निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 12/12/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 27/12/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19/10/2013
कालावधी 09 महिने. 22 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
राहुल भिकुलाल कासट. अर्जदार
वय 35 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.गोपाल दोडिया.
रा.मोंढा सेलू ता.सेलू जि.परभणी.
विरुध्द
1 शाखा अधिकारी, गैरअर्जदार.
द ओरीएन्टल इन्शुरन्स कं.लि. नांदेड. अॅड.बी.ए.मोदानी.
शाखा समन्स बजावल्याचे ठिकाण,
द शाखाधिकारी , द ओरीएन्टल इन्शुरन्स कं.लि.
दौलत बिल्डींग, शिवाजी चौक, परभणी ता.जि.परभणी.
2 श्री भारत पी रामराव डख,
वय 35 वर्षे, धंदा विमा एजंट, गजानन विमा सेवा केंद्र,
बस स्टँन्ड जवळ, सेलू,ता.सेलू जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा जिप क्रमांक MH-22-N-3500 चा अपघात विमा नुकसान दावा प्रलंबीत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा जिप क्रमांक MH-22-N-3500 चा मालक व ताबेदार आहे व सदरची जिप अर्जदाराने स्वतःच्या उपयोगासाठी खरेदी केली होती. सदर जिप खरेदी केल्या पासून अर्जदार प्रत्येक वर्षी गैरअर्जदार क्रमांक 1 चा एजंट गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे विमा उतरवित असे. सदरील जिपचा विमा अर्जदाराने अपघाताच्या पूर्वी गैरअर्जदार क्रमांक 2 एजंट मार्फत उतरविला होता. ज्याचा पॉलिसी क्रमांक 182000/31/2011/1017 असा असून सदर पॉलिसीचा कालावधी 25/02/2011 ते 24/02/2012 पर्यंत होता. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 05/05/2011 रोजी अर्जदार आपली सदरील जिप स्वतः चालवत सेलूहून स्वतःच्या कामासाठी जालना येथे जात होता, त्यावेळी सदर जिप जिंतूर जालना रोडवर मंठा ते वाटूर फाट्या दरम्यान वाटुर फाट्याजवळ असतांना अचानक सदरील जिप समोर एक जनावर आले व सदर जनावरास वाचविण्यासाठी अर्जदाराने ब्रेक दाबला असता सदरील जिप पल्टी झाली व जिपचे बरेच नुकसान झाले व अपघाता मध्ये अर्जदारास मार लागला. अर्जदाराने सदरील घटनेची कल्पना फोनव्दारे गैरअर्जदार क्रमांक 2 यांस कळविली असता गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सर्व्हेअर पाठवुन स्पॉट सर्व्हे केला व गाडीचे जास्त नुकसान असल्या कारणाने अर्जदारास औरंगाबाद येथे सदर जिप दुरुस्तीसाठी नेण्यासाठी सल्ला दिला. अर्जदाराचे नाते वाईकांनी सदरील जिप दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथील सोहन मोटार्स येथे टोचन करुन पाठविले तेव्हा गैरअर्जदाराने सोहन मोटार्स येथे अरविंद अंब्रे यांना सर्व्हेअर म्हणून पाठवुन फायनल सर्व्हे करुन घेतले व गाडी दुरुस्त करण्याकामी सुचना दिली. गैरअर्जदाराने डिव्हीजनल ऑफिस औरंगाबाद असले कारणाने सर्व कागदपत्रे तेथेच देण्यासंबंधी सुचना केल्यावरुन अर्जदाराने तेथे क्लेमफॉर्म, आर.सी.बुक, ड्रायव्हींग लायसेंस, इस्टीमेंट, पॉलिसी कॉपी, गाडी दुरुस्तीचे बिल, जुन 2011 पर्यंत पाठवुन दिली तेव्हा औरंगाबाद डिव्हीजन ऑफिसने सांगीतले की, सदरील नुकसानीचा चेक अर्जदारास रिजनल ऑफिसची मंजुरी घेवुन परभणी शाखाव्दारे जुन 2011 पासून 3 महिन्याच्या आत देण्यात येईल.
अर्जदाराने 3 महिने वाट पाहिली व परभणी शाखा तथा नांदेड शाखा येथे संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की, फाईल मंजूरीसाठी रिजनल ऑफिस नागपुर येथे गेली आहे. ती मंजूर झाल्यावर चेक मिळेल, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नंतर 13/04/2012 ला अर्जदाराने पत्र दिले की, बरीच महिने लाटून गेली क्लेम मिळाले नाही, कृपया क्लेम लवकरात लवकर देणे, परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. त्यानंतर अर्जदाराने परभणी शाखेचे वरखेडे व नांदेड शाखेचे श्री.मुंदडा यांच्याकडे वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी असे उत्तर दिले की, रिजनल ऑफिस कडून फाईल मंजूर होई पर्यंत ते चेक देवु शकत नाही, असे म्हणून उडवा उडवीचे उत्तरे दिली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदारास गाडी दुरुस्तीसाठी रु.1,50,000/- लागला व मानसिक व शारिरीकत्रास झाला व गैरअर्जदार क्रमांक 1 व2 यांनी अर्जदारास त्यांचा क्लेम लटकत ठेवुन त्रुटीची सेवा दिली या कारणाने अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश द्यावा की, अर्जदाराची जिप क्रमांक MH-22-N-3500 च्या अपघातात झालेले नुकसान रुपये 1,50,000/- मिळवुन अर्जदारास द्यावे. व गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी देवुन मानसिक शरिरीकत्रास दिल्या बद्दल 20,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व सदरील रक्कमेवर द.सा.द.शे.18 टक्के व्याजदर देण्या बाबत सदरील तक्रार खर्चासह मंजूर करावी. अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 4 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. ज्यामध्ये पॉलिसी कॉपी, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना लिहिलेले पत्र, आर.सी. बुक, अर्जदाराने दाखल केलेल्या बिलाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
गैरअर्जदारांना त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 15 वर लेखी जबाब दाखल केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही संपूर्णपणे खोटी व दिशाभुल करणारी आहे. व त्यातील संपूर्ण मजकुर गैरअर्जदार विमा कंपनीस अमान्य आहे. गैअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा जिप क्रमांक MH-22-N-3500 चा मालक व ताबेदार आहे व सदरची जिप अर्जदाराने स्वतःच्या उपयोगासाठी खरेदी केली याबद्दल गैरअर्जदार विमा कंपनीस व्यक्तीशः माहिती नसल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीना हा मजकूर अमान्य आहे व गैरअर्जदार विमा कंपनीने हे मान्य केले आहे की, अर्जदाराने सदरच्या जिपवर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे त्यांनी पॉलिसी घेतली होती, ज्या पॉलिसीचा क्रमांक 182000/31/2011/1017 अन्वये 25/02/2011 ते 24/02/2012 या कालावधीसाठी विमाकृत केलेली असल्याबद्दल मान्य आहे. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, दिनांक 05/05/2011 रोजी अर्जदार स्वतः सदरील जिप चालवत सेलु येथून जालना येथे जात असतांना त्याची जिप जिंतूर जालना रोडवर वाटुर फाटळ्या जवळ अचानक एक जनावर रस्त्यात आल्याने सदरील जिप पल्टी झाली व त्या जिपचा अपघात होवुन त्या वाहनाचे अतोनात नुकसान झाले. व अर्जदारास मार लागला या बद्दल गैरअर्जदार विमा कंपनीस व्यक्तीशः माहिती नसल्यामुळे गैरअर्जदारास सदरील गोष्टी अमान्य आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनी यास अपघाता बद्दल फोन वरुन सुचना दिल्यानंतर गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचा क्लेम नोंदवुन घेतला व त्यानंतर सर्व्हेअर नेमून घटनेच्या ठिकाणी सर्व्हे केला हे गैरअर्जदार विमा कंपनीस मान्य आहे, परंतु अर्जदारस सदरील जिप दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथे नेण्याचा सल्ला विमा कंपनीने केव्हाही दिला नव्हता. व गैरअर्जदार विमा कंपनीने हे मान्य केले आहे की, सदरील वाहनाचा अंतिम सर्व्हे सर्व्हेअर अरविंद अंब्रे यांनी सोहन मोटर्स औरंगाबाद येथे केल्याचे गैरअर्जदार विमा कंपनीस अमान्य नाही व गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, सदरील गाडी दुरुस्तीसाठी अर्जदारास रु. 1,50,000/- खर्च आला व त्यास मानसिक व शारिरीकत्रास झाला हे खोटे असून गैरअर्जदार विमा कंपनीने अमान्य केले आहे. व गैरअर्जदार विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार ही मुदत बाहय आहे. त्यामुळे नामंजूर करण्यात यावी. तसेच अर्जदार यांने मुदतीत मागणी प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता विमा कंपनीस केली नाही व त्यास अर्जदाराचा स्वतःचा निष्काळजीपणा शाबीत होतो व त्यामुळे अर्जदारास क्लेम मागण्याचा हक्क राहत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी. व गैरअर्जदार विमा कंपनीने मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा व गैरअर्जदार विमा कंपनीच्या हक्कात व अर्जदाराच्या विरोधात दंडात्मक 10,000/- रुपये मंजूर करण्यात यावे.
गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 21 वर 1 कागदपत्रांच्या यादीसह एक कागदपत्राची प्रत दाखल केलेली आहे, ज्यामध्ये सर्व्हेअर रिपोर्ट दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यास मंचाची नोटीस तामिल होवुन मंचासमोर गैरहजर, त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराची जिप क्रमांक MH-22-N-3500
चा अपघात नुकसान भरपाईचा विमादावा प्रलंबीत ठेवुन अर्जदारास
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा जिप क्रमांकMH-22-N-3500 चा मालक आहे. ही बाब नि.क्रमांक 4/4 वरील आर.सी.बुकच्या प्रतवरुन सिध्द होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे त्याच्या जिप क्रमांक MH-22-N-3500 चा विमा गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पॉलिसी क्रमांक 182000/31/2011/1017 अन्वये पॉलिसी काढली होती व सदर पॉलिसीचा कालावधी 25/02/2011 ते 24/02/2012 पर्यंत होता ही बाब नि.क्रिमांक 4/1 वर अर्जदाराने दाखल केलेल्या पॉलिसी प्रतवरुन सिध्द होते, व तसेच ही बाब गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्यांच्या लेखी जबाबात मान्य केले आहे. अर्जदाराच्या जिपचा अपघात दिनांक 05/05/2011 रोजी झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदरची जिपची नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्व्हेअर नियुक्त केले व जिपची नुकसान पाहणी करुन सर्व्हेअरने अहवाल तयार केला ही बाब नि.क्रमांक 21 वरुन सर्व्हेअर रिपोर्टवरुन सिध्द होते. अर्जदाराच्या जिपचा अपघात विमा कालावधी मध्ये झाला ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील पॉलिसी प्रत वरुन सिध्द होते. अर्जदाराने त्याच्या मालकीचा जिपचा अपघात दिनांक 05/05/2011 रोजी झाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीची प्रमुख शाखा यांच्याकडे अपघात दावा दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या अर्जावरुन सिध्द होते, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर जिप अपघाता मध्ये त्याच्या जिपचे नुकसान रु.1,50,000/- झाले होते, हे मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराने त्याबद्दल सबळ, ठोस व विश्वासार्ह पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही, परंतु अर्जदाराच्या जिपचे अपघता मध्ये रु.77,000/- चे नुकसान झाले होते ही बाब गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 21 वरील फायनल सर्व्हे रिपोर्टवरुन सिध्द होते, गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचा जिपचा अपघात विमादावा नुकसान भरपाई रु.77,000/- मंजूर न करता अर्जदाराचा अपघात दावा प्रलंबीत ठेवुन अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 ने निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचास वाटते. व अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 1 कडून त्याच्या जिपची अपघात नुकसान भरपाई म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 कडून रु. 77,000/- मिळवण्यास निश्चितच पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
रु.77,000/- फक्त ( अक्षरी रु.सत्याहत्तर हजार फक्त ) द्यावे.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- फक्त
(अक्षरी रु.पाचहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावेत.
4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.