ORDER | निकालपत्र ( पारित दिनांक :23/12/2014) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, त.क.ला वि.प. बॅंकेने गृहकर्ज रुपये3,00,000/- दि.10.03.2000 रोजी मंजूर केले व त्या अनुषंगाने पहिला हप्ता रु.75,000/- दि. 10.03.2000 रोजी, दुसरा हप्ता रु.1,10,000/- दि. 25.03.2000 रोजी, तिसरा हप्ता रु.90,000/- दि. 27.05.2000 व शेवटचा हप्ता रु.25000/- दि.12.10.2000 रोजी त्याच्या खात्यात जमा करण्यात आले. त.क. व वि.प. यांच्यात झालेल्या कर्ज कराराच्या अटी व शर्तीनुसार त.क.ला प्रतिमहा 3,000/-रुपये 144 महिने कर्ज परतफेडीसाठी भरणे होते व व्याज दर 14टक्के प्रतिवर्ष असा ठरला होता. त.क. हा ठरल्याप्रमाणे 3,000/-रुपये मासिक हप्ता नियमितपणे भरणा करीत होता. 11 महिन्यानंतर म्हणजे दि. 14.09.2001 रोजी वि.प.ने नोटीस देऊन त.क.ला कळविले की, त्यांनी व्याजदर 13टक्के प्रमाणे प्रतिमहा हप्ता 3,795/रुपये असा भरावा. त.क. ने त्याच्या जवळील एकमुस्त रक्कम 30,000/-रुपये दि. 08.10.2001 रोजी कर्ज खात्यात जमा केली. त्यानंतर त.क.ने 3,800/-रुपये प्रतिमहा प्रमाणे 14 महिने रक्कम अशी एकूण रक्कम रु. 53,200/- खात्यात जमा केली. तसेच बॅंकेच्या मौखिक आदेश व निर्देशानुसार रुपये3,600/- प्रतिमहा या प्रमाणे 119 महिन्याची एकूण रक्कम 4,28,400/-रुपये कर्ज खात्यात जमा केले. अशा प्रकारे त.क.ने एकूण 5,44,600/-रुपये कर्ज खात्यात जमा केले.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, कर्ज कराराप्रमाणे त.क.ला रुपये3,000/- प्रतिमहा प्रमाणे 144 महिन्याचे हप्ते म्हणजे एकूण रक्कम रुपये 4,32,000/- भरणे होते. वि.प.चे सततचे बदलते व्याज धोरणाप्रमाणे व्याजादर 13 टक्कया वर आला होता . दि. 08.10.2001 ला एकमुस्त रक्कम 30,000/-रुपयाचा भरणा केल्यामुळे त्यावेळेस शाखाधिकारी यांनी त.क.ला सांगितले की, त्यांनी प्रतिमहा रुपये3,600/- हप्ता भरावा. प्रतिमहिना जर हप्त्याचा दर निकषात घेतला तर त.क.ला एकूण रक्कम रुपये 5,18,400/- भरणे होते. वि.प.ने दिलेला नोटीस व मौखिक निर्देशानुसार एकूण रुपये5,44,600/- भरणा करावयाचे होते. त.क.ने पुढे असे ही कथन केले की, वि.प.कडे त.क.चे बचत खाते क्रं. 355502010007159 असे आहे. त.क. व वि.प.मध्ये कोणताही करार नसतांना, वि.प.ने त.क.ला कोणतीही पूर्व सूचना न देता दि.26.03.2009 रोजी रुपये 1,145/-, दि.27.07.2011 ला रुपये 29,000/-, दि.03.07.2011 ला रुपये 3,361/-, दि.30.08.2011 ला रुपये 4,316/-, दि.29.09.2011 ला रुपये 4,316/-, दि.30.10.2011 ला रुपये 4,317/-, दि.30.11.2011 ला रुपये 4,317/-, दि.02.01.2012 ला रुपये 994/-, दि.30.01.2012 ला रुपये 7,646/-, दि.29.02.2012 ला रुपये 715/-, दि.01.09.2012 ला रुपये 13,458/-, दि.28.09.2012 ला रुपये 737/- त.क.च्या बचत खात्यातून काढून सदर रक्कम कर्ज खात्यात वळती केली. तसेच दि.30.04.2010 ला रुपये 24,015/- व दि.06.08.2012 ला रुपये 16,170/- ही रक्कम राष्ट्रीय बचत पत्राची सुध्दा त.क.ला कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांच्या कर्ज खात्यात वळती केली. अशाप्रकारे वि.प.ने गैरकायदेशीररित्या विनाअधिकाराने रुपये 1,14,507/- ही रक्कम कर्ज खात्यात वळती केली. अशाप्रकारे वि.प.ने आतापर्यंत त.क.कडून रुपये 6,59,107/- इतकी मोठी रक्कम वसूल केली आहे. प्रत्यक्षात त.क.ला बॅंकेच्या निर्देशानुसार 144 महिन्याची रक्कम एकूण रुपये 5,44,600/- देणे होते. अशाप्रकारे वि.प.ने त.क.चा विश्वासघात केला आहे. त.क.ने वेळोवेळी वि.प.च्या अधिका-याशी बोलणीकेली. परंतु योग्य प्रतिसाद दिला नाही. वि.प.ने त.क.ला सेवा देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे त.क.ने वि.प.ला दि. 12.12.2012रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली व जास्तीचे घेतलेली रक्कम परत मागितली. नोटीस मिळून सुध्दा वि.प.ने उत्तर दिले नाही व नोटीसची अंमलबजावणी केली नाही. म्हणून त.क.ने प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात जास्तीची घेतलेली रक्कम रुपये 1,14,507/-, शारीरिक मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
- वि.प. यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 6 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. त.क. ला दि. 10.03.2000 रोजी रुपये 3,00,000/-चे गृहकर्ज मंजूर करण्यात आले हे वि.प. यांनी मान्य केले आहे परंतु इतर सर्व आक्षेप अमान्य केलेले आहे. वि.प. चे म्हणणे असे की, कर्जाची रक्कम वि.प. बॅंकेच्या नियमाप्रमाणे व कराराच्या अटीनुसार बंधनकारक असल्याने भरावयाचे ठरले होते व कर्जाची संपूर्ण रक्कम भरेपर्यंत व कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड होईपर्यंत भरावयाची जबाबदारी त.क.ची होती व व्याजाचा दर सुध्दा बॅंकेच्या नियमांना अधिन राहून भरावयाचे होते. वि.प.ने त.क.च्या बचत खात्यातून कर्ज खात्यात वळती केलेल्या रक्कमांचा उल्लेख तारखेप्रमाणे नमूद आहे. परंतु रक्कमेबाबत कोणतीही पूर्व सूचना न देता वळती केली हे मान्य नाही. रुपये1,14,507/- हे त.क.ने कर्जाऊ परतफेडीकरिता भरलेले आहे व आजही त.क.चे कर्ज खात्यात रक्कम थकित आहे व बॅंकेला त.क.कडून थकित रक्कम वसूल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
- वि.प.ने पुढे असे कथन केले की, करारपत्राप्रमाणे दरमहा व्याजाची रक्कम भरावयाची आहे. त्याबाबत बॅंक एकूण रक्कम दरमहा व्याजासह हप्त्याची रक्कम ठरवू शकते असे करारपत्रात नमूद केलेले आहे. तसेच पुढे करारात याबाबत बॅंक स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते असा स्पष्ट उल्लेख आहे. कराराप्रमाणे त.क.ने बॅंकेला सदरील कर्ज व्याजाची भरावयाची रक्कम त्याच्या खात्यातून वळती करण्याचा अधिकार नमूद केलेले आहे. वि.प.ने कर्ज खात्यात त.क.ला कर्जाची देय असलेल्या रक्कमेबाबत योग्य ती कार्यवाही केली आहे व वि.प. बॅंकेने गैरवाजवी रक्कम घेतली नाही. बॅंककडे असलेल्या खाते उता-यानुसार त.क.कडे आजही कर्जाची रक्कम थकित आहे. वि.प.ने बॅंकेच्या नियमाप्रमाणे सेवेत कोणतीही त्रृटी केली नसल्यामुळे त.क.ची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- त.क.ने स्वतःच्या कथनाच्या पृष्ठयर्थ त्याचे शपथपत्र नि.क्रं. 11 वर दाखल केले व एकूण 10 कागदपत्रे वर्णन यादी नि.क्र2 सोबत दाखल केलेली आहे. वि.प.बॅंकेने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ एस.आर.बाकडे यांचे शपथपत्र नि.क्रं. 10 वर दाखल केलेले आहे. त.क.ने त्याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.12 वर दाखल केला असून वि.प.ने त्याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.13 वर दाखल केलेला आहे. त.क. व वि.प. यांचे अधिवक्ता यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्याकडून गृहकर्जाची रक्कम रु.1,14,507/-जास्तीचे वसूल करुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | नाही. परंतू परत फेडीच्या हप्त्याची कल्पना न देऊन सेवेत ञृटीपूर्ण व्यवहार केले आहे. | 2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः | 3 | अंतिम आदेश काय ? | आदेशाप्रमाणे |
: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1, व 2 बाबत ः- वि.प. बॅंकेने त.क.ला दि.10.03.2000 रोजी रुपये 3,00,000/-चे गृहकर्ज मंजूर केले व त्या अनुषंगाने पहिला हप्ता रुपये 75,000/- दि. 10.03.2000 रोजी, दुसरा हप्ता रु.1,10,000/- दि. 25.03.2000 रोजी, तिसरा हप्ता रु.90,000/- दि. 27.05.2000 व शेवटचा हप्ता रु.25000/- दि.12.10.2000 रोजी त.क.च्या खात्यात जमा केला हे वादातीत नाही. तसेच त.क.ने कर्ज करारानुसार प्रतिमाह 3,000/-रुपये मासिक हप्ता सप्टेंबर 2000 पासून 11 महिने जमा केले हे सुध्दा वादातीत नाही. त्यानंतर वि.प.च्या दि. 14.09.2001 च्या नोटीसप्रमाणे 30,000/-रुपये दि. 08.10.2001 रोजी त्याच्या कर्ज खात्यात जमा केले व त्यानंतर प्रतिमाह 3,800/-रुपये 14 महिने असे एकूण 53,200/-रुपये कर्ज खात्यात जमा केले हे सुध्दा वादातीत नाही. दि. 14.09.2001 ची नोटीस त.क.ने नि.क्रं. 2(2) सोबत दाखल केली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, त.क.ला वेळोवेळी तोंडी व लेखी कळवून देखील त.क.ने कर्जाची रक्कम देण्याचे टाळले व दि. 30.06.2001 पर्यंत त.क.कडून 3,17,960/-रुपये येणे बाकी होते. थकित रक्कम व त्यावरील व्याज असे एकूण 30,000/-रुपये भरण्याविषयी त.क.ला कळविण्यात आले व त्या कर्ज रक्कमेवर दि. 01.07.2001 पासून व्याज लावण्यात आले नाही असे कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे त.क.ने 30,000/-जमा केले. त.क.ने दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त.क.ने एकूण 5,41,200/-रुपये वि.प.कडे गृह कर्जाच्या परतफेडीबाबत जमा केलेले आहे. तसेच खाते उता-याचे अवलोकन केले असता वि.प.ने त.क.च्या बचत खात्यातून व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातून एकूण रु.1,30,516.99 पै. त.क.च्या कर्ज खात्यात वळती करुन घेतले आहे, असे एकूण त.क.ने वि.प.कडे 6,59,107/-रुपये जमा केल्याचे दिसून येते. त.क.ची तक्रार अशी आहे की, कर्ज कराराप्रमाणे त.क.ला 3,000/-रुपये प्रतिमाहप्रमाणे 144 महिन्याचे हप्ते एकूण रक्कम 4,32,000/-रुपये भरणे होते. त्यावेळेस व्याजदर 14 टक्के द.सा.द.शे. होता. त्यानंतर बदलत्या व्याजाचे धोरणामुळे व्याजदर 13टक्के वर आला होता व वि.प.चे शाखाधिकारी यांच्या सांगण्याप्रमाणे प्रतिमाह 3600/-रुपयेचा हप्ता त.क.ला भरावयाचा होता. त्याप्रमाणे त.क.ला एकूण5,18,400/-रुपये भरले होते. बॅंकेने दिलेल्या नोटीस व मौखिक आदेशानुसार 5,44,600/-रुपये भरणा करावयाचा होता.परंतु वि.प. बॅंकेने त.क.कडून6,59,107/-रुपये वसूल केले. म्हणजेच 1,14,507/-रुपये जास्तीची रक्कम वि.प.बॅंकेने त.क.कडून वसूल केले आहे व त.क. ती रक्कम परत मिळविण्यास हक्कदार आहे.
- त.क.ने कर्ज कराराची नक्कल नि.क्रं. 2(1) वर दाखल केलेले आहे. त्या कर्ज कराराचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, त.क.ने कर्ज परतफेड पोटी प्रतिमाह 3,000/-रुपये हप्ता व्याजासह 144 महिन्यात परतफेड करावयाचे होते.तसेच त.क.ने हे सुध्दा कबूल केले होते की, घराचे बांधकाम झाल्यानंतर कर्ज दिल्यापासून घर बांधकामाकरिता कर्ज दिलेले असल्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्याच्या पहिल्या तारखेला कर्जाच्या हप्त्याची परतफेड सुरु करेल व मासिक हप्त्या व्यतिरिक्त व्याज मासिक हप्त्यासोबत वि.प. बॅंक ठरविल त्याप्रमाणे परत करेल. याचा अर्थ असा होतो की, त.क.ने मुद्दल रक्कमेचा हप्ता व कर्जावरील व्याज हे भरावयाचेहोते. परंतु त.क.ने फक्त 3,000/-रुपये महा भरलेले आहे. तसेच कर्ज दिल्यापासून ते कर्जाचे हप्ते परतफेड सुरु होईपर्य्रत व्याज त.क.ने दिलेले नाही.त्यामुळे त्यावरील व्याज हे वाढत जाऊन मासिक हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली. वि.प. बॅंकेने त.क.ला दिलेल्या त्याच्या कर्ज खात्याचा उतारा मंचासमोर दाखल केलेला आहे. त्याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, वि.प. बॅंकेने वेळोवेळी त.क.ने भरलेल्या हप्त्याची नोंद केलेली आहे व कर्जावरील व्याज सुध्दा वेळोवेळी लावण्यात आले आहे, त्यात अशी कोणतीही त्रृटी आढळून येत नाही.परंतु वि.प. बॅंकेने व्याजदरा संबंधी व व्याजाची रक्कम भरणा करण्यासंबंधी त.क.ला लेखी कळविल्याचे आढळून येत नाही. त.क.चे अधिवक्ता यांनी असा युक्तिवाद केला की, व्याजाची रक्कम धरुनच मासिक हप्ता ठरविण्यात आला आहे व त्याप्रमाणे त.क.ने परतफेडीचे हप्ते नियमित वि.प. बॅंकेकडे जमा केलेले आहे. परंतु कर्ज कराराचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, हप्ते व त्यावरील व्याज त.क.ने भरावयास पाहिजे होते. हे मात्र सत्य आहे की, त.क.ला बॅंकेच्या व्यवहारा संबंधी माहिती नसल्यामुळे वि.प. बॅंकेने त्या संबंधी त्याला लेखी कळवावयास पाहिजे होते. परंतु वि.प. बॅंकेने तसे त.क.ला कळविल्याचे आढळून येत नाही किंवा तसा पुरावा मंचासमोर आलेला नाही. त.क.ने वि.प. बॅंकेने ठरवून दिलेला मासिक हप्ता भरीत होता हे अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन आढळून येते. परंतु हे सर्व हप्ते महिन्याच्या शेवटी भरल्याचे दिसून येते.
- वि.प. बॅंकेने दिलेलया त.क.च्या खाते उता-याचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता असे दिसून येते की, वि.प. बॅंकेने त.क.चा कर्ज खाते उतारा हे व्यवस्थित व नियमानुसार केलेला आहे त्यात व्याज सुध्दा व्यवस्थित लावलेले आहे. इतकेच नव्हेतर monotorium कालावधीतील व्याज सुध्दा 18,060/- आकारण्यात आले आहे. ते त.क.ने जमा केलेला नाही. त्यामुळे बॅंकेने जास्तीची रक्कम वसूल केली असे म्हणता येणार नाही. वि.प. बॅंकेने त्याचे लेखी जबाबात सविस्तरपणे त.क.कडून वसुली केलेल्या रक्कमेची आहे व व्याजदारा संबंधी नमूद केलेले नाही . परतफेडीच्या हप्त्यासंबंधी सुध्दा वि.प. बॅंकेने त्याचे लेखी जबाबात नमूद केलेले नाही. वि.प.चे साक्षीदार एस.आर.बाकडे यांनी त्यांच्या शपथपत्रात पहिल्यांदा मासिक हप्ता व्याजासह 4311/-रुपये 144 महिन्याकरिता 3,00,000/-रुपये कर्जावर येतो असे नमूद केलेले आहे. त.क.ने फक्त 3,000/-रुपये महिना भरल्यामुळे 1311/-रुपये दरमहा कमी भरलेला आहे असे नमूद केलेले आहे व monotorium कालावधीतील व्याज 18,060/-रुपये असे नमूद केले आहे. परंतु ही बाब वि.प.ने त्याच्या लेखी जबाबात नमूद केलेली नाही. किंवा त.क.ला मासिक हप्ता व्याजासह 4,311/-येते त्याप्रमाणे 144 महिन्यामध्ये परतफेड करावयाची आहे असे त.क.ला कळविले नाही. जरी वि.प.चे साक्षीदाराने त्याचे शपथपत्रामध्ये असे नमूद केले आहे की, सन 2000-13 या काळात बदललेल्या व्याजाचे दर आणि हप्त्यामध्ये बदल झाल्याचे त.क.ला नोटीस देऊन वेळोवेळी कळविण्यात आले परंतु तशा प्रकारचा कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही किंवा त्याचे लेखी जबाबात सुध्दा तसे नमूद केलेले नाही. कर्ज कराराप्रमाणे जो मासिक हप्ता 3,000/-रुपये लिहिलेला आहे, त्या व्यतिरिक्त व्याज सुध्दा त.क.ने देण्याचे कबूल केलेलेआहे.परंतु योग्य तो हप्ता त.क.ला न कळविल्यामुळे त्यांना त्याच्याकडून जास्तीची रक्कम वसूल करण्यात आली असे वाटणे साहजिकच आहे. म्हणून त्याने वेळोवेळी वि.प.कडे चौकशी केली, नोटीस पाठविली. त्यामुळे निश्चितच त्याला शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. कर्ज परतफेडीच्या मासिक हप्त्यासंबंधी न कळवून तसेच monotorium कालावधीतील व्याजासंबंधी त.क.ला कल्पना न देणे, त.क.ला नोटीस न देता त्याची पूर्व परवानगी न घेता त्याच्या बचत खात्यातून रक्कम त्याच्या कर्ज खात्यात वळती करणे जरी कर्ज करारात तसे नमूद असले तरी वि.प. बॅंकेची त.क. ला कळविण्याची जबाबदारी होती. म्हणून वि.प.चे कृत्य हे निश्चितच सेवेतील दोषपूर्ण सेवा या सदरात मोडते. त्यामुळे त.क.ला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई देण्यास वि.प. बॅंक बांधिल आहे. तक्रारीचे स्वरुप व त.क.ला झालेल्या त्रासाचा विचार केला असता मंच या निष्कर्षा प्रत येते की, त.क.ला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई म्हणून 10,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 2000/-रुपये देणे उचित राहील. त.क. ने मागणी केलेली रक्कम 1,14,507/-रुपये हे जास्तीचे वसूल न झाल्यामुळे त.क. ती परत मिळण्यास पात्र नाही. म्हणून वरील मुद्दयाचे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत द्यावे. 3 तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या अमान्य करण्यात येते. 4 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 5 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |