निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 16/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19 /08/2013
कालावधी 01वर्ष, 06 महिने.16 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
दत्तात्रय सुधाकरराव देशपांडे. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.-- अड.एस.एन.वेलणकर.
रा.कोमटी गल्ली,परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार.
दि ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि. अड.बी.ए.मोदाणी.
परभणी शाखा,दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,
परभणी 431401.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत ञुटी दिल्या बद्दलची आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की,
अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून त्याची L.M.L. कंपनीची लाल रंगाची मोटार सायकल क्रमांक एम.एच. 22/डी 5551 ही 20/03/2008 ते 19/03/2009 या एका वर्षाच्या कालावधीसाठी 22000/- रुपयांची पॉलिसी गैरअर्जदाराकडे काढली होती जीचा पॉलिसी क्रमांक 182003/31/2008/3302 असा आहे.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, दिनांक 21/2/2009 रोजी सदरचे वाहन वसमत रोड वरील आर.टी.ओ. कार्यालय परीसरातील देशपांडे विमा केंद्र येथून चोरीला गेले.त्यानंतर अर्जदाराने सर्वत्र शोध घेवुनही गाडी न सापडल्याने शेवटी 03/03/2009 रोजी पोलीस स्टेशन मोंढा परभणी येथे तक्रार दिली व त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नं. 50/09 नोंदवला.16/03/2009 रोजी वाहनाच्या क्लेम बाबत गैरअर्जदार कंपनीस सुचना दिली, त्याप्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 16/03/2009 रोजीच सर्व कागदपत्रे दाखल करुन घेतली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरच्या वाहन चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर वाहन चोर व वाहन न सापडल्याने “ अ ” समरी रिपोर्ट करीता न्यायालयांत 30/04/2009 रोजी प्रकरण दाखल केले.त्याच वेळेस गैरअर्जदाराकडे सर्व कागदपत्रे दाखल करुन पुर्तता केल्यावर गैरअर्जदाराने अर्जदारास “ अ ” समरी मंजूर झाल्याचा रिपोर्ट दाखल करण्यास सांगीतले, त्याप्रमाणे अर्जदाराने पोलीस स्टेशन व न्यायालयांत चकरा मारल्या, परंतु दोन वर्षाच्या कालावधीत “ अ ” समरी रिपोर्ट न्यायालाकडून मिळाला नाही.शेवटी विमा कंपनीने विमादावा मंजूर करता येत नाही, असे तोंडी सांगीतले. व नंतर अर्जदाराने वकिला मार्फत गैरअर्जदार कंपनीस नोटीस पाठवल्यानंतर दिनांक 02/12/2011 रोजी अर्जदारास कळवले की, समरी रिपोर्ट ii) Letter of subrogation on 100 Rs. bond तसेच 100 रुपयेच्या बॉंडवर Indemnity Bond व वाहन 21/02/2009 रोजी चोरीस गेल्यावर इन्शुरंस कंपनीला 16/03/2009 रोजी म्हणजेच 22 दिवस उशिरा का कळवले याचा खुलासा दाखल केला नाही, असे कारण देवुन नो क्लेम म्हणून दिनांक 28/06/2010 रोजी फाईल बंद केली. म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराना असा आदेश द्यावा की, अर्जदाराच्या वाहन क्रमांक एम.एच.22/डी/5551 च्या पॉलिसी प्रमाणे वाहन चोरीचा दावा 22,000/- रुपये 28/06/2010 पासून व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी 5,000/- रुपये व खर्चापोटी 2,000/- रुपये अर्जदारास द्यावे.
अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे व तसेच नि.क्रमांक 4 वर 8 कागदपत्रांच्या यादीसह 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये पॉलिसी कव्हरनोट, पोलीस स्टेशन मोंढा परभणी यांचा समरी फायनल करीता सुचना फॉर्म, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, अर्जदाराचे गैरअर्जदारास पत्र, गैरअर्जदाराचे अर्जदारास पत्र, अर्जदाराने वकिला मार्फत गैरअर्जदारास पाठवलेली नोटीस, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वकिलाना दिलेले उत्तर, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
मंचातर्फे गैरअर्जदारांस नोटीस काढण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत हजर व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला
गैरअर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, सदरची तक्रार हि खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे व त्यांत त्यांचे असे म्हणो आहे की, अर्जदाराने चोरीस गेलेल्या मोटार वाहनाची योग्य ते काळजी घेतली नाही. गैरअर्जदाराचे पुढे असे ही म्हणणे आहे की,आजपर्यंत संबंधीत गुन्ह्यातील तपासणीस अंमलदाराचा अहवाल न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परभणी यांनी मंजूर केल्या बद्दलचा कोणताही अहवाल सादर केला नाही.म्हणून अर्जदाराने दाखल केलेली तक्रार फेटाळण्यात यावी.तसेच त्याचे असे म्हणणे आहे की, विमा पॉलिसीच्या अटी प्रमाणे विमा धारकाने त्याचे वाहन चोरीस गेल्यास त्याची लेखी सुचना विमा कार्यालयास ताबडतोब देणे आवश्यक आहे व ते बंधनकारक आहे व सदरच्या घटने मध्ये अर्जदाराची मोटार सायकल 21/02/2009 रोजी चोरीस गेली, परंतु अर्जदाराने पोलीस स्टेशनला तक्रार 03/03/2009 रोजी दिली व तथाकथीत चोरीची सुचना विमाक कंपनीस 16/03/2009 रोजी दिली व विलंबाचे स्पष्टीकरण देखील दिलेले नाही,म्हणून गैरअर्जदाराने विमादावा देण्याचे नाकारुन कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 10 वर दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 13 वर 12 कागदपत्रांच्या यादीसह 12 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये पॉलिसीची कव्हरनोट, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास लिहिलेले पत्र, दाखल केलेले आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियती वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा L.M.L. कंपनीचे मोटार सायकल ज्याचा क्रमांक एम.एच. 22/डी/5551 चा मालक होता ही बाब नि.क्रमांक 14 वरील दाखल केलेल्या आर.सी.बुक वरुन सिध्द होते.तसेच अर्जदाराची मोटार सायकल ही दिनांक 21/02/2009 रोजी चोरीस गेली ही बाब नि.क्रमांक 4/2 वरील व 4/4 एफ.आय.आर वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. सदरची तक्रार अर्जदाराने मोंढा पोलिस स्टेशन परभणी येथे 03/03/2009 रोजी दिली होती ही बाब नि.क्रमांक 4/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे सदरच्या वाहनाची चोरी झाल्या बाबतची माहिती दिनांक 16/03/2009 रोजी गैरअर्जदारास दिली ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे सदरच्या वाहनाचा विमा काढला होता, व ज्या विम्याचा पॉलिसी क्रमांक 182003/31/2008/3302 असा होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील पॉलिसी कव्हरनोट वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.सदरची पॉलिसी ही 20/03/2008 ते 19/03/2009 पर्यंत वैध होती ही बाब देखील नि.क्रमांक 4/1 वरील दाखल केलेल्या पॉलिसी कव्हरनोट वरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरच्या वाहनाची चोरी झाल्यामुळे पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई रक्कम मिळावी, म्हणून गैरअर्जदार कंपनीकडे अर्ज दिल्यानंतर गैरअर्जदार कंपनीने सदरच्या अर्जदाराचा विमादावा नाकारला व नाकारण्याचे कारण दिनांक 21/02/2009 रोजी सदरच्या वाहनाची चोरी झाली व विमा कंपनीस 16/03/2009 रोजी माहिती दिली त्यामुळे तब्बल 22 दिवस उशिरा कळविले म्हणून अर्जदाराचा विमादावा नाकारण्यात येवुन नो क्लेम असा शेरा देवुन फाईल बंद करण्यात आली. ही बाब नि.क्रमांक 4/8 वरील दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते, वास्तविक अर्जदाराने विमा कंपनीकडे 22 दिवसा नंतर सदरच्या घटनेची माहिती देवुन पॉलिसीच्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे, हे स्पष्ट सिध्द होते.कारण सदरच्या पॉलिसी मध्ये कंडीशन या सदराखाली स्पष्ट लिहिलेले आहे की,
CONDITIONS
This Policy and the Schedule shall be read together and any word or expression to which a specific meaning has been attached in any part of this policy or of the Schedule shall bear the same meaning wherever it may appear. Notice shall be given in writing to the company immediately upon the occurrence of any accident or loss or damage and in the event of assistance as the Company shall require.म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीस अर्जदाराचा विमादावा उशिरा कळविला, म्हणून नामंजूर केले यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दली नाही याबाबत रिपोर्टेड केस Lakhan pal V/s United India Insurance Co. ltd. 2013 (2) CPR 517 (NC) या मध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने स्पष्ट मत व्यक्त केले आहे की, Insurance Company must be immediately informed after alleged theft. व मा.राष्ट्रीय आयोगाचे मत हे या तक्रारीला लागु पडते. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारुन कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही,म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष