निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 13/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 09/09/2011 कालावधी 06 महिने 27 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्री.नामदेव पिता रामकिशन चापके. अर्जदार वय 30 वर्ष.धंदा.शेती व व्यवसाय. अड.एस.एन.वेलणकर. रा.कातनेश्वर ता.पुर्णा जि.परभणी. विरुध्द शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार. युनायटेड इंडिया इन्शुरंस कं.लि.दयावान कॉम्पलेक्स. अड.जी.एच.दोडिया. स्टेशन रोड परभणी ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराच्या विमा दावा फेटाळून दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल गैरअर्जदारा विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा जीप क्रमांक एम.एच. 17 – K / 9601 चा मालक आहे.व त्याने या जीपचा गैरअर्जदाराकडून वीमा उतरवलेला आहे व ज्याचा पॉलिसी क्रमांक 230601 /31 / 09/ 01/ 00013048 असून कालावधी दिनांक 21/12/2009 ते 20/12/2010 पर्यंतचा होता सदर जीपचा अपघात दिनांक 08/04/2010 रोजी झाला व जीपचे रु.40,000/- रु.चे नुकसान झाले या अपघाताची नोंद पोलीस स्टेशन नवा मोंढा परभणी येथे गुन्हा क्रमांक 68/2010 अशी नोंदवलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सर्व कागदपत्रे दाखल केली त्यानंतर गैरअर्जदाराने चौकशी अधिकारी नेमुन सदरील जीपचा सर्व्हे केला व अर्जदारास दिनांक 17/08/2010 रोजी असे कळवले की,जीपच्या चालकाचा लायसन्स हा एल.एम.व्ही.लायसेन्स आहे व टॅक्सी जीप असल्यामुळे पॉलिसीचा ब्रीच झाल्यामुळे क्लेम नामंजूर करण्यात येत आहे. विमा कंपनीने कोणतेही कारण नसतांना अर्जदाराचा क्लेम नाकारुन अर्जदारास दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.व जीपची नुकसान भरपाई रु.40,000/- अपघात झाल्या तारखे पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने मिळावेत व शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/-मिळावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत त्याचे शपथपत्र क्लेम रेप्युडेशन लेटर, ही कागदपत्र दाखल केलेली आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराची तक्रार ही खोटी,तथ्यहीन व ग्राहक तक्रार निवारण कायद्याच्या विरुध्द आहे व सदरील तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.अर्जदाराच्या जीपच्या ड्रायव्हरकडे LMV Tr.लायसेन्स होते,परंतु अपघातग्रस्त जीप ही टॅक्सी जीप असल्यामुळे बॅच नंबर आवश्यक होता व तो नसल्यामुळे अर्जदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला आहे व तो योग्यच कारणाने फेटाळण्यात आला असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी गैरअर्जदाराने विनंती केलेली आहे. गैरअर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, रेप्युडेशन लेटर,बील चेक रिपोर्ट, पॉलिसी,ड्रायव्हींग लायसेन्स,डिव्हीजनल ऑफीसचे पत्र हे कागदपत्र दाखल केलेले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व अर्जदार व गैरअर्जदाराच्या वकिलांचे युक्तीवादातून तक्रारीत खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदार हा जीप क्रमांक MH 17/K – 9601 चा मालक आहे व त्याने गैरअर्जदाराकडून सदरील जीपचा दिनांक 21/12/2009 ते दिनांक 20/12/2010 या कालावधीचा विमा क्रमांक 230601/31/09/01/00013048 घेतलेला आहे ही बाब सर्वमान्य आहे.अर्जदाराने सदरील जीपचा अपघात दिनांक 08/04/2010 रोजी झाल्यानंतर गैरअर्जदाराकडे विम्याचे सर्व कागदपत्र दाखल केले व त्यनंतर गैरअर्जदाराने जीपचा सर्व्हेअरकडून सर्व्हे करुन घेतला ही बाब सर्वमान्य आहे. त्यानंतर दिनांक 17/08/2010 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा फेटाळला कारण जीपच्या ड्रायव्हरकडे MDL LMV Tr. लायसेन्स होता,परंतु अपघातग्रस्त वाहन हे टॅक्सी जीप होते व त्यासाठी “ बॅच नंबर ” गरज आहे सदरील “ बॅच नंबर ” जीपच्या ड्रायव्हरकडे नव्हता म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा योगय कारणानेच फेटाळला आहे.असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या नि.17/2 वरील ड्रायव्हींग लायसेन्स वर LMV Tr. असा स्पष्ट उल्लेख आहे व तो अपघाताच्या दिवशीही वैध होता.नि.17/5 वरील पॉलिसी वर टॅक्सी जीप ड्रायव्हरकडे “ बॅच नंबर ” आवश्यक आहे असा स्पष्ट उल्लेख दिसून येत नाही.गैरअर्जदाराने ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेंन्स हे LMV TR. आहे आणि जीप ही टॅक्सी होती त्यामुळे “ It is breach of MDL & Policy ” असा रेप्युडेशन लेटर मध्ये उल्लेख केला आहे, परंतु LMV TR हे लायसेन्स टॅक्सी जीप चालवण्यासाठी कायदेशीर नाही असा कुठलाही ठोस पुरावा तक्रारीत गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही.अथवा ड्रायव्हरकडे बॅच नव्हता याचाही पुरावा तक्रारीत दाखल नाही.त्यामुळे अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदाराने फेटाळून अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत जीपची नुकसान भरपाई रु. 40,000/- मिळावी अशी मागणी केलेली आहे.परंतु नि.17/4 वरील बिलचेक रिपोर्ट वरुन अर्जदार हा रु.10,600/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 10,600/- तक्रार दाखल दिनांका पासुन संपूर्ण रक्कम देय होई पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,500/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |