर्तीस अधीन राहून निर्गमित करण्यात आलेली आहे. दि.9/12/2009 रोजी आगीमुळे नुकसान झाल्याची सूचना मिळताच त्यांनी सर्व्हेअर श्री. एस.एस. मंगळुरे यांची नियुक्ती केली आणि त्यांनी त्याप्रमाणे घटनास्थळाची पाहणी करुन अहवाल दि.29/1/2010 रोजी सादर केला. तसेच तक्रारदार यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी केल्यानंतर ती वेळोवेळी सादर करण्यात आली आहेत. सर्व कागदपत्रांचा विचार करुन सर्व्हेअरने रु.8,400/- नुकसान झाल्याबाबत मुल्यनिर्धारण केले. तसेच आगीची घटना 60, सिध्देश्वर पेठ, खोली क्र.17 येथे घडलेली असून पॉलिसी 26, बेगमपेठ, सोलापूर करिता असल्याचे निदर्शनास आले. पॉलिसी अटी व शर्तीप्रमाणे विमा रक्कम देय होत नसल्यामुळे त्याप्रमाणे तक्रारदार यांना दि.22/3/2010 च्या पत्राद्वारे कळविण्यात आले असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विमा पॉलिसी उतरविलेली असून विरुध्द पक्ष क्र.2 यांचे कार्य केवळ सहकार्य करण्याचे आहे. विमा पॉलिसीकरिता हप्त्याची रक्कम कपात केल्यानंतर त्यांची भुमिका पूर्ण होते. तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्याकरिता ते जबाबदार नसून त्यांना अनावश्यक पक्षकार करण्यात आलेले आहे. तक्रारदार यांची तक्रार खोटी असल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? अंशत:
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
निष्कर्ष
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या अगरबत्ती व्यवसाय/दुकानाचा विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दि.7/2/2009 ते 6/2/2010 कालावधीसाठी स्टॅन्डर्ड फायर अॅन्ड स्पेशन पेरिल्स पॉलिसी क्र.161201/11/08/11/00001154 अन्वये रु.1,00,000/- चा विमा उतरविण्यात आल्याविषयी, तक्रारदार यांच्या गोडाऊन असलेल्या म्यु. घर नं. 60, खोली नं. 17, सिध्देश्वर पेठ, सोलापूर येथे आगीमुळे दुर्घटना घडल्याविषयी, तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केल्याविषयी, विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर केल्याविषयी उभय पक्षकारांमध्ये विवाद नाही.
5. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार वहीदभाई पी. शेख यांचे नांवे दि.7/2/2009 ते 6/2/2010 कालावधीकरिता रु.1,00,000/- ची विमा पॉलिसी पत्ता : 26, बेगमपेठ, सोलापूर येथे स्थित दुकानाकरिता उतरविलेली होती आणि आगीची घटना पत्ता : 60, सिध्देश्वर पेठ, खोली क्र.17 येथे घडल्याचे निदर्शनास आले. पॉलिसी अटी व शर्तीप्रमाणे विमा रक्कम देय होत नसल्यामुळे त्याप्रमाणे तक्रारदार यांना दि.22/3/2010 च्या पत्राद्वारे कळविण्यात आल्याबाबत त्यांनी कथन केलेले आहे.
6. अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन विरुध्द पक्ष क्र.1 यांनी वहीदभाई पी. शेख यांचे नांवे दि.7/2/2009 ते 6/2/2010 कालावधीकरिता रु.1,00,000/- ची विमा पॉलिसी निर्गमित केल्याचे स्पष्ट आहे. निर्विवादपणे, विमेदार व विमा कंपनी यांच्या एकमेकांवरील अत्युच्च परम विश्वासावर विम्याचा करार अवलंबून असतो. त्या अनुषंगाने विमेदाराने सर्व आवश्यक व सत्य माहिती देऊन विमा करार होणे अपेक्षीत व आवश्यक आहे. तसेच विमा कंपनीनेही विमा कराराबाबत दक्ष राहून विमाधारकाचे हित जपण्याचा प्राधान्याने प्रयत्न करण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.
7. प्रस्तुत प्रकरणामध्ये दाखल विमा पॉलिसीचे अवलोकन करता, ज्या ठिकाणाचा/ जागेचा विमा उतरविण्याचा आहे, त्या ठिकाणी केवळ ‘सोलापूर’ इतकाच मजकूर नमूद केलेला आहे. विमा कराराचा मुख्य व आधारस्तंभ असलेल्या विमा पॉलिसीमध्ये विमा संरक्षणाच्या ठिकाण/जागेची पूर्ण माहिती न देता केवळ ‘सोलापूर’ नमूद करण्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांनी कोणतेही उचित व संयुक्तिक स्पष्टीकरण दिलेले नाही. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी यापूर्वी दि.9/2/2004 ते 8/2/2005 कालावधीकरिता निर्गमित केलेल्या पॉलिसीचे अवलोकन करता, विमा संरक्षीत ठिकाण : 17, सिध्देश्वर पेठ, सोलापूर असे नमूद केलेले आहे. त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या विमा पॉलिसीमध्ये केवळ ‘सोलापूर’ इतकाच मजकूर करण्यात आलेला असून त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दिलेले नाही. वास्तविक पाहता, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 किंवा 2 यांना विमा संरक्षीत ठिकाण बदलल्याबाबत कोणताही लेखी पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी निर्गमित केलेल्या पॉलिसीमधील विमा संरक्षीत ठिकाणाबाबतचा मजकूर सदोष व त्रुटीपूर्ण असल्याचे मान्य करावे लागेल. जोपर्यंत विमाधारक विमा पॉलिसीतील पत्ता बदलण्याबाबत अर्ज करीत नाही आणि विमा कंपनी रितसर कार्यवाही करुन त्याची पॉलिसीमध्ये नोंद घेत नाही, तोपर्यंत विमा कंपनीस विमाधारकाच्या विमा संरक्षीत ठिकाणाचा पत्ता बदलण्याचा कोणताही एकतर्फी अधिकार प्राप्त होत नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपली चूक लपविण्याकरिता तक्रारदार यांना बळी ठरविण्याचा व विमा रकमेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
8. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ मा. राष्ट्रीय आयोगाने ‘एस. राठीनावेलू /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि. व इतर’, प्रथम अपिल क्र.119/1993 चा संदर्भ सादर केला आहे. त्या प्रकरणामध्ये विमेदाराने त्याचा पत्ता बदलल्याबाबत सूचना दिल्यानंतर त्याबाबतची नोंद विमा पॉलिसीमध्ये न आल्यामुळे विमा दावा देय होणार नाही, असे तत्व विषद केले आहे. परंतु आपल्या समोरील प्रकरणामध्ये तशी वस्तुस्थिती नाही. तक्रारदार यांचा विमा संरक्षीत ठिकाणाचा पत्ता बदललेला नसतानाही विमा पॉलिसीतील त्रुटीचा लाभ विरुध्द पक्ष क्र.1 हे घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
9. सर्वात महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी विमेदार विमा पॉलिसी उतरवतो, त्यावेळी त्याच्याकडून आवश्यक असणारे प्रस्ताव-प्रपत्र भरुन घेण्यात येत असते. त्यावेळी त्यावर जो पत्ता नमूद असतो, तोच विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात येतो. परंतु त्याची कोणतीही कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर दाखल केलेली नाहीत.
10. काही क्षणापुरते तक्रारदार यांनी दुकानाचे ठिकाण बदलल्याचे मान्य केले असता, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दाखल केलेल्या उपरोक्त निवाडयामध्ये असे नमूद केलेले आहे की,
If there has been any change, the complainant is obliged to communicate the change of location under proper acknowledgement of an official of the Insurance Company. On the receipt of the change of address, it is required to be incorporated in the policy by way of separate endorsement and till then no risk is assumed in respect of the new location.
11. उपरोक्त न्यायिक तत्वाचा विचार करता, विरुध्द पक्ष यांनी यापूर्वी दि.9/2/2004 ते 8/2/2005 कालावधीकरिता निर्गमित केलेल्या पॉलिसीमध्ये विमा संरक्षीत ठिकाण : 17, सिध्देश्वर पेठ, सोलापूर असे नमूद केलेले असून ठिकाण बदलण्याबाबत कोणतीही सूचना दिल्याचे किंवा लेखी कळविल्याचे कोणतेही कागदपत्रे कथन नाही किंवा त्याप्रमाणे कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. असे असताना व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या विमा पॉलिसीमध्ये केवळ ‘सोलापूर’ इतकाच मजकूर नमूद करण्यात आल्यामुळे त्या त्रुटीचा लाभ विरुध्द पक्ष क्र.1 यांना घेता येणार नाही. आमच्या मते, त्रुटीयुक्त विमा पॉलिसी देऊन तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्यांनी त्रुटी केलेली आहे.
12. तक्रारदार यांनी त्यांच्या गोडाऊनचा रु.1,00,000/- चा विमा होता आणि गोडाऊनला आग लागल्यानंतर त्यांचा रु.2,00,000/- चा माल पुर्णत: जळून खाक झाल्यामुळे रु.2,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. जळीत दुर्घटनेनंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नियुक्त केलेल्या सर्व्हेअर/लॉस असेसर/व्हॅल्युअर श्री. एस.एस. मंगळुरे यांचा फायनल सर्व्हे रिपोर्ट अभिलेखावर दाखल करण्यात आलेला आहे. त्या रिपोर्टबाबत उभय पक्षकारांनी कोणतेही मत नोंदविलेले नाही. अशा परिस्थितीत, सर्व्हेअरचा अहवाल हा महत्वपूर्ण व निर्णायक पुरावा म्हणून विचारात घेणे भाग पडते. त्यामध्ये आगीच्या दुर्घटनेसमयी तक्रारदार यांच्या दुकानामध्ये रु.35,000/- चा माल असल्याच्या निर्णयाप्रत सर्व्हेअर आले आहेत. त्याचे खंडन उभय पक्षकारानी केलेले नाही. तसेच तक्रारदार यांचा रु.2,00,000/- चा माल जळाल्याबाबत कोणतीही उचित कागदपत्रे किंवा खरेदी पावत्या अभिलेखावर दाखल नाहीत. त्यामुळे रु.35,000/- चे नुकसान झाल्याचे गृहीत धरणे न्यायोचित ठरते. परंतु सर्व्हेअरने नुकसानीबाबत रु.8,400/- जे मुल्यांकन केले आहे, ते पुराव्याअभावी व तरतुदीअभावी अमान्य करण्यात येते. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि अंतिमत: तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून विमा रक्कम रु.35,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
13. शेवटी खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.35,000/- (रुपये पस्तीस हजार फक्त) व त्यावर दि.22/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
2. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/1813)