(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- ३०/११/२०१५ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार हे वेकोली माजरी कॉलरीला सरकारी नौकरीत आहे. गैरअर्जदार क्रं. ३ ही गैरअर्जदार क्रं. १ व २ ची मुख्य शाखा आहे. गैरअर्जदार क्रं. २ हे गैरअर्जदार क्रं. १ चे झोनल ऑफिस बॅंक आहे. गैरअर्जदार क्रं. १ हे मौजा कॉलरी येथे बॅंकींगचा व्यवसाय करीत आहे. अर्जदार नौकरीत असल्याने अर्जदार यांचे पगाराचे खाते गैरअर्जदार क्रं. १ यांचे कडे आहे व अर्जदार यांचेकडे शेती असल्याने त्याने गैरअर्जदार यांचे कडे ट्रॅक्टर घेण्याकरीता कर्जाची मागणी केली गैरअर्जदार क्रं. १ यांनी अर्जदाराचे ट्रॅक्टरच्या कर्जाची केस मंजूरी करीता गैरअर्जदार क्रं. २ यांचेकडे पाठविली त्यानंतर अर्जदारास ट्रॅक्टर करीता रु. ५,९०,०००/- द.सा.द.शे. ११.५० प्रमाणे कर्ज मंजूर केले अर्जदार ठरल्याप्रमाणे नियमित मासीक/वार्षिक हप्ते भरत होते अर्जदाराने दि. २९.०४.२००९ रोजी आपले बचत खाते क्रं. ०९१३०१००००३६२९ मधून रु. १,११,०००/- चा भरणा केला सदर रक्कम अर्जदाराचे बचत खात्यामधून वजा झाली परंतु आजपर्यंत ती रक्क्म ट्रॅक्टरचे कर्ज खाते क्रं. ०९१३०६००१०००००२ ला जमा झाली नाही.अर्जदाराने सदर बाब गैरअर्जदार क्रं. १ व २ यांचे लक्षात आणून दिली व सदर रक्क्म ट्रॅक्टरचे कर्ज खात्यात जमा करण्याची तोंडी विनंती केली तसेच उर्वरित कर्जाची रक्क्म आपल्या पगार खात्यामधून भरणे चालुच ठेवले दि. ०३.०५.२०१४ रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. १ यांना लेखी तक्रार दिली परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही. व त्यांनी गैरअर्जदार क्रं. २ यांचेकडे चौकशी करण्यास सांगितले गैरअर्जदार क्रं. १ यांनी दि.०४.०६.२०१४ रोजीचे पञाव्दारे सदर प्रकरणात आपली असमर्थता दर्शविली म्हणून अर्जदाराने दि. ३०.१०.२०१४ रोजी रजि. पोष्टाव्दारे गैरअर्जदार क्रं. १ते ३ यांना नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांना सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी नोटीसची पुर्तता केली नाही. सबब अर्जदाराने मंचा समक्ष सदर तक्रार दाखल केली व तक्रारीत अशी मागणी केलीकि, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या ञुटीपूर्ण सेवे करीता गैरअर्जदाराना दोषी ठरवून रक्कम रु. १,११,०००/- अर्जदारास गैरअर्जदार यांनी परत करावे तसेच सदर रकमेवर द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे दि. २९.०४.२००९ पासून ते रक्कम वसूल होईपर्यंत व्याज दयावे शारिरीक मानसिक ञासपोटी रु. १,००,०००/- व तक्रार खर्च रु. २५,०००/- गैरअर्जदाराने अर्जदारास वैयक्तिक अथवा संयुक्तिक दयावे अशा आदेश देण्यात यावा.
२ अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. १ ते ३ विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यांनी नि. क्रं. १२ वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदारांनी आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदाराविरुध्द केलेले आरोप खोटे असल्याने त्यांनी नाकबुल केले व आपले विशेष कथनात नमुद केले कि, अर्जदाराच्या तथाकथीत कथनानुसार दि. २९.०४.२००९ रोजी अर्जदार यांनी रु. १,११,०००/- बचत खात्यामध्ये जमा केले. त्यामुळे तक्रारीचे कारण दि. २९.०४.२००९ रोजी घडले व त्या कारणाकरीता अर्जदाराने दि. ३०.०१.२०१५ रोजी तक्रार दाखल केली म्हणून सदर तक्रार मुदतीत नसल्यामुळे खारीज होण्यास पाञ आहे तसेच अर्जदाराने महत्वाची बाब तक्रारीत नमुद न करता ती जाणून बुझून लपवून ठेवलेली दिसते. गैरअर्जदाराने पुढे नमुद केले कि, अर्जदाराने दि. २५.०३.२००६ रोजी ट्रॅक्टर खरेदीकरीता एकूण रु. ५,९०,०००/- चे कर्ज गैरअर्जदार क्रं. १ कडे अर्ज केल्यानंतर गैरअर्जदाराने ११.५० टक्के दराप्रमाणे कर्जाची रक्कम रु. ५,९०,०००/- अर्जदाराला देण्यात आली. त्याकरीता अर्जदाराने मौजा बांबुर्डा सर्व्हे नं. १११ शेतीचे गैरअर्जदाराला रजि. गहाणखत करुन दिले. अर्जदाराने कर्जाची रक्कम दि. २७.१२.२०१३ रोजी रु. १६,४९८/- गैरअर्जदार क्रं. १ कडे भरणा केली. अर्जदाराने कर्जाचे रक्मेचा हिशोब करुनच शेवटची रक्कम भरली. व नंतर गैरअर्जदाराकडून शेतीवरील कर्जाचा बोझा कमी करण्याकरीता दि. ०८.०१.२०१४ रोजी पञ घेतले होते त्यावेळी अर्जदाराने त्याचे कर्ज खात्यात रक्कम रु. १,११,०००/- जमा झालेली नाही तसेच दि. २९.०४.२००९ चे तक्रारीतील वाद रकमेबाबत कोंणताही आक्षेप घेतला नव्हता जवळपास ५ वर्षानी अर्जदाराने तथाकथीत दि. २९.०४.२००९ रोजीचे रक्कम रु. १,११,०००/- बाबत खोटा आक्षेप घेतला अर्जदाराचे गैरअर्जदार क्रं. १ कडे ३६२९ क्रं. चे बचत खाते आहे. व त्याकरीता अर्जदार नियमित पणे बॅकेत येत असतो. अर्जदाराला बॅंकेत झालेल्या खात्यापध्दतीची माहीती झाली कि, बॅंकेकडे २००१ पर्यंत हाताने खाते लिहीले जात होते त्यानंतर २००१ ते दि. १०.१२.२००९ पर्यंत ALPM बॅंकेचे खाते तयार करण्यात येत होते. व २००९ चे पुढे CBS CORE बॅंक सिस्टीम व्दारे खाते तयार करण्यात येत होते. २००९ पूर्वीची सिस्टीम खाते नोंदणी करीता केली होती ती बॅंकेकडे उपलब्ध नाही याची माहीती अर्जदाराला मिळाल्यानंतर अर्जदाराने त्याचा गैरफायदा घेतला. व गैरअर्जदाराविरुध्द खोटी तक्रार दाखल केली म्हणून सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
३. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१. अर्जदार गैरअर्जदारांचा ग्राहक आहे काय ? होय.
२. सदर तक्रार मुदतीत दाखल आहे काय ? नाही.
३. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
४. अर्जदार यांनी ट्रॅक्टर विकत घेण्याकरीता गैरअर्जदार यांचेकडून रु. ५,९०,०००/- द.सा.द.शे. ११.५० प्रमाणे कर्ज घेतले. अर्जदार यांचे गैरअर्जदार क्रं. १ कडे ०९१३०१००००३६२९ नंबरचे बचत खाते व ०९१३०६००१०००००२ क्रं. चे कर्ज खाते आहे. सदर कर्जाची अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पूर्णपणे परतफेड केली याबाबत उभयपक्षांमध्ये वाद नाही म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
५. अर्जदाराने नि.क्रं ५ वर दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करतांना असे निर्देशनास आले की, अर्जदाराने कर्जाची पूर्ण परतफेड करुन गैरअर्जदार क्रं. १ कडून दि. ०८.०१.२०१४ रोजी कर्जाकरीता गहाण ठेवलेल्या शेत जमीनीचा बोझा कमी करण्याकरीता पञ घेतले होते व त्यानंतर अर्जदाराने दि. ०३.०५.२०१४ रोजी गैरअर्जदार क्रं. १ कडे दि. २९.०४.२००९ रोजी रक्कम रु. १,११,०००/- बचत खात्यामूधून वजा झाली परंतु कर्ज खात्यामध्ये सदर रक्कम जमा झाली नाही याबाबत तसेच ती रक्कम कोणत्या कर्ज खात्यात जमा झालेली आहे याबाबत सविस्तर माहीती दयावी त्याचा असा अर्ज केला तोपर्यंत अर्जदाराने दि�. २९.०४.२००९ रोजीच्या सदर रकमेबाबत कोणताही लेखी आक्षेप व तक्रार गैरअर्जदार यांचे कडे केलेला नाही हे दाखल दस्तावेजावरून स्पष्ट होते. सदर तक्रार दाखल करण्याचे प्रथम कारण हे दि. २९.०४.२००९ रोजी घडले परंतु अर्जदाराने सदर तक्रार ही दि. ३०.०१.२०१५ रोजी मंचासमक्ष दाखल केली हे नि. क्रं. ०१ वरुन सिध्द होते तसेच सदर तक्रार दाखल करतेवेळी अर्जदाराने कोणताही विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम २४(अ)(१) नुसार कारण घडल्यापासुन २ वर्ष मुदतीच्या आत दाखल केलेली नाही असे मंचाचे मत असल्याने मुद्दा क्रं. ०२ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
६. मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
२. उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ३०/११/२०१५